06 December, 2019

शासकीय कापूस खरेदीचा दिनांक 9 डिसेंबर रोजी शुभारंभ


शासकीय कापूस खरेदीचा दिनांक 9 डिसेंबर रोजी  शुभारंभ

             हिंगोली,दि.6 :- हंगाम 2019-20 मधील परभणी विभागातील शासकीय कापूस खरेदी सीसीआय चे सबएजंट म्हणून कापूस पणन महासंघातर्फे हिंगोली येथे सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता केंद्र शासनाच्या किंमत आधारभूत किमतीनुसार कापूस खरेदीचा शुभारंभ करण्याचे योजिले आहे.
            यावर्षी कापूस खरेदी केल्यावर शेतकऱ्यांना अदा करावयाची रक्कम आरटीजीएस/ एनईएफटी ने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे चालू हंगामातील कापूस पेऱ्याची अद्ययावत नोंद असलेला 7/12 उतारा, बँकेचे नाव, बँकेची शाखा, बँकेचे आईएफएससी कोड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स प्रत व शेतकऱ्यांचा बँकेशी संलग्न (लिंक) केलेला मोबाईल नंबर व ई-दस्ताऐवज सोबत आणावेत.
            वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार यांचे परिपत्रकानुसार शासकीय कापूस खरेदी केंद्रावर फक्त FAQ  दर्जाचाच कापूस स्विकारण्यात येणार आहे. FAQ दर्जाच्या कापसाला रुई धाग्याची लांबी, तलमता व आर्द्रता यानुसार भाव देण्यात येणार आहे. 12%  च्या वर आर्द्रता असलेला कापूस केंद्रावर स्विकारला जाणार नाही.
            शेतकरी बांधनानी जास्तीत जास्त कापूस शासकीय कापूस खरेदी केंद्रावर विक्रीस आणावा, असे आवाहन कापूस पणन महासंघाचे परभणी विभागाचे संचालक पंडितराव चोखट व विभागीय व्यवस्थापक ए.डी. रेणके यांनी केले आहे.
00000

05 December, 2019

जिल्ह्यात सर्वत्र कलम 37 (1) (3) लागू


जिल्ह्यात सर्वत्र कलम 37 (1) (3) लागू

             हिंगोली,दि.5: कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी हिंगोली शहर आणि पूर्ण जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) लागू करण्यात आला आहे. हा आदेश 6 ते 20 डिसेंबर 2019 या कालावधीत लागू असेल, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी कळवले आहे.
            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, मुस्लिम समाजातर्फे  बाबरी मस्जीद पतन दिन म्हणून जिल्हयात काळा दिवस पाळण्यात येतो, श्री. दत्त जयंती, महानुभव पंथीय सत्संग सोहळा व संत संमेलनाच्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीस शस्त्र, काठी, तलवार, बंदुक बाळगता येणार नाही. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक जन्य बाळगता येणार नाही. दगड, क्षेपणिक उपकरणे गोळा करता येणार नाही किंवा जवळ बाळगता येणार नाही. सभ्यता, नीतीमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे, निशाणी, घोषणा फलक बाळगण्यास मनाई असेल. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना दुखावतील असे असभ्य वर्तन करता येणार नाही. पाच किंवा अधिक व्यक्तींना रस्त्यावर जमता येणार नाही. मात्र शासकीय कामावर असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी , विवाह अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा, परवानगी दिलेले मिरवणूक कार्यक्रमास हे आदेश लागू होणार नाहीत, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. कार्यक्रम मिरवणुकीस परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधिक्षक अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांना राहतील, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
*****


03 December, 2019

संत श्री जगनाडे महाराज यांची 8 डिसेंबर रोजी जयंती साजरी करण्याचे आवाहन


संत श्री जगनाडे महाराज यांची 8 डिसेंबर रोजी जयंती साजरी करण्याचे आवाहन


हिंगोली,दि.3: महाराष्ट्राचे थोर संत आराध्य दैवत संत श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती यावर्षी पासून प्रथमच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये साजरी करण्याबाबत शासनाचे आदेश आहेत.
सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये संत श्री जगनाडे महाराज यांची जयंती 8 डिसेंबर रोजी साजरी करण्यात यावी. असे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

****


परभणी येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन


परभणी येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

हिंगोली,दि.3: सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी 4  ते 13 जानेवारी, 2020 या कालावधीत सोल्जर (जनरल ड्युटी), सोल्जर टेक्निकल व सोल्जर ट्रेड्समन या पदासाठी परभणी येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी इच्छूक उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर दि. 19 डिसेंबर, 2019 पर्यंत आपली नोंद करावी.  तसेच दि. 20 डिसेंबर ते दि. 2 जानेवारी, 2020 पर्यत भरती करीता ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करुन घ्यावे. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले .

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे 2020 मधील परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे 2020 मधील परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

हिंगोली,दि.3: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2020 मध्ये  होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्य सेवा परीक्षा 2020 साठीची मुख्य परीक्षा शनिवार पासून 3 दिवस आणि सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा ही शनिवारी घेण्यात येणार आहे. उर्वरित सर्व पूर्व तसेच मुख्य परीक्षा रविवारी घेण्यात येणार आहे.
राज्यसेवा परीक्षा 2020 साठीची जाहिरात डिसेंबर 2019 मध्ये प्रसिद्ध होईल. पूर्व परीक्षा दि. 5 एप्रिल, 2020 रोजी तर मुख्य परीक्षा शनिवार दि. 8 ऑगस्ट ते सोमवार दि. 10 ऑगस्ट, 2020 अशी तीन दिवस घेण्यात येणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेसाठी जानेवारी-2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा दि. 1 मार्च रोजी तर मुख्य परीक्षा दि. 14 जून, 2020 रोजी घेण्यात येणार आहे.
सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2020 साठी जानेवारी-2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा दि. 15 मार्च, 2020 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 12 जुलै, 2020 रोजी घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेसाठी फेब्रुवारी-2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा दि. 3 मे, 2020 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2020 साठी मार्च-2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून पूर्व परीक्षा दि. 10 मे रोजी तर मुख्य परीक्षा दि. 11 ऑक्टोबर, 2020 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी मार्च-2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दि. 17 मे, 2020 मध्ये घेण्यात येणार आहे. सदर वेळापत्रक किंवा अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
****


02 December, 2019

समाज कल्याण विभागाच्या दिव्यांग कल्याणाकरिता विविध योजना


समाज कल्याण विभागाच्या दिव्यांग कल्याणाकरिता विविध योजना

            हिंगोली, दि.2 : जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, हिंगोली कार्यालयाकडून दिव्यांग कल्याणाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात- सदर योजनांची माहिती खालील प्रमाणे आहे.
व्यंग अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहनपर अनुदान योजना- सदर योजनेतंर्गत एखादया दिव्यांग व्यक्तीसोबत सुदृढ व्यक्तीने विवाह केल्यास अशा जोडप्यास प्रोत्साहनपर अनुदान म्हणून विभागाकडून रु.25000/- रोख व रु.25000/- चे राष्ट्रीय बचत पत्र या स्वरुपात अनुदान देण्यात येते. दिव्यांग जनांसाठी बीज भांडवजल योजना- सदर योजनेतंर्गत दिव्यांग व्यक्तींना लघुउदयोगासाठी बॅकेमार्फत रु.150000/- च्या मर्यादेत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. सदर मंजुर कर्जाच्या एकूण रकमेवर 20 टक्के सबसीडीची रक्कम विभागाकडून बॅकेस अदा केली जाते. 5 टक्के दिव्यांग कल्याण निधी - सदर योजनेतंर्गत प्रत्येक आर्थीक वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या स्वउत्तपन्नाच्या 5 टक्के एवढा निधी हा दिव्यांग कल्याण करिता राखून ठेवण्यात येतो. सदर निधीमधून दिव्यांग व्यक्तींना स्वंयरोजगारासाठी विविध साहित्य खरेदी साठी 100 टक्के अनुदान देण्यात येते. शालांतपूर्व शिक्षण घेणा-या दिव्यांग विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती - सदर योजनेतंर्गत इ.1 ते 10 वी पर्यंत शिक्षण घेणा-या दिव्यांग विदयार्थ्यांना शासनाकडून दिव्यांगांच्या प्रवर्गानुसार शिष्यवृत्तीचे विदयार्थ्यांच्या बॅकखातेवर अनुदान जमा करण्यात येते. तरी  वरील योजनांचा जास्तीत जास्त दिव्यांग बंधूनी लाभ घेणेबाबत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी आवाहन केले आहे.
000



ओल्या दुष्काळातही रेशीम शेतीने तारले






ओल्या दुष्काळातही रेशीम शेतीने तारले

हिंगोली, दि.2: संपूर्ण राज्यात ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाले. परंतू रेशीम शेती याला अपवाद ठरली हिंगोली जिल्ह्यातील रेशीम शेतकऱ्यांनी या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
वसमत तालूक्यातील पांगरा शिंदे या गावातील रेशीम शेतकरी श्री. सुशील रावसाहेब शिंदे यांनी जुलै 2019 ते नोव्हेंबर 2019 या पाच महिन्याच्या कालावधीत चार वेळा एकूण 750 रेशीम आणि त्याचे संगोपन करून 708 कि.ग्रॅ. रेशीम कोषाचे उत्पादन घेऊन या चार पिकाद्वारे 2 लाख 48 हजार 306 रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
याप्रकारे जिल्ह्यातील सुमारे 50 रेशीम शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत अवघ्या 5 महिन्याच्या कालावधीत 1 लाखाहून अधिक रुपयाचे उत्पन्न घेतले आहे. तसेच 140 शेतकऱ्यांनी 50 हजार रुपयापेक्षा जास्त उत्पन्न घेऊन रेशीम शेतीने प्रतिकूल परिस्थितीत देखील शेतकऱ्यांना संजीवनी देणारी उत्तम जोड व्यवसाय असल्याचे सिद्ध केले आहे.
ओल्या दुष्काळात पारंपारिक पिकांप्रमाणे रेशीम शेतीचे कुठलेही नुकसान होत नसून वाढलेल्या आर्दतेचा चांगला परिणाम कोष उत्पादनावर होवून चांगले उत्पन्न्‍ मिळते. त्यामुळे जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा मार्ग अवलंबून स्वतःची आर्थिक स्थिती बळकट करावी, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी  स्वप्नील तायडे व प्रगतीशील रेशीम शेतकरी सुशील शिंदे यांनी केले आहे.
श्री. सुशील शिंदे यांनी रेशीम शेतीत विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक श्री वडवळे, प्रवीण चव्हाण यांनी सत्कार करून गौरव केला. तसेच इतर शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.

****