26 June, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात
 राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन
हिंगोली, दि. 26:- येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार श्री. मेटकरी यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  
****



23 June, 2017

कोसळणाऱ्या विजेपासून नागरीकांनी स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 23 : दरवर्षी अंगावर वीज पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मरण पावतात अथवा दुर्घटनाग्रस्त होतात, त्यामुळे कोसळणाऱ्या विजेपासून नागरीकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी खालीलप्रमाणे खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
आकाशात विजा चमकत असल्यास हे करा : आकाशात विजा चमकत असल्यास शेतात काम करणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ शेताजवळील घरात किंवा सुरक्षित ठिकाणी जावे. पोहणारे, मच्छीमारी करणाऱ्यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे, जवळ आसरा नसेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा. तसेच विजेपासून बचावासाठी दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे गुडघ्यामध्ये झुकवा वडोके जमिनीवर टेकणार नाही याची काळजी घ्या, झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे, वीजवाहक वस्तूपासून दूर रहा. उदा. विजेचे खांब, टेलीफोन खांब, लोखंडी पाईप ई. पासून दूर राहावे, वीज पडल्यास प्राथमिक उपचारा करीता मुख्यतः हृदय व श्वसन प्रकियेत अडथळा येतो त्यामुळे विद्युतघात झाल्यास लगेच हृदयाच्या बाजूने मालीश करावी. तोंडाने श्वसन प्रक्रियेस मदत करावी, विजा चमकत असल्यास संगणक, विद्युत उपकरणे बंद करून ठेवावीत.
आकाशात विजा चमकत असल्यास हे करू नका : पाण्याचे नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका. बाहेर असाल तर भ्रमणध्वनी तात्काळ बंद करावा, विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका. झाडाखाली आश्रय घेऊ नका, दोन चाकी, सायकल यावर असाल तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जावे, धातूची कांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका. 

***** 
स्वयंरोजगाराविषयक प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 23 : स्थानिक हिंगोली येथे युवक / युवती करिता स्वयंरोजगार वर आधारित 12 दिवसांच्या कालावधीचे प्रशिक्षणाचे आयोजन दि. 28 जून, 2017 ते 12 जुलै, 2017 या कालावधीत करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली व्दारा आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमातून स्वयंरोजगार व रोजगार प्राप्त होण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमात शेळी पालन, म्हैसपालन इत्यादी विषयी या प्रकारचे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे सोबतच व्यवसाय मार्गदर्शन, व्यक्तीमत्व विकास, शासनाच्या विविध कर्ज योजना, बँकेची कार्यप्रणाली, आदीबाबत तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात युवक व युवतींना प्रवेश घ्यावयाचा असल्यास वयोमर्यादा 18 ते 45, शिक्षण 7 वी पास, प्रवेशाची अंतिम तारीख 27 जून, 2017 रोजीच्या दु. 4.00 वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजक रामप्रसाद मुडे मो. 8390201549 एमसीईडी जिल्हा कार्यालय व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाचा दुसरा मजला हिंगोली येथे प्रत्यक्ष भेटून आपला अर्ज सादर करावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (एम.सी.ई.डी) चे प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 
शासकीय अल्पसंख्यांक वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 23 : अल्पसंख्यांक विकास विभाग महाराष्ट्र शासनातर्फे शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, वसमत जि. हिंगोली येथे अल्पसंख्यांक मुलींचे वसतीगृहामध्ये प्रवेश घेण्याकरिता सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या (अल्पसंख्यांक 70 टक्के व बिगर अल्पसंख्यांक 30 टक्के) जागा भरण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छूक मुलींनी प्रवेश अर्ज आपल्या महाविद्यालयामार्फत भरुन अल्पसंख्यांक मुलींचे वसतीगृह व्दारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमत येथे सादर करावेत, अधिक माहितीसाठी वसतीगृहाचे समन्वयक श्री. खोले यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुनिल वानखडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 

22 June, 2017


साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत
                                             
हिंगोली, दि. 22: सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात 10 वी व 12 वी पदवी, पदव्युत्तर, वैद्यकिय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील विद्यार्थी / विद्यार्थीनींना महामंडळाकडून जेष्ठता व गुण क्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या अधिन राहून अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.
या शिष्यवृत्ती करिता पात्र असलेल्या विद्यार्थी / विद्यार्थींनी कडून 10 जुलै, 2017 पर्यंत आवश्यक कागदपत्रासह अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जासोबत पुढील कागदपत्र साक्षांकित करून जोडावे. 1) जातीचे प्रमाणपत्र, 2) उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 3) शाळा सोडल्याचा दाखला, 4) मार्क लिस्ट, 5) पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतल्याचा पुरावा, 6) फोटो आणि 7) आधार कार्ड.
वरील माहिती पुढील पत्यावर पाठविण्यात यावी - साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, हिंगोली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जिल्हा सरकारी रुग्णालयाचे पूर्व बाजूस दर्गा रोड, रिसाला बाजार, हिंगोली फो. क्र. 02456-223831 या पत्यावर पाठविण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, हिंगोली यांनी केले आहे.

*****
जात वैधता प्रमाणपत्रासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 22 : जिल्ह्यामध्ये दि. 21 नोव्हेंबर, 2016 पासून जिल्हास्तरीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन झालेली असून सदर समितीच्या  वेगवेगळ्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील निवडणूक / सेवा / विद्यार्थी अशा प्रकरणामध्ये ज्यांचे जातीचे प्रमाणपत्र वैध झालेली आहेत. अशा सर्वांना जिल्हा जात प्रमाणपत्र समितीकडून त्यांनी त्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जात नमुद केलेल्या भ्रमणध्वनीवर एस. एम. एस. (भ्रमणध्वनी संदेश) पाठविण्यात आलेले असल्याने राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचे जयंतीनिमित्त दि. 26 जून, 2017 रोजी सकाळी 10.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय सांस्कृतिक भवन, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पुर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली येथे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केलेल्या प्रस्तावाची मुळ पावती, उमेदवारांचे (स्वत:चे) फोटो असलेले (उदा. आधार कार्डची छायांकित प्रत, पॅनकार्डची छायांकित प्रत, महाविद्यालय किंवा शासकीय कार्यालयाने दिलेले ओळखपत्राची छायांकित प्रत) ओळखपत्रासह स्वत: उपस्थित राहावे, आपले जात वैधता प्रमाणपत्र मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी यांनी कळविलेले आहे.
तरी ज्या उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र आहे अशा उमेदवारांनी स्वत: उपस्थित राहणे अत्यावश्यक आहे. इतर उमेदवार किंवा नातेवाईक यांना आपले जात वैधता प्रमाणपत्र दिले जाणार नाही, कृपया याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 
विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 22 : सन 2017-18 या शैक्षणिक वर्षाकरिता मुलां-मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे प्रवेश सन 2015-16 च्या पुर्वीप्रमाणेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात कार्यरत मागासवर्गीय मुलां/मुलींचे शासकीय वसतिगृहातील प्रवेश ऑफलाईन (मॅन्युअली) पध्दतीने करण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या सर्व शासकीय वसतिगृहावर सन 2017-18 च्या प्रवेशाकरिता भरावयाचे अर्ज मोफत वाटप सुरू असून सोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार कार्यवाही होणार असल्याने जिल्ह्यातील सर्व पात्र मागासवर्गीय विद्यार्थी / विद्यार्थीनींनी आपला प्रवेश ज्या तालुक्यात आहे, त्या तालुक्यातील मागासवर्गीय मुलां/मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी ऑफलाईन (मॅन्युअली) अर्ज भरण्याकरिता प्रत्यक्ष वसतिगृहामध्ये जाऊन अर्जांचा नमुना प्राप्त करून घ्यावा व त्या विहित अर्जांच्या नमुन्यात आपला अर्ज विहित मुदतीत आवश्यकत्या कागदपत्रासह आपला अर्ज त्याच वसतिगृहात सादर करून त्याची पोच-पावती त्याच वसतिगृहातून प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****