04 October, 2024

बालविवाह विरोधी सक्षम गावे करण्यासाठी जिल्हास्तरीय बैठक संपन्न

हिंगोली (जिमाका), दि. 04 : जिल्ह्यात शासकीय यंत्रणेच्या मध्यमातून बालविवाह प्रतिबंधासाठी जाणीव जागृतीद्वारे जिल्ह्याला सक्षम करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) गणेश वाघ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत ग्रामपंचायत आणि अंगणवाडी यांच्या माध्यमातून अतिजोखीम घटकांतील मुलीच्या नोंदी घेऊन त्यांचा बालविवाह होऊ नये यासाठी त्यांना सामाजिक पालकत्व घेण्यासाठी आवाहन करणे, तसेच पात्र मुलींना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेशी जोडणे, तसेच इतर शासकीय योजनेशी जोडणे या विषयावर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनावर काम करणाऱ्या सर्व विभाग प्रमुखांनी प्रत्येक गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समितीचे गठन आणि त्या सक्रीय करण्यासाठी पंचायत विभागाकडून प्रयत्न करणे, शिक्षण विभाग व एकात्मिक बाल विकास विभागाकडून बालविवाह निर्मूलन विषयी रॅली काढून घोषणाद्वारे जाणीव जागृती करणे, दर सोमवारी बालविवाह विषयीची शपथ घेणे. शाळेमध्ये चित्रकला, निबंध, वकृत्व स्पर्धेचे आयोजन करणे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून मानवी साखळी तयार करून बालविवाहाची शपथ घेणे, अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून प्रत्येक गावात बालविवाह विषयीचे पोस्टर चिटकवणे, तसेच किशोरवयीन मुलीचे समुपदेशन आणि विवाहाच्या स्थितीच्या नोंदी ठेवणे, सेवा पुरवठादार याच्या बैठका घेणे. तसेच गावात बालविवाह होऊ नये म्हणून ठराव सुद्धा घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्ह्यात बालविवाह विषयी जाणीव जागृती करून प्रत्येकाला सक्षम करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) गणेश वाघ, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजाभाऊ मगर, उपशिक्षणाधिकारी नितीन नेटके, विस्तार अधिकार श्री. गुढे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एन. फोपसे, वरिष्ठ प्रकल्प समन्वयक विकास कांबळे, प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे व सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे उपस्थित होते. *****

औंढा नागनाथ तालुक्यातील युवक व युवतीसाठी 'फूड प्रोसेसिंग'वर मोफत प्रशिक्षण

• सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छुकांनी 10 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करावी हिंगोली (जिमाका), दि. 04 : येथील जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने विशेष घटक योजनेंतर्गत औंढा नागनाथ तालुक्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील युवक, युवतीसाठी फूड प्रोसेसिंग या विषयावर मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी उमेदवार हा किमान आठवी पास असावा, त्याचे वय 18 ते 45 वर्षादरम्यान असावे. तसेच आधार कार्ड, तीन पासपोर्ट फोटो, टीसी, मार्क मेमो, बँक पासबूक जमा करुन आपली नाव नोंदणी दि. 10 ऑक्टोबर, 2024 पर्यंत करावी. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी सुभाष बोरकर, कार्यक्रम आयोजक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे. *****

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची परिणामकारक अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी

हिंगोली (जिमाका), दि. 04 : सुशिक्षि बेरोजगार युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरु केली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करुन समिती सदस्यांना कामकाजाचे वाटप करण्यात आले आहे. संबंधित समिती सदस्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची परिणामकारक अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देवून अतिरिक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत, ज्या उद्योग आधार, उद्योग उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या सुक्ष्म, लघु, मध्यम उपक्रमांतील खाजगी आस्थापनामध्ये, उद्योगामध्ये 5 ते 10 पर्यंत कार्यरत मनुष्यबळ असणाऱ्या आस्थापनामध्ये एक उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी रुजू करून घेता येईल. 11 ते 20 पर्यंत कार्यरत मनुष्यबळ संख्या असणाऱ्या आस्थापनामध्ये 2 उमेदवार कार्यप्रशिक्षणासाठी रूजू करून घेता येईल. तसेच 20 पेक्षा अधिक कार्यरत गनुष्यबळ असणाऱ्या उत्पादन व सेवा क्षेत्रातील उद्योजक, कंपनी, उद्योग, खाजगी आस्थापना, खाजगी शाळा, महाविद्यालय, कृषी उद्योग, गोदाफार्म, व्यापारी व्यावसायिक, कारखानदार, दुकानदार, मालक, प्रोपरायटर इत्यादी आस्थापनांना त्याच्याकडील कार्यरत मनुष्यबळाच्या अनुक्रमे 10 टक्के व 20 टक्के उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी रुजू करून घेता येईल, आपल्याशी संबंधित असलेल्या खासगी आस्थापना, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयांनी आपल्याकडे नोंदीत सार्वजनिक न्यास, सेवाभावी संस्था यांचे सर्वेक्षण आपल्या स्तरावरून करून तसेच त्या आस्थापनांनी जीएसटी भरणा व सीएस ने प्रमाणित केलेले वार्षिक लेखा परीक्षण अहवाल, आयकर भरणा, पगारपत्रके, हजेरीपट या बाबी तपासून त्या आस्थापनेवर कार्यरत मनुष्यबळ किती आहे व त्यावर आपल्याला त्या आस्थापनेवर किती प्रशिक्षणार्थी देता येईल. या सर्व वस्तुनिष्ठ बाबी तपासून विहित नमुन्यात अहवाल सादर करावा व त्यांची रिक्तपदे cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचित करून निवड प्रक्रिया पूर्ण करावी. गठीत केलेल्या समिती सदस्यांनी विभागनिहाय वाटप करण्यात आलेले कामकाज व तसेच आपल्या आस्थापनेशी संबंधित असलेले 3 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या नोंदणीकृत खासगी आस्थापनांची माहिती घ्यावी. शासन निर्णय व मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन सर्व बाबी तपासाव्यात व तपासलेली आस्थापनांची यादी कौशल्य विकास कार्यालयाकडे पाठवावी व निवड प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत. ******

शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग,उडीद,सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घ्यावा •जिल्ह्यातील नऊ खरेदी केंद्रांचा समावेश

हिंगोली (जिमाका), दि. 04 : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, नाफेड व एनसीसीएफ कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने 2024-25 या हंगामामध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड व एनसीसीएफ मार्फत मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी दि. 1 ऑक्टोबर, 2024 पासून नोंदणी सुरु झाली आहे. प्रत्यक्षात मूग, उडीद खरेदी दि. 10 ऑक्टोबर व सोयाबीन खरेदी दि. 15 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील ९ खरेदी केंद्रांचा समावेश आहे. राज्य शासनाने राज्यात 209 खरेदी केंद्रांना मंजूर दिली असून त्यांच्यामार्फत शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत मूग, उडीद व सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. राज्य शासनाने नियुक्त केलेल्या दोन्ही केंद्रीय नोडल एजन्सींना खरेदीकरिता जिल्ह्यांची विभागणी करुन दिलेली आहे. नाफेड कार्यालयाने 19 जिल्ह्यातील 146 खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. यामध्ये अकोला-9, अमरावती 8, बीड-16, बुलढाणा-12, धाराशीव-15, धुळे-5, जळगाव-14, जालना-11, कोल्हापूर-01, लातूर-14, नागपूर-8, नंदूरबार-2, पुणे-01, सांगली-2, सातारा-01, वर्धा-8, वाशिम-5, यवतमाळ-7 आणि परभणी जिल्ह्यातील 8 खरेदी केंद्राचा समावेश आहे. एनसीसीएफ कार्यालयाने 7 जिल्ह्यातील 63 खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 6, अहमदनगर-7, सोलापूर-11, छत्रपती संभाजीनगर-11, हिंगोली-9, चंद्रपूर-5 आणि नांदेड-14 खरेदीकेंद्राचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यातील खरेदी केंद्राचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. कयाधू शेतकरी उत्पादक कंपनी मर्या. तोंडापूर (खरेदी केंद्र वारंगा फाटा), हजरत नासरजंग बाबा स्वयंसेवा सहकारी संस्था मर्या. (खरेदी केंद्र येहळेगाव), प्रगती स्वंय सेवा सहकारी संस्था मर्या. हिंगोली (खरेदी केंद्र बळसोंड हिंगोली), औंढा नागनाथ तालुका खरेदी विक्री सह. संघ (खरेदी केंद्र जवळा बाजार), कयाधू शेतकरी उत्पादक कंपनी मर्या. तोंडापूर (खरेदी केंद्र कळमनुरी), श्री संत नामदेव स्वयं. सेवा सहकारी संस्था मर्या. चोरजवळा (खरेदी केंद्र कन्हेरगाव), विजयालक्ष्मी बेरोजगार सहकारी संस्था मर्या. कोळसा (खरेदी केंद्र साखरा ता. सेनगाव), श्री. संत भगवान बाबा स्वयं सेवा सहकारी संस्था मर्या. कोथळज (खरेदी केंद्र सेनगाव), वसमत तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. वसमत (खरेदी केंद्र वसमत) या केंद्राचा समावेश आहे. सर्व शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्चित केलैल्या आधारभूत दरामुनसार मूग, उडीद व सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. ही योजना शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरिता राबविण्यात येत आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मूग, उडीद व सोयाबीन विक्रीकरिता आपल्या गावाजवळील नाफेड, एनसीसीएफच्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन सातबारा उतारा, आधार कार्ड, बँकेचे पासबूक घेऊन प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करावी. आपणास एसएमएस प्राप्त झाल्यावर शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन यावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, उपाध्यक्ष रोहित दिलीप निकम, सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे पाटील, सरव्यवस्थापक देविदास भोकरे यांनी केले आहे. *****

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सायकल खरेदी अर्थसहाय्यासाठी सोमवारी होणार ईश्वर चिठ्ठीद्वारे लाभार्थ्यांची निवड • पात्र लाभार्थ्यांनी निवडीच्या दिवशी उपस्थित राहण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 04 : जिल्हा परिषद सेस योजना सन 2024-25 मधून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल खरेदीकरिता अर्थसहाय्य पुरवणे या योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी पंचायत समितीकडून अर्ज मागविण्यात आले होते. पात्र लाभार्थ्यांमधून ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड करावयाची आहे. ही निवड मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहामध्ये सोमवारी (दि.7) दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी निवडीच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आवाहन निवड समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, सह अध्यक्ष तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, सदस्य सचिव तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके व निवड समितीच्या सर्व सदस्यांनी केले आहे. ******

03 October, 2024

अधिसूचित सेवा तात्काळ ऑनलाईन करा - जिल्हाधिकारी

हिंगोली (जिमाका), दि. 03 : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार जिल्ह्यातील अधिसूचित केलेल्या लोकसेवांची माहिती तात्काळ ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हास्तरीय विभागप्रमुखांच्या बैठकीमध्ये याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, गणेश वाघ, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, मुख्याधिकारी अरविंद मुंढे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, प्रशांत दिग्रसकर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार अधिसूचित केलेल्या सर्व सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी अर्जदारांना आपले सरकार सेवा पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करावे. त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. त्यामुळे अधिसूचित कालावधीत या सेवा वेळेत पुरविण्यात येतील. ऑफलाईन दिलेल्या सेवा पोर्टलवर दिसत नसल्यामुळे केलेली कामेही येथे ऑनलाईन दिसत नाहीत. त्यामुळे या सर्व सेवा ऑनलाईन करून घ्याव्यात. तसेच विभाग प्रमुखाकडे आलेल्या अर्जाची संख्या, निकाली काढलेल्या अर्जाची संख्या, अपिलाची संख्या आदीचे आकडे तपासून घ्यावेत. तसेच पोर्टलवर अधिसूचित सेवा वेळेत पूर्ण न करण्यामागची कारणे, ऑनलाइन सेवा देता येणे शक्य असताना त्या ऑफलाईन देण्यामागची कारणे नमूद करावीत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माहितीचे वाचन सर्व ग्रामपंचायतीमध्ये 26 जानेवारी 2024 रोजी करावयाचे होते. याबाबतचाही कार्यपूर्ती अहवाल सादर करावा. तसेच आदर्श आपले सरकार सेवा केंद्रामध्ये सेवा उपलब्ध करून देण्याचे दर, कालावधी आणि वेळेत पूर्ण करण्यात येणारे सेवा केंद्रांची माहिती प्रदर्शित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी यावेळी दिल्या. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाचे जिल्हा समन्वयक सागर भुतडा व जिल्हाधिकारी कार्यालयातील आयटी कक्षाचे प्रकल्प व्यवस्थापक नीरज धामणगावे यांनी अधिनियमांतर्गत विभागनिहाय प्राप्त झालेल्या व त्यावर कार्यवाही झालेल्या अर्जाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित केलेल्या सेवा देणाऱ्या सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. *******

आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मूग, उडीद, सोयाबीन खरेदी सुरु

• शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे पणन विभागाचे आवाहन • जिल्ह्यात नऊ खरेदी केंद्र निश्चित हिंगोली (जिमाका), दि. 03 : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत एनसीसीएफच्या वतीने खरीप हंगाम 2024-25 मध्ये मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले असून, या खरेदी केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी दि. 1 ऑक्टोबर, 2024 पासून नोंदणी सुरु करण्यात आली आहे. तसेच याच खरेदी केंद्रावर दि. 10 ऑक्टोबर,2024 ते दि. 07 जानेवारी,2025 पर्यंत मूग व उडीद खरेदी तर दि. 15 ऑक्टोबर, 2024 ते दि. 12 जानेवारी, 2025 पर्यंत सोयाबीन खरेदी सुरु करण्यात येणार आहे. मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात नऊ खरेदी केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. खरेदी केंद्राचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. कयाधु शेतकरी उत्पादक कं. मर्या. तोंडापूर ता. कळमनुरी ही संस्थेचे खरेदी केंद्र वारंगा फाटा व कळमनुरी येथे आहेत. वारंगा फाटा येथील केंद्रावर केंद्र चालक म्हणून मारोती शिवदास कदम (संपर्क 9736449393) तर कळमनुरी येथील केंद्रावर प्रशांत तुकाराम मस्के (9921609393) हे आहेत. हजरत नासरगंज बाबा स्वयंसेवी सेवा सहकारी संस्था म. हिंगोली या संस्थेचे खरेदी केंद्र येहळेगाव ता. औंढा नागनाथ येथे आहे. या केंद्रावर केंद्र चालक म्हणून शेख गफार शेख अली हे असून त्यांचा संपर्क क्रमांक 9881501040 असा आहे. प्रगती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था,हिंगोली या संसथेचे खरेदी केंद्र बळसोंड जि. हिंगोली येथे आहे. या संस्थेवर केंद्रचालक म्हणून नारायण शामराव भिसे हे कामकाज पाहणार असून 9850792784 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. औंढा नागनाथ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. औंढा (ना) या संस्थेचे खरेदी केंद्र जवळा बाजार ता. औंढा नागनाथ येथे आहे. या संस्थेवर केंद्र चालक म्हणून कृष्णा नामदेव हरणे हे असून त्यांचा संपर्क क्रमांक 9175586758 असा आहे. श्री संत नामदेव स्वयंरोजगार सहकारी संस्था म. चोरजवळा या संस्थेचे खरेदी केंद्र कन्हेरगाव ता. जि. हिंगोली येथे आहे. या संस्थेवर केंद्रचालक म्हणून अमोल जयाजीराव काकडे हे कामकाज पाहणार असून त्यांचा संपर्क क्र. 8007386143 आहे. विजयलक्ष्मी बेरोजगार सहकारी संस्था म. कोळसा ता. सेनगाव या संस्थेचे खरेदी केंद्र साखरा ता. सेनगाव येथे आहे. या केंदावर केंद्र चालक म्हणून उमाशंकर वैजनाथ माळोदे हे काम पाहणार आहेत. त्यांना 9403651743 क्रमांकावर संपर्क साधावा. श्री संत भगवानबाबा स्वयंरोजगार सेवा संस्था कोथळज या संस्थेचे खरेदी केंद्र सेनगाव येथे आहे. या केंद्राचे केंद्र चालक म्हणून निलेश रावजीराव पाटील (9881162222) हे असून, वसमत तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित, वसमत या संस्थेचे खरेदी केंद्र वसमत येथे आहे. या केंद्रावर केंद्र चालक म्हणून सागर प्रभाकर इंगोले हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 8390995294 असा आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी संपर्क करुन नोंदणी करावी. नोंदणीसाठी हंगाम 2024-25 मधील पीक पेरा नोंद असलेला ऑनलाईन सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स सोबत आणावे व बँक पासबूकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आय. एफ. एस. सी. कोड स्पष्ट असावा (जनधन बँक खाते किवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये). संबंधित तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी मूग, उडीद, सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावे, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, परभणी/हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. ****

मधमाशा पालनासाठी 50 टक्के अनुदान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 03 : राज्यात सुमारे 70 टक्के लोकसंख्या शेती व्यवसायावर उपजीविका करत आहे. शेती व्यवसाय अधिक फायदेशीर होण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. मधमाशामुळे शेती उत्पन्नात भरघोस वाढ होत आहे. मध उद्योग हा केवळ शेतीपूरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून न करता एक मुख्य उद्योग म्हणून केल्यास ग्रामीण रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. मधमाशांच्या मधपेट्या शेती पिके, फळबागायतींच्या ठिकाणी, तसेच जंगलात ठेवल्यास मधमाशाद्वारे पर-परागीभवन होऊन पिकांच्या उत्पादनात पिकांच्या प्रकारानुसार 20 ते 45 टक्के उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ मधमाशांच्या मधाच्या व मेणाच्या किंमतीच्या 10 ते 15 टक्के अधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशी पालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेद्वारे मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या योजनेचा जास्तीत-जास्त शेतकरी, कातकरी, सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. या योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहेत. 1. वैयक्तिक मधपाळ योजना : या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. 2. केंद्र चालक प्रगतीशील मधपाळ योजना : या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्ती वैयक्तिक केंद्र चालक असावा. शैक्षणिक पात्रता किमान 10 वी पास असावी, वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे. अशा व्यक्तींच्या नावे अथवा त्या व्यक्तीच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे किमान एक एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थीकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. 3. केंद्रचालक संस्था : योजनेचा लाभ घेण्यासाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे मालकीची किंवा 10 वर्षासाठी भाडेतत्वावर घेतलेली किमान एक एकर शेत जमीन, संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान एक हजार चौरस फूट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशीपालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेली संस्था असावी. वरील योजनेसाठी लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे तसेच निश्चित ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, हॉल नं एस-11, नांदेड रोड, हिंगोली मो.नं. 9860404917, 9822528534, ई-मेल पत्ता- dviohingoli@mskvib.org आणि संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सरकारी बंगला नं. 5 महाबळेश्वर, जि. सातारा पिन-412806 (दूरध्वनी- 02168-260264) यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी, सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. *******

जिल्हाधिकारी कार्यालयात शौर्य दिन उत्साहात साजरा

हिंगोली (जिमाका), दि. 03 : भारतीय सैन्य दलाने दि. 29 सप्टेंबर, 2016 रोजी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी दि. 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्यात येतो, परंतु यावर्षी 29 सप्टेंबर रोजी रविवार आल्यामुळे दि. 30 सप्टेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शौर्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अभिमन्यू बोधवड, लेखा अधिकारी, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष, वीर माता, वीर पिता यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व भारत माता, वीर जवानांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी शौर्य दिनाचे महत्व सांगून शौर्य दिन आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले. यावेळी दुसऱ्या महायुध्दातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, वीर माता, वीर पिता यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे ऑनररी कॅप्टन तुकाराम रामराव मुकाडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक सुरेश भालेराव, पाईकराव दलीत धरबा, कडूजी टापरे, पाईकराव काशिनाथ सुदामराव तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांनी स्थानिक परिस्थितीनुसार अत्यंत साधेपणाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला. *******

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर 102 कोटी वितरीत • सन 2023 च्या खरीप हंगामाचे अर्थसहाय्य जमा • शेतकऱ्यांनी ई-केवायसी वेळेत पूर्ण करावी - डॉ. राजेंद्र कदम

हिंगोली, दि. 03 (जिमाका) : सन 2023 च्या खरीप हंगामामधील ई-पीक पाहणी नोंदविलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात शासनाकडून 102 कोटी 26 लाख रुपयांचे अर्थसहाय वाटप केले असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे. खरीप हंगाम 2023 मधील ई-पीक पाहणी नोंदविलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपये व अधिकतम 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत संबंधितांच्या बँक खात्यावर वाटप सुरू झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक अँप पोर्टलद्वारे कापूस 37 हजार 096 व सोयाबीन 3 लक्ष 66 हजार 460 असे एकूण जिल्ह्यामध्ये 4 लक्ष 3 हजार 556 लक्षांक होते. त्यापैकी कापूस 28 हजार 160 व सोयाबीन 2 लक्ष 81 हजार 787 असे एकूण जिल्ह्यामध्ये 3 लक्ष 9 हजार 947 लागवडीची ई-पीक नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संमती पत्र घेऊन पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. ई-पीक पाहणी अँप, पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करुन अर्थसहाय्य हिंगोली तालुक्यातील 20 कोटी 88 लाख, कळमनुरी तालुक्यातील 19 कोटी 81 लाख, वसमत तालुक्यातील 19 कोटी 42 लाख, सेनगाव तालुक्यातील 26 कोटी 17 लाख तर औंढा ना. तालुक्यातील 15 कोटी 98 लाख असे एकूण हिंगोली जिल्ह्यातील 102 कोटी 26 लाख रुपयांचे सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात अर्थसहाय्य वाटप करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीव्दारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरण माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थ्यांची केवायसी प्रलंबित असल्यामुळे त्यांनी सामायिक सुविधा केंद्र किंवा संबंधित कृषि सहाय्यक यांच्याकडे ई-केवायसी त्वरित पूर्ण करून घ्यावी. केवायसी पूर्ण झाल्यावर त्यांच्या खात्यावर अर्थसहाय्य जमा करणे शासनास सुलभ होईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. ******

02 October, 2024

सामाजिक न्याय विभागातर्फे ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

हिंगोली (जिमाका), दि.०२ : सामाजिक न्याय विभागातर्फे प्रती वर्षाप्रमाणे यावर्षीही दि. 1 ऑक्टोबर 2024 रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सांस्कृतिक सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पेन्शनर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष एम.एल.पोपळाईत, समाज भूषण पुरस्कार्थी प्रा.विक्रम जावळे, मधुकर माजंरमकर, डॉ.विजय निलावार तसेच ज्येष्ठ नागरीक संघाचे खुशिरमियाँ मो. पठाण,श्री.जगताप, गोविंदराव घनतोडे, बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे, सहाय्यक लेखाधिकारी श्रीकांत कोरडे, आत्माराम वागतकर, सुलोचना ढोणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महामानवाच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित जेष्ठ नागरिकांना प्रमुख पाहुण्यांनी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले. सुत्रसंचालन सुरेश पठाडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी 200 ते 250 ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. *******

स्मार्टचे प्रकल्प संचालक डॉ.हेमंत वसेकर यांची फार्मर प्रोड्यूसर कंपनीस भेट

हिंगोली (जिमाका), दि . ०२ : बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाचे पुणे येथील प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर हिंगोली जिल्ह्याच्या भेटीत वसमत तालुक्यातील हट्टा येथील हट्टावाला फार्मर प्रोड्यूसर कंपनी, तोंडापूर येथील कयाधु फार्मर प्रोड्यूसर कंपनीस भेट देऊन वेअर हाऊस व मशिनरी शेड बांधकामाची पाहणी करुन मार्गदर्शन केले. यावेळी स्मार्टचे नोडल अधिकारी उपसंचालक जी.बी.बंटेवाड, पुरवठा व मूल्यसाखळी तज्ञ जी.एच.कच्छवे, अर्थशास्त्र तज्ञ तथा वित्तीय सल्लागार जितेश नालट, शेख मोहीब उर-रहेमान उपस्थित होते. हट्टावाला फार्मर प्रोडयूसर कंपनी येथे संबंधित कंपनीचे संचालक झोहेब सिदिकी, उत्तम रिठे, मंचक काळे, फहिमोदिन सिद्दिकी आदी उपस्थित होते. प्रकल्प संचालक माजी खासदार शिवाजीराव माने यांनी संचालक डॉ. वसेकर यांना कंपनीची माहिती दिली. तर कंपनीचे संचालक महेंद्र माने यांनी कंपनीमार्फत उत्पादित होणाऱ्या पदार्थांबाबत माहिती दिली. यावेळी स्मार्टचे प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कयाधू फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे संचालक डॉ.माधुरी काटकर, महेंद्र माने आदि कंपनीचे संचालक उपस्थित होते. *****

जिल्ह्यातील स्मार्ट प्रकल्पामधील सहभागी यंत्रणांचा स्मार्टचे प्रकल्प संचालकांकडून आढावा

हिंगोली (जिमाका), दि.०२ : बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाचे पुणे येथील प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी हिंगोली जिल्ह्याच्या भेटीत येथील जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील स्मार्ट प्रकल्पामधील सहभागी यंत्रणा कृषि, महिला आर्थिक विकास महामंडळ, पशुसंवर्धन विभाग, व्हीएसटीएफ, एम.एस. आर.एल. एम. आदी यंत्रणाचा अंतिम मंजुरी प्राप्त असलेल्या समुदाय आधारीत संस्थेचा आढावा घेतला. जागतिक बँक अर्थसहाय्यित प्रकल्प असल्यामुळे स्मार्ट प्रकल्पामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी जागतिक बँकेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश डॉ. वसेकर यांनी दिले. तसेच प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, स्मार्टचे प्रमुख अंमलबजावणी कक्ष तथा आत्माचे प्रकल्प सचांलक बी.आर.वाघ, स्मार्टचे नोडल अधिकारी उपसंचालक जी.बी.बंटेवाड, पुरवठा व मूल्यसाखळी तज्ञ जी.एच.कच्छवे व स्मार्टच्या जिल्हा अंमलबजावणी कक्ष कार्यालयातील कर्मचारी व संबंधित यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पुरवठा व मूल्यसाखळी तज्ञ जी.एच.कच्छवे यांनी सर्वांचे आभार मानले. ******

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

*हिंगोली, दि.०२, (जिमाका) :* राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, नायब तहसीलदार सचिन जोशी यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. ०००००