30 September, 2022

 

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त "फिट इंडिया फ्रीडम रन"चे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 30 : युवा व खेल मंत्रालय नवी दिल्ली यांनी पुढाकार घेउन फिट इंडिया फ्रीडम रन" 3.0 कि.मी. धावणे उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. हा उपक्रम दि. 02 ऑक्टोबर ते दि. 31 ऑक्टोबर,2022 या कालावधीत सर्व राज्यामध्ये व्यापक स्वरुपात आयोजन करण्याबाबत शासनाकडून निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने फिट इंडिया फ्रिडम रन उपक्रम पुढील प्रमाणे आयोजित करावयाचा आहे.

दि. 02 ऑक्टोबर, 2022 रोजी महात्मा गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यामध्ये आजादी का अमृत महोत्सव फिट इंडिया फ्रिडम रन 3.0 कि.मी. धावणे हा उपक्रम हिंगोली जिल्ह्यात व्यापक स्वरुपात राबवयाचा आहे. दि. 02 ऑक्टोंबर,2022 रोजी Plog Run आयोजित करुन स्वच्छता आणि तंदुरुस्ती अशा दोन्ही बाबी साधावयाच्या आहेत. धावतांना, जॉगिंग करतांना रस्त्यात दिसणारा हाताने उचलता येईल असे कागदाचे कपटे, कचरा उचलून कचऱ्याच्या पिशवीत / Garbage Bag मध्ये गोळा करुन स्वच्छता करावयाची आहे, ही विशेष सूचना फिट इंडिया मुव्हमेंटच्या मिशन डायरेक्टर श्रीमती एकता बिश्नोई यांनी बैठकीमध्ये दिली आहे. तसेच वर्क फ्रॉम होम म्हणजे घरात बसून कामकाज करणारे युवक/ युवती, नागरिक व गृहिणी या सर्वांना देखील फ्रिडम रन या उपक्रमात सहभागी होऊ शकतात.

सहभागी झालेल्या व्यक्तींनी धावलेले, चाललेले अंतर, मॅरेथॉन फिट इंडिया पोर्टलवर (www.fitindia.gov.in) नोंद करावी. उपरोक्त डाटा स्वतंत्रपणे वरील संकेतस्थळावर मोबाईलव्दारे किंवा इतर अॅपव्दारे अपलोड करावा. वरीलप्रमाणे माहिती अपलोड केली असता यामध्ये सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र इमेलव्दारा आपणास प्राप्त होणार आहे.  फिट इंडिया मिशनव्दारा संघटक आणि व्यक्तींना सामाजिक अंतर राखण्याचे निकषानुसार दि. 02 ऑक्टोंबर ते 31 ऑक्टोंबर, 2022 या कालावधीत धावणे चालण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. फिटनेस का डोस आधा घंटा रोज हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

धावणे हे मानवी शरीराचे सर्वात मोठे स्वातंत्र्य आहे. त्यास नेहमी तंदुरुस्ती (फिटनेस) नियमित व्यायामाची आवश्यकता असते. नियमित व्यायामासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि सर्वांना लठ्ठपणा, आळस, तणाव, चिंता, आजार इत्यादीपासून मुक्त होण्यासाठी मदत करण्यासाठी फिट इंडिया अंतर्गत फिट इंडिया फ्रिडम रन 3.0 कि.मी. धावणे ही चळवळ दि. 02 ऑक्टोंबर, 2022 या कालावधीत सर्व राज्यांनी राबविण्याचे केंद्र शासनाच्या संदर्भीय बैठकीव्दारे कळविण्यात आले. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिक, खेळाडू, क्रीडा प्रेमी, युवक-युवती यांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा.

या उपक्रमामागील संकल्पना अशी आहे की, तुम्ही कोठेही चालू शकता कधीही पळु शकता. प्रत्येक जन धावण्यासाठी, चालण्यासाठी आपल्या आवडीचा मार्ग व्यक्तिशः अनुकूल वेळ निवडु शकतात. आवश्यकतेनुसार काही मिनिटांची विश्रांती घेउनही धावणे चालणे करु शकणार आहात. प्रत्येकास स्वतःच्या वेगाने धावणे चालण्यासाठी मूभा असणार आहे. स्वयंचलितपणे किंवा कोणत्याही ट्रॅकिंग अॅप किंवा जीपीएस घड्याळाचा वापर करुन धावलेल्या, चाललेल्या अंतराचा मागोवा घेता येणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात दि. 02 ऑक्टोंबर ते 31 ऑक्टोबर, 2022 या कालावधीत "फिट इंडिया फ्रीडम रन" 3.0 कि.मी. धावणे ही चळवळ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व जनतेसाठी  www.fitindia.gov.in  ही लिंक उपलब्ध आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात दि. 02 ऑक्टोंबर, 2022 रोजी सकाळी 7.30 वाजता फिट इंडिया फ्रीडम रन" 3.0 कि.मी. धावण्याचे आयोजन हिंगोलीच्या जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावरुन जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

या उपक्रमामध्ये सर्व पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र, स्काऊट अॅन्ड गाईडस्, नेहरु युवा केंद्राचे युवक, एन.एस.एसचे छात्र, महाविद्यालयीन तसेच शालेय छात्र, खाजगी संस्था, कार्यालयातील कर्मचारी, राज्य राखीव पोलिस बल गटाचे जवान, पोलिस जवान, जिल्ह्यातील विविध खेळांच्या संघटना, योग विद्याधाम व पतंजली योग समिती, सर्व नागरिक व सर्व खेळाडू इत्यादींना व्यापक स्वरुपात सहभागी होऊन "फिट इंडिया फ्रीडम रन" 3.0 कि.मी. धावणे ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय मुंढे यांनी केले आहे.

********

No comments: