06 September, 2023

 

वसमत तालुक्यातील लोण बु. येथील बाल विवाह थांबविण्यास

जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईनला यश

 


                हिंगोली (जिमाका), दि.06 : जिल्ह्यात बाल विवाह समुळ नष्ट करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात बाल विवाह निमुर्लन समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006, ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. याच उद्देशाने जिल्ह्यातील मौजे लोण (बु.)  ता. वसमत जि. हिंगोली येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बाल विवाह होणार असल्याबाबत चाईल्ड लाईन (1098) ला गोपनीय माहिती मिळाली. त्या दरम्यान मौजे लोण (बु.)  येथील  या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार  जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक)  गणेश मोरे, चाईल्ड हेल्पलाईनचे केस वर्कर राजरत्न पाईकराव, विकास लोणकर यांनी  घटनास्थळी  भेट देवून उपस्थित सर्वांना बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 विषयी माहिती सांगितली. ज्यामध्ये मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे आणि जर मुलाचे व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात व अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते. तसेच बाल विवाहाची कारणे व दुष्परिणाम या विषयी सविस्तर मार्गदर्शन करुन बाल विवाह थांबविण्यात आला. बालिकेच्या आई-वडिलाकडून मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही, असा लेखी जबाब लिहून घेण्यात आला.

यावेळी लोण (बु.) येथील सरपंच लक्ष्मीबाई गंगाधरराव मुळे, पोलीस पाटील गजानन अशोकराव सोनटक्के,  ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी एस. पी. भागवत, अंगणवाडी सेविका शिला नवलाखे आणि बालिकेची आई व इतर नातेवाईक उपस्थित होते. या बालिकेला पुढील कार्यवाहीसाठी बाल कल्याण समिती, हिंगोली समोर हजर करण्यात आले. त्यानंतर बालिकेच्या वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत बाल कल्याण समिती हिंगोली कडून दर महिन्याला बालिकेबाबत पाठपुरावा करण्यासंदर्भात सूचना महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास देण्यात येतात व त्यानुसार बालिकेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी आणि सामाजिक स्थिती/सद्यस्थिती बाबत वेळोवेळी माहिती बाल कल्याण समितीला कळविण्यात येते. तसेच बालिकेच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत नियमित पाठपुरावा घेतला जातो, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.

*****

 

पोळा सणाच्या कर निमित्त वाई गोरखनाथ मार्गावरील

वसमत-औंढा रोडवरील वाहतूक मार्गात बदल

 

हिंगोली (जिमाका), दि.06 : प्रतिवर्षाप्रमाणे दि. 14 सप्टेंबर, 2023 रोजी पोळा हा सण साजरा करण्यात येणार असून दि. 15 सप्टेंबर, 2023 रोजी कर हा सण साजरा करण्यात येत आहे. या कर सणानिमित्ताने कुरुंदा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाई येथील गोरखनाथ मंदिरास हिंगोली, लातूर, परभणी व नांदेड जिल्ह्यातील जवळपास 15 हजार ते 20 हजार बैलजोड्या दर्शनास व प्रदक्षिणा मारण्यासाठी बैलाचे मालक घेऊन येतात. त्यामुळे वसमत-औंढा रोडवर बैलांची व बैल फिरविण्यासाठी आणणाऱ्या लोकांची बरीच गर्दी होते. हा रस्ता राज्य महामार्ग  असल्याने सदर रोडवर वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू असते व या दिवशी वाहतूक चालू राहिल्यास अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने वसमत टी पॉईंट ते नागेशवाडी पर्यंत रहदारीचा रस्ता हा दि. 14 सप्टेंबर, 2023 चे 00.00 ते दि. 15 सप्टेंबर, 2023 रोजीचे 24.00 वाजे पावेतो बंद करण्यात येऊन नांदेडकडून येणारी वाहतूक वसमत, झिरो फाटा, हट्टा जवळा बाजार मार्गे नागेशवाडी असे पर्यायी मार्गाने औरंगाबादकडे व औरंगाबादकडून नांदेडकडे जाणारी वाहतूक ही नागेशवाडी, जवळा बाजार हट्टा, झिरो फाटा मार्गे वसमत ते नांदेडकडे वळविण्यासाठी आदेश होण्यास विनंती केली आहे.  

पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या अहवालानुसार सदर रस्ता हा राज्य महामार्ग असल्याने रोडवर वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू असते. या दिवशी वाहतूक चालू राहिल्यास अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने रस्ता वळविणे आवश्यक आहे.

त्यामुळे जिल्हादंडाधिकारी हिंगोली यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ख) अन्वये प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन वसमत टी पाईंट ते नागेशवाडी पर्यंत रहदारीचा रस्ता हा               दि. 14 सप्टेंबर, 2023 चे 00.00 ते दि. 15 सप्टेंबर, 2023 रोजीचे 24.00 वाजे पावेतो बंद करण्यात येऊन नांदेडकडून येणारी वाहतूक वसमत, झिरो फाटा, हट्टा जवळाबाजार मार्गे नागेशवाडी असे पर्यायी मार्गाने औरंगाबादकडे व औरंगाबादकडून नांदेडकडे जाणारी वाहतूक ही नागेशवाडी, जवळा बाजार, हट्टा, झिरो फाटा मार्गे वसमत ते नांदेडकडे वळविण्यात आले आहे.

या आदेशाची माहिती पोलीस अधिकारी वाहतूक यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे प्रसिध्द करावी व सर्व उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार, नगर परिषद, पोलीस स्टेशन कार्यालयाचे नोटीस बोर्डावर डकवून प्रसिध्दी देण्यात यावी. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द नियमानुसार कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

******

 

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

 

            हिंगोली (जिमाका), दि. 06 :  जिल्ह्यात सर्व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दि. 21 ऑगस्ट, 2023 रोजी पासून श्रावण मास व सोमवार आरंभ होत आहे. श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथे आठवे ज्योतिर्लिंग असल्याने या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच दि. 6 सप्टेंबर, 2023 रोजी श्रीकृष्ण जयंती, दि. 11 सप्टेंबर रोजी श्रावण सोमवार, दि. 14 सप्टेंबर रोजी पोळा सण, दि. 15 सप्टेंबर रोजी पोळ्याची कर, दि. 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, दि. 18 सप्टेंबर, 2023 रोजी हारतालिका व दि. 19 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी (गणेश स्थापना) आहे. तसेच सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडी तसेच नागरिकांच्या वतीने विविध संघटना, पक्ष यांच्यातर्फे हिंगोली जिल्ह्यात त्यांच्या मागणी संदर्भात मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 05 सप्टेंबर, 2023 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 20 सप्टेंबर, 2023 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास    सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी दिलीप कच्छवे  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.     

****

 सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या मोफत पूर्वप्रशिक्षणाची सुवर्णसंधी

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 20 सप्टेंबर रोजी मुलाखतीचे आयोजन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 06  : भारतीय सशस्त्र सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी नाशिक येथील नाशिक रोडच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये राज्य शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी 3 ऑक्टोबर, 2023 ते 12 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 54 आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे. तरी हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी हिंगोली जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 20 सप्टेंबर, 2023 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

मुलाखतीस येताना डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर (डीएसडब्ल्यू) यांच्या संकेतस्थळावर सर्च करून त्यामधील एसएसबी-54 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) किंवा व्हाटसअप क्रमांक 9156073306 वर एसएसबी 54 हा मेसेज केल्यास कोर्ससाठी परिशिष्ट उपलब्ध करुन दिले जाईल. शिफारस पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट यामधील माहिती पूर्ण भरून सोबत येऊन यावे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये एस.एस.बी कोर्ससाठी प्रवेश मिळण्यासाठी नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेवून यावेत.

उमेदवार कंम्बाइंड डिफेंस सर्व्हिसेस एक्झामिनेशन (सीडीएसई-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेंस अॅकडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) पास झालेली असावी व सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेला असावा. एनसीसी 'सी' सर्टिफिकेट 'ए' किंवा 'बी' ग्रेडमध्ये पास झालेले आणि एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस. एस. बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिवर्सिटी एन्ट्री स्कीमसाठी एस.एस.जी कॉल लेटर असावे. शिफारस केलेल्या यादीत नांव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी :  training.pctcnashik@gmail.com अथवा 0253-2451032 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 9156073306 या भ्रमणध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत अथवा प्रत्यक्ष संपर्क साधून हिंगोली जिल्ह्यातील नवयुवक व नवयुवतींनी या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

 

***** 

05 September, 2023

 

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी शिबीर, तृतीयपंथी व्यक्तीं व ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वाटप,

जात वैधता प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न

 

 







            हिंगोली, (जिमाका) दि. 05  : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभांगाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज दि. 5 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी शिबीर, तृतीयपंथी व्यक्तींना ओळखपत्र वाटप, जात वैधता प्रमाणपत्र वाटप व ऊसतोड कामगारांना ओळखपत्राचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

            या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजू एडके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उगम संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव, ऊसतोड कामगार संघटनेच्या अध्यक्षा छाया पडघन, लक्ष्मीबाई मागासवर्गीय संस्थेच्या अध्यक्षा रेखा देवकर, हिंगोली तृतीयपंथी संघटनेचे अध्यक्ष विनोद खरटमोल, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. घट्टे मॅडम, ज्येष्ठ नागरिक श्री.पोपळाईत, समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आत्माराम वागतकर, विशाल इंगोले इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

            प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

            तद्नंतर जेष्ठ नागरीकांचा सत्कार करुन 60 जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 50 ऊसतोड महिला कामगारांना ओळखपत्र वाटप करुन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच 16 तृतीयपंथी यांना ओळखपत्राचे वाटप करुन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच प्राथमिक स्वरुपात 18 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येऊन आरोग्य तपासणी करण्यात आली.

             या प्रसंगी  मान्यवरांनी ऊसतोड कामगारांच्या समस्येविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच तृतीयपंथी यांना येणारे अडी-अडचणी बाबत साक्षी रमेश पाईकराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

            अध्यक्षीय समारोप कार्यक्रमात सहायक आयुक्त समाज कल्याण राजू एडके यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीय घटकासाठी सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती सांगितली व जास्तीत जास्त पात्र मागासवर्गीय घटकातील लाभार्थ्यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृहपाल सुलोचना ढोणे यांनी केले तर सुत्रसंचालन अशोक इंगोले  यांनी  केले.  

            या कार्यक्रमाला हिंगोली जिल्हयातील  450 ते 500 ऊसतोड कामगार, तृतीयपंथी व्यक्ती, जेष्ठ नागरिक तसेच जात वैधता प्रमाणपत्राचे लाभार्थ्यांची  उपस्थिती  होती.

            या कार्यक्रमासाठी हिंगोली येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

*****

 

 

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

दिव्यांगासाठी विविध स्पर्धा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 05  :  जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग व दिव्यांगांच्या विविध संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांच्या विविध कलागुण स्पर्धा व दिव्यांगांना स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर दि. 13 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सहाय्यक आयुक्त कार्यालय, समाज कल्याण, जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे हिंगोली येथे आयोजित करण्यात आला आहे.

यामध्ये चित्रकला, रांगोळी स्पर्धा, शेतकरी आत्महत्या- कारणे व उपाय आणि वाढती बेरोजगारी-कारणे व उपाय या दोन विषयावर निबंध लेखन तसेच दिव्यांग कलावंत विविध गुण प्रदर्शन (नृत्य, गायन, वादन, एकपात्री नाटक, भारुड इत्यादी) व दिव्यांगांना स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धकांनी चित्र व निबंध घरी तयार करुन दररोज कार्यालयात जमा करावे किंवा कार्यक्रम स्थळी दि. 13 सप्टेंबर, 2023 रोजी जमा करावेत.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

***** 

 

औंढा नागनाथ तालुक्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व युवती, महिलासाठी

फूड प्रोसेसिंग या विषयावर मोफत प्रशिक्षणाचे आयोजन

12 सप्टेंबर पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 05  :  येथील जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने औंढा नागनाथ तालुक्यातील अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील युवक, युवती व महिलासाठी फूड प्रोसेसिंग या विषयावर मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी उमेदवार हा किमान 07 वी पास असावा, वय 18 ते 45 वर्षे यादरम्यान असावे. तसेच जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, टीसी, गुणपत्रक, बँक पासबूक जमा करुन आपली नाव नोंदणी दि. 12 सप्टेंबर, 2023 पर्यंत करावेत. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी सिध्दार्थ थोरात (मो.9552183038) , कार्यक्रम आयोजक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. के. कादरी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे.    

*****