29 November, 2017

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन



वृत्त क्र. 558                                              दिनांक : 29 नोव्हेंबर 2017

जिल्हास्तरीय  युवा महोत्सवाचे आयोजन

हिंगोली,दि.29: राज्याचे युवा धोरण 2012 नुसार युवक कल्याणाच्या विविध योजना राबविण्यात येतात त्याचाच एक भाग  म्हणून  युवकांमध्ये  राष्ट्रीय  एकात्मता  तसेच युवांच्या सुप्त  गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा विभाग व अहिल्यादेवी  होळकर कन्या  विद्यालय, वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे दि. 4 डिसेंबर, 2017 रोजी अहिल्याबाई  होळकर कन्या विद्यालय, वसमत येथे सकाळी 11.00 वाजता आयोजन करण्यात आले आहे.
या युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी कला प्रकार कलाकारांची संख्या खालीलप्रमाणे आहे. लोकनृत्य -20 कलाकार, लोकगीत-10 कलाकार, एकांकिका (इंग्रजी व हिंदी)-12 कलाकार, शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी किंवा कर्नाटकी) सितार-1, बासरी -1, वीणा-1, तबला-1, मृदंग-1, हार्मोनियम (लाईट)-1, गिटार-1, शास्त्रीय नृत्य- मणिपुरी-1, ओडीसी-1, भरतनाट्यम-1, कथ्थक-1, कुचीपुडी-1, वक्तृत्व (हिंदी किंवा इंग्रजी-1 अशा एकूण 56 कलाकार व सहकलाकरांना सहभागी होता येणार असून या कलाप्रकारामध्ये कला सादर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे . या महोत्सवात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील 15 ते 19 वर्षे वयोगटातील युवक-युवती, युवक मंडळे, विद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी होऊ शकतात. युवक महोत्सवात सहभागी होण्यासाठी आपल्या  प्रवेशिका मंडळाच्या, शाळेच्या, कॉलेजच्या लेटरपॅडवर कलाकारांचे नांव, जन्म तारीख व स्वाक्षरी इत्यादी माहिती भरुन  दि. 3 डिसेंबर, 2017 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा, हिंगोली येथे करावेत. यासाठी स्पर्धकांनी आपल्या जन्मतारखेचा पुरावा सादर करावा, उशिराने आलेल्या प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत.  प्रत्येक कलाकाराने त्यांना आवश्यक असणारे वेशभुषा, ड्रेस, साहित्य, वाद्य, मेकअप साहित्य प्रत्येकाने स्वत:चे आणावे. तसेच सी.डी., कॅसेट्स, डिव्हीडी यावर कला सादर करता येणार नाही. कला सादर करतांना कुठल्याही प्रकारची इजा दुखापत अथवा गंभीर इजा झाल्यास आयोजन समिती जबाबदार राहणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी संघ व्यवस्थापक  व कलाकार यांची राहील. तसेच पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
तरी हिंगोली जिल्ह्यातील  युवक-युवतींनी या युवक  महोत्सवात  सहभागी होऊन आपल्या अंगी असलेली कला गुण सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
0000

27 November, 2017

पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली दि. 27 : राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप व पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे दि. 29 व 30 नोव्हेंबर, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
बुधवार, दि. 29 नोव्हेंबर, 2017 रोजी रात्री 08.00 वाजता लातूर येथून शासकीय वाहनाने नांदेड-कळमनुरी मार्गे हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 11.50 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व मुक्काम. गुरुवार, दि. 30 नोव्हेंबर, 2017 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक. दुपारी 3 ते 5 वाजता शासकीय बैठका व कार्यक्रमासाठी राखीव. सायंकाळी 06.00 वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने जिंतूर-जालना मार्गे औरंगाबादकडे प्रयाण करतील.

*****
जलसंजीवनी संस्थेपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 27 : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामीण समाज विकास सेवाभावी संस्थेमार्फत ग्रामपंचायतीमध्ये  जलसंजीवणी  मंच मार्फत  पाणी वितरण केंद्र चालवित आहेत. सदर  संस्थेमार्फत  ग्रामपंचायत अंतर्गत  एखाद्या  व्यक्तीची  केंद्रचालक  म्हणून करार पध्दतीवर नेमणूक केलेली आहे. व संबंधीतांकडून प्रत्येकी 20 हजार रुपये घेण्यात येत आहेत.  या संस्थेने  पाणी वितरण  केंद्र चालकाकडे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची  यादी सर्वेक्षण सन 2002-03  देऊन सदर दारिद्र्य रेषेखालील यादीप्रमाणे लाभार्थी संख्या निश्चित करुन त्यानंतरच पाणी वितरण करावे, अशा सूचना  सदर संस्थेने  केंद्र चालकांना  दिल्याचे दिसून येते.
दारिद्र्य रेषेखालील  यादीतील लाभार्थींना पाणी वितरण करणेबाबत  या कार्यालयाने  कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. तसेच  अशाप्रकारची  शासनाची  कोणतीही योजना नाही. या संस्थेने सन 2002-03 ची बीपीएल ची यादी जी एनआयसी च्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड केलेली आहे. सदरील संस्था दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीचा  दुरुपयोग करत असून  सामान्य  जनतेची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे सदर  संस्थेच्या  जलसंजीवणी मंच या पाणी  वितरण संस्थेशी  या कार्यालयाचा  किंवा शासनाचा काहीही संबंध नाही. यावी सर्व जनतेने नोंद घ्यावी, तसेच सर्व सरपंचांनी  सदर संस्थेस कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये, असे आवाहन प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा , हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 
जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे सामूहिक वाचन

            हिंगोली, दि. 27 : भारतीय संविधान दिनानिमत्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. शासनाच्या सूचनेनुसार आज जिल्हाधिकारी सभागृहामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.
            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी रोहयो खुदाबक्श तडवी, यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची  उपस्थिती होती.


*****

24 November, 2017

विशेष लेख                                                                                                                                             दिनांक : 24 नोव्हेंबर, 2017
नगरपालिका भागातील नागरिकांसाठी विविध योजना
ग्रामीण भागातील लोकांसाठी शासनाच्या जशा विविध योजना असतात तशा शहरी भागासाठीही विविध योजना आहेत. शहरी भागातील जनतेने या योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे.
नगरपालिकेच्या विविध योजनेंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या क्षेत्रातील अनुसूचित जाती तसेच नव बौद्धांसाठी आरक्षित असलेल्या प्रभागांमध्ये तसेच अनुसूचित जातीच्या राखीव प्रभागाशिवाय इतर प्रभागातील ज्या वस्तीतील अनुसूचित जाती व नवबौद्ध (विशेष घटक) यांची लोकसंख्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा वस्त्यांमध्ये रस्ते, पोच रस्ते, जोड रस्ते, रस्त्याचे डांबरीकरण, सिमेंटीकरण (अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत वस्त्यांकरिता कच्चे रस्ते, नाली बांधकाम, लहान नाल्यांवर फरशी बांधणे, विहीर दुरुस्ती तसेच उघड्या विहिरीवर कठडे बांधणे, नदीच्या काठावर अथवा डोंगर उतारावर संरक्षक भिंत तसेच कठडे बांधणे, छोटे पूल, पिण्याच्या पाणीसाठी सोयी सुविधा (हापसा, पाण्याची टाकी) सार्वजनिक उपयोगासाठी मुताऱ्या व शौचालये बांधणे, रस्त्यांवरील विजेचे दिवे, बालवाडी, बगीचे, बगीच्यांमध्ये पक्या स्वरुपाचे बसवावयाचे खेळाचे साहित्य, समाजमंदीर, वाचनालय, व्यायामशाळा, दवाखाने, सांस्कृतिक केंद्र, दुकाने, स्मशानभूमीचा विकास करणे व यासारखी सार्वजनिक हिताची अन्य कामे हाती घेता येतात.
अटी व शर्ती : या योजनेंतर्गत अनुदान अनुज्ञेय होण्यासाठी निवड व निश्चिती करणारा संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्वसाधारण सभेचा ठराव असणे आवश्यक आहे.
या योजनेंतर्गत वरील नमूद केल्याप्रमाणे अनुज्ञेय प्रभागामध्ये हाती घ्यावयाच्या बांधकाम विषयक कामासाठीचे रेखांकन/नकाशे संबंधित नगरपरिषदेसंदर्भात जिल्हा स्तरावरील नगररचना कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून व महानगरपालिका संदर्भात महानगरपालिकेच्या नगररचना अधिकाऱ्यांकडून मंजूर करून घेणे आवश्यक राहिल. जिल्हास्तरावर नगररचना कार्यालयाने संबंधित नगरपरिषदेच्या बांधकाम विषयक प्रस्ताव महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1965 नुसार सुसंगत आहे की नाही हे तपासणे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विकास योजनेचा जमीन वापर व आरक्षणाबाबत सखोल छाननी अपेक्षित आहे. 
रेखांकन/नकाशे मंजुरीनंतर हाती घ्यावयाच्या कामावरील खर्चाच्या तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात प्रचलित कार्यपद्धतीनुसार नगरपरिषदांबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अथवा नगररचना विभागातील अंमलबजावणी कक्ष येथील सक्षम प्राधिकाऱ्याची तांत्रिक मंजूरी घेणे आवश्यक राहील. महानगरपालिकांच्या बाबतीत संबंधित महानरपालिकेचे नगर अभियंता प्रस्तावास तांत्रिक मान्यता देण्यास सक्षम असतील.
अशाप्रकारे रेखांकन मंजूरी तसेच तांत्रिक मंजूरी प्राप्त करून तयार करण्यात आलेला प्रस्ताव निधीच्या उपलब्धतेसाठी संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करण्यात यावा.
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शासनाने विहीत केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून आवश्यक त्या सहपत्रासह निधीच्या मागणीचा परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेनंतर संबंधित जिल्हाधिकारी यांनी प्रस्तावांची सखोल तपासणी करावी. जिल्ह्यांसाठी उपलब्ध असलेली तरतूद लक्षात घेऊन निधीच्या उपलब्धतेनुसार प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीची प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान करावी. या योजनेंतर्गत हाती घ्यावयाच्या कामांना पूर्ण प्रशासकीय मंजूरी आवश्यक असल्याने कोणत्याही परिस्थितीत कार्योत्तर प्रशासकीय मंजूरी देऊ नये.
प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे : प्रस्तावित कामासाठी शासनाच्या इतर कोणत्याही योजनेंतर्गत अर्थसहाय्य घेतले नसल्याबाबतचे प्रमाणपत्र. प्रस्तावित काम ज्या जमिनीवर घ्यावयाचे आहे ती जमीन महानगरपालिका/ नगरपरिषदेच्या ताब्यात असल्याचे प्रमाणपत्र. प्रस्तावित कामांची निवड निश्चीत करणारा स्थानिक नागरी संस्थेच्या सर्वसाधारण सभेचा ठराव. प्रस्तावित काम हे ज्या वस्तीतील अनुसूचित जाती व नवबौद्ध (विशेष घटक) याची लोकसंख्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आहे अथवा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभागातीलच असल्याबाबतचे प्रमाणपत्र. सक्षम अधिकाऱ्याकडून प्राप्त झालेल्या तांत्रिक मान्यतेच्या आदेशाची प्रत. बांधकाम विषयक काम असल्यास नगररचना शाखेकडून प्रस्तावित कामांच्या रेखांकन/नकाशांना मंजूरी प्राप्त झाल्याच्या आदेशाची प्रत. मागील आर्थिक वर्षामध्ये प्राप्त झालेल्या निधीचा पूर्णपणे विनियोग करुन त्याचे नियोग प्रमाणपत्र प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक राहील. 
या योजनेबाबतची अधिक माहिती जवळच्या नगरपालिकेत उपलब्ध होऊ शकेल.

                                                                                                                        जिल्हा माहिती कार्यालय
हिंगोली

*****

23 November, 2017

सन 2015-16 व 2016-17 मधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती
 अदा करण्यासाठी ई स्कॉलरशिप पोर्टल पुन्हा सुरु करणार
हिंगोली , दि.23 : सामाजिक न्याय विभागामार्फत  मागासवर्गीय  विद्यार्थ्यांना  शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा निर्वाह  भत्ता, विद्यावेतने इत्यादी योजनेच्या माध्यमातून  आर्थिक लाभ दिला  जातो. सन 2017-18 या वर्षापासून  राज्य शासनाने  सर्व  विभागाच्या  सर्व प्रकारच्या या महाडिबीटी पोर्टल मार्फत  अदा करण्याचा  निर्णय घेतला असल्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे https://mahaeschol.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ  संस्थागित करण्यात आलेले आहे .
काही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, शिक्षण            फी, परीक्षा  फी , विद्यावेतने, निर्वाह भत्ता इत्यादी लाभ देण्याचे प्रलंबित  असल्याने तो अदा  करण्यासाठी आता ई-स्कॉलरशिप  हे संकेतस्थळ  दिनांक 21 नोव्हेंबर, 2017  पासून पुन्हा मर्यादित  कालावधीसाठी  सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे .
प्रथम टप्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सन 2015-16 साठी दिनांक  31 मार्च 2016 साठी सन 2016-17 करिता दिनांक 31 मार्च 2017 पर्यंत ऑनलाईन  अर्ज भरलेले आहेत. परंतू ज्यांना अद्याप शिष्यवृत्ती शिक्षण फी, परीक्षा फी इत्यादीचा  लाभ मिळालेला  नाही अशा विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाकडे प्रलंबित असलेले अर्ज आणि नुतनीकरण करावयाचे  या कालावधीत संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे पाठवावेत.
याबाबत  सविस्तर सूचना असलेले परिपत्रक  आणि वेळापत्रक हे विभागाच्या www.sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे .
तरी शाळा/ महाविद्यालयांनी त्यांच्याकडे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन सादर केलेले  सन 2015-16 व 2016-17चे पात्र विद्यार्थ्यांचे  प्रलंबित आणि नुतनीकरणाचे  प्रस्ताव त्वरित  सादर करावेत , असे आवाहन  सहायक आयुक्त, समाज कल्याण  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                            *****   
सेनगाव-रिसोड अतिरिक्त बस सुरु
        हिंगोली, दि.23: पानकन्हेरगाव येथील अनेक विद्यार्थी हे रिसोड येथे शिक्षणासाठी प्रवास करतात. सोमवार दि. 20 नोव्हेंबर रोजी वसमत-रिसोड जाणारी राज्य परिवहनची बस शालेय विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करून अडविली होती. हि प्रवासी बस असल्याने पानकन्हेरगाव येथून याबसच्या फेरीत केवळ विद्यार्थी फेरी करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांची होती. परंतू सदर बाब हि चालक-वाहक यांच्या कार्यक्षेत्रातील नसल्याने आणि याबाबत कोणतीही माहिती विद्यार्थ्यांनी आगारास न देता रास्ता रोको करून बस अडविण्यात आली होती. परंतू विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याकरीता त्याच वेळेमध्ये सेनगाव-रिसोड अतिरिक्त बसची व्यवस्था करण्यात आल्याचे आगार व्यवस्थापक राज्य परिवहन, हिंगोली यांनी कळविले आहे.    

*****