24 January, 2022

मतदार जागृतीसाठी : राष्ट्रीय मतदार दिवस

 


मतदार जागृतीसाठी : राष्ट्रीय मतदार दिवस 

             हिंगोली (जिमाका) दि.24 : भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली आहे. त्यामुळे 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मतदार असल्याचा अभिमान मतदारास असावा आणि त्यातून बळकट लोकशाहीसाठी मोठा सहभाग  नोंदवता यावा हा आहे.

            भारतीय लोकशाही गणराज्यात प्रत्येक भारतीय नागरिकाला सार्वत्रिक तथा पोट निवडणुकीत मतदानाचा मुलभूत हक्क बहाल करण्यात आलेला आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव नोंदवून मतदान करण्याचे कर्तव्य पार पाडून लोकशाही बळकट करण्याचा वाटा उचलण्याची संधी प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे.

            भारतातील युवा मतदारांना सक्रीय राजनीतीमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सन 2011 पासून भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून दरवर्षी साजरा करण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत. 

            देशातील प्रत्येक नागरिक हा या देशाचा सुजाण नागरिक असून मतदान करणे हा आपला मुलभूत हक्क असल्याची जाणीव  होण्यासाठी या राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व आहे. या 'राष्ट्रीय मतदार दिवसा' निमित्त 18 वर्ष पूर्ण होत असलेल्या (दिनांक 1 जानेवारी, 2022 रोजी) आणि 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवयुवक युवतींना मतदारांना तसेच ज्या नागरिकांनी अद्यापही यादीत नाव नोंदविले नाही अशा नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे आणि भारत निवडणूक आयोगामार्फत ओळख पत्र मिळवावे.

हिंगोली जिल्ह्यात 01 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर  दि. 5 जानेवारी, 2022 रोजी मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यात एकूण 14 हजार 878 नव मतदारांची वाढ झालेली आहे. आता जिल्ह्यात एकूण 9 लाख 42 हजार 510 मतदार झाले आहेत. यामध्ये 4 लाख 93 हजार 868 पुरुष मतदार, 4 लाख 48 हजार 640 महिला मतदार तर 2 तृतीय पंथी मतदारांचा समावेश आहे. या सर्व मतदारांची मतदार यादीतील छायाचित्रे शंभर टक्के अद्ययावत करण्यात आली आहेत.

            हिंगोली जिल्ह्यात 01 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2022 अंतर्गत दिनांक 01 नोव्हेंबर, 2021 ते 05 डिसेंबर, 2021 या कालावधीत दावे हरकती स्वीकारण्यात आले. सदर दावे व हरकतीवर निर्णय घेण्यात येऊन अंतिम मतदार यादी दिनांक 05 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी  कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील  कार्यालय, सर्व मतदान केंद्र  व मुख्य निवडणूक अधिकारी  यांचे  कार्यालयाचे  https://ceo.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर येथे  प्रसिध्द  करण्यात  आली  आहे.

नव्याने नोंदणी झालेल्या 14 हजार 878 मतदारांना राष्ट्रीय मतदार दिवस- 2022 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने नव्यानेच जारी केलेले स्मार्टसाइज प्लॅस्टीक मतदार ओळखपत्राचे (PVC-EPIC) वाटप त्या-त्या मतदान केंद्राचे ठिकाणी संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांत 03 हजार 266 मतदारांची वगळणी करण्यात आली आहे. मतदार यादीमध्ये 14 हजार 878 मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता एकूण मतदारांची संख्या 9 लाख 42 हजार 510 एवढी झाली आहे.

            हिंगोली जिल्ह्याची सन-2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 11 लाख 77 हजार 345 इतकी असून नोव्हेंबर, 2021 ची अनुमानित (Projected) लोकसंख्या 13 लाख 19 हजार 74 इतकी आहे.  त्यामध्ये एकूण मतदार 9 लाख 42 हजार 510 मतदार आहेत. लोकसंख्येशी मतदाराचे प्रमाण 71.45 टक्के आहे. मतदारांनी आपले नाव अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीत असल्याबाबत खात्री करावी.

            वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या अधिकाधिक तरुणांनी छायाचित्र मतदार याद्यांचा सततचा पुनरिक्षण कार्यक्रम- 2022 च्या कालावधीत आपली नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी, तसेच मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी, मतदार यादीत दुबार नावे असलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी संबधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), संबंधित तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, संबंधित उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावेत किंवा http://www.nvsp.in/ या संकेतस्थळावरून ऑनलाईन सादर करावेत. तसेच यासाठी निवडणूक आयोगाने वोटर हेल्पलाईन हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. त्यामुळे मतदारांना आपल्या मोबाईल फोनमध्ये वोटर हेल्पलाईन ॲप (VHA) डाऊनलोड करुन याद्वारेही नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती करता येणार आहे. याचा सुजाण मतदारांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. कोरोनाच्या नियमांचे पालन करुन मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांना या कार्यक्रमात मतदार ओळखपत्र, बिल्ले प्रदान करुन मतदार दिनाची शपथ देण्यात येणार आहे.

            आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत नव मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्याचा हक्क मिळणार आहे. ही संधी गमावणे म्हणजे आपण आपला भारतीय नागरिक असल्याचा हक्क गमावल्यासारखे आहे ! तर चला मग ! आपण सर्व भारतीय नागरिक या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करुन आपला मतदानाचा हक्क बजावण्यास सज्ज होऊ या !

                                                                        -- चंद्रकांत कारभारी

                                                                            माहिती सहायक

                                                                                                                 जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

*****

 

 

 

महिलांच्या प्रश्नांची जाणीव व  सोडवणुकीचा अनुभव असलेल्या अशासकीय संस्थांनी

अंतर्गत तक्रार निवारण समितीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 24 : कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक सतावणूकीस प्रतिबंध करण्यासाठी  1992 चा रिट विनंती अर्ज (सीआरएल) क्रमांक 666-70 मधील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या न्यायनिर्णयातील मार्गदर्शक तत्वे भारत सरकारकडून प्रसृत करण्यात आले असून राज्यस्तरावर राज्य महिला तक्रार निवारण समितीकडून या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे लैंगिक छळवादाबाबत येणाऱ्या तक्रारींची चौकशी करुन कारवाईची शिफारस संबंधित विभागाला करण्यात येते.

           मा.सर्वोच्च न्यायालयाने डॉ. मेधा कोतवाल लेले विरुध्द केंद्र शासन या प्रकरणी दिलेल्या आदेशात सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात व इतर संस्थेत महिला तक्रार निवारण समित्या गठित करणे बंधनकारक केले आहे.

          अशा समितीची अध्यक्षा ही महिलाच असावी. समितीत 50 टक्क्यापेक्षा जास्त महिलांचा समावेश असावा व किमान एका अशासकीय सदस्यांचा समावेश असावा अशी तरतूद मा. सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आहे. परंतु बऱ्याच कार्यालयातील महिला तक्रार निवारण समितीमध्ये अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यात येत नाही, अशा समित्या गठित करतांना लैंगिक छळवादाच्या तक्रारीबाबत काम करणाऱ्या अशासकीय सदस्यांची माहिती बऱ्याच कार्यालयांना नसते  त्यामुळे अशा समितीमध्ये अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली जात नाही.

           कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 नुसार, हिंगोली जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयात, लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे आवश्यक आहे. अशा समितीमध्ये अशासकीय सदस्यांची नेमणूक करणे सोयीचे व्हावे म्हणून शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी अशासकीय सदस्यांची नावांची यादी प्रसिध्द करण्यात येते.

हिंगोली जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयात स्थापन करावयाच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीमध्ये अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव मागविण्यासाठी जिल्हाधिकारी हिंगोली यांनी मान्यता दिल्यानूसार महिलांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व महिलांच्या प्रश्नांची जाणीव तसेच सोडवणुकीचा अनुभव असलेल्या जिल्ह्यातील अशासकीय संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. अशासकीय संस्थांनी उपरोक्त कालावधीत आपले प्रस्ताव जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्रमांक एस -7, हिंगोली पिन कोड -431513  या कार्यालयात दि.28 जानेवारी , 2022 पर्यंत सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी , हिंगोली  यांनी केले आहे.

******

 

स्थानिक तक्रार निवारण समितीच्या सदस्य पदासाठी

पात्र व इच्छूक व्यक्तींनी 28 जानेवारी पर्यंत अर्ज करावेत

 

              हिंगोली (जिमाका), दि. 24 : विशाखा जजमेंटमधील तरतूदीनुसार कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध,मनाई व निवारण) अधिनियम 2013 व नियम दि. 9 डिसेंबर, 2013  रोजी प्रसिध्द करण्यात आलेले आहेत. या अधिनियमातील कलम 6(1) नुसार जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार समिती गठीत करण्याची तरतूद आहे.  या अधिनियमानुसार स्थानिक तक्रार समिती गठीत करण्याचे पूर्ण अधिकार प्रत्येक जिल्ह्याचे नियुक्त जिल्हा अधिकारी (District Officer) या नात्याने  उपजिल्हाधिकारी यांना आहेत.

या जिल्हास्तरावरील स्थानिक तक्रार समितीची रचना - अध्यक्ष - सामाजिक कार्याचा 5 वर्षाचा अनुभव व महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात येते. जिल्ह्यातील गट, तालुका, तहसील,  प्रभाग, नगरपालिका या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या महिलामधून एका सदस्याची निवड करण्यात येते. महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या अशासकीय संघटना, संघ किंवा लैंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचित असलेली व्यक्ती यांमधून दोन सदस्यांची निवड करण्यात येते. यापैकी किमान एक सदस्य महिला असावी. परंतु त्यापैकी किमान एका सदस्यांची पार्श्वभूमी प्राधान्याने कायद्याची (Legal) असावी. तसेच त्यापैकी किमान एक सदस्य अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती किंवा इतर मागासवर्ग किंवा अल्पसंख्यांक समाजातील महिला असावी. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हे या समितीचे पदसिध्द सदस्य सचिव असतील .

स्थानिक तक्रार समितीमधील अध्यक्ष  सदस्य यांच्या नियुक्तीचा कालावधी तीन वर्षापेक्षा अधिक नसेल.   स्थानिक तक्रार समितीचे अध्यक्ष किंवा कोणतेही सदस्य हे या अधिनियमाच्या कलम 16 मधील तरतुदीचे उल्लंघन करीत असतील किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये त्यांच्याविरुध्द अपराधाची चौकशी प्रलंबित असेल किंवा  ते कोणत्याही शिस्तभंगाच्या कारवाईमध्ये दोषी असल्याचे आढळून आले असतील किंवा त्यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही प्रलंबित असेल, किंवा अशा रितीने त्याने पदावर राहून सार्वजनिक  हितास बाधा पोहोचवून त्याच्या पदाचा दुरुपयोग केला असेल. अशा अध्यक्ष किंवा सदस्य यांना पदावरुन दूर करण्यात येईल आणि अशा रितीने रिक्त झालेले पद किंवा कोणत्याही नैमित्तिक कारणाने रिक्त झालेले पद या अधिनियमातील तरतूदीनुसार जिल्हा अधिकारी (District Officer) नव्याने नामनिर्देशन भरतील.

               ही समिती गठीत करण्यासाठी  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांच्याकडून जिल्ह्यातील पात्र व इच्छूक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यांनी स्थानिक तक्रार समितीमध्ये काम करण्यास तयार असल्याबाबतचे संमतीपत्र देणे आवश्यक आहे. महिला व बालविकास विभागाला दि.28 जानेवारी, 2022 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्रस्तावांमधून नामनिर्देशनाने जिल्हा अधिकारी (District Officer) या नात्याने मा.उपजिल्हाधिकारी, हिंगोली  हे अध्यक्ष व सदस्यांची  निवड करतील.

               अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस -7, हिंगोली 431513 येथे संपर्क करावा, असे आवाहन विठ्ठल शिंदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

23 January, 2022

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 165 रुग्ण ; तर 32 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

·  855 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 23 : जिल्ह्यात 165 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक , हिंगोली यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 01 व्यक्ती, वसमत परिसर 06 व्यक्ती, औंढा परिसर 06 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 29 व्यक्ती, वसमत परिसर 51 व्यक्ती, कळमनुरी परिसर 11 व्यक्ती, औंढा परिसर 40 व्यक्ती व सेनगाव परिसर 21 व्यक्ती असे एकूण 165 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 32 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 02 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 17 हजार 232 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 981 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 855  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 396 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.

****

 


जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 23 :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी  देखील त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.  

****

22 January, 2022

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 147 रुग्ण ; तर 64 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

·  722 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 22 : जिल्ह्यात 147 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक , हिंगोली यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 03 व्यक्ती, वसमत परिसर 17 व्यक्ती, कळमनुरी परिसर 02 व्यक्ती व सेनगाव परिसर 03 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 30 व्यक्ती, वसमत परिसर 54 व्यक्ती, कळमनुरी परिसर 20 व्यक्ती, औंढा परिसर 17 व्यक्ती व सेनगाव परिसर 01 व्यक्ती असे एकूण 147 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 64 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 17 हजार 67 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 949 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 722  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 396 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.

****

 




मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करु या

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली, दि. 22 (जिमाका) : येथील कै. रं.रा. बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालय हे अतिशय चांगले वाचनालय असून या वाचनालयात दोनशे-तीनशे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी चांगल्या प्रकारची अभ्यासिका उपलब्ध आहे. तसेच येथे आयोजित ग्रंथ प्रदर्शनाला भेट देवून चांगल्या व नव्याने आलेल्या माहितीपूर्ण पुस्तकाचे अवलोकन करावे आणि आपला आनंद द्विगुणीत करावा. तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करु या, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज केले.

येथील जिल्हा प्रशासन, जिल्हा शासकीय ग्रंथालय व कै. रं.रा. बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने नूतन साहित्य मंदिर वाचनालयात मराठी भाषा सर्वंधन पंधरवाडानिमित्त ग्रंथप्रदर्शाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथप्रदशर्नाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. पापळकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष अशोक अर्धापूरकर हे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, ग्रंथालयाचे कोषाध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जी. पी. मुपकलवार, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, साहित्यिक कलानंद जाधव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, निरीक्षक मिलींद सोनकांबळे, ग्रंथपाल संतोष ससे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना श्री. पापळकर म्हणाले, नूतन साहित्य मंदिर वाचलनालयात अंत्यत चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रंथालयाचे व ग्रंथालय पदाधिकाऱ्यांचे कौतूक केले. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी या ग्रंथालयाला भेट द्यावी व येथे उपलब्ध असलेल्या नवनवीन पुस्तकाचा लाभ घ्यावा, असे सांगून  शासनाच्या निर्देशानुसार मराठी भाषा संवर्धन पंधरवाडानिमित्त हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे, असे सांगितले. तसेच या वाचनालयासंदर्भात व जिल्ह्यातील इतर वाचनालयात स्पर्धा परिक्षेचे अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी अशा प्रकारची अभ्यासिका सुरु करण्यासाठी आणि पुस्तिका उपलब्ध करुन देण्यासाठी मा. पालकमंत्री यांच्याशी चर्चा करुन काही वेगळी योजना तयार करता येईल, तसेच पुढच्या कालावधीत ग्रंथालयांना पुस्तके उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनीही ग्रंथालयात उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांचे कौतूक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोरोना प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमासाठी जास्त गर्दी न जमवता या कार्यक्रमाचे जिल्हा माहिती कार्यालय हिंगोली या फेसबूक पेजवरुन लाईव्ह प्रसारण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी नूतन साहित्य मंदिर वाचनालयातील अभ्यासिका व ग्रंथालयाची पाहणी केली. यावेळी मान्यवरांचा पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचलन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले.

 

*****