18 December, 2016

‘सेल्फी विथ ट्री’ चे पारितोषिक जाहिर

हिंगोली, दि. 18 :- राज्यात वन विभागामार्फत घेण्यात आलेल्या ‘सेल्फी विथ ट्री’ या स्पर्धेचे लवकरच विभागस्तरावर पारितोषिक वितरण केले जाणार असून हिंगोलीतून अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी व रोजगार हमी योजना कार्यालयातील कर्मचारी गजानन जकाते यांना पारितोषिक दिले जाणार आहे.
राज्यात वन विभागातर्फे दि. 01 जुलै, 2016 रोजी दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात ‘सेल्फी विथ ट्री’ या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेस राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह नागरिकांनीही वृक्षलागवड करून सेल्फी काढून स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यानंतर वन विभागाने यातून 23 स्पर्धकांची पारितोषिकांसाठी निवड केली होती.
सदरील पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम नागपूर येथे आयोजित केला होता. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वीच अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने प्रातिनिधीक स्वरूपात पाच विजेत्यांना पारितोषिक दिले असून उर्वरित 18 स्पर्धकांना विभागस्तरावर कार्यक्रम घेऊन पारितोषिक देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यामुळे पुढील काही दिवसांत हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. या कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी व रोहयो विभागातील कर्मचारी गजानन जकाते यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

*****

No comments: