28 December, 2023

 

जिल्ह्यातील वंचित  राहिलेल्या बालकांचे टीडी लसीकरण करुन घ्यावेत

                                                                                    --- जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

 

            हिंगोली (जिमाका), दि. 28 :  जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या वंचित  राहिलेल्या बालकांचे या मोहीम कालावधीत प्राधान्याने टीडी लसीकरण करुन घ्यावे, असे  आवाहन प्र. जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्र.जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली  10 वर्षे व 16 वर्षे वयोगटातील टीडी लसीकरण वाढविण्यासाठी जिल्हा टास्क्‍ फोर्स समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी श्री. परदेशी बोलत होते. या बैठकीस  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास शेळके, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी  डॉ.सतीश रुणवाल, शिक्षणाधिकारी माधव सलगर, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व गट शिक्षणाधिकारी, सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री.परदेशी म्हणाले, जिल्ह्यातील राहिलेले टीडी लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभाग, आरोग्य विभाग तसेच महिला व बालविकास विभागाने आपणास दिलेली जबाबदारी आपापसात समन्वय साधून योग्यरित्या पाडावी, अशा सूचना केल्या.

यावेळी जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.सतीश रुणवाल यांनी धनुर्वात आणि घटसर्प आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून टीडी लस दिली जाते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व लसीकरण वेळापत्रकानुसार 10 वर्षे व 16 वर्षे वयोगटाचे निर्देशांक हे की डिलिव्हरीबल म्हणून दिले गेले आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार शाळेतील 10 व 16 वर्षाच्या बालकांच्या लसीकरणामध्ये वाढ करण्यासाठी शाळानिहाय बालकांचे नियोजन करुन लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. शाळांमधील लसीकरणासाठी वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. या ठरलेल्या वेळापत्रकानुसार शाळेतील शिक्षकांना लसीकरणाच्या दिवसाबाबतची पूर्वसूचना देण्यात येणार आहे. यासाठी सर्व शाळेतील शिक्षकांनी पाचवी, सहावी (टीडी वर्ष) तसेच नववी, दहावी (16 वर्षे) वर्गातील लाभार्थ्यांच्या पालकांची बैठक लसीकरणापूर्वी घेऊन टीडी लसीचे महत्व पटवून द्यावेत. लसीकरणाच्या दिवशी सर्व लाभार्थी उपस्थित राहतल यासाठी वर्ग शिक्षकांची मदत घ्यावी. जेणेकरुन जास्तीत जास्त लाभार्थ्यांचे लसीकरण त्याच दिवशी पूर्ण होईल, टीडी लसीकरणाचे 10 व 16 वर्षे वयोगटातील लाभार्थी संख्या 44 हजार 256 असून आतापर्यंत 16 हजार 18 लाभार्थींना टीडी लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित 28 हजार 238 लाभार्थींना या मोहिमेत टीडी लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.

******

 ग्राहक कल्याणाच्या सर्व उपक्रमात सर्वांचा सहभाग महत्वाचा

- जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण धरमकर                             

 





हिंगोली (जिमाका), दि. 28 :  ग्राहक कल्याणाच्या सर्व उपक्रमात सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे ग्राहक कल्याणासाठी विविध माध्यमांचा वापर करुन समाजामध्ये जागरुकता निर्माण करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीणकुमार धरमकर यांनी केले.                                  

आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी हिंगोलीचे तहसीलदार नवनाथ वगवाड, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हाध्यक्ष ॲड.आर.एन.अग्रवाल, सचिव परसराम हेंबाडे, सहसचिव एम.एम.राऊत, प्रसिध्दी प्रमुख डॉ.विजय निलावार, जिल्हा संघटक सुभाष लदनिया, ॲड.शोएब, जेठानंद नेंनवानी, माजी उपप्राचार्य विक्रम जावळे, प्रा.जी.पी.मुपकलवार, सुभाष नागरे, स्वस्त धान्य दुकानदार संघाचे भिकूसेठ बाहेती, कांनबाळे, श्रीमती ॲड.पाटील, अधीक्षक जकाते आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना श्री. धरमकर म्हणाले, ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी ग्राहक चळवळ निर्माण झाली पाहिजे. यासाठी आपण शालेय विद्यार्थ्यांमध्ये आपल्या हक्काची जाणीव करुन देण्यासाठी जनजागृती करण्यासाठी ग्राहक पंचायतीला योग्य ते सहकार्य करण्यात येईल, यासाठी आपण पुढे यावे असे त्यांनी यावेळी आपण सांगितले.

याप्रसंगी परसराम हेंबाडे, एम. एम. राऊत, डॉ.विजय निलावार यांनी येत्या नववर्षात विद्यार्थी वर्गासाठी ग्राहक चळवळ आणि हक्क व कल्याण संदर्भात उदबोधन उपक्रम राबवण्यात बद्दल सूचित केले.

ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष ॲड. आर. एन. अग्रवाल यांनी याबाबत प्रशासन, शिक्षण विभाग आणि सर्व संबंधितांना सोबत घेवून व्यापक मोहीम राबवण्यासाठी शासकीय यंत्रणेने पाठबळ द्यावे, त्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वतीने वक्त्यांची एक फळी निर्माण करता येईल, असे सांगून ग्राहक पंचायत सज्ज असल्याचे म्हंटले.

ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना अनेक हक्क प्राप्त झाले असून या हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी व ग्राहक चळवळ लोकाभिमुख होण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक दिन दरवर्षी साजरा करण्यात येत असल्याचे हिंगोलीचे तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी प्रास्ताविकात सांगितले.

याप्रसंगी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य, ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा शाखेचे पदाधिकारी आणि सदस्य, जागरुक व ज्येष्ठ नागरिक, ग्राहक कल्याण क्षेत्रातील अन्य मंडळी, हिंगोली जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच तहसील कार्यालय आणि संबंधित विभागातील अधिकारी. कर्मचारी, शिक्षण, आरोग्य, व्यापार क्षेत्रातील नागरिक सहभागी झाले होते. प्रारंभी दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन पत्रकार डॉ.विजय निलावार यांनी केले.

******

 

मोटार सायकल संवर्गासाठी नवीन मालिका चालू

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील यापूर्वीची मोटारसायकल संवर्गासाठीची एमएच-38-एएफ ही मालिका संपुष्टात आल्यामुळे मोटार सायकल संवर्गासाठी एमएच-38-एजी-0001 ते 9999 ही नवीन मालिका सुरु केली आहे. 

ज्या वाहन मालकांना वाहनासाठी आकर्षक क्रमांक राखीव करावयाचा आहे. त्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून आपला आकर्षक क्रमांक विहित शासकीय शुल्क भरुन राखीव करुन घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे.

*****

 

मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्धारित करण्यात आलेल्या दि. 01 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कार्यक्रमामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे.  दि. 01 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रम सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तो पुढीलप्रमाणे आहे.

दावे व हरकती निकाली काढण्याचा सध्याचा कालावधी मंगळवार, दि. 26 डिसेंबर, 2023 पर्यंत होता. यात सुधारणा करुन तो कालावधी शुक्रवार, दि. 12 जानेवारी, 2024 पर्यंत वाढविण्यात आला आहे. मतदार यादीचे हेल्थ पॅरामीटर तपासणे आणि अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी घेणे, डेटा बेस अद्यावत करणे व पुरवणी याद्यांची छपाई करण्याचा सध्याचा कालावधी सोमवार, दि. 01 जानेवारी, 2024 पर्यंत होता. यात सुधारणा करुन तो कालावधी बुधवार, दि. 17 जानेवारी, 2024 पर्यंत वाढविण्यात आला आहे. तर अंतिम यादी प्रसिध्दीचा सध्याचा कालावधी शुक्रवार, दि. 05 जानेवारी, 2024 असून त्यात सुधारणा करुन तो कालावधी सोमवार, दि. 22 जानेवारी, 2024 पर्यंत वाढविण्यात आला आहे. या बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी संतोष राऊत यांनी केले आहे.

******

 

केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव दोन दिवसाच्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर

 

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : केंद्रीय श्रम व रोजगार, पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव हे दि. 30 व 31 डिसेंबर, 2023 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि. 30 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 8.00 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून मोटारीने प्रयाण करुन सकाळी 11.30 वाजता फाळेगाव ता.जि. हिंगोली येथे आगमन व तेथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता फाळेगाव येथून आडगाव कडे प्रयाण. 1.40 वाजता आडगाव येथे आगमन व 2.30 वा. पर्यंत राखीव. दुपारी 2.30 वाजता आडगाव येथून औंढा नागनाथ कडे प्रयाण. 3.30 वाजता औंढा नागनाथ येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमास उपस्थिती. सांय. 6.30 वाजता औंढा नागनाथ येथून प्रयाण. 7.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव तसेच मुक्काम .

रविवार, दि. 31 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 9.30 ते 10.30 वाजता पक्षाचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासमवेत बैठकीस उपस्थिती. 11.00 वाजता मोटारीने सेलसुरा ता.कळमनुरी जि.हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजता पर्यंत सेलसुरा येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.00 वाजता सेलसुरा येथून मोटारीने प्रयाण करुन 1.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन. 1.30 ते 2.30 वाजता राखीव. दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथून मोटारीने छत्रपती संभाजीनगर कडे प्रयाण.

******

 विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी

शुक्रवारी दहा गावात जाणार विकसित भारत संकल्प यात्रा

 

·         नागरिकांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचाव्यात, तसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही विशेष मोहीम  24 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शुक्रवार, दि. 29 डिसेंबर, 2023  रोजी जिल्ह्यातील विविध दहा ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, नाव नोंदणी करण्यात येत आहे.

शुक्रवार, दि. 29 डिसेंबर, 2023 रोजी ही विकसित भारत संकल्प यात्रा हिंगोली तालुक्यात सकाळी चिंचोली  व सायंकाळी कनका येथे, कळमनुरी तालुक्यात सकाळी धानोरा जहा. व सांयकाळी कडपदेव येथे, वसमत तालुक्यात सकाळी भोगाव व सांयकाळी तुळजापूरवाडी येथे, औंढा नागनाथ तालुक्यात सकाळी लांडाळा व सायंकाळी लाख येथे, सेनगाव तालुक्यात सकाळी येलदरी व सायंकाळी आमदरी येथे जाणार आहे.

या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, ओडीएफ प्लस मॉडेल ग्रामपंचायत, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के, मेरी कहानी मेरी जुबानी आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.

यासाठी संबंधित गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे .

*******   

27 December, 2023

 

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून

गावागावात पोहोचली शासनाच्या योजनांची माहिती

 

·         विकसित भारत संकल्प यात्रेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हिंगणी, बिबगव्हाण, पोटा, भेंडेगाव व लिंबाळा आमदरी येथील नागरिकांना दूरदृश्य प्रणालीद्वारे केले संबोधन

·    जिल्ह्यातील विविध गावातील विकसित भारत संकल्प यात्रेत गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

 





हिंगोली (जिमाका), दि. 27 :  'विकसित भारत संकल्प यात्रा' आज हिंगोली तालुक्यातील हिंगणी व लासीना, कळमनुरी तालुक्यातील बिबगव्हाण व झरा, औंढा तालुक्यातील पोटा खु., सेनगाव तालुक्यातील लिंबाळा आमदरी व चिखलागर, वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथे पोहचली आहे. शासनाच्या वतीने सर्व प्रकारच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकरी, कामगार, महिला तसेच युवा वर्गाच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या योजना शासन राबवत आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन शासनाच्या विविध कल्याणकारी  योजनांचा जागर करत योजनांची माहिती देण्यात येत आहे. या संकल्प यात्रेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील गावागावात फिरणाऱ्या संकल्प यात्रेच्या रथाद्वारे हिंगणी, बिबगव्हाण, पोटा, भेंडेगाव व लिंबाळा आमदरी येथील नागरिकांना दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले.

यावेळी या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, ओडीएफ प्लस मॉडेल ग्रामपंचायत, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के, मेरी कहानी मेरी जुबानी आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. तसेच 'आपला संकल्प, विकसित भारत' या एलईडी रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगण्यात आली. याप्रसंगी गावातील नागरिकांना आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, उज्वला गॅस योजना, घरकुल योजना, आरोग्य तपासणी यासारखे विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. तसेच यावेळी  ड्रोन यंत्राद्वारे कोणती कामे करता येतात याबाबतचे प्रात्यक्षिक करुन दाखवण्यात आले.

वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथील कार्यक्रमाला सहायक गटविकास अधिकारी सुनिल अंभुरे, विस्तार अधिकारी गुडेवार, ग्रामसेवक तेलगोटे यांच्यासह संबंधित गावाचे संरपच, तलाठी, कृषि सहायक, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंगोली तालुक्यातील हिंगणी व लासीना, कळमनुरी तालुक्यातील बिबगव्हाण व झरा, औंढा तालुक्यातील पोटा खु., सेनगाव तालुक्यातील लिंबाळा आमदरी व चिखलागर येथील कार्यक्रमाला संबंधित गावाचे संरपच, ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहायक, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

******