12 September, 2022

 

हिंगोली जिल्ह्यातील गोजातीय सर्व गुरे व म्हशी यांची

एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी नेण्यास मनाई

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

 

हिंगोली (जिमाका), दि. 12 :  प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 20009 (2009 चा 27) याची कलमे (6), (7), (11), (12) व (13) यांद्वारे पूर्ण महाराष्ट्र राज्य नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील गोजातीय सर्व गुरे व म्हशी यांची एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी नेण्यास मनाई केली आहे.

उक्त अधिसूचनेनुसार गोजातीय प्रजातीची लम्पी चर्म रोगाने बाधित असलेली कोणत्याही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातींच्या कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेलले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात आलेली आहे. तसेच गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशींचा कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे , प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करुन किंवा त्यांना एकत्रित करुन कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात आलेली आहे.

त्याअनुषंगाने जिल्ह्यातील नियंत्रित क्षेत्रामधील बाजारपेठेत , जत्रेत, प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या उक्त बाधित झालेल्या गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करण्यास मनाई करण्यात आलेली असल्याने जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा हिंगोली  यांनी गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशी यांच्या वाहतुकीवर, बाजार भरवण्यावर, जत्रा व प्रदर्शनावर बंदी घालण्याची विनंती केली आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशी यांच्या वाहतुकीवर, बाजार भरवण्यावर, जत्रा व प्रदर्शनावर बंदी घालण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.   

*****

No comments: