04 July, 2024

मराठा आरक्षणाशी संबंधित जनसंवाद रॅलीसाठी 16 आरोग्य पथकाची नियुक्ती

हिंगोली (जिमाका), दि. 04 : हिंगोली येथे दि. 6 जुलै, 2024 रोजी मराठा आरक्षणाशी संबंधित जनसंवाद रँली आयोजित करण्यात आली असून, या रॅलीसाठी येणारा जनसमुदाय व अधिकारी, कर्मचारी यांना औषधी साठा आणि रुग्णवाहिका आदी आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी सकाळी 6 ते रॅली कार्यक्रम संपेपर्यंत 16 आरोग्य पथकामार्फत आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी आज काढले आहेत. पथक क्र. 1चे पथकप्रमुख डॉ. नामदेव पवार (9518744878) व 2चे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल दरगु (8087674950) हे मनोज जरांगे यांच्या जनसंवाद रॅलीसोबत राहणार आहेत. पथक क्र. 3 चे प्रमुख डॉ. कैलास पवार (9850960711) यांच्यासह पथक सिटी क्लब मैदान परिसर येथे उपस्थित राहणार आहे. पथक क्र. 4चे प्रमुख डॉ. शिवाजी विसलकर (7385062223) पोलीस पेट्रोलपंप परिसर, पथक क्र. 5चे प्रमुख डॉ. किशन सोनकांबळे (8308003866) हे आखरे मेडिकल परिसर, पथक क्र. 6चे प्रमुख डॉ. नितीन बोरकर (8421488337) हे रामलीला मैदान येथे उपस्थित राहणार आहेत. तर पथक क्र. 7चे प्रमुख डॉ. शाम बोकारे (7709462797)हे पोस्ट ऑफिस रोड जवळ, पथक क्र. 8चे प्रमुख डॉ. मधुकर भोसले (9766720324) हे खुराणा पेट्रोल पंपाजवळ, पथक क्र. 9चे प्रमुख डॉ. अमोल भालेराव (8850721362) हे महात्मा गांधी चौक परिसर येथे उपस्थित राहणार आहेत. पथक क्र. 10चे डॉ. शिवाजी माने (9970798578) हे देशमुख हॉस्पिटल शिवाजीनगर जवळ, पथक क्र. 11चे प्रमुख डॉ. शिवाजी पतंगे (8850721362) हे सह्याद्री हॉस्पिटल एनटीसी, पथक क्र. 12 चे प्रमुख डॉ. शिवाजी टोपे (9657144379) हे नवजीवन हॉस्पिटल परिसर एनटीसी, पथक क्र. 13चे प्रमुख डॉ. प्रशांत घुगे हे (9028457777) हे सिटी क्लब मैदान परिसर, पथक क्र. 14चे प्रमुख डॉ. जगदीश गोरे (7588153892)हे पोलीस पेट्रोल पंप परिसर, पथक क्र. 15 चे प्रमुख डॉ. कैलास गायकवाड (9922551017) व 16 चे प्रमुख डॉ. मनोज साबु (9423737531 )हे रामलीला मैदान येथे उपस्थित राहणार आहेत. वरील सर्व पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संबंधित जनसमुदायास आरोग्य सुविधा पुरविण्याचे आदेश दिले आहेत. *****

आकांक्षीत हिंगोली तालुक्याची ओळख पुसण्यासाठी ऑगस्टअखेर 100 टक्के कामे पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली (जिमाका), दि. 04 : आकांक्षीत तालुका विकसनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने केंद्राच्या निती आयोगाच्या माध्यमातून सुरु होत असलेल्या संपूर्णता अभियानाची सुरुवात आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. त्यामुळे निती आयोगाच्या सूचनेप्रमाणे सहा विषयावर सुरुवातीला कामकाज करण्यात येणार असून, आकांक्षीत हिंगोली तालुक्याची ओळख पुसण्यासाठी ऑगस्टअखेर 100 टक्के कामे पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले. निती आयोगामार्फत आकांक्षीत ब्लॉक, आकांक्षीत जिल्हा कार्यक्रम अंतर्गत दि. 4 जुलै ते दि. 30 सप्टेंबर, 2024 या कालावधीत संपूर्णता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचे उद्घाटन आज येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निती आयोगाचे अधिकारी आर. एन. मुंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, मिराताई कदम आदी उपस्थित होते. या अभियानामध्ये आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषि व इतर सेवा, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या क्षेत्राचा समावेश आहे. निती आयोगामार्फत आकांक्षीत तालुका, आकांक्षीत जिल्हा कार्यक्रम अंतर्गत दि. 4 जुलै ते दि. 30 सप्टेंबर, 2024 या कालावधीत संपूर्णता अभियान राबविण्यात येत आहे. या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये कार्यक्रमाचा कृति आराखडा तयार करणे, कार्यक्रमाची जनजागृती करणे, प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे आणि क्षेत्रीय स्तरावर संनियंत्रण करणे असा कालबद्ध कार्यक्रम आहे. हे संपूर्णता अभियान हे 30 सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार असले तरीही हे काम ऑगस्ट महिन्यापर्यंतच शंभर टक्के पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले असल्याचे त्यांनी सांगितले. उद्या सर्व गावांमध्ये प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. ग्रामपातळीवरच्या ग्रामसभा व तालुका पातळीवरच्या बैठका घेऊन निती आयोगाने निश्चित करुन दिलेल्या नियोजनानुसार हिंगोली तालुक्याचे मागासलेपण दूर करावयाचे आहे. यासाठी ग्रामपंचायतचे सरंपच, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी ताई, आशाताई आदींना या अभियानात सहभागी करुन घेण्यात येत आहे. निती आयोगाच्या प्रकल्पाची अंमलबजावणी झालेल्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार आहेत. आकांक्षीत तालुका जिल्हा संपूर्ण अभियानाची सर्व सरपंचांनी आवश्यक ती प्रचार प्रसिद्धी गावपातळीवर करुन महिलाची शंभर टक्के नोंदणी करावी, अशा सूचनाही श्री. पापळकर यांनी यावेळी दिल्या. मागास भागाचा विकास करण्यासाठी प्रधान मंत्री यांनी निती आयोगामार्फत आकांक्षीत तालुक्याचा कार्यक्रम तयार केला आहे. राज्यातील 27 तालुक्याचा आकाक्षींत तालुका अंतर्गत समावेश असून यामध्ये हिंगोली तालुक्याचा समावेश आहे. हिंगोली तालुक्याची आकांक्षीत तालुका म्हणून असलेली ओळख पुसण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन विकास कामे करण्यासाठी ग्रामपातळीवरील सरपंच, अधिकारी यांनी पूर्णपणे सहयोग दिला पाहिजे. दोन तालुका, जिल्ह्यामध्ये विकासाची स्पर्धा लावली तर आपला जिल्हा, तालुका विकासामध्ये पुढे जाण्यास मदत होणार आहे. संपूर्णता अभियान हा निती आयोगाच्या आकांक्षित तालुका अंतर्गत सुरु केलेला कार्यक्रम आहे. प्रत्येक तालुक्यात आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषि व इतर सेवा, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या सहा निर्देशांकावर कामकाज करण्यात येणार आहे. हिंगोली तालुक्यामध्ये ग्रामपातळीवरील उत्साह व अधिकाऱ्यांचा सहभाग यामुळे हिंगोली तालुक्याने हे संपूर्णता अभियान राबवून दोन महिन्यात उद्दिष्ट पूर्ण करीत यशस्वी होईल, असा विश्वास निती आयोगाचे समन्वय अधिकारी आर. एन. मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमापैकी आकांक्षित तालुका कार्यक्रम हा एक आहे. आंकाक्षित तालुका कार्यक्रमाची घोषणा प्रधानमंत्र्यांनी जानेवारी -2023 मध्ये केली. या घोषणेनुसार निती आयोगाने संपूर्ण भारतातून 500 तालुक्याची एकूण 40 निर्देशकाच्या आधारावर निवड केली आहे. महाराष्ट्रातून एकूण 27 तालुके आहेत तर आपल्या जिल्ह्यातून हिंगोली हा आकांक्षित तालुका म्हणून घोषित केला आहे. आपण आकांक्षित तालुक्यात येणे ही निश्चितच आनंदाची बाब नसून आपण निती आयोगाच्या 40 निर्देशकामध्ये मागासलेले असल्यामूळे आपल्या तालूक्याची निवड करण्यात आलेली आहे. उपरोक्त निर्देशकामध्ये आपणास युद्धपातळीवर काम करून सुधारणा करावयाची आहे. यासाठी निती आयोगाने आपणास प्रथमत: सहा निर्देशकामध्ये अग्रक्रमाने काम करून येणाऱ्या तीन महिन्याच्या कालावधीत अमुलाग्र बदल करण्यासाठी निर्देशित केलेले आहे. या सहा निर्देशकामध्ये बदल करण्यासाठी पुढील तीन महिन्यात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा कार्यक्रम पाच थिम्सवर राबविण्यात येणार आहे. या तीन महिन्याच्या कालावधीत या सहा निर्देशकामध्ये तर सुधारणा निश्चितपणे करू आणि येणाऱ्या काळात हिंगोली तालुका हा Aspirational to Inspirational तर झालेला असेलच पण त्यापुढे जाउन Inspirational to Ideal करण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे प्रास्ताविकात जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांनी सांगितले. या कार्यक्रमास हिंगोली जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी, तालुक्याचे सर्व अधिकारी, ग्रामपातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशाताई, बचत गटाच्या महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. *******

मूल्यमापनाची कामे करण्यास इच्छूक त्रयस्थ संस्थेकडून 11 जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित

हिंगोली (जिमाका), दि. 04 : जलयुक्त शिवार अभियान 2.0, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गतची कामे पूर्ण झाल्यानंतर त्रयस्थ संस्थेमार्फत करावयाच्या मूल्यमापनासाठी इच्छूक पात्र संस्थेकडून 11 जुलै, 2024 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत . त्या अनुषंगाने शासन निर्णयात नमूद केल्यानुसार मूल्यमापनाची कामे करण्यास इच्छूक त्रयस्थ संस्थेकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छूक त्रयस्थ संस्थांनी त्यांच्याकडील सविस्तर प्रस्ताव अटी व शर्तीसह कार्यालयातील नोटीस बोर्डावर नमूद असलेल्या कागदपत्रासह दि. 11 जुलै, 2024 पर्यंत जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, रेल्वे स्टेशन रोड, जुने एसपी ऑफिस जवळ, हिंगोली या कार्यालयाकडे इच्छूक त्रयस्थ संस्थांनी आपल्या संस्थेची नावे नोंदविण्यात यावीत, असे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, हिंगोली यांनी केले आहे. **

मागासवर्गीय मुलामुलींना सायकल खरेदी अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 04 : जिल्हा परिषदेच्या सेस योजना सन 2024-25 मधून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते नववीमध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींना सायकल खरेदीसाठी अर्थसहाय्य पुरविण्यासाठी अर्जदारांचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते नववीमध्ये शिकणारा असावा. त्याचप्रमाणे विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेचे अंतर त्याचा मूळ राहत्या घरापासून 2 कि.मी. असावे. ही योजना डीबीटी तत्वावर राबविण्यात येणार असल्याने निवड केलेल्या लाभार्थ्यांने सर्वप्रथम सायकल खरेदी करुन अनुदानासाठी मूळ देयक व सायकल खरेदी केल्याबाबतचे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्रासह प्रस्ताव समाज कल्याण अधिकारी अथवा गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांना सादर करावयाचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर सायकलच्या किंमतीइतके अथवा जास्तीत जास्त 5 हजार रुपये वर्ग करण्यात येणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आपले अर्ज गटविकास अधिकारी अथवा जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद हिंगोली या ठिकाणी दि. 19 जुलै, 2024 पर्यंत संबंधित कार्यालयात सादर करावेत. ज्या विद्यार्थ्यांनी सन 2023-24 मध्ये अर्ज सादर केला होता व कागदपत्राच्या छानणी अंती पात्र आहे परंतु ईश्वर चिठ्ठीमध्ये निवड झाली नाही, अशा विद्यार्थ्यांनी परत अर्ज सादर करावयाची आवश्यकता नाही. विलंबाने प्राप्त झालेल्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी केले आहे. ******

डेंगी प्रतिरोध महिना साजरा करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 04 : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यामध्ये दरवर्षी प्रमाणे जुलै महिना हा डेंगी प्रतिरोध महिना म्हणून साजरा करायचा आहे. या महिन्यात डेंगी आजाराविषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन त्याच्या प्रतिरोध उपाययोजनेच्या अंमलबजावणीमध्ये त्याचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने दरवर्षी विविध उपक्रमाद्वारे जनजागरण मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेमध्ये गाव पातळीवर डेंगीची लक्षणे, उपचार व प्रतिरोधाच्या विविध उपाययोजनांची माहिती योग्य त्या माध्यमाद्वारे जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यामध्ये डासोत्पत्ती स्थाने नष्ट करुन प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये लोकसहभाग वाढविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक सभा, जलद ताप रुग्ण सर्वेक्षण, रॅली, ग्रामसभा, बाजाराच्या ठिकाणी प्रदर्शनाचे आयोजन, हस्तपत्रिका वाटप, आशा बळकटीकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन, कंटेनर सर्वेक्षण, ग्रामीण आरोग्य पोषण आहार समितीची सभा, सर्व स्तरातून स्वच्छता मोहीम, दिंडीचे आयोजन, डासोत्पती स्थानात गप्पीमासे सोडण्याचा धडक कार्यक्रम, बचत गटाच्या सभा, शिक्षकासाठी सामाजिक जाणीव, सर्व स्तरातील अधिकाऱ्यांनी फवारणी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण व एक दिवस कोरडा दिवस पाळणे याविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक यांचा लोक सहभाग घेऊन गावपातळीवरील डेंगी प्रतिरोध महिना साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे. *******

02 July, 2024

शेतकऱ्यांनी एक रुपयात पिक विमा योजनेत सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली, दि. 02 (जिमाका) : खरीप 2024 हंगामात पेरण्या सुरु झाल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन आणि कापूस या पिकांसाठी एक रुपयात प्रधानमंत्री विमा योजनेत सहभागी होऊन पिकांना विम्याचे संरक्षण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये घेतला आहे. योजने अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 5 लाख 12 हजार 439 शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये सहभाग नोंदविला होता. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यास आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी केंद्र शासनाचे पिक विमा पोर्टल (www.pmfby.gov.in) सुरु करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी फक्त एक रुपया भरून आपल्या पिकांना पिक विम्याचे संरक्षण घ्यावे, असे आवाहन केले आहे. विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी केंद्रास 40 रुपये मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिले आहे. ते संबंधित विमा कंपनीमार्फत सीएससी केंद्रास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे रक्कम सीएससी केंद्र चालकांना देऊन अर्ज करावा. केंद्रचालकांनी अतिरिक्त रक्कमेची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे संपर्क केल्यास केंद्रचालकावर कायदेशीर कारवाई करता येईल. कोणत्याही सीएससी केंद्र चालकाने अथवा शेतकऱ्याने शासकीय जमीन, शासकीय गायरान, मंदिर, देवस्थान, संस्थान जमीन अथवा दुसऱ्या शेतकऱ्याचा परस्पर पिक विमा उतरवू नये, अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. शेतकऱ्यांनी विमा काढताना ही काळजी घ्यावी अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. पिक विम्यातील अर्ज हा आधार वरील नावाप्रमाणेच असावा. पिक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टल द्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते. यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे. याकरिता आपला बँक मॅनेजर माहिती देऊ शकतो. आधार कार्ड वरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखे असावे. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याने हे करावे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. त्यासाठी अंतिम दिनांकाच्या 7 दिवस अगोदर कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये अर्ज देणे आवश्यक (अनिवार्य) आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपला सातबाराचा उतारा, बँक पासबुक, आधारकार्ड, पिकपेराचे स्वयं घोषणापत्र व आवश्यक ठिकाणी नोंदणीकृत भाडेपत्रक-कारारनामा अपलोड करावा. योजनेत सहभागी होण्यासाठी आपण प्राधिकृत बँक, कॉमन सर्विस सेंटर अथवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेता येईल. योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत दि.15 जुलै 2024 आहे. परंतु, सर्व शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकाची वाट न पाहता आपल्या पिकाचा पिक विमा उतरवून घ्यावा. मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे. याकरिता बँक व्यवस्थापक माहिती देऊ शकतो. योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन 14447 संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. *****

जिल्हास्तरीय अतिसार प्रतिबंध मोहीम सुरू

हिंगोली, दि.२ (जिमाका): स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अतिसार प्रतिबंध मोहिमेस प्रारंभ झाला. दिनांक 1 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आला. यात प्रामुख्याने शाळा अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व सार्वजनिक कार्यालय इत्यादी ठिकाणी पिण्याचे पाणी व स्वच्छतेबाबत चर्चा करण्यात आली. तसेच शुद्ध पाणी निर्जंतुकीकरणाचा वापर करून जनजागृती आजारास रोखणे, पाणी तपासणी अधिक गुणवत्ता पूर्ण करून दूषित पाणी स्त्रोतावर नियोजित वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व सरकारी कार्यालयातील क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे एफ. टी.के (ftk)पाणी गुणवत्ता तपासणी करणे तसेच ग्रामपंचायतीमधील इतर सर्व संस्थांमध्ये पाणी तपासण्याचे प्रात्यक्षिक देऊन तेथील विद्यार्थ्यांना व नागरिकांना पाणी तपासणीच्या स्वच्छतेचा संबंधित माहिती देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच जल स्त्रोतांचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. पाण्याचे व्यवस्थापन, स्वच्छता जागरूकता कार्यक्रम, तसेच गावातील नळ जोडणी, पाणी गळती जागा शोधून त्याची दुरुस्तीबाबत पाहणी करणे, छतावरील पाणी संकलन, कचऱ्याचे वर्गीकरण, शौचालयाच्या वापरासाठी विशेष उपक्रम, स्वच्छता जागरूकता कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. ही मोहीम यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन केले आहे. मोहिमेचा अहवाल सादर करणे, याप्रसंगी शिक्षण विभाग आरोग्य विभाग, महिला बालकल्याण विभाग ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, ग्रामपंचायत विभाग, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभाग, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. तसेच पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे प्रकल्प संचालक संजय कुलकर्णी यांनी अतिसार प्रतिबंध मोहिमेत करावयाच्या उपक्रमाची माहिती दिली. अतिसार प्रतिबंध मोहिमेचे जिल्हास्तरीय सनियंत्रण महेश थोरकर करणार आहे. *****

01 July, 2024

कंत्राटी तत्त्वावर डाटा एंट्री ऑपरेटरच्या दोन जागांसाठी गुरुवारी मुलाखत

हिंगोली (जिमाका), दि.01:अनुसूचित उपयोजनेंतर्गंत वार्षिक अनुसूचित जाती घटक कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी समाज कल्याण विभागामध्ये दोन डाटा एंट्री ऑपरेटर (कंत्राटी)च्या गुरुवारी (दि. 4) रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असल्याचे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. हिंगोली येथील समाज कल्याण कार्यालयामध्ये डाटा एंट्री करण्यासाठी ऑपरेटर (कंत्राटी) पदाची आवश्यकता असून, कार्यालयीन कामकाज करण्यासाठी केवळ मुलाखत तसेच संगणकावर टंकलेखन चाचणी घेऊन निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात डाटा एंट्री ऑपरेटर (कंत्राटी) पद तीन महिन्यासाठी भरावयाचे आहे. तरी कोणत्याही शाखेतील पदवीधर, संगणकाचे ज्ञान, एमएस-सीआयटी, टंकलेखन मराठी - 30 श.प्र.मी. आणि इंग्रजी- 40 श.प्र.मी. इ अटी/पात्रता पात्र असलेल्या इच्छूक उमेदवारांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली येथे गुरुवार, दि. 4 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री. गायकवाड यांनी केले आहे. *****

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि.01: हरित क्रांतिचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना आज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी –कर्मचारी यावेळी उपस्थित होते. *****

ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनी मानधन सन्मान योजनेसाठी आधार प्रमाणिकरण करून घेण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि.01: राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना मानधन सन्मान योजनेमध्ये लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकीकरण (व्हेरीफिकेशन) करून घेणे आणि उर्वरीत लाभार्थ्यांना आधार कार्ड उपलब्ध करून घेण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी केले आहे. राज्यातील मान्यवर वृध्द साहित्यिक व कलावंतांना मानधन योजना सन 1954-55पासून संपूर्ण राज्यात सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविली जाते. सद्यस्थितीत कलावंतांना ऑनलाईन पद्धतीने 5 हजार रुपये मानधन अदा करण्यात येते. ही योजना प्रत्यक्ष लाभहस्तांतरण (डीबीटी)मार्फत राबविण्यासाठी जुन्या लाभार्थ्यांची परिपूर्ण माहिती उदा. आधार कार्ड, जन्म दिनांक (आधार कार्डवर नमूद असलेला), मोबाईल नंबर आवश्यक आहे. त्यासाठी संचालनालय स्तरावर माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांचे मानधन देण्यासाठी त्यांचे पडताळणी क्रमांक आवश्यक आहेत. त्यासाठी शासनाने https://mahakalasanman.org/AadharVerification.aspx ही लिंक तयार केली असून या लिंकवर क्लिक करून आपले आधार क्रमांक व इतर माहिती स्वतःच्या मोबाईल वरून किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र व महा ई सेवा केंद्र येथून पडताळणी करू शकतात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ****

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

• बीएलओ घरोघरी भेटी देवून करणार पडताळणी • 25 जुलै रोजी प्रसिद्ध होणार एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी • 25 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत मतदार यादीत नाव नोंदविता येणार • मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 20 ऑगस्टला होणार हिंगोली (जिमाका), दि. 01 : भारत निवडणूक आयोगाने 1 जुलै 2024 या अर्हता दिनाकांवर आधारित छायाचित्र मतदार यादीचा (दुसरा) विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 25 जून 2024 ते 24 जुलै 2024 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याद्वारे घरोघरी भेटी देवून तपासणी, पडताळणी, योग्य प्रकारे फोटो तसेच मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणिकरण करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांनी केले आहे. मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी गुरुवार, दि. 25 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध केली जाईल. तसेच गुरुवार, दि. 25 जुलै ते शुक्रवार, दि. 9 ऑगस्ट 2024 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. या काळातील शनिवार, रविवारी दावे व हरकती स्वीकारण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत सोमवार, दि. 19 ऑगस्ट 2024 पर्यंत राहणार असून मंगळवार, दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाणार आहे. त्यानुसार सर्व तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावरुन दि. 25 जून, 2024 ते दि. 4 जुलै, 2024 या कालावधी दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेटी देऊन तपासणी, पडताळणी करणे, तसेच दि. 10 जुलै, 2024 ते दि. 12 जुलै, 2024 या कालावधीत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणिकरण करुन प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. दि. 1 जुलै, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित प्रारुप मतदार यादी दि. 25 जुलै, 2024 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. या कामी यादीत नवीन नाव नोंदणीसाठी नमुना नं. 6, मतदार यादीतील नोंदी दुरुस्तीसाठी नमुना नं. 8 आणि त्याच विधानसभा मतदारसंघात नाव स्थलांतरीत मधील दावे आणि मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी नमुना नं. 7 मधील दावे व हरकती सर्व संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयातील मतदार मदत कक्ष (VHC) मार्फत स्वीकारण्यात येतील. भारत निवडणूक आयोगाची मान्यता प्राप्त असलेल्या राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक याप्रमाणे मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्यांच्या नेमणुका करुन त्यांची विहित नमुन्यातील यादी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना उपलब्ध करुन द्यावी. मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी श्रीमती शारदा दळवी यांनी केले आहे. ******

आयटीआय प्रवेशासाठी 3 जुलैपर्यंत मुदतवाढ

हिंगोली, (जिमाका) दि. ०१: यावर्षी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमत येथे प्रवेश प्रक्रियेतील ऑनलाईन अर्ज भरून नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये भरलेला फॉर्म दुरुस्त करणे व प्रवेश शुल्क जमा करण्याचा ३० जून 2024 हा अंतिम दिनांक होता. त्यात 3 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. तसेच सुट्टीच्या दिवशीसुद्धा सर्व आयटीआय चालू असून प्रवेश अर्ज कन्फर्म करण्याचे काम चालू आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आयटीआयला फॉर्म भरून अर्ज भरण्याचे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य एस. एल. कोंडावार यांनी केले आहे. कमी वेळेत कमी खर्चात खात्रीशीर झटपट नोकरी किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करून देणारे शिक्षण म्हणून आयटीआयकडे पाहिले जाते. यावर्षी 2.5 लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरलेले आहेत. दिवसेंदिवस औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यात वाढ होत असून इलेक्ट्रिशियन, वायरमन आदि अभ्यासक्रमाला 20 प्रवेश क्षमता असून, एका तुकडीसाठी 280 अर्ज प्राप्त झाले आहेत. 000000