22 August, 2022

 

पोळा सणाच्या कर निमित्त वाई गोरखनाथ मार्गावरील

वसमत-औंढा रोडवरील वाहतूक मार्गात बदल

 

हिंगोली (जिमाका), दि.22 : प्रतिवर्षाप्रमाणे दि. 26 ऑगस्ट, 2022 रोजी पोळा हा सण साजरा करण्यात येणार असून दि. 27 ऑगस्ट, 2022 रोजी कर हा सण साजरा करण्यात येत आहे. या कर सणानिमित्ताने कुरुंदा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाई येथील गोरखनाथ मंदिरास हिंगोली, लातूर, परभणी व नांदेड जिल्ह्यातील जवळपास 25 हजार ते 30 हजार बैलजोड्या दर्शनास व प्रदक्षिणा मारण्यासाठी बैलाचे मालक घेऊन येतात. त्यामुळे वसमत-औंढा रोडवर बैलांची व बैल फिरविण्यासाठी आणणाऱ्या लोकांची बरीच गर्दी होते. हा रस्ता राज्य महामार्ग  असल्याने सदर रोडवर वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू असते व या दिवशी वाहतूक चालू राहिल्यास अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने वसमत टी पॉईंट ते नागेशवाडी पर्यंत रहदारीचा रस्ता हा दि. 26 ऑगस्ट, 2022 चे 00.00 ते दि. 27 ऑगस्ट, 2022 रोजीचे 24.00 वाजे पावेतो बंद करण्यात येऊन नांदेडकडून येणारी वाहतूक वसमत, झिरो फाटा, हट्टा जवळा बाजार मार्गे नागेशवाडी असे पर्यायी मार्गाने औरंगाबादकडे व औरंगाबादकडून नांदेडकडे जाणारी वाहतूक ही नागेशवाडी, जवळा बाजार हट्टा, झिरो फाटा मार्गे वसमत ते नांदेडकडे वळविण्यासाठी आदेश होण्यास विनंती केली आहे.  

पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या अहवालानुसार सदर रस्ता हा राज्य महामार्ग असल्याने रोडवर वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू असते. या दिवशी वाहतूक चालू राहिल्यास अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने रस्ता वळविणे आवश्यक आहे.

त्यामुळे जिल्हादंडाधिकारी हिंगोली यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ख) अन्वये प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन वसमत टी पाईंट ते नागेशवाडी पर्यंत रहदारीचा रस्ता हा               दि. 26 ऑगस्ट, 2022 चे 00.00 ते दि. 27 ऑगस्ट, 2022 रोजीचे 24.00 वाजे पावेतो बंद करण्यात येऊन नांदेडकडून येणारी वाहतूक वसमत, झिरो फाटा, हट्टा जवळाबाजार मार्गे नागेशवाडी असे पर्यायी मार्गाने औरंगाबादकडे व औरंगाबादकडून नांदेडकडे जाणारी वाहतूक ही नागेशवाडी, जवळा बाजार, हट्टा, झिरो फाटा मार्गे वसमत ते नांदेडकडे वळविण्यात आले आहे.

या आदेशाची माहिती पोलीस अधिकारी वाहतूक यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे प्रसिध्द करावी व सर्व उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार, नगर परिषद, पोलीस स्टेशन कार्यालयाचे नोटीस बोर्डावर डकवून प्रसिध्दी देण्यात यावी. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द नियमानुसार कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

******

19 August, 2022

 

आरोग्य विभागाची आढावा बैठक संपन्न

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथरोग होऊ नये

याबाबत सर्वांनी सतर्कता बाळगावी

- मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने

 



हिंगोली (जिमाका), दि.19 : जिल्हा प्रशिक्षण केंद्र हिंगोली येथे आज मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व सर्व जिल्हा समन्वयक यांची आढावा बैठक घेण्यात आली.

यामध्ये राष्ट्रीय कार्यक्रमनिहाय आढावा घेण्यात आला. कुष्ठरोग कार्यक्रमाबाबत सविस्तर आढावा घेतला व नवीन कुष्ठरुग्ण शोधून त्यांना लवकर उपचाराखाली आणणे तसेच माहे सप्टेंबर मध्ये जिल्ह्यात दि.13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान कुष्ठरोग शोध व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येणार असल्याचे डॉ.सुनील देशमुख यांनी सांगितले. त्यानंतर हिवताप रुग्णाबाबत आढावा घेण्यात आला. यामध्ये आरोग्य कर्मचारी यांना गृहभेटी दरम्यान तापीच्या रुग्णाचे रक्त नमुने घेऊन त्यांना उपचार द्यावा. तसेच संशयित  डेंग्यू रुग्ण आढळून आल्यास तात्काळ रक्तजल नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात यावेत व प्रतिबंधात्मक उपाय योजना करावे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या तापीच्या रुग्णाचे रक्त नमुने घ्यावेत व उपचार द्यावा व संसर्गजन्य आजाराबाबत आढावा घेण्यात आला. तसेंच प्राथमिक आरोग्य केंद्र , उपकेंद्र स्तरावर प्रसूतीचे प्रमाण वाढवावे. नियमित लसीकरण हे नियोजित ठिकाणी नियोजित वेळेत करावे. ते कोणत्याही परिस्थितीत रद्द करण्यात येऊ नये, बाह्यरुग्ण विभागामध्ये येणाऱ्या रुग्णांना गुणात्मक व दर्जेदार आरोग्य सेवा द्यावी, कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करावे, तसेच आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने कोविड-19 लसीकरण व बूस्टर डोस नागरिकांना देण्यात यावेत, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे साथरोग होऊ नये याबाबत सर्वांनी सतर्कता बाळगावी. सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयास राहावे. भेटी दरम्यान गैरहजर आढळून आल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.सचिन भायेकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास  शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सतीश रुणवाल, डॉ.नामदेव कोरडे, डॉ.संदीप काळे, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे डॉ. देवेंद्र जायभाये, डॉ.सुनील देशमुख, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश जाधव, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, कमलेश ईशी, श्रीमती वडकुते, अनिता चव्हाण, आरोग्य सहाय्यक डी. आर. पारडकर, अमोल कुलकर्णी, संदीप मुरकर, अजहर अल्ली, बापू सूर्यवंशी, मुनाफ आदी उपस्थित होते.

******

 शेतकरी उत्पादक कंपनीनी गोदाम बांधकाम अनुदानासाठी अर्ज करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि.19 : विविध केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल तेल अभियान अंतर्गत सन 2022-23 या योजनेअंतर्गत 250 मे.टन क्षमतेचे गोदाम बांधकाम या बाबीसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12 लाख 50 हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे. ही बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छूक शेतकरी उत्पादक संघ/कंपनी यांनी अर्ज सादर करावा.

यासाठी वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषानुसार डिझाईन, स्पेसिफिकेशन, खर्चाचे अंदाज पत्रकाप्रमाणे बांधकाम या आर्थिक वर्षात पूर्ण करणे बंधनकारक आहे. गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषिमाल साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना योग्य व माफक दर आकारुन करावा. याबाबत 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज्ड हमीपत्र आवश्यक आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा, आधारकार्ड व बँक खात्यांचा तपशील इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाकडे दि. 30 सप्टेंबर 2022 पूर्वी सादर करावेत. पूर्वसंमती देण्यात आलेल्या कंपन्यांनी बांधकाम पूर्ण केल्यानंतर त्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान शेतकरी उत्पादक कंपनी/संघ यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर पध्दतीने वर्ग करण्यात येईल.

या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उत्पादक संघ/कंपनी यांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषि विभागाच्या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

******

 एकात्मिक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापन निविष्ठांच्या अनुदानाचा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि.19 : विविध केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल तेल अभियान अंतर्गत पिकांसाठी सन 2022-23 या योजने अंतर्गत खरीप व रब्बी अंतर्गत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापन या बाबीसाठी पिक संरक्षण औषधे, तणनाशके, जिप्सम, जैविक खते, जैविक कीड नियंत्रण या निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना किंमतीच्या 50 टक्के कमाल 500 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मर्यादेत लाभ देय आहे.

सध्या खरीप हंगामातील पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांना कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार निविष्ठा खरेदी केल्यास राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल तेल अभियान सन 2022-23 उत्पादन वाढीसाठी निविष्ठा पुरवठा घटक-प्रकल्पा बाहेरील या बाबीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खालीलप्रमाणे अनुदान अनुज्ञेय आहे.

सूक्ष्म मुलद्रव्ये, जिप्सम, जैविक खताच्या एकूण किमतीच्या 50 टक्के कमाल 500 रुपयाच्या मर्यादेत 2 हेक्टर क्षेत्रासाठी देय आहे. तसेच पिक संरक्षण औषधे, तणनाशके, जैविक कीड नियंत्रण इत्यादी किंमतीच्या 50 टक्के किंवा कमाल 500 रुपये हेक्टर देय आहे. एका शेतकऱ्याला कमाल 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वरील निकषानुसार निविष्ठा खरेदी करुन त्याची खरेदी पावती , सातबारा, आधारकार्ड व बँक खात्यांचा तपशील इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाकडे खरीप हंगामासाठी दि. 15 सप्टेंबर 2022 पूर्वी व रब्बी हंगामासाठी दि. 30 डिसेंबर 2022 पूर्वी सादर करावेत. त्यानुसार त्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर पध्दतीने वर्ग करण्यात येईल. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

******

18 August, 2022

 

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिवस साजरा



 

हिंगोली (जिमाका), दि.18 : भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषाविषयक भेद न करता सर्वांनी सामंजस्याने कार्य करणे आणि अहिंसा व संविधानाच्या मार्गाने मतभेद सोडविण्याचा प्रयत्न करण्यासंदर्भातील सदभावना दिवसाची प्रतिज्ञा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना दिली.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासकीय इमारतीतील अधिकारी, कर्मचारी यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन सामुहिक प्रतिज्ञा घेतली.

******  

17 August, 2022

 

निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार

क्षेत्रीय डाक जीवन विमा अधिकारी म्हणून काम करण्याची संधी

 

हिंगोली, (जिमाका) दि. 17 :  परभणी डाक विभागाकडून डाक जीवन विमा (PLI) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) योजनेअंतर्गत "क्षेत्रीय डाक जीवन  विमा अधिकारी’’  (Field Officer)  म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत.

इच्छूक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज दि. 30 ऑगस्ट, 2022 रोजी कार्यालयीन वेळेत (11.00 17.00) अधीक्षक डाकघर, परभणी विभाग, परभणी- 431401 येथे थेट मुलाखतीसाठी हजर राहावे व सोबत बायोडाटा, मूळ कागदपत्र, प्रमाणपत्र/सेवामुक्ती प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे.

यासाठी उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 65 वर्ष असावे. अर्जदार हा केंद्र किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही खात्याचा निवृत्त अधिकारी, कर्मचारी असावा. तसेच त्याच्यावर कुठल्याही प्रकारची विभागीय, शिस्तभंगाची कारवाई चालू नसावी. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विमा बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती आदी बाबींचे ज्ञान तपासले जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपये अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी NSC/KVP च्या स्वरुपात असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. जो IRDA ची परवाना परीक्षा उतीर्ण केल्यानंतर कायम स्वरुपाच्या परवानामध्ये रुपांतरीत केली जाईल. ही परीक्षा 3 वर्षाच्या आत उतीर्ण करणे अनिवार्य राहील. उमेदवाराची नियुक्ती ही लायसन्स तत्वावर आणि कमिशन तत्वावर राहील, असे डाकघर अधीक्षक, परभणी विभाग, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

******

 

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा आयोजनाची कार्यवाही सुरु

- सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य मंत्री

 

हिंगोली, (जिमाका) दि. 17 :  शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धांच्या कार्यवाहीस सुरुवात झाली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. दि. 15 नोव्हेंबर, 2022 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे

याबाबत संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, दिनांक 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर, 2022 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. 61 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक 15 नोव्हेंबर, 2022 पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच 61 व्या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी 01 जानेवारी 2023 पासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच 19 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची स्पर्धेची प्राथमिक फेरी 01 जानेवारी 2023 पासून 10 केंद्रांवर आयोजित करण्यात येणार असून दिव्यांग बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी फेब्रुवारी 2023 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी दिली आहे.

           नाट्य स्पर्धेसाठी 03 हजार रुपये इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष, तर बालनाट्य स्पर्धेसाठी 01 हजार रुपये  इतक्या रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल.

            नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या www.mahasanskruti.org या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळयाखाली उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. 15 सप्टेंबर, 2022 पर्यंत खालील पत्त्यावर सादर कराव्यात.

1) मुंबई, कोकण व नाशिक विभागातील संस्थांनी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-32 (022-22043550) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

2) पुणे महसूल विभागातील संस्थांनी, सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, बंगला क्रमांक-4, विमानतळ रोड, पुणे (7579085918) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

3) औरंगाबाद महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, रुम नंबर-02, एमटीडीसी बिल्डिंग, गोल्डी टॉकीजच्या समोर, स्टेशन रोड, औंरगाबाद-431005 (08788893590) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात. 

4) नागपूर व अमरावती महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, द्वारा : अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय, अस्थायी प्रदर्शन हॉल, तळमजला, सिव्हिल लाईन, नागपूर-440001 (0712-2554211) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

        विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशील भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल. प्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची सर्व स्पर्धक संस्थांनी कृपया नोंद घ्यावी.

         स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेसाठी संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल. 

           राज्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

*****