09 April, 2021

प्रशासनाने योग्य नियोजन करुन कोरोनाची रुग्ण संख्या कमी करण्याचा प्रयत्न करावा - पालकमंत्री वर्षाताई गायकवाड

 


हिंगोली,(जिमाका)दि.09: मागील एक महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असुन मृत्यू पण जास्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य नियोजन करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करत रुग्ण संख्या कमी करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना पालकमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांनी दिल्या.

       आज झुम ॲपद्वारे हिंगोलीचे पालकमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या झुम बैठकीस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार उपस्थित होते.  

यावेळी बोलताना पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरुन न जात आपली आणि आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मास्क वापरावा, वेळोवेळी हात धुवावे व सुरक्षित शारीरिक अंतर ठेवावे. खाजगी रुग्णांलयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना गरज असल्यासच रेमडिसिवीर द्यावी. बसस्थानकावर येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची ॲन्टीजन तपासणी करावी. तसेच गंभीर स्वरुपाचे लक्षणे आढळल्यास RTPCR तपासणी करावी.

 तसेच जिल्ह्यात रेमडिसिवीर इंजेक्शन जास्त दरांने विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. याकरीता या औषधाच्या प्राप्त, वापर व शिल्लक साठ्याबाबतची माहिती जिल्ह्यात उपलब्ध असुन त्यावर प्रशासनाने नियंत्रण ठेवावे. लसीकरणांसाठी आरोग्य विभागाने लसीची मागणी करुन मुबलक साठा ठेवून लसीकरण करावे. जिल्ह्यात सर्वत्र लसीकरण करण्यात येत असुन ग्रामीण भागातून यास अल्प प्रतिसाद मिळत आहे. याकरिता ग्रामीण भागात लसीकरणांबाबत जनजागृती करुन जनतेला लसीकरण करुन घेण्याबाबत प्रोत्साहित करावे अशा ही सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. तसेच तपासणीचे प्रमाण, कोविड सेंटर, ऑक्सिजन पुरवठा, लसीकरणाची आणि जिल्ह्यात राबविण्यात उपक्रमांची व सुविधांची माहिती घेऊन जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले .

             यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांनी जिल्ह्यात मागील पूर्ण वर्षभरात 4 हजार पाझिटीव्ह रुग्ण आढळून होते. परंतु टेस्टींगचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यामुळे दि. 1 फेब्रुवारी ते 8 एप्रिल, 2021 पर्यंतच्या कालावधीत 4 हजार 240 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आढळून आली असून रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याची माहिती दिली. रुग्णामंध्ये वाढ होण्याचे प्रमाण इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी आहेत. तसेच या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाटा उपलब्ध आहेत. कोविडचे सर्व केंद्र सुरु करण्यात आले आहेत. तसेच खाजगी दोन डीसीएचसी व दोन सीसीसी सेंटर सुरु करण्यात आले आहेत. आक्सिजनचा साठा मुबलक आहे. आयसीयूमध्ये दाखल रुग्णांनाच रेमडिसिवीर इंजेक्शनचा वापर करायचा असताना इतर रुग्णांनाही रेमडिसिवीरचे इंजेक्शन देत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांना सूचना देण्यात आल्या असून रेमडिसिवीर इंजेक्शनचा विनाकारण वापर केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे सांगितले .

            रुग्णांची तपासणीसाठी नवीन आरटीपीसीआर मशीन मागविली आहे. ही मशीन उपलब्ध झाल्यावर आरटीपीसीआरचे टेस्ट वाढणार आहेत.

            तसेच जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी 58 हजार 920 व्हॅक्सीन उपलब्ध झाले होते. त्यापैकी 47 हजार 515 लसीकरण करण्यात आले असून शिल्लक असेलेले व्हॅक्सीन दोन दिवस पुरेल, असे सांगितले. सध्या दररोज दीड ते दोन हजार व्हॅक्सीन  देण्यात येत आहे.

            जिल्ह्यातील वसमत व कमळनुरी मध्ये कोरोनाबाधिताचे प्रमाण जास्त आहे. जी गावे जास्त प्रभावित आहेत ती गावे कंटोन्मेंट झोन घोषित करुन त्या गावातील संपूर्ण नागरिकांचे तपासण्या करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यावेळी दिली.   

****

08 April, 2021

जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना प्रवेशास मनाई - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 08 :  जिल्ह्यात कोरोना विषाणूचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना तसेच जिल्हाधिकारी यांना भेट देण्यासाठी येणाऱ्या अभ्यांगताना दि. 30 एप्रिल, 2021 पर्यंत परवानगीस मनाई केली आहे. नागरिकांच्या कामासाठी  ई-मेल पत्ता : rdc.hingoli123@gmail.com प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार नागरिकांनी त्यांच्या कामासाठी ई-मेलचा वापर करावा. तसेच खूप अपवादात्मक परिस्थितीत जिल्हाधिकारी यांची भेट घ्यावयाची झाल्यास भेट देणाऱ्या अभ्यांगताकडे 15 दिवस कालावधीतील वैध असलेले आरटीपीसीआर चाचणी अहवाल नकारात्मक असलेले प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत.

            या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम  1897 अन्वये दंडनीय , कायदेशीर कारवाई संबंधित  पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी, असे आदेश दिले आहेत.  

****

हिंगोली जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, बार, दारु दुकाने पूर्णपणे बंद -- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 08 : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरंट, हॉटेल्स, बियर व वाईन बार, बियर व वाईन दुकाने (शॉपी) आणि देशी दारु दुकाने दि. 30 एप्रिल, 2021 पर्यंत पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत.

            या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम  1897 अन्वये दंडनीय , कायदेशीर कारवाई संबंधित अधिकारी व  पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी, असे आदेश दिले आहेत.  

****

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 255 रुग्ण ; तर 192 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


·  993 रुग्णांवर उपचार सुरु तर सहा रुग्णांचा मृत्यू

 

हिंगोली, (जिमाका) दि. 08 : जिल्ह्यात 255 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 22, वसमत परिसर 53 व्यक्ती, कळमनुरी परिसर 36 व्यक्ती, औंढा परिसर 21 व्यक्ती  व सेनगाव परिसर 04 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 24 व्यक्ती, औंढा परिसर 04 व्यक्ती, वसमत परिसर 34 व्यक्ती, सेनगाव परिसर 11 व्यक्ती, कळमनुरी परिसर 46 व्यक्ती असे एकूण  255 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 192 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज सहा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे . 

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 180 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 25 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 205 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 7 हजार 986  रुग्ण झाले असून, त्यापैकी  6 हजार 881 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 993 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 112 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

 

07 April, 2021

गोळीबार सरावासाठी 5 ते 24 एप्रिल या कालावधीत मौजे वगरवाडी येथील क्षेत्र उपलब्ध

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 07 : महाराष्ट्र जमीन  महसूल  अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील  कलम 33 (1) (ख) व (प)  नुसार मौजे  वगरवाडी  ता. औंढा, जि. हिंगोली  येथील फायरींग रेंज सर्वे नं. 25 व 29 या परिसरात  दि. 05 ते 24 एप्रिल, 2021 पर्यंत  पोलीस कर्मचाऱ्यांना  वार्षिक गोळीबारीचा सराव  करण्यास  परवानगी  देण्यात येत आहे.

            या कालावधीत पुढील अटीवर गोळीबार  सरावासाठी  मैदान उपलब्ध  करुन देण्यात येत आहे. हे ठिकाण  धोकादायक  क्षेत्र म्हणून  घोषित करण्यात आले आहे. परिसरात  गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सूचना  पोलीस अधिकारी यांनी  दवंडीद्वारे  व ध्वनीक्षेपकाद्वारे  संबंधित  गावी सर्व संबंधितांना  द्याव्यात. तसेच तहसीलदार औंढा नागनाथ व पोलीस  स्टेशन हट्टा यांनी मौ. वगरवाडी  फायरींग बट परिसरात  दवंडीद्वारे व ध्वनीक्षेपकाद्वारे  या आदेशाची  प्रसिध्दी  करावी, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.

****

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 195 रुग्ण ; तर 155 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


·  936 रुग्णांवर उपचार सुरु तर एका रुग्णांचा मृत्यू

 

हिंगोली, (जिमाका) दि. 07 : जिल्ह्यात 195 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 21, वसमत परिसर 34 व्यक्ती, कळमनुरी परिसर 21 व्यक्ती, औंढा परिसर 09 व्यक्ती  व सेनगाव परिसर 02 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 71 व्यक्ती, औंढा परिसर 06 व्यक्ती, वसमत परिसर 05 व्यक्ती, सेनगाव परिसर 02 व्यक्ती, कळमनुरी परिसर 24 व्यक्ती असे एकूण  195 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 155 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज एका कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे . 

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 145 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 25 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 170 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 7 हजार 731 रुग्ण झाले असून, त्यापैकी  6 हजार 689 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 936 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 106 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

 

 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती चाचणीची कामे विहित क्षमतेपेक्षा 25 टक्के इतक्या संख्येने नियमितपणे सुरु

 


जनतेनी सहकार्य करण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 07 : जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनातर्फे आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी वेळोवेळी निर्देश / आदेश जारी केलेले आहेत. त्याअनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील  शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती व इतर कामकाज नियंत्रित करण्यात आले आहे. तरीही गर्दी रोखणे शक्य होत नाही. गर्दी नियंत्रणासाठी पुरेसे मनुष्यबळ कार्यालयात उपलब्ध नाही. कार्यालयात कर्मचारी व अधिकारी यांची संख्या अतिशय तोकडी असल्याने कोरोनापासून त्यांचा बचाव न झाल्यास भविष्यातील कार्यालयीन कामकाजावर दिर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता संभवते.

या कारणाने हिंगोली जिल्ह्यातील शिकाऊ अनुज्ञप्ती यांच्या अपॉईटमेंटचा प्रतिक्षा कालावधी एका महिन्यावर गेल्याने लोकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे नागरिकांची सोय व्हावी म्हणून तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 8 एप्रिल, 2021 पासून शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी, पक्की अनुज्ञप्ती चाचणी ही कामे विहीत क्षमतेपेक्षा 25 टक्के इतक्या संख्येने नियमितपणे सुरु राहतील. तसेच इतर कार्यालयीन कामकाज 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीप्रमाणे करण्यात येईल. योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज नेहमीप्रमाणे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे गर्दी न करता चालू राहील. केंद्र शासनाने वाहन विषयक, अनुज्ञप्ती विषयक कागदपत्राची वैधता दि. 30 जुन, 2021 पर्यंत वाढविलेली आहे. याची सर्वांनी नोंद घेवून विनाकारण कार्यालयात गर्दी करु नये.

अर्जदारानी प्रत्येक कामासाठी घेतलेल्या अपॉईटमेंटच्या निर्धारीत वेळेत मास्क, हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझर इत्यादीसह उपस्थित राहावे. सर्वांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे बंधनकारक असेल. तसेच शासन आदेशाप्रमाणे अभ्यांगतांना कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांना प्रत्यक्ष भेटण्याची परवानगी देण्यात येणार नाही. आपल्या कोणत्याही कामासाठी, चौकशीसाठी आपण mh38@mahatranscom.in आणि dyrto.38-mh@gov.in ई-मेलवर संपर्क साधावा. उक्त बाबीची सर्व अर्जदारांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

****