हिंगोली, दि. २० ऑक्टोबर (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुधनासाठी चारा टंचाईच्या काळात चारा उपलब्ध व्हावा, यासाठी विभागीय वन अधिकारी, हिंगोली यांच्या विभागांतर्गत उपलब्ध असलेला अंदाजे ३७४ मेट्रिक टन चारा व गवत राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, उपलब्ध चारा व गवत पशुधनासाठी टंचाईच्या काळात उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे हा चारा राखीव ठेवून त्याचा उपयोग जिल्ह्यातील पशुधनाची चारा गरज भागविण्यासाठी करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
उपलब्ध चारा व गवताचा लिलाव करू नये किंवा अन्य कोणत्याही मार्गाने त्याची जिल्ह्यांतर्गत अथवा जिल्ह्याबाहेर विक्री करू नये. उपलब्ध असलेला संपूर्ण चारा व गवत पशुधनासाठी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विभागीय वन अधिकारी, हिंगोली यांना निर्गमित केले आहेत. दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्धतेचे नियोजन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
No comments:
Post a Comment