हिंगोली दि.२० ऑक्टोबर:- भारतात दुसऱ्या क्रमांकाचा ऐतिहासिक सार्वजनिक दसरा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगोली येथील ऐतिहासिक रामलीला मैदानावर यंदाचा दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या महोत्सवाचे औचित्य साधून आरोग्य विभागाच्या वतीने रामलीला मैदानावर भव्य ‘आरोग्य प्रदर्शनी स्टॉल’ उभारण्यात आला आहे. ग्रामीण व शहरी भागातून आलेल्या भाविकांना विविध आजारांविषयी माहिती व मोफत आरोग्य सेवा देत जनजागृती करण्याचे कार्य या प्रदर्शनीच्या माध्यमातून केले जात आहे.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही आरोग्य प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे.
या स्टॉलमध्ये "सेवा संकल्प" अभियानांतर्गत:
"माझं गाव, आरोग्य संपन्न गाव" "तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला"
यांसारख्या विविध कल्याणकारी अभियानांची सविस्तर माहिती भाविकांना दिली जात आहे. तिशी पार केलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी, आहारविषयक सल्ला आणि असंसर्गजन्य आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जात आहे.
दसरा महोत्सवात येणाऱ्या भाविकांना केवळ मनोरंजनाचाच नव्हे, तर आरोग्याचा लाभही या स्टॉलमुळे मिळत आहे. विशेषतः ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी या आरोग्य प्रदर्शनीला मोठ्या प्रमाणावर भेट देऊन विविध सेवा व मोफत तपासण्यांचा लाभ घेतला आहे.
दसरा महोत्सवात मागील सात दिवसात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, दसरा व्यवस्थापन समितीचे मधुकर खंडागळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रणजीत कंजे, श्री. कावरखे पाटील, बालरोग तज्ज्ञ डॉ. विशाल पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता डुडुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी भाकरे, डॉ. नामदेव कोरडे, ज्ञानेश्वर चौधरी इत्यादी अधिकारी व कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात भाविकांनी आरोग्य प्रदर्शनीला भेटी दिल्या.
No comments:
Post a Comment