17 August, 2022

 

जिल्हा बाल संरक्षण कक्षाने घेतले

"आझादी का अमृत महोत्सव" निमित्ताने अनेक उपक्रम

 


हिंगोली, (जिमाका) दि. 17 : येथील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालया अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाने "आझादी का अमृत महोत्सव" अर्थात स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेतले. यामध्ये तहसील कार्यालय हिंगोली येथे कोविड-19 मुळे विधवा झालेल्या महिलांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच पात्र महिलांना  विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

जि.प.शाळा येहळेगाव (तुकाराम) या शाळेमध्ये "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" निमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बालकांना विविध कायदे व योजनांची माहिती देण्यात आली. सेनगाव तालुक्यातील महिलांचा मेळावा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यामध्ये सर्व महिलांना शासनाच्या विविध योजनांबद्दल माहिती देण्यात आली.

मौजे येहळेगाव (गवळी) येथील गोकुळ विद्यालय या शाळेमध्ये अमृत महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला व विद्याथ्यांना बालकांच्या कायद्याविषयी माहिती देण्यात आली. वसंतराव नाईक माध्यमिक आश्रमशाळा वारंगाफाटा ता. कळमनुरी येथे बालकांचे हक्क व बालकांचे कायदे, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा 2012 या कायद्याची माहिती बालकांना देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील सरस्वती मुलीचे निरीक्षणगृह / बालगृह, सावरकर नगर व श्री स्वामी समर्थ बालगृह खानापूर (चित्ता) येथील बालकांसोबत निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, खो-खो स्पर्धा घेण्यात आल्या व बालकांना आझादी का अमृत महोत्सवाचे महत्व सांगण्यात आले.

या सर्व कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांनी केले आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांचे नियोजनानुसार जिल्ह्यात बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी अॅड.अनुराधा पंडीत, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे व रेशमा पठाण, समुपदेशक सचिन पठाडे, क्षेत्रबाह्य कार्यकर्ता अनिरुद्ध घनसावंत, राहुल सिरसाट यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाची जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 17 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता नियोजन हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रगीताने सांगता झाली व सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले.

 

*****

 

 

हिंगोली येथील लोकन्यायालयामध्ये

3 कोटी 87 लाख 15 हजार 698 रुपयांची प्रकरणे निकाली

 



हिंगोली, (जिमाका) दि. 17 : येथील तालुका विधी सेवा समिती, सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालय व परभणी जिल्हा न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालयामध्ये दि. 13 ऑगस्ट, 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयामध्ये प्रलंबित असलेली 188 प्रकरणे तसेच विद्युत महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत व नगरपालिका, घरकुल योजनेची दाखलपूर्व 245 प्रकरणे जडजोडीआधारे निकाली काढण्यात आले. या लोकन्यायालयात प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणात तब्बल 3 कोटी 87 लाख 15 हजार 698 रुपये  रक्कम ठरवून तडजोडी आधारे प्रकरणे निकाली काढण्यात आली.

वयोवृध्द महिलेची बाजू समजून घेण्यासाठी न्यायाधीश पॅनलवरुन उतरले खाली

या लोकन्यायालयामध्ये शांताबाई जिजाबा वसू या 65 वर्षीय वयोवृध्द महिला त्यांच्या मोटार अपघात वाद निवारण मंचासमोरील प्रलंबित प्रकरणांच्या तडजोडीसाठी हजर होत्या. वयोवृध्द महिलेला चालता येत नसल्याने व जिल्हा न्यायालयातील वरील मजल्यावर पोहोचणे शक्य होत नसल्याने हिंगोली जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश  आर. व्ही. लोखंडे यांनी स्वत: पॅनलवरुन उतरुन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमध्ये लॉबीमध्ये बसलेल्या वयोवृध्द शांताबाई जिजाबा वसू यांच्याजवळ जाऊन त्यांची बाजू ऐकूण घेतली. तसेच त्या प्रकरणात 9 लाख 50 हजार नुकसान भरपाई रकमेवर तडजोड करुन प्रकरण निकाली काढण्यात आले. 

या लोकन्यायालयासाठी हिंगोली येथे न्यायिक अधिकारी तसेच विविध समाविष्ट असलेली पाच पॅनल तयार करण्यात आले होते.

या लोकअदालतीमध्ये तालुका विधी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-1 आर.व्ही. लोखंडे, जिल्हा न्यायाधीश-3 श्री. व्ही. बुलबुले, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यु.एन.पाटील, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर डी. यु. राजपूत, आय. जे. ठाकरे यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम केले. या लोकअदालतीला दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर कु.पी.आर.पमनाणी,वकील संघाचे अध्यक्ष ॲड.के.आर.नर्सीकर,कार्याध्यक्ष ॲड.मतीन पठाण, वकील संघाचे सर्व सभासद, न्यायालयीन व पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

 

*****

 

 

जिल्हाधिकारी कार्यालयात सामुहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात,जोमात आणि राष्ट्रभक्तीमय वातावरणात साजरा

-- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

* मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करताना सर्वांचा सहभाग आवश्यक

 



            हिंगोली, (जिमाका) दि. 17 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त राज्यात स्वराज्य सप्ताह अंतर्गत आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डीपीसी सभागृहात आज सकाळी 11.00 वाजता समूह राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न झाला.  

तसेच आज जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थामध्ये एकाच वेळी सकाळी 11.00 वाजता समूह राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणार पार पडला.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यांच्या 75 व्या वर्षानिमित्त अमृत महोत्सवी कार्यक्रमाची आज सांगता होत आहे. त्यानिमित्त शेवटच्या दिवशी सूमह राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याविषयी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयाशी समन्वय साधून समूह राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम राबविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अमृत महोत्सवानिमित्त गेल्या वर्षभरात अनेक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये सामुहिक राष्ट्रगान, तिरंगा सायकल रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम यासारखे अनेक उपक्रम राबविण्यात आले. या सर्व उपक्रमांना अधिकारी, कर्मचारी यांच्यासह व्यापारी महासंघ, लोकांनी खूप मोठा सहभाग नोंदवला. त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात, जोमात आणि राष्ट्रभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. आता मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून मराठवाडा मुक्तीसंग्राचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमासही  असाच सहभाग घेऊन मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सवही यशस्वी करु, असे सांगितले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, प्रशासकीय इमारतीतील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

16 August, 2022

  दि.17 ऑगस्ट ला सकाळी 11 वाजता होणाऱ्या समूह राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्वानी उत्साहात सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन


 हिंगोली, दि.16 (जिमाका) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात "स्वराज्य महोत्सव" अंतर्गत उद्या सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. खाजगी, शासकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा / महाविद्यालये / शैक्षणिक संस्था / विद्यापीठे यामधील विद्यार्थी, शिक्षक यांचा सहभाग अनिवार्य असून हिंगोली जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

    भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्ताने दि.9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीमध्ये स्वराज्य महोत्सव सुरू आहे. या अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम उद्या दि.17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र उद्या सकाळी 11 वाजता या एकाच वेळी नागरिकांनी आहे त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहून राष्ट्रगीत गायन करावे.  सकाळी 11.00  ते 11.01 या एका मिनिटांमध्ये राष्ट्रगीत गायन करणे अपेक्षित आहे, याची सर्व संबधितांनी दक्षता घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

       समूह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी जाणते-अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये, याची सर्वांनीच दक्षता घेणे तसेच खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था, शासकीय व निम शासकीय कार्यालये, केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधित कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी यांनीही या उपक्रमात सक्रीय सहभाग घेणे अपेक्षित आहे.

       राष्ट्रगीत गायनासाठी विद्यार्थ्यांनी मोकळे पटांगण, वर्ग खोली, किंवा हॉल या ठिकाणी एकत्रित उपस्थित राहावे. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभागी व्हावे.  ग्राम स्तरावर, वॉर्ड स्तरावर (नगरपालिका/ नगरपरिषद/ नगरपंचायत / महानगरपालिका स्तरावर), सर्व प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

     तरी जिल्ह्यातील विद्यार्थी, नागरिकांनी उद्या दि.17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीत गायन उपक्रमात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. 

0000000

15 August, 2022

 

डी.एल.एड. प्रथम वर्ष प्रवेशासाठी शासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी

दि. 16 ते 20 ऑगस्ट या कालावधीत विशेष फेरीचे आयोजन

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 15 : डी.एल.एड. प्रथम वर्ष सन 2022-23 मधील शासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी विशेष फेरीद्वारे ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज सादर करण्यासाठी 16 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट, 2022  पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने ऑनलाईन प्रवेश देण्यात येणार आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*****

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास

रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

• जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’या देशभक्तीपर गाण्याला रसिंकाची दाद

  • विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर सादर केलेले नृत्य ठरले लक्षवेधी 







हिंगोली (जिमाका), दि. 15 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात देशभक्तीपर गीत गायन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. या कार्यक्रमास रसिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

देशभक्तीपर गीत गायन व सांस्कृतिक समारोहाची देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात भारत माता की जय, वंदे मातरम जयघोषाने विद्यार्थी-विद्यार्थींनी, नागरिकांच्या उपस्थितीत जल्लोषात सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’ हे देशभक्तीपर गीत सादर करुन रसिकांची दाद मिळवली आणि या गाण्यास वन्समोर मिळवला. तसेच उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी ‘मेरा मुलूक मेरा देश, मेरा ये वतन’ या गाण्याद्वारे प्रेक्षकांची दाद मिळवली. तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांनीही ‘ये देश के यारो क्या कहना’ यासह विविध देशभक्तीपर गाण्यावर प्रेक्षकांची दाद मिळवली. तसेच स्वरगांधार ऑर्केस्ट्राच्या टीमने एकापेक्षा एक बहारदार देशभक्तीपर गीत सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.

  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावेळी स्विस ॲकडमी इंग्लीश स्कूल व डी इफेक्ट डान्स ॲकडमीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर बहारदार अशी नृत्ये सादर केली. पृथ्वी  वाढवे या चिमुकलीने देशभक्तीपर हिंदी कविता सादर केली. कलानंद जाधव यांनी माझ्या देशाचा गौरव या विषयावर हिंदीत कविता सादर केली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले होते. या वातावरणात विद्यार्थ्यांनी केलेल्या समूह नृत्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतूक केले.  

उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फूल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी या उद्देशाने या देदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली .

देशभक्तीपर गाण्याच्या माध्यमातून बहारदार शैलीतून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंतनू पोले यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी विविध पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थींनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला.

****

 

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनी अमृत महोत्सवी ध्वजारोहण

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न

 

  • जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपस्थिताना दिली तंबाखू मुक्तीची शपथ

 



हिंगोली (जिमाका),दि. 15 :  भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले.

यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, राज्य राखीव दलाचे समादेशक संदिपसिंह गिल, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक  यशवंत काळे, अप्पर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी व सर्व उपस्थित मान्यवरांची भेट घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या . तसेच यावेळी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून व आजादी का अमृत महोत्सवाअंतर्गत तंबाखू विरोधी जनजागृती व तंबाखू विरोधी शपथ जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपस्थित पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक,  पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांना दिली.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या हस्ते एकत्रित महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी व स्नेहल नर्सिंग होमचे डॉ. सत्यनारायण तापडीया यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. यात निबंध स्पर्धेमध्ये तिसरी ते पाचवीच्या गटातील श्रेया जाधव, आदेश पोले, ईश्वरी घुगे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. इयत्ता सहावी ते आठवी गटात निबंध स्पर्धेमध्ये विद्या गरपाळ, श्रध्दा ढोले, नेहा सुर्यवंशी यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. इयत्ता नववी ते दहावी गटात निबंध स्पर्धेमध्ये प्रियंका हिराळे, तनवी राठोड, पूजा बगाटे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. इयत्ता 11 वी ते 12 वी गटात निबंध स्पर्धेमध्ये पायल जाधव, संध्या लोंढे, संध्या कावळे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच चित्रकला स्पर्धेमध्ये इयत्ता तिसरी ते पाचवीच्या गटामध्ये श्रेया जगताप, कृष्णा वारकड, श्रेयस धामणे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. इयत्ता सहावी ते आठवीच्या गटामध्ये वैष्णवी शेवाळकर, सायली सोरते, विद्या डोल्हारे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. इयत्ता नववी ते दहावीच्या गटामध्ये ऋतुजा भोसले, पूजा सोळंके, स्नेहा नागरे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. इयत्ता 11 वी ते 12 वीच्या गटामध्ये नरेंद्र खाकरे यांना प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक,  पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 ****