29 September, 2022

 

ग्राम बाल संरक्षण समितीची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी

बालमित्राची नियुक्ती करावी : मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने

 


हिंगोली (जिमाका), दि. 29 : मुलांच्या काळजी व संरक्षणाच्या दृष्टीकोनातून बालकांच्या समस्या जाणून घेवून त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील काही महसुली गावांमध्ये ग्राम बाल संरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तर उर्वरित गावांमध्ये ग्राम बाल संरक्षण समित्या स्थापन करणे सुरु आहे. या ग्राम बाल संरक्षण समितीची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी समितीमध्ये नव्याने बाल मित्राची नियुक्ती करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी दिले.

येत्या 02 ऑक्टोबर 2022 रोजी होणाऱ्या ग्राम सभेमध्ये 20 ते 30 वर्षे वयोगटातील एक युवक व एक युवती यांची ग्राम बाल संरक्षण समितीमध्ये बाल मित्र म्हणून निवड करण्याबाबत सूचना देण्यासाठी येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना श्री. दैने यांनी ग्राम बाल संरक्षण समितीचे रचना फलक ग्राम पंचायत कार्यालयात लावण्याबाबत सर्व गट विकास अधिकारी यांना आदेशित केले. तसेच बाल विवाह निर्मूलनासाठी ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी बाल विवाह समूळ नष्ट करण्यासंदर्भात सक्रीय सहभाग नोंदवून आपल्या कार्यक्षेत्रात बाल विवाह होणार नाहीत याची योग्य ती खबरदारी घेण्याबाबत सुचना दिल्या.

 उप मुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांनी 02 ऑक्टोबर,2022 रोजी होणाऱ्या ग्राम सभेमध्ये ग्राम बाल संरक्षण समितीचे ठराव संमत करुन घेण्याबाबत सर्व गट विकास अधिकारी यांना आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व ग्रामसेवकांना आदेशित करण्याबाबत सूचना दिल्या.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी (बाल कल्याण) गणेश वाघ यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व अंगणवाडी सेविका तथा ग्राम बाल संरक्षण समितीतील सदस्य सचिव यांना बाल मित्र नियुक्त करण्याबाबत सहाय्य करतील असे वक्तव्य केले.

या बैठकीस जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे गट विकास अधिकारी गणेश बोथीकर (हिंगोली), प्रदिप बोंढारे (कळमनुरी), एस.आर बेले (औंढा ना.), उमाकांत तोटावाड (वसमत), एस. व्ही. गोरे (सेनगाव), तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षातील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड.अनुराधा पंडित इत्यादी उपस्थित होते.

 

******

No comments: