06 January, 2020

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना · लाभार्थ्यांनी आधार-कार्ड प्रमाणे PM-KISAN पोर्टल वरील नावात दुरुस्ती करुन घ्यावी.


केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
·         लाभार्थ्यांनी आधार-कार्ड प्रमाणे PM-KISAN पोर्टल वरील नावात दुरुस्ती करुन घ्यावी.
हिंगोली, दि.6 : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात 1 लाख 90 हजार 958 लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी PM-KISAN पोर्टलवर झालेली आहे. त्यानुसार पात्र लाभार्थी यांचे खात्यावर पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याची रक्कम जमा करण्याची कार्यवाही केंद्र शासनाकडून सुरु आहे. तथापि केंद्रशासनाच्या निर्देशानुसार PM-KISAN योजनेचे पुढील हप्ते (चौथा हप्ता) Aadhar base payment वर आधारीत असल्याने लाभार्थी यांनी आधार-कार्ड प्रमाणे लाभार्थ्यांचे नाव PM-KISAN पोर्टलवर दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. आधार-कार्ड प्रमाणे PM-KISAN पोर्टलवरील नाव दुरुस्त करण्यासाठी पुढीलप्रमाणे तालुकानिहाय लाभार्थी संख्या आहे. औंढा नागनाथ 17 हजार 415, वसमत 18 हजार 236, हिंगोली 16 हजार 440, कळमनुरी 16 हजार 347 व सेनगाव 18 हजार 484 अशी एकूण 86 हजार 922 लाभार्थी संख्या आहे.
            त्यानुषंगाने तालुकास्तरावर तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी, गट विकास अधिकारी यांच्यामार्फत मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या सन्मान योजनेत नावात त्रुटी असलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या तहसिलस्तरावर व तलाठी, कृषि सहायक, ग्रामसेवक यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यानुसार PM-KISAN पोर्टलवर ज्या लाभार्थ्यांचे नाव PM-KISAN पोर्टलवरील नाव आधार-कार्ड प्रमाणे नसेल त्यांनी आधार-कार्ड वरील नावाप्रमाणे दुरुस्ती करावयाचे आहे. त्यांना सदर सुविधा https://www.pmkisan.gov.in या वेब लिंक वर Farmer Corner या Tab मध्ये Edit Aadhaar failure record मध्ये असून शेतकऱ्यांनी स्वत: आपल्या ॲड्राईड मोबाईल द्वारे किंवा आपल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्रावर (CSC) जावून आधार-कार्ड वरील नावाप्रमाणे PM-KISAN पोर्टलवरील नाव लवकरात लवकर दुरुस्त करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी  हिंगोली यांनी केले आहे.

*****



04 January, 2020

शासकीय तंत्रनिकेतन येथे विज्ञान प्रदर्शनी संपन्न





शासकीय तंत्रनिकेतन येथे विज्ञान प्रदर्शनी संपन्न

हिंगोली,दि.4: येथील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत दि. 3 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी तसेच निबंध स्पर्धा, भित्तीपत्रक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील ए.बी.एम. इंग्लिश स्कूल हिंगोली, जिल्हा परिषद बहुविध प्रशाला, गोरखनाथ माध्यमिक विद्यालय चौंढी, अहिल्यादेवी होळकर कन्या शाळा वसमत, बालाजी विद्यालय, वाई, ता. कळमनुरी, विद्यासागर विद्यालय खानापूर, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, वसमत या शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्पर्धेची सुरुवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉ. आर. के. सावंत, प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी पी. बी. पावसे, उपशिक्षणाधिकारी श्री. मलदोडे आदींची  उपस्थिती होती.
यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्वरांच्या हस्ते पारितोषिके वितरीत करण्यात आली. यामध्ये निबंध स्पर्धेत बालाजी विद्यालय, वाई येथील पांडूरंग रिठे, भित्तीपत्रक स्पर्धेत गोरखनाथ विद्यालय आंबा चोंढी येथील ज्ञानोजी भोसले, विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेत जिल्हा परिषद बहुविध प्रशाला हिंगोली येथील हर्षवर्धन पुंडगे व ग्रुप, टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धेत अहिल्यादेवी होळकर वसमत येथील वैष्णवी डुकरे यांनी प्रथम विजेत्यांचा मान मिळविला.
****


जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सभापती निवडीसाठी 14 जानेवारी रोजी सभा


जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सभापती निवडीसाठी  14 जानेवारी रोजी सभा

हिंगोली,दि.4: महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 83 उपकलम 1-अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी हिंगोली यांनी जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे  सभापती पदाची निवड करण्यासाठी दिनांक 14 जानेवारी, 2020 रोजी दुपारी 2.00 वाजता हिंगोली जिल्हा परिषदेच्या सभागृहात सभा आयोजित केली आहे. याकरीता उपविभागीय अधिकारी, हिंगोली यांची या सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
वरिल विषय समित्यांची सभापती पदाची निवडणूक ही जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 व महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती) व (पंचायत समित्याचे सभापती, उपसभापती) निवडणूक नियम-1962 त्याखालील नियम यामधील तरतुदीनुसार घेण्यात यावी, असे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
****

03 January, 2020

सायबर सुरक्षिततेबाबत सदैव सतर्क असणे आवश्यक - पोलीस अधिक्षक योगेशकुमार









सायबर सुरक्षिततेबाबत सदैव सतर्क असणे आवश्यक
-         पोलीस अधिक्षक योगेशकुमार

हिंगोली,दि.3: माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे आजच्या डिजिटल युगात ‘सायबर सुरक्षितता’ हा विषय अत्यंत महत्वाचा असून त्याबाबत  प्रत्येकाने सदैव सतर्क असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पोलीस अधिक्षक योगेशकुमार यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सायबर सेफ वूमन’ आणि ‘महिला सुरक्षा’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजणे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार आणि अशोक घोरबांड, सायबर तज्ज्ञ विक्रम सारस्वत, ॲड. सत्यशिला तांगडे, ॲड. जयश्री सावरगावकर, ॲड. वैशाली देशमुख, सहायक पोलीस निरिक्षक प्रभा पुंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
श्री. योगेशकुमार म्हणाले की, सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र असून, यामुळे जगभरातील माहिती एका क्‍लिकवर सहज प्राप्त करणे शक्‍य झाले आहे. आज एक व्यक्ती जगातील कुठल्याही कोपऱ्यातून दुसऱ्या व्यक्‍तीशी फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम आदी या सारख्या समाज माध्यमाद्वारे सहज संवाद साधू शकतो. थोडक्‍यात काय तर समाज माध्यमे ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहेत. सोशल मीडियाचे चांगले फायदे असले, तरी आज सोशल मीडियाच्या होत असलेल्या अती वापरामुळे समाजात रोज नव-नवीन समस्या निर्माण होत आहेत. आजच्या तरुणाईकडून समाज माध्यमांचा सर्वात जास्त वापर होत आहे. आजची युवा पिढी समाज माध्यमांच्या अभासी जगात एवढे रमले आहेत की त्यांचा बाह्य जगाशी संपर्कच तुटला आहे.
तसेच ऑनलाईन शॅापींग, ऑनलाईन बॅंकीग व्यवहाराकरीता स्मार्ट फोन, संगणक या माध्यमांचा वापर होत आहे. समाजातील ज्येष्ठ नागरीक, महिला, विद्यार्थी, युवक हे याद्वारे मोठ्या प्रमाणात व्यवहार करत असताना ई-प्रणालीचा जबाबदारी आणि जागरुक राहून उपयोग करणे गरजेचे आहे. या व्यवहारांमध्ये पुरेशी काळजी घेतली जात नाही. ऑनलाइन व्यवहार करताना सावधानता बाळगण्याची गरज असून, नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे, तसेच कार्यशाळेच्या माध्यमातून मिळणारी माहिती उपस्थितांनी नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन ही पोलीस अधिक्षक योगेशकुमार यांनी केले.
यावेळी ॲड. सत्यशिला तांगडे सायबर सुरक्षा विषयावर मार्गदर्शनात म्हणाल्या की, महिलांनी सोशल मीडियाचा वापर करतांना स्वत: दक्ष राहून काळजी घ्यावी. आपली वैयक्तिक माहिती, छायाचित्र, पत्ता, बँकीग व्यवहाराची माहिती इत्यादी शेअर करु नये. सोशल मीडियाद्वारे आपल्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याची जास्त शक्यता असते. स्त्री ही अबला नसून सबला आहे. ॲड. श्रीमती तांगडे म्हणाल्या की, मुलींना स्वयंसिध्द होण्यासाठी स्वयंसिध्दतेचे शिक्षण देण्याचे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी सायबर विषयक विविध घडणाऱ्या गुन्ह्यांविषयी घ्यावयाची खबरदारी तसेच सायबर गुन्ह्यातील विविध कलमांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
ॲड. जयश्री सावरगावकर महिला सुरक्षा या विषयावर बोलतांना म्हणाल्या की, आजच्या युगात स्त्री ही कणखर झाली पाहीजे. तसेच समाजात येणाऱ्या विविध  समस्यांना तिने समर्थपणे सामोरे गेले पाहीजे. यावेळी त्यांनी गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा, कलम 376, कलम 354, कौटूंबीक कायदे सन-2005, आदी विविध कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
ॲड. वैशाली देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैगिंक छळापासून संरक्षण आणि त्यावरील विविध उपाय आणि कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी कार्यालयात स्थापन करण्यात येणाऱ्या विशाखा समिती विषयी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी पोस्को कायद्यातील विविध कलमांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
सहायक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, आजच्या काळात महिलांनी स्वत:चे संरक्षण करण्यासाठी स्वयंसिध्द होण्याची आवश्यकता आहे. तसेच महिलांच्या संरक्षणाकरीता जिल्ह्यात पोलीस विभागामार्फत ‘पोलीस दीदी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थीनींना तक्रार नोंदविण्यासाठी तक्रार पेटीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
यावेळी सायबर तज्ज्ञ विक्रम सारस्वत यांनी पॉवर पॉईट प्रेझेंटेशनद्वारे सायबर जगतात घडणारे विविध प्रकारचे गुन्हे यामध्ये लैंगिक छळ, नोकरीचे प्रलोभन, लग्नाचे आमिष, ऑनलाईन गेमींग, खोटी माहिती देणारी संकेतस्थळे, सायबर स्काउट, बँकीग विषयक फसवणूक इत्यादी  गुन्हे घडण्याची पार्श्वभूमी, गुन्ह्यांपासून बचावात्मक कसे राहावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
सायबर तज्ज्ञ विक्रम सारस्वत यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, त्यामध्ये असणारे धोके, ऑनलाइन व्यवहार करतांना तसेच सोशल मीडीयाचा वापर करतांना घ्यावयाची काळजी आदी बाबींवर सादरीकरण केले. तसेच  मोबाईलवर अनावश्यक अॅप डाउनलोड करू नये, ॲप डाउनलोड करतांना आपली वैयक्तिक माहिती देवू नये. आपला पासवर्ड परिचित व्यक्तीलाही सांगू नये, फसव्या मेलपासून सावध रहावे. मोबाईल, संगणक यावर चांगल्या दर्जाची संरक्षण यंत्रणा ठेवावी. अशी माहिती त्यांनी दिली.
महिला व बालकांवर होणारे अत्याचार तसेच सायबर गन्हे रोखण्यासाठी व यासंदर्भातील कायद्याची माहिती देण्यासाठी आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमीत्त राज्यभर एकाच दिवशी ‘सायबर सेफ वूमन’ ही जनजागृती मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी प्रास्ताविकात दिली.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्यांती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.
कार्यशाळेचे सुत्रसंचालन महिला व बालविकास विभागाच्या संरक्षण अधिकारी माया सूर्यवंशी यांनी केले. तर जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांनी आभार मानले. कार्यशाळेस यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थीनी, प्राध्यापक वृंद, सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी, पोलीस अधिकारी-कर्मचारी, तसेच पत्रकार आदी उपस्थित होते.

****



जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी




जिल्हाधिकारी कार्यालयात
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
        हिंगोली, दि. 3 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गीरगांवकर,  उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर, जिल्हा उपनिबंधक सुधीर मैत्रेवार आदीसह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.
*****

‘नारी शक्ती’ पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन


‘नारी शक्ती’ पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

हिंगोली, दि.3 : सामाजिक क्षेत्रात ज्या महिलांनी मौलिक कार्य केले आहे अशा महिलांच्या सन्मानार्थ व त्यांच्या नावे पाच राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतात. पुरस्काराचे नाव ‘नारी शक्ती’ पुरस्कार असून ठराविक रक्कम व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना सदर पुरस्कार 8 मार्च या ‘जागतिक महिला दिनी’ दिला जातो.
ज्या महिलांनी विधवा, परितक्त्या, निराधार, अपंग, महिलांचे पुनर्वसन करणे अनाथ, अपंग बालकांचे पुनर्वसन करणे अशा कार्यात ज्या महिलांनी जाणीवपूर्वक प्रयत्न व कार्य केले आहे. शैक्षणिक प्रशिक्षण कार्य, पर्यावरण क्षेत्र, महिला स्वावलंबन क्षेत्र तसेच शेती व्यवसाय काबाड कष्ट करणाऱ्या महिलांचे श्रम विविध तांत्रिक यंत्राद्वारे जाणीवपूर्वक कमी करण्याचे काम केले आहे, अशा महिलांचा सदर पुरस्कारासाठी विचार करण्यात येतो.
सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांनी अधिक सहभाग घ्यावा यासाठी ज्या महिलांनी जाणीवपूर्वक  प्रयत्न केले आहेत. तसेच स्त्रियांशी निगडीत असलेल्या प्रशनांना विविध माध्यमाद्वारे उदा. रेडिओ, दूरदर्शन कलेद्वारे विविध कार्यक्रम करुन समाजात जागृती करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार दिला जातो. तरी हिंगोली जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्या व समाज सेविका यांनी आपले प्रस्ताव नारी शक्ती पुरस्कारासाठी, अर्ज योग्य त्या कागदपत्रांसह केवळ ऑनलाईन प्रक्रीयेद्वारे केंद्र शासनाचे www.narishaktipuraskar.wed.gov.in/ www.wcd.nic.in या वेबसाईटवर भरावयाचे आहेत. केवळ ऑनलाईन अर्जच स्विकारले जातील असे मार्गदर्शक सूचनेमध्ये नमूद केले आहे. तसेच अर्ज भरण्याची अंतिम दि. 7 जानेवारी 2020 आहे.
तरी जास्तीत-जास्त महिलांनी अर्ज भरावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
****

02 January, 2020

‘सायबर सेफ वुमन’ आणि ‘महिला सुरक्षा’ विषयावर कार्यशाळेचे आयोजन


‘सायबर सेफ वुमन’ आणि ‘महिला सुरक्षा’
 विषयावर कार्यशाळेचे आयोजन

हिंगोली, दि.2: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय आणि पोलीस अधिक्षक कार्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त्‍ विद्यमाने ‘सायबर सेफ वुमन’ आणि महिला सुरक्षा’ या विषयावर शुक्रवार, दिनांक 3 जानेवारी, 2020 रोजी  जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे दूपारी 12.00 वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळा ही जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, यावेळी प्रमुख पाहूणे म्हणुन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, खासदार हेमंत पाटील, आमदार विप्लव बाजोरिया, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार चंद्रकांत नवघरे, पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची उपस्थिती राहणार आहे.
तसेच यावेळी ॲड सत्यशिला तांगडे या ‘महिला सुरक्षा’ विषयावर मार्गदर्शन करणार असून ॲड जयश्री सावरगावकर या ‘सायबर सेफ वुमन’ या विषयावर श्रीमती वैशाली देशमुख या ‘लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण’ या विषयावर, सायबर तज्ज्ञ विक्रम सारस्वत हे सायबर गुन्हे आणि  सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे या ‘महिला सुरक्षा’ या विषयावर या कार्यशाळेत मार्गदर्शन करुन सविस्तर माहिती देणार आहेत.
तरी या कार्यशाळेस जिल्ह्यातील शालेय महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थीनी, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी, पोलीस ठाण्याच्या महिला दक्षता समितीच्या महिला सभासद आणि मुलांचे पालक आणि सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय आणि पोलीस अधिक्षक कार्यालय यांनी केले आहे.

                                                            ****