06 April, 2023

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती

 

हिंगोली (जिमाका), दि. 06 :  यावर्षी हिंगोली जिल्ह्यात दि. 14 एप्रिल ते दि. 30 एप्रिल, 2023 या कालावधीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरी करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त जिल्ह्यात मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने बंदोबस्त लावण्यात येतो. परंतु जयंती काळात शुल्लक कारणावरुन अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अचानक निर्माण होते.

अशाप्रकारे अचानक उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस तोंड देण्यासाठी बंदोबस्तातील अधिकाऱ्यासोबत विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची आवश्यकता आहे. 

त्यामुळे वरील परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दि. 14 एप्रिल ते दि. 30 एप्रिल, 2023 या कालावधीत उद्भवणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी जिल्ह्यातील 13 पोलीस स्टेशनसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 13 विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यानी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये नियुक्ती केली आहे. 

वसमत शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी वसमतचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांची , हट्टा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अरविंद बोळंगे, कुरुंदा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे महसूल विभागाचे नायब तहसीलदार विलास तेलंग, हिंगोली शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी, नरसी नामदेव पोलीस स्टेशनसाठी हिंगोली तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी नवनाथ वगवाड, बासंबा पोलीस स्टेशनसाठी हिंगोली महसूल विभागाचे नायब तहसीलदार अनिता वडवळकर, कळमनुरी पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सुरेखा नांदे यांची, बाळापूर पोलीस स्टेशनसाठी कळमनुरी येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार पाठक यांची, औंढा नागनाथ पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी डॉ.कृष्णा कानगुले यांची, सेनगाव पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी जीवक कांबळे यांची, गोरेगाव पोलीस स्टेशनसाठी सेनगाव येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार डी. के. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वरील नियुक्ती केलेल्या दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत दि. 14 एप्रिल ते दि. 30 एप्रिल, 2023 रोजी पर्यंत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या उपविभागावर दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे. तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या तालुक्यात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावेत, असे आदेश दिले आहेत. 

                                             

*****

 

माजी सैनिकांनी पदवी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी

अर्ज करण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 06 : केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठ यांच्या कला शाखेतून बीए (एचआरएम) पदवी प्रमाणपत्र प्राप्त करुन देण्यासाठी करार झालेला आहे. हे पदवी प्रमाणपत्र केंद्र व राज्य सरकार तसेच इतर सार्वजनिक उपक्रमाच्या नोकरीसाठी मान्यताप्राप्त आहे. देशाच्या रक्षणासाठी आपल्या तरुणाईच्या आयुष्याचा मोठा भाग समर्पित करणाऱ्या सैनिकांना नोकरीसाठी शैक्षणिक क्षेत्रात सशक्त बनविणे हा उद्देश आहे.

            माजी सैनिकास निवृत्तीच्या वेळी प्राप्त झालेले शैक्षणिक प्रमाणपत्र काही संस्था मान्य करत नाहीत. त्यामुळे आंध्र विद्यापीठाशी झालेल्या कराराद्वारे माजी सैनिकास विविध नोकऱ्यांसाठी पात्र होण्यासाठी तसेच सक्षम करण्यासाठी आंध्र विद्यापिठाद्वारे कला शाखेतून बीए (एचआरएम) पदवी प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

            माजी सैनिकांसाठी कला शाखेतून पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्रता व अटी : अर्जदार माजी सैनिक असावा. अर्जदाराचे शिक्षण इयत्ता बारावी किंवा समतूल्य शिक्षण किंवा भारतीय आर्मी, नेव्ही, एअरफोर्स द्वारा प्राप्त शिक्षणाचे विशेष प्रमाणपत्र, माजी सैनिकांची सेवा पंधरा वर्षापेक्षा कमी नसावी. दि. 01 जानेवारी, 2010 नंतर निवृत्त झालेला असावा. माजी सैनिक इयत्ता दहावी पास असेल तर अशा उमेदवारांना 5 वर्षाचा अभ्यासक्रम (2 वर्ष 12 वी + 3 वर्ष पदवी) लागू राहील. सदर अभ्यासक्रमाची कोर्स फी 12 हजार 500 रुपये असून अर्जदाराने आपले अर्ज फक्त एप्रिल किंवा ऑक्टोबर महिन्यातच संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी www.ksb.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन Circulars/Publications पहावे किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास भेट द्यावी.

            इच्छूक माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे‍.

******

05 April, 2023

 

जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाची

जिल्हाधिकारी  कार्यालयातील तंबाखू बहाद्दरांवर कार्यवाही

 


            हिंगोली (जिमाका), दि. 05 : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार  जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे  पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 5 एप्रिल, 2023 रोजी जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांमध्ये कर्तव्यावर असतांना तंबाखू युक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर धाडी टाकण्यात आल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच तारांबळ उडाली. तंबाखू विरोधी कायदा (कोटपा-2003) नुसार शासकीय कार्यालय कर्तव्यावर असतांना, सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन व विक्री करण्यास बंदी आहे.

त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील मिलिंद वाकळे, औरंगाबाद येथील मराठवाडा ग्रामीण संस्थेचे अभिजित संघई व जिल्हा रुग्णालयातर्फे डॉ. मयूर निंबाळकर, कुलदीप केळकर, आनंद साळवे व इतर कर्मचारी यांच्या पथकाने  कार्यवाही केली. या कार्यवाहीत एकूण 16 लोकांकडून 2 हजार 120 रुपये दंड वसूल करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी शिक्षण विभागाची मदत घ्यावी तसेच पोलिस विभागाच्या मदतीने जिल्हा अंतर्गत तंबाखू विरोधी कार्यवाही वाढवावी, अशा सूचना दिल्या.

कोटपा-2003 कायदा काय म्हणतो......

कलम 4 - सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी आहे.

कलम 5 - तंबाखूयुक्त पदार्थ जाहिरात बंदी

कलम 6 - 'अ'  18 वर्षा खालील मुलांना तंबाखूयुक्त पदार्थ विकण्यास सक्त मनाई.

कलम 6 'ब'  शै. संस्थांच्या 100 मी. परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ विक्री, सेवन बंदी

कलम 7 - कोणत्याही तंबाखूयुक्त पदार्थावर (पाकिटावर) कर्करोगविषयी चेतावणी पाकिटाच्या 85 टक्के भागावर असावी.

******

 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेशासाठी

अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 05 : अनुसूचित जमातीच्या हिंगोली व परभणी जिल्ह्यातील मुलामुलींना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीमध्ये शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. अर्जासाबेत अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत असावी. विद्यार्थी दारिद्रय रेषेखालील असेल तर त्यासंबंधित छायांकित प्रत व दारिद्र्य रेषा अनुक्रमांक नमूद करावा. पालकाची उत्पन्न मर्यादा ही एक लाख एवढी असून यासाठी सक्षम अधिकाऱ्यांने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र देण्यात यावे. अर्जासोबत पालकांनी समतीपत्रक देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, दोन पासपोर्ट साईजचे फोटो, जन्म तारखेचा पुरावा, वैद्यकीय अधिकारी यांचे विद्यार्थी निरोगी असल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडण्यात यावे.  

या योजनेत आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना तसेच विधवा, घटस्फोटित, निराधार व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पाल्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसावेत. प्रकल्प कार्यालयात प्रवेश अर्ज विनामूल्य उपलब्ध असून दि. 30 एप्रिल, 2023 पर्यंत परिपूर्ण प्रवेश अर्ज जमा करणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांवर होणारा  संपूर्ण खर्च आदिवासी विकास विभाग करणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि.हिंगोली  येथे संपर्क साधावा. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या पाल्यास शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेश घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन छंदक लोखंडे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांनी केले आहे.

******

 

हिंगोली येथील रोजगार मेळाव्यात आठ बेरोजगार उमेदवारांची निवड

 

हिंगोली (जिमाका), दि. 05 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर (एनसीएस) हिंगोली येथे आज दि. 5 एप्रिल, 2023 रोजी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जागेवरच निवड संधी मोहिमेअंतर्गत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या रोजगार मेळाव्यात बंसल कोचिंग हिंगोली यांची 11 रिक्त पदे, मुथूट मायक्रो फायनान्स नांदेडची 6 रिक्त पदे व भारतीय जीवन विमा निगम हिंगोलीचे 05 रिक्त पदे असे एकूण 22 रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित कंपनीचे उद्योजक उपस्थित होते. जागेवरच निवड संधी या विशेष मोहिमेअंतर्गत रोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील दहावी, बारावी, डिप्लोमा व पदवी तसेच पदवीधारक पात्रतेचे 36 उमेदवार उपस्थित होते. या 36 उमेदवारांपैकी 08 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी मेळाव्यास उपस्थित उमेदवारांना आता केलेल्या क्यूआर कोडवर एकदा नोंदणी केल्यावर आपणास रोजगार उपलब्ध होईपर्यंत वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्याची माहिती मिळणार आहे. तसेच सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यासाठी व करिअर कसे निवडावे याबाबत माहिती देण्यासाठी नॅशनल करिअर सेंटरची स्थापना आली आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी म. शां. लोखंडे, नवनाथ टोनपे, म.ना.राऊत, अ.अ.घावडे, ना.ज.निरदुडे, र.ला. जाधव यांनी परिश्रम घेतले.

****  

 राज्य राखीव पोलीस बलाच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या

गोळीबार सरावासाठी मौजे वगरवाडी येथील क्षेत्र उपलब्ध

 

हिंगोली (जिमाका), दि. 05 : महाराष्ट्र जमीन  महसूल  अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील  कलम 33 (1) (ख) व (प)  नुसार मौजे  वगरवाडी  ता. औंढा, जि. हिंगोली  येथील फायरींग रेंज सर्वे नं. 25 व 29 या परिसरात  दि. 6 एप्रिल ते 15 एप्रिल, 2023 या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल गट क्र.12, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी  व पोलीस अंमलदार यांच्या वार्षिक गोळीबाराचा सराव तसेच या गटातील 3 कंपन्या नक्षल बंदोबस्तासाठी गडचिरोली येथे कार्यरत असल्यामुळे या कंपन्यातील गट मुख्यालयातील वार्षिक शीट रिमार्क गोळीबार सराव शिल्लक असलेल्या पोलीस अधिकारी व अमलदार यांचा वार्षिक शिट रिमार्क गोळीबार सराव  करण्यास  परवानगी  देण्यात येत आहे.

            या कालावधीत पुढील अटीवर गोळीबार  सरावासाठी  मैदान उपलब्ध  करुन देण्यात येत आहे. हे ठिकाण  धोकादायक  क्षेत्र म्हणून  घोषित करण्यात आले आहे. परिसरात  गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सूचना  पोलीस अधिकारी यांनी  दवंडीद्वारे  व ध्वनीक्षेपकाद्वारे  संबंधित  गावी सर्व संबंधितांना  द्याव्यात. तसेच तहसीलदार औंढा नागनाथ व पोलीस  स्टेशन हट्टा यांनी मौ. वगरवाडी  फायरींग बट परिसरात  दवंडीद्वारे व ध्वनीक्षेपकाद्वारे  या आदेशाची  प्रसिध्दी  करावी, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

****  

 

उष्माघातात नागरिकांनी स्वत:चा बचाव करावा

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन


हिंगोली (जिमाका), दि. 05 : उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी व स्वत:चा बचाव करण्यासाठी  खालील उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

काय करावे :-

  •  उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडीओ, टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.
  •  तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.
  • हलकी, पातळ व सचिद्र सूती कपडे वापरावेत. बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, हॅट, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा.
  • प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी.
  • जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल तर हॅट किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.
  • शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा वापर नियमित करण्यात यावा.
  • अशक्तपणा, स्थूळपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
  •  गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.
  • घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात  यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.
  •  कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.
  • पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.

काय करु नये  :-

  • लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी 12.00 ते 3.00 या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
  • बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. तसेच दुपारी 12.00 ते 3.00 या कालावधीत बाहेर काम करण्याचे टाळावे.
  • उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. (तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.)
  • शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय इ. यांचा वापर टाळावा.
  • शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने (Proteins) असलेले अन्न टाळावे.

*****