24 June, 2022

 

हिंगोली जिल्ह्यातील 30 स्थळांना क वर्ग पर्यटनाचा दर्जा देण्यास मान्यता

 

जिल्हा वार्षिक योजनेच्या 2021-22 या आर्थिक वर्षातील 229 कोटी 43 रुपयाच्या खर्चास मान्यता

 

सन 2022-23 चा जिल्हा वार्षिक योजनेचा प्राप्त निधी वेळेत खर्च करावा

                                                        - पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड



 

 

हिंगोली, दि. 24 (जिमाका) :  जिल्हा नियोजन समितीची आज ऑनलाईन बैठक घेऊन सन 2021-22 मध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी योजनेत एकूण 229 कोटी 62 लाख 51 हजार रुपयाचा निधी प्राप्त झाला होता. यापैकी जिल्ह्यात विकास कामावर झालेल्या 229 कोटी 43 लाख रुपयाच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. तसेच आगामी वर्षात 270 कोटी 21 लाख 71 हजार रुपयाचा निधी खर्च करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी यावेळी दिल्या. तसेच जिल्हा वार्षिक योजनेचा सन 2022-23 चा प्राप्त निधी वेळेत खर्च करण्यासाठी कामाना मंजुरी देण्यास मान्यता देण्यात आली.  

जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेतंर्गत सन 2022-23 या वर्षासाठी प्राप्त झालेला निधी योग्य नियोजन करुन जिल्ह्यातील विकास कामांवर वेळेत खर्च करावा, अशा सूचना राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या.

आज जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकूळे, राजू नवघरे, डॉ. प्रज्ञा सातव, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, ए.एल. बोंद्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी हिंगोली जिल्ह्यातील विकसित होऊ शकणाऱ्या 28 पर्यटन स्थळासह आमदार तान्हाजी मुटकुळे आणि आमदार राजू नवघरे यांनी सुचविलेल्या अशा एकूण 30 स्थळाना क वर्ग पर्यटनाचा दर्जा देण्यासाठी या बैठकीत मान्यता देण्यात आली.  तसेच जिल्ह्यातील जास्तीत पर्यटन स्थळाला ब दर्जा देण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी दिल्या.

सन 2022-23 मध्ये हिंगोली जिल्ह्यासाठी प्राप्त निधीतून 11.40 कोटी रुपये शासनाकडून मार्गदशक सूचना प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी देण्याबाबत मान्यता देण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व निजामकालीन शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या असून त्याचे नुतनीकरण करण्यासाठी राज्याकडून 90 टक्के निधी मिळणार देण्यात येणार आहे. उर्वरित 10 टक्के लोकवाटा जिल्ह्यातील आमदारांनी आपल्या मतदार संघातील शाळा दुरुस्तीसाठी आमदार निधीतून द्यावा, अशी विनंती केली.

यावेळी आमदार राजू नवघरे यांनी बाभुळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती केली.

यावेळी बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य यांच्यासह सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांची बैठकीस उपस्थिती होती.

****

 

आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

 

राज्यातील अनेक जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे पाऊसही चांगला पडेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. राज्यात नुकतेच मान्सूनचे आगमन झाले आहे. या मान्सून कालावधीत अतिवृष्टी झाल्यास पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. यासह विविध प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागाच्या यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास ही पूरपरिस्थती सक्षमपणे हाताळता यावी, या उद्देशाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग कामाला लागला असून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनीही सर्व संबंधित विभागाना सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यातून कयाधू, पैनगंगा, पूर्णा या तीन प्रमुख नद्या वाहतात. दरवर्षी या नद्या दुथडी भरुन वाहतात. पैनगंगा नदी ही सेनगाव, हिंगोली, कळमनुरी तालुक्यातून वाहते. याच नदीवर इसापूर येथे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प (इसापूर धरण) बांधले आहे. पूर्णा नदी ही सेनगाव, औंढा तालुक्यातून वाहते. पूर्णा नदीवर येलदरी येथे धरण बांधले असून पुढे याच नदीवर सिध्देश्वर येथे धरण बांधले आहे. कयाधू नदी ही सेनगाव, हिंगोली, कळमनुरी तालुक्याच्या मध्यवर्ती भागातून वाहते. जास्त पाऊस झाल्यास नदीकाठावरील गावांमध्ये पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी 2006 मध्ये मोठा पूर आला होता. त्यामुळे लष्कराला पाचारण करावे लागले होते. पुरामुळे जिवित हानी होऊ नये यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज असून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यात 72 पूर प्रवण गावे असून यामध्ये हिंगोली तालुक्यातील 17, कळमनुरी 14, औंढा नागनाथ 09, सेनगाव 16 आणि वसमत तालुक्यातील 16 गावांचा समावेश आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तालुकास्तरावर आवश्यक ती साधनसामग्री उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी पापळकर यांच्या उपस्थितीत औंढा नागनाथ येथील तलावात जवानांना एअर बोटचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील एकूण 9 पथकांना प्रत्येकी तीन दिवस याप्रमाणे पुणे येथील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच पूरबाधित क्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये आपत्तीत नागरिकांनी काय करावे व काय करु नये याबाबत पत्रके, पोस्टर, बॅनर, ऑडिओ जिंगल व चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांच्यासाठी वेळोवेळी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करुन मार्गदर्शन करण्यात आले आहे.

मान्सून कालावधीतील संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व नगर परिषदांनी आपल्या अधिनस्त असलेले परिसर स्वच्छ करुन गटारे, नाले सफाईची कामे तात्काळ पूर्ण करावेत. जिल्ह्यातील सर्व मोठे, मध्यम, लघु धरणांची पाहणी करुन गरजेनुसार दुरुस्ती करण्याच्या सूचना पाटबंधारे आणि सिंचन विभागाला देण्यात आलेल्या आहेत. पूरग्रस्त गावांचा नकाशा तयार करुन धरणांचे पाणी वाढल्यास किंवा पाणी सोडायचे असल्यास त्याबाबत सावधगिरी बाळगून बाधित होणाऱ्या संबंधित गावांना पूर्वसूचना देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करुन नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धरणातील पाणीसाठा व विसर्गाबाबत दैनंदिन अहवालाचे संदेश वहन उपकरणे सुसज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व संबंधित यंत्रणांना कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीत संबंधित गावांशी संपर्क तुटल्यास तो पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणांना आराखडे तयार ठेवण्याबाबत सांगितले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे जे पूल अथवा रस्ते पाण्याच्या प्रवाहामुळे बंद होतात अशा ठिकाणच्या दुरुस्तीचे कामे करण्यात येत आहेत. पोलीस विभाग, राज्य राखीव पोलीस बल व जिल्हा समादेशक होमगार्डस यांनाही आपल्या मनुष्यबळासह सज्ज राहण्याबाबत सूचित केले आहे. नैसर्गिक आपत्तीत आपदग्रस्तांचे स्थलांतर करावे लागल्यास परिवहन विभागाने आपली वाहने व वाहनचालकांसह त्वरित उपलब्ध होतील याबाबत नियोजन करण्यास सांगितले आहे.

कोणत्याही कारणामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी पुरवठा विभागाने अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. आपत्कालीन  भागातील पशुधनास सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पशुधन केंद्र व उपचार केंद्र सुसज्ज ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

आरोग्य विभागाने पुरामुळे बाधित होणाऱ्या गावात आरोग्य सेवा उपलब्ध करुन द्यावेत. मुबलक प्रमाणात औषधी साठा उपलब्ध करुन ठेवावा. तसेच दूषित पाण्यामुळे देखील रोगराई पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी शहर व गावांना ब्लिचींग पावडर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच  अतिवृष्टी, पूर, वीज कोसळून मृत्यू तसेच अन्य आपत्तींना सामोरे जाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली आहे. मदत व बचाव कार्याबाबत तात्काळ प्रतिसाद  कार्य यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत. आपत्कालीन परिस्थिती  हाताळण्यासाठी तसेच संपर्कासाठी जिल्हाधिकारी  कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

प्रत्येक तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष : प्रत्येक तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करुन 24 तास कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. विविध विभाग, शोध व बचाव पथक यांच्यात समन्वय साधणे, तालुका आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे, धरण व नदीकाठच्या गावांचा पूर परिस्थितीचा आढावा घेणे, सतर्कतेचा इशारा मिळताच गावातील विविध समित्यांद्वारे तातडीने संदेश पाठविणे, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे नियोजन आदी कामे या नियंत्रण कक्षातून चालणार आहेत.

शोध व बचाव साहित्य : शोध व बचावासाठी 50 लाईफ जॅकेट, 02 मोटार बोट, 12 हेल्मेट, 18 प्रथमोपचार पेटी, 10 अग्निरोधक, 15 सर्च लाईट, 50 लाईफ बॉईज, 05 फोल्डींग स्ट्रेचरची व्यवस्था करुन ठेवण्यात आलेली आहे.  

संभाव्य धोके व आपत्ती लक्षात घेऊन गावांचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. आवश्यक साधनसामग्री , प्रतिसादाची कृती, रुग्णालय, आरोग्य केंद्र, पशु वैद्यकीय दवाखाने, वैद्यकीय अधिकारी, सेवाभावी संस्था, पोहणाऱ्या व्यक्ती, औषधी दुकाने, स्वस्त धान्य दुकाने अशी सर्वच प्रकारची माहिती अद्यावत करणे, पर्जन्यमापक यंत्राची तपासणी व दुरुस्ती, संभाव्य अतिवृष्टीमुळे गावात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही याबाबत उपाययोजना करण्याच्या पूर्वसूचना संबंधित यंत्रणेला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या आहेत.

 

                                                                                                - चंद्रकांत कारभारी, माहिती सहायक

                                                                                                   जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

 

*****

23 June, 2022

 

रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रम सुरु

विविध ठिकाणी रस्ता सुरक्षा कार्यक्रमाची जनजागृती



 

हिंगोली (जिमाका), दि.23 : जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालय व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि. 22 जून ते 29 जून, 2022 या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे. याअंतर्गत आज दि. 23 जून, 2022 रोजी सेनगाव तालुक्यातील महामार्गावरील शाळा व काही गावामध्ये विविध ठिकाणी रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

यामध्ये सेनगाव येथील मातोश्री लक्ष्मीबाई येवले प्राथमिक विद्यालय, तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात व कोळसा येथील विद्यानिकेतन विद्यालयात संस्थेचे प्राचार्य, प्राध्यापक वृंध्द, विद्यार्थ्यांना व उपस्थित पालकांना तसेच उपस्थित वाहनचालक व प्रवाशांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन करुन रस्ता सुरक्षिततेची शपथ देण्यात आली. यावेळी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तयार केलेल्या रस्ता सुरक्षा मार्गदर्शिकेचे वाटप करण्यात आले.

तसेच सेनगाव टी पॉईंट, पुसेगाव टी पाँईट, जिंतूर टी पाँईट, हट्टा टी पॉईंट येथे उपस्थित चालकांना एकत्रित जमवून त्यांना रस्ता सुरक्षेबाबत नियमाचे पालन करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. नरसी, पानकन्हेरगाव व सवड येथील ग्रामपंचायतींना भेटी देऊन वाहतूक नियमांबाबत व पावसाळ्यात अपघात कसे टाळावेत याबाबत माहिती देण्यात आली. या पथकातील सहायक मोटार वाहन निरीक्षक पवन बानबाकोडे, मनोजकुमार कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सतीश ठेगे यांनी मार्गदर्शन करुन रस्ता सुरक्षा शपथ दिली. या पथकामधील पोलीस कर्मचारी घुमनार, सावळे, गवळी, घुगे व चालक भुताळे यांनी सहकार्य केले.

हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशंवत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीष देशमुख, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी कळविले आहे.  

****   

 

डी.एल.एड प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठी

7 जुलैपर्यंत ऑनलाईन आवेदन सादर करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि.23 : प्राथमिक पदविका (डी.एल.एड.) प्रथम वर्ष या अभ्यासक्रमासाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय व व्यवस्थापन कोट्यातील जागा भरण्यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यास पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी परवानगी दिली आहे.

या अभ्यासक्रमासाठी इयत्ता बारावीमध्ये खुल्या संवर्गातील विद्यार्थी 49.5 टक्के  व इतर संवर्गातील विद्यार्थी 44.50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी प्रवेश अर्ज शुल्क खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 200 रुपये व इतर संवर्गातील विद्यार्थ्यासाठी 100 रुपये ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. प्रवेश नियमावली, अध्यापक विद्यालय यादी, वेळापत्रक, प्रवेशाबाबतच्या सूचना www.maa.ac.in या संकेतस्थळावरील Important Information मध्ये उपलब्ध आहे.

शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये डी.एल.एड प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी  www.maa.ac.in या संकेतस्थळावर दि. 7 जुलै, 2022 पर्यंत ऑनलाईन आवेदन सादर करावेत. पडताळणी अधिकाऱ्यांनी दि. 8 जुलै, 2022 पर्यंत प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करावी व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहन  प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

****   

22 June, 2022

 

आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांनी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घ्यावा

 

हिंगोली (जिमाका), दि.22 : देशातील जातीय भेदभाव कमी करुन सर्व धर्मात समानता व्हावी. या दृष्टिकोनातून केंद्र शासनाची डॉ.बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना सन 2014-15 पासून सुरु करण्यात आली आहे. आंतरराजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांना या योजनेंतर्गत दोन लाख पन्नास हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आंतरजातीय विवाहित दाम्पत्यांपैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीचा असणे आवश्यक आहे. विवाहाच्या एक वर्षाच्या आत परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, पासपोर्ट फोटो, विवाह नोंद प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला (टीसी), तहसीलदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र (मर्यादा 5 लाख रुपयाच्या आत), आधार कार्ड, पॅन कार्ड, पती पत्नीच्या नावाने संयुक्त बँक खाते क्रमांक, जिल्ह्यातील खासदारांचे शिफारस प्रमाणपत्र आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली कार्यालयास प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके यांनी केले आहे.

****   

21 June, 2022

 

हिंगोली जिल्हा न्यायालयात योग दिन साजरा

 

हिंगोली (जिमाका), दि.21 : तालुका विधी सेवा समिती, वकील सेवा संघ, हिंगोली आणि इंडियन ॲडव्होकेटस् मल्टी पर्पज को-ऑप सो.लि. हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 21 जून, 2022 रोजी सकाळी 7.00 वाजता जिल्हा न्यायालय, हिंगोली आवारात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.   

या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगशिक्षक ॲड . आर.एन. अग्रवाल, श्री. तोष्णीवाल, सौ. तोष्णीवाल यांनी योगासन व प्राणायाम याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करुन प्रात्यक्षिक उपस्थिताकडून करुन घेतले.

या योग दिनाच्या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 आर. व्ही. लोखंडे, हिंगोली मुख्यालयातील इतर सर्व न्यायाधीश , बार कौन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष ॲड. सतीष देशमुख, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. मतीन पठाण, हिंगोली वकील संघाचे सन्माननीय सदस्य, कायद्याचे स्वयंसेवक, पॅनल विधिज्ञ, रिटेनर विधिज्ञ, मध्यस्थी विधिज्ञ व हिंगोली मुख्यालयातील न्यायालयीन कर्मचारी, तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी हजर होते.

****   

  

जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध

 

            हिंगोली (जिमाका), दि.21 : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली येथील वृत्तपत्रांची रद्दी विक्री करण्यात येणार आहे. ज्यांना रद्दी घ्यावयाची असेल त्यांना कार्यालयीन वेळेत रद्दी पाहावयास मिळेल. ज्यांना रद्दी विकत घ्यावयाची  आहे, अशा नोंदणीकृत रद्दी खरेदीदारांनी त्यांचे लिफाफा बंद दरपत्रक जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एस-6, हिंगोली या पत्यावर दि. 29 जून, 2022 रोजीच्या सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दाखल करावीत. या संदर्भातील अटी व शर्ती कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामाच्या दिवशी पाहता येतील . 

            रद्दी विक्रीचे दरपत्रक मंजूर करणे अथवा रद्द करणे हे सर्व अधिकार जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली यांना राहतील .

****