23 September, 2022

 

सेवा पंधरवाडानिमित्त जेष्ठ नागरिकांची भव्य रॅली संपन्न

 


हिंगोली (जिमाका), दि. 23 : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा दि. 17 सप्टेंबर ते दि. 02 ऑक्टोबर, 2022 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या सेवा पंधरवाडा कालावधीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांचे वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज दि. 23 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 7.00 वाजता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली व जॉएन्ट्स ग्रुप हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत प्रभात रॅली काढण्यात आली. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस जेष्ठ नागरिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

या रॅलीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील 100 ते 125 ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहून सहभाग नोंदवला. यावेळी जॉएन्ट्स ग्रुपचे रत्नाकर महाजन व इतर पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सहाय्यक आयुक्त मिणगिरे यांनी सेवा पंधरवाडा निमित्त ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त 1 आक्टोबर रोजी तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे उपस्थितीत आरोग्य तपासणी शिबीराचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दर्गा रोड, हिंगोली येथे सकाळी 11.30 वाजता  आयोजित करण्यात आलेला असून सदर आरोग्य तपासणीचा लाभ हिंगोली जिल्हयातील  सर्व ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व बार्टीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

*****

No comments: