03 November, 2023

 

जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, हिंगोली विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर

सर्वसाधारण मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 :  मा. मुख्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यामध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत दि. 27 ऑक्टोबर, 2023 ते 09 डिसेंबर, 2023 या कालावधीमध्ये नागरिकाकडून दावे व हरकती म्हणजेच नागरिकांकडून मतदार नोंदणीचे मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक नागरिकांनी त्यांची मतदार नोंदणी करुन घेण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यानुसार जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2024 अंतर्गत शनिवार दि. 04 नोव्हेंबर 2023, रविवार दि. 05 नोव्हेंबर, 2023, शनिवार दि. 25 नोव्हेंबर, 2023 व रविवार दि. 26 नोव्हेंबर, 2023 या चार दिवशी जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94- हिंगोली विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष शिबीरे घेण्यापूर्वी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार होण्याच्या दृष्टीने नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडुन मतदार नोंदणी दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. तसेच मतदार यादीमध्ये मतदारांच्या तपशिलात काही त्रुटी असल्यास त्याच ठिकाणी विहित नमुन्यातील नमुना आठ मध्ये अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. तसेच दि. 01 जानेवारी, 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेल्या पात्र मतदारांचे नाव मतदार यादींमध्ये समाविष्ट करुन विहित नमुना नं. 6 मध्ये अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. तसेच नवविवाहीत महिला यांचे फॉर्म नं. 6 भरुन घेण्यात येणार आहेत. तसेच दिव्यांगाबाबत आणि भटक्या जाती व जमाती यांचे मतदार नोंदणीसाठी फॉर्म 6 भरुन घेण्यात येणार आहे. मतदार यादीमधील मयत मतदारांचे नमुना 7 मध्ये अर्ज भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

 

जिल्हा व्यवस्थापन व जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीसाठी

अशासकीय सदस्यत्वासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 : महिलांचे हक्क, सुरक्षा, संरक्षण व सक्षमीकरणासाठी शासन पुरस्कृत मिशन शक्ती या एकत्रित योजनेअंतर्गत मागदर्शक सूचना या केंद्र शासनाने शासन निर्णयान्वये निर्गमित केल्या आहेत. तसेच केंद्र शासन पुरस्कृत मिशन शक्ती या एकछत्रीत योजनेअंतर्गत सामर्थ्य या उपयोजनेतील महिला सक्षमीकरण केंद्र ही उपयोजना राज्यात कार्यान्वित करण्यास शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. महिला सक्षमीकरण केंद्र या घटक योजनेचे लाभार्थी हे ग्रामीण, आदिवासी व शहरी भागातील गरजू, संकटग्रस्त, काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या शिक्षित-अशिक्षित बेरोजगार, एकल, कोणत्याही प्रकारची गरज असलेल्या महिलांना या महिला सक्षमीकरण केंद्राचा लाभ मिळणार आहे.

तसेच वन स्टॉप सेंटरच्या सुधारित शासन निर्णयानुसार जिल्हा व्यवस्थापन समिती नव्याने गठीत करणे आवश्यक आहे. या योजनांची जिल्हास्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीद्वारे करावयाची आहे. महिला सक्षमीकरण केंद्रासाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती व वन स्टॉप सेंटर साठी जिल्हा व्यवस्थापन समिती स्थापन करण्याबाबत नमूद आहे. या समितीत प्रत्येकी 2-2 अशासकीय नामनिर्देशित सदस्यांचा समावेश आहे. या नामनिर्देशित सदस्यांसाठी प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत एस.-7, दूसरा मजला, हिंगोली यांना दि. 16 नोव्हेंबर, 2023 रोजी सायंकाळी 05 पूर्वी सादर करावेत.

हे प्रस्ताव स्वयंसेवी संस्थेमार्फत सादर करणे आवश्यक आहे. सदर संस्था ही हिंगोली जिल्ह्यातील नोंदणीकृत असावी. तसेच संबंधितांचे सध्याचे चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. सदरील संस्थेस महिला विषयक क्षेत्रात कामकाज केल्याचा मागील 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. संस्था काळ्या यादीत नसावी. अर्जदारांचे वय कमीत कमी 30 वर्षे पुर्ण असावे. सदरील सदस्यत्व हे बिना मानधन असल्याने स्वयंसेवी उत्स्फूर्तपणे काम करु इच्छिणाऱ्यांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगांली यांनी केले आहे.

 

******

 

शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम पीक स्पर्धेचे आयोजन

31 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. शा  प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्‍ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना  होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश  ठेऊन शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम-2023 साठी राज्यांतर्गत  पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

      वंचित, दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पिक स्पर्धांमध्ये सहभागी होतील, या दृष्टीकोनातून दि. 20 जुलै, 2023 च्या शासन निर्णयान्वये रब्‍बी हंगाम-2023 पासून पिकस्‍पर्धा तालुका, जिल्‍हा व राज्‍य पातळीवर राबविण्‍यात येणार आहे. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस  या पाच पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर, 2023 पर्यंत आहे. अर्ज दाखल करण्‍याच्‍या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्‍यास त्‍यापुढील शासकीय सुट्टी  नसलेली तारीख गृहीत धरण्‍यात यावी. पीकनिहाय स्पर्धेसाठी सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये व आदिवासीसाठी 150 रुपये प्रवेश शुल्क राहील.

 या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान  40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

या स्पर्धेसाठी अर्ज करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, आठ-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांने संबंधित सातबारा वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक, पासबूकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

            तालुकास्तर, जिल्हास्तर, व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल-  प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येणार आहेत. तालुकास्तरीय पहिले बक्षीस 5 हजार रुपये, दुसरे बक्षीस 3 हजार रुपये व तिसरे बक्षीस 2 हजार रुपये असणार आहेत. जिल्हास्तरीय पहिले बक्षीस 10 हजार रुपये, दुसरे 7 हजार रुपये व तिसरे 5 हजार रुपये आहे. तर राज्यस्तरीय पहिले बक्षीस 50 हजार रुपये, दुसरे 40 हजार रुपये व तिसरे बक्षीस 30 हजार रुपये असणार आहे.

   दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्‍हावी यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. पिक स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

*****

 

बेरोजगार सेवा सहकारी संस्था, लोकसेवा केंद्राचे

लेखा परिक्षण अहवाल 20 नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयामार्फत दि. 11 डिसेंबर, 2015 च्या शासन निर्णयानुसार बेरोजगार सहकारी सेवा संस्था, लोकसेवा केंद्रांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना तीन लाख रुपयाच्या मर्यादेत विना निविदा कामे वाटप करण्याची प्रक्रिया करण्यात येते.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाकडून जिल्ह्यातील बेरोजगार सहकारी सेवा संस्था, लोकसेवा केंद्रांना आर्थिक वर्ष 2022-23 चे लेखा परिक्षण अहवाल दि. 10 नोव्हेंबर, 2023 सादर करण्याबाबत सूचित केले होते. या कालावधीला दि. 20 नोव्हेंबर, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील बेरोजगार सेवा सहकारी संस्था, लोकसेवा केंद्रांनी सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे लेखा परिक्षण अहवाल जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, हिंगोली येथे दि. 20 नोव्हेंबर, 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.

*****

 

सर्वसाधारण मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 :  94- हिंगोली विधानसभा मतदार संघाची प्रारुप मतदार यादी दि. 27 ऑक्टोबर, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यामध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत दि. 27 ऑक्टोबर, 2023 ते 09 डिसेंबर, 2023 या कालावधीमध्ये नागरिकाकडून दावे व हरकती म्हणजेच नागरिकांकडून मतदार नोंदणीचे मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक नागरिकांनी त्यांची मतदार नोंदणी करुन घेण्यासाठी शनिवार दि. 04 नोव्हेंबर 2023, रविवार दि. 05 नोव्हेंबर, 2023, शनिवार दि. 25 नोव्हेंबर, 2023 व रविवार दि. 26 नोव्हेंबर, 2023 या चार दिवशी 94- हिंगोली विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडुन मतदार नोंदणी दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज भरुन घेण्यात येणार असून 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील सर्व नवमतदार 17 वर्षापेक्षा अधिक वय असलेले संभाव्य मतदार, नवविवाहीत वधू, भटक्या जमाती, तृतीय पंथी, दिव्यांग मतदार व ज्यांचे वयाची 18 वर्षे पूर्ण झाली आहेत परंतु मतदार यादीत नाव नोंदविलेले नाही अशा सर्वांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून घेण्यासाठी व मयत /दुबार कायम स्थलांतरीत मतदाराची नावे वगळण्यासाठी तसेच मतदार यादीतील तपशिलात दुरुस्ती करण्यासाठी उपविभागीय अधिकारों तथा मतदार नोंदणी अधिकारी 94- हिंगोली उमाकांत पारधी यांनी आवाहन केले आहे.

*****

 

अल्पसंख्यांक समाजातील शिक्षण घेणाऱ्या मुलींनी शासकीय वस्तीगृहाताचा लाभ घ्यावा

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 : वसमत येथे उपलब्ध असलेल्या शासकीय अल्पसंख्यांक मुलींच्या वस्तीगृहामध्ये सन 2023-24 या वर्षाकरिता प्रवेश देणे चालू आहे. या वस्तीगृहामध्ये वसमत व परिसरातील अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या पात्रता धारक सर्व गरजू मुलींसाठी 70 टक्के व इतर समाजातील 30 टक्के प्रवेश देण्यासाठी प्रवेश प्रक्रिया चालू आहे.

या शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश घेतलेल्या अल्पसंख्यांक समाजातील मुलींसाठी शासनाने भोजन भत्ता सुद्धा देऊ केलेले आहे. वसतिगृहातील प्रवेशासाठी व इतर माहितीसाठी संस्थेतील गणित चित्रकला निदेशक डी. के. बुंदेले संपर्क क्र. 8421685623 यांच्याशी सकाळी 10.00 ते सांयकाळी 5.30 पर्यंत संपर्क साधून जास्तीत जास्त मुलींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमत जि.हिंगोली यांनी केले आहे.

*****

 

 

हिंगोली जिल्हा न्यायालयात 9 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 : येथील जिल्हा न्यायालयात व त्या अंतर्गत येणाऱ्या विविध न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक 9 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोकअदालतीमध्ये भूसंपादन व मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तडजोड युक्त फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, वैवाहिक/ कौटुंबिक वाद प्रकरणे, पराक्रम्य अभिलेख अधिनियमचे कलम 138 खालील प्रकरणे, नगर परिषद, विद्युत महावितरण कंपनी, बँक व पतसंस्थांचे वादपूर्व प्रकरणे इत्यादी खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेत.  ही सर्व प्रकरणे आपआपसातील तडजोडीद्वारे निकाली काढता यावीत. यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकार मंडळींनी उपस्थित राहून फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश-1 तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आर. व्ही. लोखंडे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अमोल जाधव यांनी केले आहे.

*****