15 September, 2022

 

हिंगोली जिल्ह्यात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान

‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबवले जाणार...

- मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांची माहिती

 

हिंगोली (जिमाका), दि. 15 : हिंगोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये गावांच्या दृष्यमान स्वच्छतेची राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यासाठी 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, 2022 या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राबविले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने  यांनी दिली.

केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशनानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती अंतर्गत स्वच्छता ही सेवा ही मोहीम राबवली जाणार आहे. यावर्षी या मोहिमेची दृष्यमान स्वच्छता ही संकल्पना आहे. गावामध्ये दृष्यमान स्वच्छतेसाठी एक  राष्ट्रव्यापी मोहिम राबविण्यासाठी स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत खालील उपक्रम राबविले जाणार आहेत.

गावामध्ये दृष्यमान स्वच्छता, गावातील कचरा कुंड्या व असुरक्षित ठिकाणांची साफसफाई, कचरा स्त्रोताच्या ठिकाणी (सुका व ओला) कचरा वेगळे करण्यासाठी जनजागृती करणे, कचरा संकलन आणि विलगीकरण करण्यासाठी केंद्र निर्माण करणे, प्लॅस्टिकसारखा अविघटनशील कचरा एकत्रित करुन नियोजन करावे, पाणवठ्यांजवळील परिसर स्वच्छ ठेवुन त्यांच्या सभोवताली वृक्षारोपण करणे, एकल प्लॅस्टिक वापराच्या दृष्परिणामांबद्दल गावसभा आयोजित करुन यापूर्वी प्लॅस्टिक वापरावर बंदीबाबत घेतलेल्या ठरावांची अंमलबजावणी करावी.

हागणदारी मुक्त अधिक या घटकावर सरपंच संवाद आयोजित करणे, गावात कचरा न करण्यासाठी जनजागृतीपर घोषवाक्य लेखन, प्रतिज्ञा घेणे, प्लॅस्टीक बंदी व स्वच्छता या विषयावर वक्तृत्व/निबंध / रांगोळी/सजावट व देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी गावातील मंडळांना आवाहन केले जाणार आहे.

स्वच्छता ही सेवा या अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी होऊन अभियान प्रभावीपणे राबवावे. या अभियान साठी गावातील सर्व नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन गावातील स्वच्छतेसाठी  श्रमदान मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे आवाहनही मुख्य कार्य अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

*******

No comments: