01 May, 2017

अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यास उत्कृष्ट खेळाडू निर्माण होतील
-- पालकमंत्री श्री. दिलीप कांबळे
        हिंगोली,दि.1: जिल्हा क्रिडा संकूलात विविध क्रिडा प्रकाराच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्‍ध करुन दिल्यास जिल्ह्यातून उत्कृ्‌ष्ट खेळाडू निर्माण होतील असे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास वक्फ राज्यमंत्री तथा पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
            क्रिडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रिडा संकुल, हिंगोली अंतर्गत येथील जिल्हा क्रिडा संकुल मध्ये मल्टीपर्पज इनडोअर हॉलच्या भूमिपुजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, नगर परिषदेचे नगराध्यक्ष बाबारावजी बांगर, आमदार तान्हाजी मुटूकळे, रामराव वडकुते, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी                     डॉ. एच.पी. तुम्मोड, उपविभागीय अधिकारी विवेक काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश देशपांडे, जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार, क्रिडा अधिकारी किशोर पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री. कांबळे यावेळी म्हणाले की, चांगले नागरिक घडण्यासाठी विविध क्रिडा प्रकार खेळणे आवश्यक आहे.  क्रिडागंणे ही उत्कृष्ट खेळाडू निर्माण करण्याचे कार्य करत असतात.  कारण क्रिडा प्रकारातून व्यक्तीमत्वाचा विकास होण्यास मदत होऊन एकसंघाची भावना निर्माण होण्यास मदत होते. आज भूमीपुजन करण्यात आलेल्या मल्टीपर्पज हॉल हा 40 बाय 30 मीटर या आकाराचा तयार करण्यात येणार असून, याकरीता 4 कोटी 11 लक्ष खर्च करण्यात येणार आहे. या हॉल मध्ये बॅडमिंटन, कबड्डी, व्हॉलीबॉल, बॉक्सिंग, टेबल टेनिस, ज्यूडो, कराटे आदी क्रिडा प्रकारच्या स्पर्धासाठी अत्याधुनिक सर्व सुविधा असलेला हॉल निर्माण


करण्यात येणार आहे. या मल्टीपर्पज हॉलचे काम उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना ही पालकमंत्री             श्री. कांबळे यांनी यावेळी संबंधीतांना दिल्या.
            तसेच अनेक दिवसापासून बंद पडलेला जलतरण तलाव दूरुस्त करुन नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात यावा. अर्थिक अडचणीमुळे जिल्ह्यातील जे खेळाडू मागे राहत आहेत त्यांना पुढे नेण्यासाठी विविध माध्यमातून अर्थिक मदत करण्यात येईल असे ही श्री. कांबळे यावेळी म्हणाले.
            जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले की, मल्टीपर्पज इनडोअर हॉलचे काम उत्कृष्ट दर्जाचे गुणवत्तापूर्ण व्हावे. तसेच खेळाडूंना या बॅडमिंटन हॉल उपलब्ध करुन दिल्यास खेळाडूना त्यांच्या सरावासाठी होणाऱ्या समस्येचा कायमचा प्रश्न सुटणार आहे. जिल्यातून चांगले उत्कृष्ट खेळाडूं निर्माण व्हावे यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना विविध खेळासाठी प्रोत्साहित करावे. जेणेकरुन भविष्यात हे खेळाडूं आपल्या जिल्ह्याचं तसेच देशाचं नाव उंचीवर नेण्याचे काम करतील. अशी अपेक्षा जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी व्यक्त केली.
            आमदार तान्हाजी मुटकुळे म्हणाले की, हिंगोली शहरातील खेळाडूंना तसेच नागरिकांना लवकरच बॅडमिंटन हॉल उपलब्ध करुन देण्यात येईल. बॅडमिंटन हॉल उपलब्ध करुन दिल्यामुळे खेळाडूंच्या क्रिडा क्षेत्राला वाव मिळेल. तसेच सदर काम लवकरात-लवकर पूर्ण होईल, अशी इच्छा श्री. मुटकुळे व्यक्त केली.
आमदार रामराव वडकुते म्हणाले की, या मल्टीपर्पज बॅडमिंटन हॉलमुळे खेळाडूंच्या सुप्त कलागुणांना वाव मिळणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले. क्रिडा अधिकारी किशोर पाठक यांनी सुत्रसंचालन केले. तर श्री. बेत्तीवार यांनी आभार मानले.
            यावेळी जिल्ह्यातील खेळाडू, नागरिक यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
****   













जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

        हिंगोली,दि.1: येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र दिनाच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी आणि उप जिल्हा निवडणुक अधिकारी गोविंद रणवीरकरआदीसह प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

*****



खत वितरणात पारदर्शकतेसाठी खतांची ऑनलाईन विक्री करण्यात येणार  
                                                                -- पालकमंत्री दिलीप कांबळे
हिंगोली,दि.1: यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार खते मिळावी आणि खत वितरणात पारदर्शकता यावी याकरीता सर्व कृषी सेवा केंद्रावर ई-पॉस मशिनद्वारे ऑनलाईन खतांची विक्री करण्यात येणार असल्याचे माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप व पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री तथा पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.
येथील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर महाराष्ट्र दिनाच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री कांबळे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शिवराणी नरवाडे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, पोलिस अधिक्षक अशोक मोराळे, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, राज्य राखीव पोलिस बलाचे समादेशक एन. एम. मिठ्ठेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय अधिकारी विवेक काळे आणि हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. कांबळे यावेळी म्हणाले की, यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात 3 लाख 90 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी होणार आहे. या पेरणी  क्षेत्रावर पेरणीकरीता पुरेशा प्रमाणात बियाणे आणि खतांची उपलब्धता झाली आहे. खत वितरणात पारदर्शकता यावी याकरीता शेतकऱ्यांना यावर्षी ई-पॉस मशिनद्वारे ऑनलाईन खतांची विक्री करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री कृषि पिक विमा योजने अंतर्गत सर्व पिकांना विम्याचे संरक्षण देण्यात येत असून, जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कांबळे यांनी करत हवामान खात्याने यावर्षी 96 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, चांगला पाऊस होणार असल्याचे सांगत डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत 2016-2017 या आर्थिक वर्षात मुदतीत पिक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 5 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. राज्यात यंदा तुर डाळीचे विक्रमी उत्पन्न झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने  5 हजार 50 रुपये प्रती क्विंटल या हमीभावाने नाफेडमार्फत जिल्ह्यात 7 हजार 582 मेट्रीक टन तुर डाळीची खरेदी केली असल्याचे कांबळे यावेळी म्हणाले.
पालकमंत्री श्री. कांबळे पुढे म्हणाले की, प्रत्येक गावात शाश्वत पाण्याची उपलब्धता आणि शेतीकरीता सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 124 तर दूसऱ्या टप्प्यात 100 गावांमध्ये जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली. तर तिसऱ्या टप्प्यात यावर्षी 80 गावांची निवड झाली असून, कामे सुरु करण्यात आली आहेत. जलयुक्त अंतर्गत जिल्ह्यात नदी-नाला खोलीकरण व सरळीकरणाची मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. तसेच नदी-नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे आणि विविध प्रकल्पातून लाखो घनमीटर गाळ लोकसहभागातून काढून शेतजमीनीवर टाकल्याने जमीन सूपीक होण्यास मदत झाली असल्याचे ते म्हणाले.
गतवर्षीच्या 2 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये मिळालेले यश उल्लेखनीय असून, राज्य शासनाने पुढील तीन वर्षात राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यानुसार राज्यात सन-2017 मध्ये 4 कोटी तर हिंगोली जिल्ह्यास 7 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
जिल्ह्यात 795 रास्तभाव दुकानापैकी 696 दुकाने ईपॉस अंतर्गत ऑनलाईन करण्यात आली आहेत. या दूकानामार्फत शिधापत्रिकाधारकांची आधार क्रमाकांशी ओळख जुळवून अन्न-धान्य वितरीत करण्यात येत आहे. आतापर्यंत 12 हजार कुटूंबाना ईपॉस मशीनद्वारे अन्नधान्य वितरीत करण्यात येत असल्याचे ही पालकमंत्री यावेळी म्हणाले.
जिल्ह्यातील तरुणांना स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुद्रा बँक योजने अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील शिशु, किशोर आणि तरुण या गटातील 3 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना 50 कोटी रुपयांचे कर्जाचे वितरण करण्यात आले आहे.
            जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत सर्वांना घरकुल योजने अंतर्गत ग्रामीण भागातील 4 हजार 512 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करुन बांधकामासाठी योजनानिहाय लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान देण्यात येत
आहे. वसमत, कळमनुरी पोलीस स्टेशनचे काम पुर्णत्वास आले असून, सर्व पोलीस स्टेशन मध्ये महिलांकरीता विश्रांती कक्ष आणि प्रसाधनगृह सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता दोन वसतीगृह बांधून पूर्ण झाले आहे. तसेच हुतात्मा स्मारक दूरुस्तीसाठी शासनाने 1 कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करुन दिला आहे.
            सन-1999 साली जिल्हा स्थापन होऊन देखील जिल्ह्यात अद्यापपर्यंत काही शासकीय व निमशासकीय कार्यालय सुरु झालेली नाहीत. सदर जिल्हा कार्यालय सुरु करण्यासाठी पाठपूरावा करण्यात येत असून, जिल्ह्यात यावर्षी लघु पाटबंधारे विभाग आणि सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हा अधिकारी ही दोन नवीन कार्यालये सुरु झाले असल्याची माहिती श्री. कांबळे यांनी दिली.
            केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन 2016-17 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 125 ग्रामपंचायतीमध्ये वैयक्तिक शौचालय बांधकामाचे 100 टक्के उद्दिष्ट पुर्ण झाले आहे. तसेच आतापर्यंत 291 ग्रामपंचायतीना निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झाले असून, 142 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त घोषित झाल्या आहेत. नुकतेच राज्य शासनाने हिंगोली आणि कळमनुरी नगर परिषदांना हागणदारी मुक्त घोषित केले आहे. तर वसमत नगर परिषदेने याबाबत ठराव घेतला आहे. तसेच औंढा नागनाथ आणि सेंनगाव पंचायत समिती यांनी मे अखेर पर्यंत हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार केला असल्याचे हि पालकमंत्री श्री. कांबळे यावेळी म्हणाले.
            यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थी यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तसेच यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘दामिनी (एक स्वयंपूर्णा)’ या पूस्तिकेचे विमोचन पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते पोलिस कवायत मैदानावर महाराष्ट्र दिनाचा 57 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर परेड कमांडर पोलीस उप-अधिक्षक सिध्देश्वर भोरे यांच्या समवेत पालकमंत्री कांबळे यांनी परेडचे संचलन करून मानवंदना स्वीकारत जिल्हावासियांना महाराष्ट्र दिन, कामगार दिन व हिंगोली जिल्ह्याचा स्थापना दिनानिमित्त सर्व जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या.
            यावेळी स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****