▶️ जिल्हाधिकारी यांचे सुधारित आदेश जारी.
▶️ चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापराचा मुद्दा रद्द.
हिंगोली, दि. २० (जिमाका) : बायोमास, ब्रिकेट, पेलेट्स व गट्टू निर्मिती करणाऱ्या उद्योगसमूहांनी रोजच्या कुटार आवकपैकी किमान ५० टक्के साठा शासनाच्या आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवावा, असे सुधारित आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी हे आदेश १९ ऑक्टोबरपासून चारा टंचाईचा कालावधी संपेपर्यंत लागू राहतील. या आदेशानुसार कुटाराच्या व्यावसायिक वापराबाबतची पूर्वीची तरतूद रद्द करण्यात आली आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे पशुधन नाही, त्यांनी प्रथम परिसरातील पशुधन असलेल्या शेतकऱ्यांना कुटार उपलब्ध करून देण्याचा विचार करावा. त्यानंतर उर्वरित कुटार उद्योगांना त्यांना देता येईल.
पशुधन असलेल्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या जनावरांसाठी कुटाराची व्यवस्था करावी. त्यानंतर उर्वरित कुटार विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावे. यासाठी तालुकास्तरीय पशुसंवर्धन अधिकारी आणि दुग्ध व्यवसाय अधिकारी यांच्याकडे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. शासनाच्या चारा वाटप धोरणानुसार संबंधित शेतकऱ्यांना लाभ देण्याबाबतचे निर्बंध लागू राहतील.
राखीव साठ्याची माहिती देणे बंधनकारक
ब्रिकेट, पेलेट्स व गट्टू निर्मिती करणाऱ्या तसेच इतर उद्योगांना कुटार विकणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या चारा वाटप योजनेचा लाभ मिळणार नाही.
उद्योगांनी शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवलेल्या कुटाराच्या साठ्याची माहिती हिंगोलीच्या पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त यांच्याकडे वेळोवेळी सादर करावी. राखीव साठ्याबाबत प्रशासनाच्या सूचनांनुसार संबंधितांनी पुढील कार्यवाही करावी.
जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण झाल्यास बायोमास, ब्रिकेट, पेलेट्स व गट्टू निर्मिती करणाऱ्या उद्योगांकडील राखीव कुटाराचा वापर शासनाच्या चारा टंचाई निवारणासाठी करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment