19 December, 2016

जिल्हा व राज्यस्तर युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 19 : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध विषयांत युवांनी पार पाडलेल्या भूमिका, योगदान यामुळे युवांची  एक अव्दितीय समूह अशी ओळख समाजात निर्माण झालेली आहे. युवा हा समाजाचा अविभाज्य घटक असून विकास प्रक्रियेतील  आवश्यक भाग आहे. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण 2012 च्या अनुषंगाने धोरणातील शिफारशीच्या अनुषंगाने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर युवकांच्या विकासासाठी राष्ट्रीय व सामाजिक  क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 15 ते 35 वयोगटातील युवक - युवती व स्वयंसेवी संस्थांना जिल्हा व राज्य युवा पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावरील पुरस्काराचे स्वरूप युवक व युवतींसाठी रक्कम 10 हजार रुपये (प्रत्येकी) गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि युवा संस्थेकरिता रक्कम 50 हजार (प्रत्येकी) गौरवपत्र, सन्मानचिन्ह असणार आहे. राज्यस्तरावरील पुरस्काराचे स्वरूप युवक व युवतींसाठी रक्कम 50 हजार रुपये (प्रत्येकी) गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि युवा संस्थेकरिता रक्कम 1 लाख रुपये (प्रत्येकी) गौरवपत्र, सन्मानचिन्ह असणार आहे. सदरचा पुरस्कार 1 मे महाराष्ट्र दिनी पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
अर्ज प्राप्त करून घेणे व जमा करणेची अंतिम तारीख दि. 28 फेब्रुवारी, 2017 आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. विहीत अर्ज पात्रतेचे निकष व अधिक माहितीकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली  यांनी केले आहे.

*****
जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 19 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या मार्फत जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू-2 (महिला-1, पुरुष-1) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक-1 व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता- 1 यांच्या कार्याचे योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे याकरीता जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहे.
या पुरस्कारामध्ये प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व रोख रक्कम 10 हजार रुपये देण्यात येणार असून पुरस्काराचे वर्ष दि. 1 जूलै, 2015 ते दि. 30 जुन, 2016 या कालावधीतील राहील. तरी जिल्ह्यातील उत्कृष्ठ कामगीरी करणारे खेळाडू, मार्गदर्शक, क्रीडा कार्यकर्ता यांनी दि. 26 डिसेंबर, 2016 या कालावधीत कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.
गुणवंत खेळाडू  ची मान्यता प्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य/राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धेमधील पुरस्कार वर्षाच्या लगत पुर्व पाच वर्षातील राज्य व राष्ट्रीयस्तरावरील वरीष्ठ/कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला राष्ट्रीय स्तरीवरील कामगीरी लक्षात घेण्यात येईल यापैकी उत्कृष्ठ ठरणाऱ्या तीन वर्षाच्या कामगीरीचा विचार करण्यात येईल.
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक  म्हणून सतत दहा वर्ष क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले असले पाहिजे व त्यांचे वयाची 30 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरीता त्या जिल्ह्यातील खेळाडूचीच कामगीरी ग्राह्य धरली जाईल. गेल्या दहा वर्षात किमान वरीष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला (पंचायत युवा क्रीडा खेल व अभियान) मधील राष्ट्रीयस्तरावरील पदकविजेते खेळाडू तयार केले असतील असा क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करु शकतो.
गुणवंत क्रीडा कार्यकर्ता क्रीडा संघटक, कार्यकत्याने सतत दहा वर्ष महाराष्ट्र क्रीडा विकासासाठी भरीव योगदान दिले असले पाहिजे व त्याने वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकणाकरीता त्या जिल्ह्यातील कामगीरी ग्राह्य धरली जाईल. क्रीडा कार्यकर्ते यांनी केलेल्या कामाचे मुल्यमापन पुढील तीन प्रकारे करण्यात येते. विकासात्मक कार्य - संघटक कार्यकर्ते यांच्या सक्रीय प्रयत्नातून अधिकृत खेळांची किती मैदाने त्यांच्या जिल्ह्यात उभारली गेली. किती व्यायाम शाळा, क्रीडा संस्था, संघटना स्थापन करण्यात आल्या. दहा वर्षात किती अधिकृत खेळाच्या राष्ट्रीय, राज्य, विभागीय, जिल्हास्तरीय भरविला व अर्जदाराची कोणती जबाबदारी होती ती स्पष्ट करावी.
जिल्हा क्रीडा पुरस्काराचे प्रस्ताव दि. 26 डिसेंबर, 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत स्विकारले जातील. दि. 26 डिसेंबर 2016 नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. यांची नोंद जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणऱ्या गुणवंत खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****
अनुसूचित जातीच्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर वाटप
        हिंगोली, दि. 19 :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सन 2016-17 मध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदनीकृत बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर वाटप करण्यात येणार आहेत.
            जिल्ह्यातील इच्छूक व नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी खालील अटी व शर्तीची पुर्तता करणे आवश्यक आहे. 1) अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचा नोंदणीकृत बचतगट असावा, बचतगटाचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असावे.  2) गटामध्ये किमान 10 किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य असून पैकी 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत 3) गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. 4) सदस्यांचे जातीचे प्रमाणपत्र सक्षम अधिकारी यांचे आवश्यक. 5) गटातील प्रत्येक सदस्याचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असावे व ते आधारक्रमांकाशी सलग्न असावे. 6) गटाने / गटातील सदस्यांनी यापुर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 7) निवडीनंतर गटाला 10 टक्के रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट तात्काळ द्यावा लागेल. अर्ज जास्त असल्यास ड्रॉ पध्दतीने निवड करण्यात येईल.
            वरील अटी व शर्ती पुर्ण करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील बचत गटांनी तसेच यापुर्वी अर्ज सादर केले परंतु लाभ न मिळालेल्या गटांनी नव्याने अर्ज सादर करावेत. अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली या कार्यालयामधुन विनामुल्य घेऊन जावेत व परिपूर्ण भरलेले अर्ज दिनांक 28 डिसेंबर, 2016 पर्यंत सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****    
फळपिकावर किडरोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन करण्यात येणार
हिंगोली, दि. 19 :- राष्ट्रीय कृषि विकास योजना 2016-17 अंतर्गत फळपिकावरील किडरोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
योजनेचा उद्देश - जिल्ह्यातील केळी या पिकाचे सर्वेक्षण करून किड रोगाचा प्रादुर्भावाबाबत शेतकऱ्यांना वेळीच उपाययोजना सुचविणे, किडरोगाच्या आकस्मिक प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळणे, किडरोगाचा प्रादुर्भाव वेळीच लक्षात आल्याने पुढील संभाव्य नुकसान टाळुन उत्पादनात वाढ करणे, किडरोगाबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षीत करून किडरोगाचे वेळीच व्यवस्थापन करणे, किडरोग प्रादुर्भाविन क्षेत्रासाठी आपत्कालीन पिक संरक्षण औषधे उपलब्ध करून देणे. सदर योजनेचे कार्यक्षेत्र - जिल्ह्यातील वसमत व कळमनुरी तालुक्यात केळी पिकाचे अधिक क्षेत्र असल्यामुळे दोन तालुक्याची निवड करण्यात आली आहे.
मनुष्यबळ - या योजने अंतर्गत महात्मा फुले मल्टीसर्विसेस परभणी या संस्थेकडून कंत्राटी किडसर्वेक्षक 2, संगणक प्रचालक 1 व उपविभाग स्तरावर किडनियंत्रक तथा 1 कृषि पर्यवेक्षक यांची प्रतिनियुक्ती केली असून किडसर्वेक्षक यांचेकडून सर्वेक्षणाचे काम करून घेणे त्यांचेवर सनियंत्रण करणे, मासिक अहवाल करणे, पाक्षिक अहवाल, उपस्थिती अहवाल सल्ला तालुकास्तरावर व शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून देणे ही कामे उपविभाग स्तरावरून करण्यात येतात. तरी या योजने अंतर्गत वेळोवेळी येणारे सल्ले शेतकऱ्यांनी अमलात आनुन उत्पादनात वाढ करावी, असे आवाहन बोथीकर, कृषि पर्यवेक्षक खंदारे व उपविभागीय कृषि अधिकारी यु. जी. शिवणगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 
अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षण महत्वाचे
--- जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी
हिंगोली, दि.19:-  अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. तसेच अल्पसंख्यांकाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन सदैव संवेदनशिल आणि कटिबध्द आहे.  समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी अल्पसंख्याक समाजाला शिक्षणाची संधी मिळवून देणे महत्वाचे आहे, असे जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी सांगितले.  
जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित अल्‍पसंख्‍यांक हक्‍क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. अनिल भंडारी बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमा यावेळी  अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी डी. आर. गुप्ता, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक शिवाजी राऊत, माजी नगराध्यक्षा अनिताताई सुर्यतळ, राज्य संघटक महाराष्ट्र राज्य बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र संघाचे डॉ. विजयकुमार निलावार , साप्ताहिक पुसेगाव की खबरचे संपादक नजीर अहेमद, सिध्दीक अहेमद अब्दुल खुद्दुस, बुऱ्हाण पहेलवान, प्रकाश सोनी , धरमचंद्र बडेरीजी आदींचीही व्याख्याने झाली.  
जिल्हाधिकारी श्री. भंडारी पुढे म्हणाले की, व्यक्तिच्या जडणघडणीत आणि सुसंस्कृत समाजाच्या उभारणीमध्ये शिक्षणाची भूमिका महत्वाची आहे.  विशेषतः ग्रामीण भागातील तसेच दुर्बल घटकांना  शिक्षणाची संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीमध्ये या समाजातील मुलींची प्रगती हा महत्वाचा टप्पा आहे. अल्पसंख्याक समाजाची सामाजिक, आर्थिक उन्नती होण्यात समाजातील सुशिक्षित मुलीं-स्त्रीयांची भूमिका महत्वाची ठरणारी आहे, त्यादृ्ष्टीने बदलत्या काळानुसार कौशल्याधारीत शिक्षण देण्यावर विशेष भर द्यावा, प्रसार व प्रचार यावरही भर देण्यात यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि नंतर देश उभारणीसाठी अल्पसंख्यांक समाजाने दिलेल्या योगदानाचा गौरवपुर्ण उल्लेख करुन जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले की, शिक्षणाने जगण्याचे शहाणपण प्राप्त होत असते. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तिला शिक्षणाची संधी मिळाली पाहीजे. त्यादृष्टीने ग्रामीण भागातील शाळांची  गुणवत्ता वृद्धीगंत करणे व अल्पसंख्यांकपर्यंत योजनाचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे.
अल्पसंख्याकांच्या विकासाठी  विभागामार्फत भरीव प्रयत्न केले जात असुन मुलींचे शिक्षणातील प्रमाण वाढण्यासाठी शिष्यवृर्ती, मोफत शिक्षणाची संधी, वसतिगृहाची सुविधा यासारख्या विविध उपयुक्त योजना राबण्यात येत आहेत. उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना रोजगार, व्यवसाय करण्यासाठी विभागामार्फत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याचाही लाभ अल्पसंख्यांक समाजानी घ्यावा, असे जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी सांगितले.
अप्पर जिल्हाधिकारी श्री. राम गगराणी म्हणाले की, अल्पसंख्याकांसाठीच्या योजनांचा प्रसार व प्रचार, प्रसिध्दी होणे आवश्यक आहे. ती आपल्यापासून सुरुवात करावी त्यामुळे योजनांचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत पोहचतील.
            राज्य संघटक महाराष्ट्र राज्य बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र संघाचे डॉ. विजयकुमार निलावार यांनी अल्पसंख्यांक व बहुसंख्यांक यांचा सलोखा निर्माण करावा. तसेच हम सब एक है अशी भावना निर्माण करावी , असे त्यांनी सांगितले.
            माजी नगराध्यक्षा श्रीमती अनिताताई सुर्यतळ म्हणाल्या की, शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मकतेने घ्यावा. तसेच आपल्या मानसिकतेत बदल घडवून आणणे गरजेचे आहे. शिक्षणामुळे स्त्री सक्षम बनते व माणूस म्हणून ओळख निर्माण होते.
            या कार्यक्रमाला विविध विभागांचे विभागप्रमुख,प्राध्यापक,विद्यार्थी,मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागतपर भाषण जिल्हा समन्वयक मानव विकास एम. एम. राऊत यांनी केले. तर आभार जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांनी मानले.
विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण
जिल्ह्यात जिल्हास्तरीय भिंतीपत्रक स्पर्धा, निंबध स्पर्धा निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. सदर पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी व अन्य व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करुन सत्कार करण्यात आला.
भिंतीपत्रक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक हिंगोली येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेची इयत्ता नववीमधील विद्यार्थींनी                 कु. सिमा आनंदा अंभोरे , द्वितीय क्रमांक सरजुदेवी भिकुला भारुका विद्यालयाची  विद्यार्थींनी इयत्ता आठवीमधील                 कु. अवंतिका उत्तमराव शिंदे तर तृतीय क्रमांक श्रीमती गोदावरीबाई कागलीवाल विद्यालयाची इयत्ता नववीमधील विद्यार्थींनी कु. कमल लक्ष्मण मांडगे .  

निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक भारतीय विद्यामंदिरची विद्यार्थींनी इयत्ता नववीची कु. गौरी राम शेटे, द्वितीय क्रमांक बहुविध प्रशालेची विद्यार्थींनी इयत्ता नववीची कु. महेविश शहाबाज खाँ पठाण, तृतीय क्रमांक श्रीमती गोदावरीबाई कागलीवाल विद्यालयाची इयत्ता नववीमधील विद्यार्थींनी कु. साक्षी बाळू सुर्वे यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.     
वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक बाबुराव पाटील महाविद्यालयाची इयत्ता बारावीची कु. स्मिता सर्जेराव कवडे, द्वितीय क्रमांक मौलाना आझाद ऊर्दू विद्यालयाची इयत्ता बारावीची कु. हिना कौसर वहिदुल्ला खाँन , तृतीय क्रमांक मौलाना आझाद ऊर्दू विद्यालयाची इयत्ता बारावीची कु. जैनेब फातेमा सरफराज खाँन .  
****










18 December, 2016

विदर्भ आणि मराठवाड्यातील पाच हजार गावांचा शाश्वत शेतीच्या माध्यमातून कायापालट करणार

* जागतिक बँकेकडून 4 हजार कोटी मंजूर *

---मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हिंगोली, दि.18:- शेतकरी आणि शेतमजूरांच्या जीवनात समग्र परिवर्तन करण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील पाच हजार गावांचा शाश्वत शेतीच्या माध्यमातून कायापालट करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज येथे दिली.
            हिंगोली येथील सेनगाव तालूक्यातील कडोळी येथे राष्ट्रऋषी नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सुरेश जोशी, पालकमंत्री दिलीप कांबळे, आमदार तान्हाजी मुटकूळे, हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबारावजी बांगर, कडोळी ग्रामच्या सरपंच उषाताई माहोरकर, पंचायत समिती सदस्य अंजीलताई शांडील्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाडा आणि विदर्भातील शाश्वत शेती, शेतीमध्ये गंतवणूक आणि शेतीमध्ये परिवर्तन व्हावे यासाठी जागतिक बँकेकडे सादर केलेल्या अशा प्रकारच्या प्रस्तावास पहिल्यांदाच 4 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होणार आहे असे सांगुन मुख्यमंत्री म्हणाले की, या योजनेमुळे शेत जमीनीतील मृदा सुधारणा, सुक्ष्म जलसंधारणाची व्यवस्था, ठिबक सिंचन, ज्या पीकांवर वातावरणांचा परिणाम होणार नाही असे नवीन बीज तयार करणे, त्या पीकांसाठी यांत्रीकी व्यवस्था आणि मार्केट पर्यंत पोहचवण्याची व्यवस्था करणे असा एकात्मिक विकासाचा कार्यक्रम शासनाने तयार केला असून, या प्रकल्पाचे नांव ‘नानाजी देशमुख ग्राम उदय योजना’ असे देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रामीण भागातील 12 बलुतेदार तथा कारागिरांच्या कौशल्यास चालना दिल्यास गाव समृध्द होऊ शकते. पंतप्रधानानी सुरु केलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमासाठी कारागिरांच्या कारीगिरीमध्ये खुप कौशल्य असून त्यांना योग्य अशी संधी मिळावी यासाठी केंद्र सुरु करण्यासाठी राज्य शासनामार्फत केंद्र उभारणीसाठी 5 कोटी रुपये देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी सतराशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असून त्यामुळे जिल्ह्यातील 14 ते 15 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. सदर कामे येणाऱ्या 3 ते 4 वर्षात पुर्ण करण्यात येणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात सिंचनाची व्यवस्था निर्माण होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
स्वच्छ भारत अभियानातंर्गत राज्यातील 8 हजार गावे हागणदारी मुक्त झाली असून देशात राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच राज्यातील 25 हजार शाळा डिजीटल केल्याने शिक्षण व्यवस्था बदलण्यास मदत झाली असून यामध्ये देशात राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. याबरोबरच प्रत्येक ग्रामपंचायत, शाळा, आरोग्य केंद्रास इंटनरनेट कनेक्टीव्हिटी देवून डिजीटीलायझेशन करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
नानाजी देशमुख यांनी देशातील शेतकरी, मजूर, दलित, शोषित, पिडीत समाजासाठी फार मोठे योगदान दिले आहे. तसेच शेती आणि ग्राम विकासाच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे. गाव समृध्द होत नाही तोपर्यंत विकास होणार नाही आणि देश विकासाकडे वाटचाल करणार नाही, असे नानाजीचे मत होते. समाजकरणांसाठी नानाजीनी मंत्रीपदाचा त्याग करत राजकारणातून संन्यास घेवून चित्रकूट मध्ये ग्राम विकासाचे काम सूरू केले होते असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यावेळी म्हणाले.
पालकमंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, राज्य शासन शेतकरी आणि शेत मजूर यांच्यासाठी काम करीत आहे. जिल्ह्याचा अनुशेष दुरुस्ती केल्याने सिंचन क्षमता वाढणार असून पाण्याच प्रश्न सुटणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दैनिक तरुण भारत सोलापूर यांनी यानिमित्ताने काढलेल्या विशेषंकाचे आणि दैनिक दिलासा वृत्तपत्राचे विमोचन करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्यने नागरिकांची उपस्थिती होती.
****