12 March, 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि. 12 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी तहसीलदार आश्विन माने, नायब तहसीलदार संतोष बोथीकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ******

कळमनुरी येथील रोजगार मेळाव्यात 189 उमेदवारांची प्राथमिक निवड

हिंगोली (जिमाका), दि. 12 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर हिंगोली व स्व.देवरावजी कल्याणकर उच्च माध्यमिक विद्यालय, कळमनुरी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच कळमनुरी येथे "पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा तथा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना भरती मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा व पदवी तसेच पदवीधारक या पात्रतेच्या 342 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 189 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील विविध नामांकीत कंपनीचे उद्योजक उपस्थित होते. तसेच जिल्ह्यात विविध महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी विविध महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना कळमनुरीचे तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी उपस्थित युवक-युवतींना प्रत्यक्ष संवाद साधून शासनाच्या विविध योजनाचा लाभ घ्यावा, असे सांगून शासकीय नोकरीमध्ये सहभागी होता न आल्यामुळे खचून न जाता स्वत:चा उद्योग उभारावा किंवा स्वयंरोजगाराकडे वळले पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष देवरावजी कल्याणकर उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष डॉ. संतोष कल्याणकर यांनीही उमेदवारांना मार्गदर्शन केले. सहायक आयुक्त डॉ. रा.प्र.कोल्हे यांनी रोजगार मेळाव्याचा हेतू विशद करताना म्हणाले, युवकांनी मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून रोजगार प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, सुशिक्षित बेरोजगार उमेदवारासाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण याची माहिती देत करिअर कसे निवडावे याच्या मार्गदर्शनासाठी मॉडेल करिअर सेंटरची स्थापना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयात करण्यात आली असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पतंगे यांनी केले तर नवनाथ टोनपे यांनी आभार मानले. या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हिंगोली या कार्यालयाचे नवनाथ टोनपे, म. ना. राऊत, ना. ज. निरदुडे, र. ला. जाधव, अमोल आडे, अभिजीत अलोने, नवनाथ पतंगे आणि देवरावजी कल्याणकर उच्च माध्यमिक विद्यालय व केंब्रीज स्कूल ऑफ स्कॉलर्स या संस्थेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ******

11 March, 2025

आरबीएसके कार्यक्रमांतर्गत विशेष तपासणी मोहीम सुरु

• वंजारवाडा, गवळीपुरा, नरसी, भिंगी येथील बालकांची आज होणार तपासणी हिंगोली (जिमाका), दि. 11 : आरबीएसके 2.0 कार्यक्रमांतर्गत हिंगोली तालुक्यात दि. 1 मार्च पासून अंगणवाडीतील बालकांची विशेष तपासणी मोहीम सुरु केली आहे. हिंगोली तालुक्यात 4 पथके कार्यरत असून या पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम घेण्यात येत आहे. त्याचा संभाव्य कृती आराखडा पुढीलप्रमाणे आहे. वरील चारही पथकामार्फत दि. 12 मार्च, 2025 रोजी वंजारवाडा, गवळीपुरा, नरसी, भिंगी येथील अंगणवाडी मध्ये बालकांची तपासणी करण्यात येणार आहे. दि. 13 मार्च रोजी संदर्भसेवा शिबीर, राजूरा, लासिना येथे, दि. 15 मार्च रोजी मस्तानशाह, भोईपुरा, करंजाळा तांडा, घोटा, नवखा येथील अंगणवाडी, दि. 17 मार्च रोजी मस्तानशाह, कमलानगर, आडगाव, सरकळी येथील अंगणवाडी, 18 मार्च रोजी मस्तानशाह, भोईपूरा, नरसी, एकंबा येथे, दि. 19 मार्च रोजी सिध्दार्थनगर, डिग्रस, लोहगाव येथे, दि. 20 मार्च रोजी महादेववाडी, जुना औंढा नाका, माळसेलू, लोहगाव येथे, दि. 21 मार्च रोजी संदर्भसेवा शिबीर, गिलोरी येथे, दि. 22 मार्च रोजी पोळा मारोती, सावरकर नगर, बोराळवाडी, भिंगी येथे, दि. 24 मार्च रोजी गवळीपुरा, शिवराज नगर, डिग्रस (क), हनवंतखेडा, जांभळून तांडा येथे, दि. 25 मार्च रोजी मस्तानशाह, खाजा कॉलनी, कडती, हिंगणी (मिनी), हिंगणी येथे, दि. 26 मार्च रोजी तालाबकट्टा, मोची गल्ली, बळसोंड व अनुपस्थित बालकांची तपासणी, दि. 27 मार्च रोजी पेन्शनपुरा व अनुपस्थित बालकांची तपासणी, दि. 28 मार्च रोजी संदर्भ सेवा शिबीर व अनुपस्थित बालकांची तपासणी आणि दि. 29 मार्च रोजी बावनखोली व अनुपस्थित बालकांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील आरबीएसकेचे तालुका नोडल वैद्यकीय अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. ********

वसमत शहर पोलीस स्टेशन येथील बेवारस वाहनाची होणार लिलावाद्वारे विक्री

हिंगोली (जिमाका), दि. 11 : वसमत शहर पोलीस स्टेशन येथे अभिलेखावर नसलेल्या परंतु पोलीस स्टेशन परिसरात पडून असलेल्या बेवारस वाहनाची उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हिंगोली यांच्यामार्फत तपासणी केली असता सदरची वाहने खूप वर्षापासून पोलीस स्टेशनला पडून असल्याने त्यांचे नंबर प्लेट चेसीस क्रमांक, इंजिन क्रमांक स्पष्ट दिसत नाही व खोडलेले असल्याने त्याचा मूळ मालक कोण आहे हे कळू शकले नाही. त्यामुळे पोलीस स्टेशन परिसरात 107 दूचाकी वाहने पडून आहेत. वरील वाहनांबाबत आजपर्यंत कोणीही मालकी हक्क किंवा त्यासंबंधी दस्तावेज सादर करुन मागणी केलेली नाही. त्यामुळे नजीकच्या काळात या बेवारस वाहनाची लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक , पोलीस स्टेशन वसमत शहर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. ******

स्मार्ट प्रकल्पांतर्गत अभ्यास दौरा वाहनाला हिरवी झेंडी दाखवून रवाना

हिंगोली (जिमाका), दि. 11 : जागतिक बँक अर्थसहाय्यित मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंतर्गत जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट, हिंगोली कार्यालय मार्फत मूल्यसाखळी विकास शाळा 2024-25 अंतर्गत 6 समुदाय आधारित संस्थेचे संचालक, सभासद अशा एकूण 30 प्रशिक्षाणार्थीना दि. 11 मार्च ते 17 मार्च 2025 या कालावधीत 7 दिवस तेलंगणा राज्यामध्ये राज्याबाहेरील प्रशिक्षणासह अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणासह अभ्यास दौरा वाहनाला हिरवी झेंडी दाखवून प्रस्थान करण्यात आले. यावेळी हिरवा झेंडा दाखवताना कृषी उपसंचालक पी. एस. हजारे, जिल्हा अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड, पुरवठा व मूल्यसाखळी तज्ञ जी. एच. कच्छवे व कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. हा अभ्यास दौरा निजामाबाद येथील हळद प्रक्रिया युनिट, रुद्रुर येथील केव्हीके, कमरापल्ली हळद संशोधन केंद्र, अरमुर व स्मार्ट फुड पार्क, हैद्राबाद या ठिकाणी आयोजित केला आहे. ******

बालकांचे शोषण होऊ नये यासाठी बालस्नेही गावे बनवावीत - जिल्हाधिकारी अभिनव गोयल

हिंगोली (जिमाका), दि. 11 : बालकांचे हक्क व अधिकार, बालकांसाठी कार्यरत यंत्रणा, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006, बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015, ग्राम बाल संरक्षण समितीची रचना व भूमिका, अग्रभागी कर्मचारी यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या, बालविवाह निर्मूलन कृती आराखडा, डेटा संकलन व अहवाल सादरीकरण, कम्युनिकेशन कीट इत्यादी विषयांवर प्रशिक्षण देवून गावात बालकांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचे शोषणाचे प्रकार होवू नये, कुठलेही बालक त्यांच्या हक्कांपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी व बालस्नेही गावे बनवावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी कार्यशाळेत दिल्या. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतील मिशन सक्षम बालिका, "बालविवाह मुक्त हिंगोली जिल्हा" अंतर्गत अग्रभागी कर्मचाऱ्यांची एकदिवशीय कार्यशाळा दिनांक 10 मार्च 2025 रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोल, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. फोफसे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजाभाऊ मगर, बाल कल्याण समिती सदस्य परसराम हेंबाडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, साधन व्यक्ती नंदू जाधव, प्रकल्प अंमलबजवणी प्रमुख बालविवाह निर्मूलन प्रकल्प युनिसेफ & एस.बी.सी.3 मुंबई यांची उपस्थिती होती. तसेच वरिष्ठ प्रकल्प समन्वयक बाळू राठोड, बालविवाह निर्मूलन प्रकल्पाच्या प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे, चाईल्ड हेल्पलाईनचे जिल्हा समन्वयक संदिप कोल्हे यांची उपस्थिती होती. हिंगोली जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनासाठी महिला व बालविकास विभाग, युनिसेफ, SBC3 व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध नाविन्य पूर्ण उपक्रम जिल्ह्यात राबविले जात आहे, याच उपक्रमाच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील निवडक 50 हॉटस्पॉट गावांसाठी पंचायत विभाग, महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, जिल्हा महिला व बाल विकास विभाग या सर्व विभागाचा बालविवाह निर्मूलन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजवणी व्हावी या उद्देशाने ग्रामपंचायत अधिकारी, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका यांची बालविवाह निर्मूलन कृती आराखडा अंमलबजावणी करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन संदीप कोल्हे यांनी केले तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी बालविवाह निर्मुलन बाबत प्रतिज्ञा घेऊन आभार व्यक्त केले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाईन 1098 यांनी अथक परिश्रम घेतले. *****

10 March, 2025

पाणलोट यात्रा पोहोचली बोथी व कुंभारवाडी गावात

हिंगोली (जिमाका), दि. 10 : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत केंद्र शासनाच्या भूमी संसाधन विभाग ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार व मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन व वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रफुल्ल खिराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी तालुक्यातील मौजे-बोथी व कुंभारवाडी येथे पाणलोट (वाटरशेड) यात्रा घेण्यात झाली. या पाणलोट (वाटरशेड) यात्रेचे गावातील महिलांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून गावात प्रभात फेरी काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. पाणी की पाठशालामध्ये पाणलोटावर शाहीर धमांनद इंगोले यांनी विविध गिते व पथनाट्य सादर केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, उपविभागीय जलसंधारण अधिकारी विकास यचावाड तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राच्या रोहिणी शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख उदघाटक उगम ग्रामीण विकास संस्थेचे जयाजी पाईकराव हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोथीचे सरपंच मोहनराव बोथीकर हे होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, रोहिणी शिंदे, जयाजी पाईकराव, एमएसआरएलमच्या श्रीमती कटके यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी महादेव कुंभार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषी सहाय्यक स्वप्नील यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा प्रकल्प समन्वयक एच.आर.नाईक यानी मानले. या कार्यक्रमात श्रमदान, वृक्ष लागवड, एनआरएम कामाचे भूमीपूजन व लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी पाणलोट योध्दा, धारणीताई व शालेय मुलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्राफीचे वितरीत करण्यात आले. तसेच उपस्थित सर्वाना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाला संतोष काळेगोरे, विनायक कोळेकर, कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व विविध स्वयंसेवी संस्थाचे अध्यक्ष, सचिव तसेच विभागातील अधिकारी व कर्मचारी, आत्मा बी टी, उमेदचे कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, आशाताई, गट समन्वयक, ग्रामपंचायत सरपंच व पाणलोट समिती सदस्य, ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी, युवक, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ********