28 March, 2023

 

एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण करण्यासाठी

बँक खात्याचा तपशील सादर करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील पात्र लाभधारकांना माहे जानेवारी, 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतीमहा प्रती लाभार्थी 150 रुपयाप्रमाणे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहे. या योजनेत आज रोजी 37 हजार 536 शिधापत्रिकाधारक आहेत. थेट हस्तांतरण योजना (DBT-Direct Benefit Transfer)  कार्यान्वित करण्यासाठी योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक असलेला बँक खात्याचा तपशील दि. 28 फेब्रुवारी, 2023 रोजीच्या शासन निर्णयासोबत जोडलेल्या नमुन्यात संबंधित रास्त भाव दुकानदारांकडे अथवा तहसील कार्यालय पुरवठा विभाग यांच्याकडे उचित कागदपत्रे, प्रमाणपत्राची पूर्तता करुन अर्ज सादर करणे अत्यावश्यक आहे.

या योजनेंतर्गत वितरीत करावयाची रोख रक्कम महिला कुटुंब प्रमुखाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. महिला कुटुंब प्रमुखाचे कोणत्याही बँकेत खाते नसल्यास सदर महिलेस बँक खाते काढून घेणे गरजेचे आहे.

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शिधापत्रिकेवर नोंद असलेल्या सर्व सदस्यांचे आधार क्रमांक शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीशी (RCMS) संलग्न असणे आवश्यक राहील. म्हणजेच शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीवर (RCMS) आधार क्रमांक संलग्न असलेल्या लाभार्थ्यांनाच डीबीटी योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार आहे.

एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी उक्त नमूद केल्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे संबंधित रास्त भाव दुकानदार अथवा तहसील कार्यालय (पुरवठा) विभागाकडे त्वरित उपलब्ध करुन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.    

*****  

 

शासनाचे रोखीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी

जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा रात्री दहा वाजेपर्यंत चालू ठेवावेत

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : महाराष्ट्र कोषागार नियम 1968 खंड एक नियम क्रमांक 409 अन्वये शासकीय रोखीचे व्यवहार पूर्ण करण्याच्या दृष्टीने दि. 31 मार्च, 2023 रोजी  जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा उशिरापर्यंत म्हणजेच रात्री 10.00 वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.   

*****

पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे

29 व 30 मार्च रोजी आयोजन

           

हिंगोली (जिमाका), दि. 28  :  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर (एनसीएस) हिंगोली यांच्यामार्फत हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने  दि. 29 ते 30 मार्च 2023 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे..

बंन्सल कोचिंग क्लासेस, हिंगोली यांचे टेलीकॉलर ची 4  महिलांची पदे, अकाऊंटंट- 2, रिेशेप्श्ननिस्ट-1 महिला, बॅच कॉर्डिनेटर-1, ॲकॅडमिक हेड-1, ऑफिस बॉय/सफाईगार-4 पदे भरण्यात येणार आहेत. टेलीकॉलर पदासाठी शैक्षणिक पात्रता बी.एस्सी पदवी/डी.एड, अकाऊटंट पदासाठी बी.कॉम, टॅली, डीटीपी 1 वर्ष अनुभव, रिसेप्शनिस्ट पदासाठी पदवी, बॅच कॉर्डिनेटर पदासाठी बीएस्सी, ॲकेडमिक हेड साठी एम.एसस्सी बी.एड 1 वर्ष अनुभव, ॲकेडमिक हेड या पदासाठी एम.एससी बी.एड 1 वर्ष अनुभव, ऑफिस बॉय/सफाईगार पदासाठी  दहावी/बारावी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. तसेच डीएसटीए एज्यूकेशन फॉऊंडेशन एमआयडीसी पुणे यांची दहावी/बारावी शैक्षणिक पात्रता असलेली 40 पदे, दहावी आयटीआय पात्रतेचे वेल्डरची 20 पदे भरण्यात येणार आहेत.

या रोजगार मेळाव्यात बंन्सल कोचिंग क्लासेस, हिंगोली व डीएसटीए एज्यूकेशन फाऊंडेशन एमआयडीसी चिंचवड पुणे या कंपनीचे 70 पेक्षा अधिक रिक्तपदे अधिसूचित केलेली आहेत. जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, पदवी, बी.एससी, डी.एड, बी.कॉम, टॅली आणि डिटीपी या शैक्षणिक अर्हतेनुसार https://rojgar.mahaswayam.gov.inwww.ncs.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत.

नोकरी इव्छुक उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदासाठी ऑनलाईन अर्ज करावेत. जेणे करुन त्यांना ऑलनाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल. याबाबत काही अडचण आल्यास 7972888970 किंवा 7385924589 या भ्रमणध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

****** 

27 March, 2023

 

जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी

तृणधान्य व हळद यासह विविध विषयावर मार्गदर्शन

           




हिंगोली (जिमाका), दि. 27  :  जिल्हा कृषि महोत्सवामध्ये आज दि. 27 मार्च 2023 रोजी  तृणधान्य, हळद या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. हरिहर कौसडीकर यांनी हळद पिकांसाठी जमिनीचे आरोग्य कसे असावे. तसेच माती नमुने काढुन पृथकरण करावे, खते देण्यात यावीत. जमिनीमध्ये सेंद्रीय कर्ब कमी झाला असुन सेंद्रीय कर्बाची वाढ करण्यासाठी सेंद्रीय कर्बाचा जमिनी मध्ये मोठया प्रमाणात वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रल्हाद बोरगड यांनी शेतकरी उत्पादक कंपनी कशी स्थापन करावयाची व त्यामध्ये येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाची मात याविषयी माहिती दिली. तसेच कंपनी अंतर्गत असणाऱ्या सभासदांना होणारे फायदे या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. नोडल अधिकारी जी.बी. बंटेवाड यांनी मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पाची उदिष्टे व त्यामध्ये समाविष्ट बाबीबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रात वरद कंपनीचे संचालक श्री. राठोड यांनी शेतीमध्ये ड्रोनचा वापर वाढविण्यात यावा. ड्रोन शेतीमध्ये फवारणी करण्यासाठी कशाप्रकारे वापरावे, त्याचे फायदे, त्याची किंमत इत्यादीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच भविष्य काळात ड्रोनचा वापर शेतीमध्ये फवारणीसाठी मोठया प्रमाणात होईल, असे सुध्दा सांगितले. त्यांनतर पणन मंडळ, संभाजीनगर यांच्या मार्फत खरेदीदार-विक्रेता यांचे संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले.  यामध्ये नांदेड, सांगली, वसमत व हिंगोली येथील खाजगी व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविला व सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच या संम्मेलनामध्ये माजी आमदार गजाननराव घुगे यांनी सहभाग घेऊन शेतकरी, व्यापारी व शासकीय विभाग यांच्या अडचणीवर मार्ग काढावा, जेणेकरुन शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल, असे सांगितले. कृषि विज्ञान केंद्राचे  प्रमुख पी. पी. शेळके यांनीही  तांत्रिक बाबीविषयी मार्गदर्शन  केले.

आज सांयकाळी 5.00 वाजेपपर्यंत झालेल्या नोंदणी नुसार 1200 पेक्षा अधिक लोकांनी प्रदर्शनास भेट दिली. तसेच नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या सुध्दा 1200 पेक्षा अधिक होती, असे  युवराज शहारे, प्रकल्प संचालक, आत्मा हिंगोली यांनी सांगितले .

******

 

जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाच्या चौथ्या दिवशीही विविध विषयावर मार्गदर्शन

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 27  :  उद्या दि. 28 मार्च 2023 रोजी जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचा चौथ्या दिवशी विविध विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये  ड्रॅगनफ्रुट लागवड तंत्रज्ञानाबाबत सेनगाव येथील रमेश जाधव यांचे, करवंद लागवड तंत्रज्ञान व त्यावरील यशोगाथे कथन वसमत येथील बालाजी यशवंते यांचे. त्यांनतर एनसीडीईएक्स नागपूर  यांच्यातर्फे शेतमाल खरेदी विक्री बाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच गोदाफार्म शेतकरी उत्पाद कंपनी लि. कळमनुरी याच्यातर्फे शेतकऱ्यांना हळद, सोयाबीन, हरभरा शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत खरेदी/विक्री बाबत मार्गदर्शन करणार आहेत. कृषि विज्ञान केंद्राच्या रोहिणी शिंदे यांनी  शेतमाल पिकाचे मुल्यवर्धन या विषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर डॉ. साईनाथ खरात कृषि विज्ञान केंद्र, तोंडापुर यांनी सेंद्रीय/नैसर्गिक शेती पध्दती तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. जालना येथील श्रीमती. सिताबाई मोहिते यांनी शेतकऱ्यांना फळप्रक्रिया तंत्रज्ञान या विषयी सखोल मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ज्या शेतऱ्यांना प्रदर्शनाचे स्टॉल पाहत-पाहत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. त्यांच्यासाठी प्रदर्शन स्टॉलमध्ये मेगा फोनद्वारा व्याख्यानाचे प्रसारण करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच मुख्य दालनामध्येही  बैठक व्यवस्था केलेली  आहे. तसेच या चर्चासत्रामध्ये होणारी व्याख्याने यूट्यूबच्या माध्यमातुन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  विशेषत: हळद उत्पादकांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन लाभ घ्यावा, असे आवाहन युवराज शहारे, प्रकल्प संचालक, आत्मा हिंगोली यांनी केले आहे.

******

 

गावात पडणारा पाऊस जमिनीत मुरविण्यासाठी पुढे आले पाहिजे

- उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी




 

हिंगोली (जिमाका), दि. 27  :  सर्वानी पाण्याविषयी संवेदनशील झाले पाहिजे आणि पाणी वाचविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच पाणी बचतीच्या सवयी आंगीकारले पाहिजे. बहुतांश शेतकऱ्यांकडे बंद किंवा सुरु बोअर असतील तर त्याचे बोअर पुनर्भरण आणि विहीर पुनर्भरण करुन पाणी पातळी वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्या गावात पडणारा पाऊस हा जमिनीत मुरविण्यासाठी पुढे आले पाहिजे. असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी  केले .  

जिल्हा प्रशासन व उगम ग्रामीण विकास संस्था आणि हिंगोली जिल्ह्यातील समविचारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चला जाणुया नदी अभियान हिंगोली तालुक्यातील समगा येथे आयोजित करण्यात आले हाते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी  हे होते. यावेळी गट विकास अधिकारी गणेश बोथीकर, विस्तार अधिकारी भोजे, विस्तार अधिकारी आमले, सरपंच सागरबाई इंगळे उपस्थित होते.  

हरिभाऊ पट्टेबहादूर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना सांगितले की, एकेकाळी बारमाही असणाऱ्या नद्याचा प्रवाह हा वर्षानुवर्षे कमी होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून चला जाणूया नदीला अभियान सुरु करण्यात आले आहे. गावकरी आणि कर्मचारी मिळून प्लॅस्टिक नदी मध्ये फेकणे, नदीचे शोषण थांबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वानी एकजुटीने हे काम हाती घेतले तर नक्कीच नदी बारमाही होईल यात शंकाच नाही, असेही त्यांनी सांगितले. 

विस्तार अधिकारी भोजे यांनी सांगितले की, जलसंधारण करण्यासाठी मनसंधारण करणे आणि त्याची लोकचळवळ होणे गरजेचे आहे. नदीला जिवंत करण्यासाठी शासनाने व गावकऱ्यांनी  समन्वयाने कामे केले तर नक्कीच चांगला परिणाम दिसेल, असे विस्तार अधिकारी भोजे यांनी सांगितले.  

या कार्यक्रमामध्ये बालाजी नरवाडे, दत्तराव घुगे, विलास आठवले, दामोदर घुगे व रामेश्वर मांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. शाहीर धम्मानंद इंगोले व संच यांनी प्रबोधन केले. तर बाल विवाह विषयी अॅड. अनुराधा पंडित यांनी माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिशांत पाईकराव, विठ्ठल चव्हाण, सिद्धार्थ निनूले व ग्रामपंचायत यांनी सहकार्य केले.

*****

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्काराचे

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वितरण

 


हिंगोली (जिमाका), दि. 27  :  जिल्हयामध्ये महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्या अनुषंगाने दि. 25 मार्च, 2023  रोजी  राज्याचे कृषि मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

यावेळी  सन 2013-14, 2014-15 व  2016-17 या तीन वर्षाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये सन-2013-14 चा सौ. वंदना उमेद सोवितकर यांना, सन 2014-15 चा सौ. सुशिला जयाजी पाईकराव यांना व सन 2016-17 चा श्रीमती सुनिता माणिकराव मुळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार व प्रत्येकी  10 हजार एक रुपयाचा धनादेश, स्मृती चिन्ह, सन्मान पत्र, शाल व श्रीफळ तसेच पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला .

यावेळी खासदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे, परिविक्षा अधिकारी सुनिल वाठोरे, विधी सल्लागार विद्या नागशेट्टीवार, जिल्हा संरक्षण अधिकारी माया सुर्यवंशी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी  सरस्वती कोरडे, कायदा तथ परिविक्षा अधिकारी अँड. अनुराधा पंडित, निलेश कोटलवार, क्षेत्रकार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुड़े उपस्थित होते.

 

*****