06 December, 2017

महापरिनिर्वाण दिनानिमत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन



वृत्त क्र. 567                                             
महापरिनिर्वाण दिनानिमत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
हिंगोली,दि.06: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली आणि हिंगोली जिल्हा सायकलींग असोसिएशन यांच्या वतीने दि. 06 डिसेंबर 2017 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी क्रीडा अधिकारी संतोष फुफाटे, जिल्हा सायकलींग असोसिएशनचे सचिव शिवाजी इंगोले, संजय ठाकरे, शेख अफसर, क्रीडा प्रेमी, संस्थाचालक, केशव मोरे, अर्जुन पवार, शेख सिकंदर आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
00000

14 वित्त आयोगातील प्राप्त निधीतून अंगणवाडीचे कामे होणार



वृत्त क्र. 566                                              
14 वित्त आयोगातील प्राप्त निधीतून अंगणवाडीचे कामे होणार
हिंगोली,दि.06: महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली अंतर्गत एकूण 1 हजार 89 अंगणवाडी  केंद्र कार्यान्वित असून त्यापैकी अपूर्ण स्थितीत असलेले अंगणवाडी बांधकामे व नादुरुस्त शौचालये पूर्ण करणे, तसेच शौचालय नसलेल्या अंगणवाडी केंद्राच्या ठिकाणी शौचालय बांधकाम करण्यासाठी 14 व्या वित्त आयोगातील प्राप्त निधी, ग्राम पंचायत स्तरावरील 10 टक्के निधी, बीआरजीएफ इत्यादी योजनेच्या आराखड्यात प्रस्तावित करुन पूर्ण करणेबाबत सर्व गट विकास अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना सूचित करण्यात आले आहे.  त्यानुसार गट विकास अधिकारी  यांच्या स्तरावरुन 26 अपूर्ण अंगणवाडी बांधकामे  14 व्या  वित्त आयोगातील  प्राप्त निधीतून  पूर्ण करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेली आहेत व उर्वरित अपूर्ण अंगणवाडी बांधकामे व शौचालये  निधी प्राप्त  होताच प्रथम प्राधान्याने  पूर्ण करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
तसेच 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून अपूर्ण अंगणवाडी बांधकामे पूर्ण करण्यासाठी व अंगणवाडी  केंद्राच्या  ठिकाणी  शौचालय बांधकामे/दुरुस्तीसाठी  अपेक्षित खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याकरिता  आयुक्त, एबाविसेयो, मुंबई यांच्या स्तरावरुन माहिती मागविण्यात आलेली असून सदरील माहिती व अपेक्षित  खर्चाचे अंदाजपत्रक त्यांचे  कार्यालयास सादर करण्यात आलेली आहेत. त्यांच्यास्तरावरुन  निधी प्राप्त होताच  सदरील कामे प्रथम प्राधान्याने  पूर्ण करण्याची  कार्यवाही करण्यात येईल. असे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.का) जिल्हा परिषद, हिंगोली यांन कळवले आहे.
000000

शेंदरी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन



वृत्त क्र. 565                                              दिनांक : 06 डिसेंबर 2017
शेंदरी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन
हिंगोली,दि.06: कपासीचे  फरदड  घेऊ नये , वेळेवर  कपासीची वेचणी करुन डिसेंबरनंतर शेतामध्ये कपासीचे पीक ठेवू नये . हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये  जनावरे किंवा शेळ्या , मेंढ्या चरण्यासाठी  सोडाव्यात . शेतातील पिकाचे  अवशेष जाळून टाकावेत. हंगाम संपल्यानंतर ताबडतोब  पऱ्हाटीचा वापर करावा किंवा बंदोबस्त करावा. शेतात किंवा शेताजवळ पऱ्हाटी रचून ठेवू नये. पीक  फेरपालट करावी. अंबाडी, भेंडी, मुद्रीका अशी पिके  कपाशीपूर्वी किंवा नंतर घेऊ नयेत. त्यामुळे या बोंडअळीच्या  जीवनक्रमात  खंड पडेल आश्रय ओळी लावावी. देशी कापूस , पारंपारिक बिगर बी.टी. कापूस किंवा  उशिरा लावलेली भेंडी हे आश्रय  पीक  म्हणून लावावे. नियमित सर्व बी.टी. कपासीचे सर्वेक्षण करावे. कामगंध सापळ्याचा वापर करुन किंवा हिरवी बोंडे फोडून या बोंड अळीचे सर्वेक्षण करावे.कामगंध सापळे आणि प्रकाश सापळ्याचा वापर करावा. हंगामामध्ये  हे सापळे शेतामध्ये आणि हंगाम संपल्यानंतर जिनिंग मिलजवळ बाजारामध्ये  लावावे. प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाते व बोंडे जमा करुन नष्ट करावेत. डोंमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळ्यासह नष्ट करावे. कामगंध सापळ्याचा वापर शेंद्री बोंड अळीचे पतंग मोठ्या प्रमाणात आकर्षित करणे आणि  नर मादी मिलनामध्ये अडथळे आणणे यासाठी करता येतो. कपासीची पऱ्हाटी उपटल्यानंतर शेताची खोल नांगरट करुन अळीचे कोष नष्ट करावे.
कमी कालावधीचे (150 दिवस) आणि एकाचवेळी  जवळपास वेचणी  करता येणाऱ्या  संकरित  वाणाची लागवड  करावी. रस शोषण करणाऱ्या  किडीसाठी  प्रतिबंधात्मक वाणाची  निवड करावी. यामुळे  या किडीच्या  व्यवस्थापनासाठी फवारण्यात  येणाऱ्या  काही किटकनाशकामुळे  फुले लावण्यात येणारी  अनियमितता टाळता येईल . ट्रायकोग्रामाटॉयडीया बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशीचे कार्ड (1.5 लाख अंडी/हे) शेतामध्ये  लावावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. व्ही.डी. लोखंडे  यांनी केले आहे .
00000

04 December, 2017

क्षयरुग्ण शोधमोहीम दिनांक 4 ते 18 डिसेंबर या कालावधीत राबवणार



वृत्त क्र. 564                                              दिनांक : 04 डिसेंबर 2017
क्षयरुग्ण शोधमोहीम दिनांक 4 ते 18 डिसेंबर या कालावधीत राबवणार
हिंगोली,दि.04: सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यकमांतर्गत  क्षयरोगाची लक्षणे  असणाऱ्या व्यक्तीचे रोगनिदान व त्यावरील औषधोपचार शासकीय संस्थांमध्ये मोफत केले जातात. बरेच रुग्ण लक्षणे असूनही क्षयरोगाबाबतच्या अज्ञानामुळे  तपासणी करुन घेत नाहीत. त्यामुळे  क्षयरोगाचा प्रसार झपाट्याने  होत आहे. समाजामध्ये  क्षयरोगाबाबत  जनजागृती  करणे तसेच निदान न झालेल्या क्षयरुग्णांचे निदान होण्याकरीता सक्रीय क्षयरुग्ण  शोध मोहिमेचा तिसरा टप्पा राज्यात 13 जिल्ह्यात  व 11 महानगरपालिका क्षेत्रात दिनांक 4 ते 18 डिसेंबर  या कालावधीत राबविण्यात  येत आहे . हिंगोली जिल्ह्यातही ही मोहीम  राबविण्यात येणार आहे .
झोपडपट्टी , ऊसतोड मजूर, विटभट्टी मजूर, रस्ते व बांधकाम  मजूर, निराधार, निराश्रीत, अनाथाश्रमे, वृध्दाश्रमे, स्थलांतरीत, नॅको ने निवडलेली जोखीमग्रस्त गावे आदी  अतिजोखमीच्या भागामध्ये  सर्व्हे होणार आहे. क्षयरोग  नियंत्रणासाठी जिल्ह्यात 1 लाख 13 हजार 345 जोखीमग्रस्त लोकसंख्येचा सर्व्हे आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत  घरोघरी जाऊन केला जाणार आहे.  क्षयरोग शोधमोहिमे दरम्यान आढळून आलेल्या संशयित क्षयरुग्णांची तपासणी  आवश्यकता असल्यास सीबीनॅट मशीनद्वारे  केली जाणार आहे .
संशयित रुग्णांचा थुंकी नमुना तपासणी व क्ष किरण तपासणी मोफत केली जाणार आहे. तरी  ज्यांना दोन आठवड्यांपासून खोकला, ताप, वजन कमी होणे , थुंकीवाटे रक्त पडणे इत्यादी लक्षणे  आढळून येणाऱ्या  व्यक्तींनी  या मोहीमेमध्ये मोफत थुंकी तपासणी  जवळच्या  सरकारी दवाखान्यात करुन घ्यावी . क्षयरोगाचे निदान झालेल्‍या  रुग्णावर मोफत  औषधोपचार केला जाणार आहे . या मोहिमेचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी , हिंगोली यांनी केले आहे .
00000

02 December, 2017

मतदार नोंदणीच्या विशेष मोहीमेस दिनांक 15 डिसेंबर 2017 पर्यंत मुदतवाढ



वृत्त क्र. 563                                               दिनांक : 02 डिसेंबर 2017
मतदार नोंदणीच्या विशेष मोहीमेस 
दिनांक 15 डिसेंबर 2017 पर्यंत मुदतवाढ
हिंगोली,दि.02: भारत निवडणूक आयोगाचे  निर्देशानुसार  मतदार नोंदणीसाठी मतदान केंद्रस्तरीय  अधिकारी  यांनी  घरो घरी भेटी  देवुन  राबविण्यात  येणाऱ्या  विशेष मोहीमेची  मुदत  दिनांक 15 डिसेंबर 2017 पर्यंत  वाढविण्यात आली आहे . मतदार नोंदणीपासून वंचित असलेल्या नागरिकांनी मतदार  म्हणून नोंदणी  करण्यासाठी  नमुना नं.6 मधील अर्ज , तसेच आपल्या कुटुंबातील  मयत , दुबार, स्थलांतरीत  झालेल्या  मतदारांची नावे मतदार  यादीतून वगळण्यासाठी  नमुना नं.8 मधील अर्ज  व त्याच  विधानसभा  मतदारसंघात मतदार यादीतील नाव स्थलांतरीत  करण्यासाठी नमुना 8 अ मधील अर्ज  आपल्या मतदान केंद्राच्या मतदान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे  किंवा संबंधित  तहसिल कार्यालयातील , निवडणूक शाखेकडे  सादर करावा तसेच अधिक माहितीसाठी https://ceo.maharashtra.gov.in  या वेबसाईटवर भेट द्यावी किंवा 02456-221113 या  दूरध्वनीवर संपर्क साधावा,असे आवाहन  जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक  अधिकारी , हिंगोली यांचे वतीने  करण्यात येत आहे .
00000