07 December, 2016

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘कॅशलेस पेमेंट’ कार्यशाळा संपन्न
हिंगोली, दि.06: देशात 500 आणि 1000 रुपयांच्या चलन बंद झाल्याने नागारिकांना दैनंदिन व्यवहारात अडचण निर्माण होत आहे. परंतू यासाठी आता सर्व बँकांनी ‘कॅशलेस पेमेंट’ ची सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे. आपल्या दैनंदिन व्यवहार करतांना कॅशलेस पेमेंटचा वापर कशाप्रकारे करावा यासाठी अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीसी सभागृहात ‘कॅशलेस पेमेंट’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 
            यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उप जिल्हा निवडणुक अधिकारी श्री. रणवीर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महेश मदान, स्टेट बँक ऑफ हैद्राबादचे व्यवस्थापक जयबीर सिंग आणि आरसेटीचे व्यवस्थापक प्रविण दिक्षीत यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘कॅशलेस पेमेंट’ चा वापर करणे ही काळाची गरज झाली आहे. दैनंदिन व्यवहार करतांना कॅशलेस पेमेंटचा वापर करण्यासाठी बँकांनी मोबाईल ॲप तयार केले असून, या ॲपच्या वापराने दैनंदिन व्यवहारात उपयोग होणार आहे. प्रत्येकाने आपले बँक खाते हे आधारशी आणि मोबाईल क्रमांकाशी संलग्न करुन घ्यावे. जेणेकरुन आपणांस कॅशलेस पेमेंट सुविधांचा वापर करण्यास मदत होईल. तसेच आपल्या खात्यात होणाऱ्या व्यवहाराची अद्ययावात माहिती प्राप्त होण्यास मदत होईल. सर्वांनी कॅशलेस पेमेंटचा वापर करावा तसेच इतरांनाही याबाबत माहिती देवून या सुविधेचा वापर करण्याबाबत प्रोत्साहित करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी यावेळी केले.
            कार्यशाळेत स्टेट बँक ऑफ हैद्राबादचे प्रविण कटरे यांनी बॅंकेने सुरु केलेल्या ‘SBI Buddy’ या ॲपबद्दल मार्गदर्शन केले. तर अलाहबाद बँकेचे श्री. मंडळ यांनी ‘UPI’ या ॲपबाबत मार्गदर्शन केले. बँक ऑफ बडोदाचे विनोद गित्ते यांनी मायक्रो एटीएस बद्दल माहिती देवून याचे प्रात्यक्षिक देखील करुन दाखवले.
            तर अप्पर जिल्हाधिकारी राम गगरानी यांनी बँक कार्ड , युएसएसडी, एईपीएस, युपीआई आणि पीओएस या सुविधांद्वारे देखील कॅशलेस पेमेंटद्वारे दैनंदिन व्यवहार करता येईल याची माहिती दिली.
कार्यशाळेस विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*****

No comments: