28 February, 2025
जनतेला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यासाठी सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा - मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव
हिंगोली (जिमाका), दि. 28 : जनतेला भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिले.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांनुसार जिल्ह्यात देण्यात येणाऱ्या सेवांचा आढावा आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी नुकताच ऑनलाईन बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त किरण जाधव, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, महाआयटीचे जिल्हा समन्वयक सागर भुतडा आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मुख्य आयुक्त श्री. श्रीवास्तव म्हणाले, जिल्ह्यातील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाचे काम चांगले असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना वेळेत ऑनलाईन सेवा देण्याची कार्यवाही करावी. विशेष मोहीम राबवून सर्व विभागाची कार्यालयीन तपासणी सुधारित नमुन्यात करुन उणिवांची पूर्तता करुन अहवाल सादर करावा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिनियमाची जनमाणसात प्रचार, प्रसिध्दी होण्यासाठी जिल्हा कार्यालयाच्या परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी डिजिटल बोर्ड आणि तालुका कार्यालयाच्या परिसरात सूचनाफलक लावावेत. जिल्ह्यातील सर्व विभागाच्या संकेतस्थळावरील मुख्य पृष्ठावर ठळक दिसेल, असे राज्य सेवा हक्क आयोग व सेवा हक्क कायद्याविषयी माहिती प्रदर्शित करावी. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कायद्याविषयी सूचना फलक, देण्यात येणाऱ्या सेवा, त्याचा कालावधी, अधिकाऱ्यांचे नाव व पद असलेले फलक लावावेत.
सर्व विभाग प्रमुखानी युजर आयडी व पासवर्ड तयार करुन घ्यावा. तसेच सर्व सेवा आपले सेवा पोर्टलवर समाविष्ट करण्यासाठी आपल्या वरिष्ठ कार्यालयाशी व महाआयटीच्या जिल्हा समन्वयाशी संपर्क साधून कार्यवाही करावी. दि. 28 जानेवारी, 2025 च्या शासन निर्णयातील निकषानुसार आपले सरकार सेवा केंद्राबाबत कार्यवाही करण्यात यावी. प्रत्येक तालुक्यात 20 आदर्श आपले सेवा केंद्र स्थापन करावेत. जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्राची अधिकारी नेमून तपासणी करण्यात यावी. तसेच या केंद्रावर तक्रारपेटी उपलब्ध करावी. तक्रारपेटी वेळोवेळी उघडून आलेल्या तक्रारीचे वेळीच निराकरण करावे. 90 टक्क्यापेक्षा कमी प्रकरणे विहित कालावधीत निकाली काढली नसल्यास संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करावी. विहित कालावधीत प्रकरणे निकाली निघण्यासाठी दर आठवड्याला आढावा घ्यावा, अशा सूचना केल्या.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत येणाऱ्या आपल्या विभागाच्या अधिसूचित सर्व सेवा 1 एप्रिल, 2025 पासून ऑफलाईपन पद्धतीने न देता आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने द्यावेत. या कामात हयगय होणार नाही याची दक्षता घ्यावी. याबाबत हयगय गेल्यास शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करावी. जिल्ह्यात रेल्वे स्टेशन, बसस्थानकावर लोकसेवा हक्क अधिनियमाची माहिती देणारे डिजिटल बोर्ड लावावेत. तसेच क्यूआर कोड देखील उपलब्ध करुन द्यावा. सेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी वर्धा जिल्ह्याच्या धरतीवर सेवा दूत पथदर्शी प्रकल्प राबवावा. राज्यसेवा हक्क आयोग आयुक्तांना दरमहा लोकशाही दिनी होणाऱ्या बैठकीला आमंत्रित करण्यात यावे. शक्य झाल्यास ऑनलाईन व्हीसीद्वारे आमंत्रित करावेत. आपले सरकार सेवा केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या डिजिटल प्रमाणपत्रावर महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचा लोगो आणि आपली सेवा आमचे कर्तव्य हे ब्रिदवाक्य याचा समावेश करावा, अशा सूचनाही श्री. मनुकुमार श्रीवास्तव यांनी त्यावेळी दिल्या. तसेच त्यांनी हिंगोली जिल्ह्याचे काम चांगले असल्यामुळे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.
यावेळी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी विभागातील सर्व अधिकाऱ्यांची वेळोवेळी व्हीसीद्वारे बैठका घेऊन लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करुन त्रुटीची पूर्तता करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामाची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
या ऑनलाईन बैठकीस जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
*****
महाशिवरात्रीनिमित्त औंढा नागनाथ येथे चाईल्ड हेल्पलाईनकडून जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 28 : महाशिवरात्रीनिमित्त औंढा नागनाथ येथील मंदिर परिसरात चाईल्ड हेल्पलाईन 1098 कक्षाकडून जनजागृती करण्यात आली.
यावेळी आपल्या आजूबाजूला जर बालकामगार, बालभिक्षेकरी, बाललैंगिक अत्याचार, हरवलेली बालके, सोडून दिलेली बालके, बालविवाह संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना मदत करण्यासाठी 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा चाईल्ड हेल्प लाईनच्या सनियंत्रण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केले.
संकटग्रस्त बालकांना त्वरीत मदतीसाठी भारत सरकार महिला व बाल विकास नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकरच्या अडचणीत व संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्प लाईन 1098 ही सेवा जिल्ह्यात कार्यरत आहे. चाईल्ड हेल्पलाईन 1098 संकटग्रस्त बालकांना 24x7 हेल्प लाईन सेवा उपलब्ध आहे. 1098 वर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय असते. त्यामुळे एखाद्या संकटग्रस्त बालकास मदत करण्यासाठो संपर्क करावा, अशी माहिती जिल्हा प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी दिली.
चाईल्ड हेल्पलाईनचे समुपदेशक अंकुर पाटोडे, पर्यवेक्षक विकास लोणकर, श्रीकांत वाघमारे, केस वर्कर राजरत्न पाईकराव, केस वर्कर सुरज इंगळे यांनी जिल्ह्यात काळजी व संरक्षणाची गरज संकटग्रस्त बालकांची तात्काळ मदत करण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 च्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध समस्या असणाऱ्या बालकांचे पुनर्वसन करण्याचे काम चाईल्ड हेल्पलाईन 1098 च्या माध्यमातून केले जाते. त्यामध्ये बालकाप्रती काम करणाऱ्या यंत्रणा, विविध सण उत्सव, समारंभ विविध धार्मिक स्थळ यांच्यासोबत समन्वय साधून रात्रंदिवस 24x7 जनजागृती व आउटरीचच्या माध्यमातून बालकांचे पुनर्वसन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
********
दोन नवीन शाळांच्या मान्यतेसाठी हरकती व सूचना पाठविण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यातील झेप ग्रामीण विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, तोंडापूर ता. कळमनुरी जि.हिंगोली या संस्थेमार्फत राज्य मंडळाची संलग्नता असलेली राजमाता विद्या संकुल, वारंगा फाटा ता. कळमनुरी जि.हिंगोली ही इंग्रजी माध्यमाची इयत्ता पहिली ते बारावी सर्व शाखा असलेली नवीन प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळा आणि निळकंठेश्वर बहु. सेवाभावी संस्था मोहखेड ता.जिंतूर जि. परभणी संचलित अमेय पब्लीक स्कूल प्राथमिक ते उच्च माध्यमिक शेंदूरसणा ता. औंढा नागनाथ जि. हिंगोली ही मराठी माध्यमाची इयत्ता पहिली ते बारावी सर्व शाखा असलेली प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळेला स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नव्याने मान्यतेसाठी शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रस्तावाची छाननी करुन शासनाकडून मान्यता पत्र देण्यासाठी पात्र शिफारस केली आहे.
या नवीन शाळेच्या मान्यतेसाठी हरकती व सूचना असल्यास 15 दिवसाच्या आत शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, हिंगोली यांना कळवावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी (मा.) प्रशांत दिग्रसकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
******
सिपेटच्या प्रवेश परीक्षेसाठी 29 मे पर्यंत अर्ज करा
हिंगोली (जिमाका), दि. 28 : केंद्रीय पेट्रो रसायन अभियांत्रिकी एवं प्रौद्योगिकी संस्थान (सिपेट) ही भारत सरकाच्या रसायन व व पेट्रोलियम विभाग, रसायन व खते मंत्रालयाची एक राष्ट्रीय स्वायत संस्था आहे. महाराष्ट्रातील प्लास्टीक उद्योगांना तांत्रिक सहायता पुरवणे, या उद्योगांसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ विकसित करणे तसेच संशोधन व विकास कामात सहायता करणे या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथे सिपेट केंद्राची स्थापना 2006 मध्ये करण्यात आली आहे. सिपेट संस्था आयएसओ 9001:2015 मानांकन प्राप्त असून या संस्थेमध्ये एआयसीटीई मान्यताप्राप्त तसेच एमएसबीटीई समतुल्य प्लॉस्टीक्स इंजिनियरींगचे अभ्यासक्रम चालविले जातात.
सिपेटमध्ये प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी ऑल इंडिया लेवलची सीआयपीईटी ॲडमिशन टेस्ट घेण्यात येते. गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून सिपेटच्या प्रवेश परीक्षेसाठी https://cipet25.onlineregistrationform.org/CIPET/ या संकेतस्थळावर नोंदणी सुरु झालेली आहे. ही प्रवेश परीक्षा 8 जून, 2025 रोजी घेण्याचे प्रयोजन आहे. परीक्षेसाठीचे प्रवेश अर्ज दि. 29 मे, 2025 पर्यंत सादर करता येतील. ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी दहावी, डिप्लोमा व बीएससी (शेवटच्या वर्षाची) परीक्षा दिलेली आहे, असे सर्व विद्यार्थी निकाल लागण्याची वाट न बघता प्रवेश अर्ज भरु शकतात. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिपेटचे प्रशिक्षण प्रमुख मिलींदकुमार भरणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
सिपेट छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक दर्जाचे सुसज्ज असे कॅड, कॅम, टूल रुम, प्लास्टिक प्रोसेसिंग, प्लास्टिक टेस्टींग विभाग आहेत. यामध्ये आधुनिक मशिनरीजद्वारे प्लास्टिक उद्योगांना तांत्रिक सहाय्यता दिली जाते. तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. सिपेटचे सर्व अभ्यासक्रम रोजगार व स्वयंरोजगाराच्या उद्देशाने तयार केलेले असून प्रॅक्टिकल आधारित संकल्पनेमुळे येथील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत.
सिपेट छत्रपती संभाजीनगर येथे दहावीच्या विद्यार्थ्यासाठी डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलाजी डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी हे तीन वर्षाचे कोर्स चालविले जातात. तर बीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट गॅज्यूएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग ॲन्ड टेस्टींग हा दोन वर्षाचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. त्या विद्यार्थ्यांनी इंजिनियरींगमध्ये डिप्लोमा केला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन हा 18 महिन्याचा कोर्स करता येतो.
अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 0240-2478322 व 9373687915, 9325687902 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सिपेटचे प्रशिक्षण प्रमुख मिलींदकुमार भरणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
******
वसमत येथे रोजगार मेळाव्यात 129 उमेदवारांची प्राथमिक निवड
हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर हिंगोली व स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमत येथे "पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा व पदवी तसेच पदवीधारक या पात्रतेच्या 293 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 129 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील विविध नामांकीत कंपनीचे उद्योजक उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील विविध महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते.
या मेळाव्यात मार्गदर्शन करताना वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी उपस्थित युवक-युवतींना प्रत्यक्ष संवाद साधून शासनाच्या विविध योजनाचा लाभ घ्यावा, असे सांगितले. प्राचार्य एस.एल. कोंडावार यांनी उमेदवारांनी स्वत:चे गाव सोडून मिळेल तिथे काम करावे, असे सांगितले. सहायक आयुक्त डॉ. रा.प्र.कोल्हे यांनी रोजगार मेळाव्याचा हेतू विशद करताना म्हणाले, युवकांनी मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून रोजगार प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, सुशिक्षित बेरोजगार उमेदवारासाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण याची माहिती देत करिअर कसे निवडावे याच्या मार्गदर्शनासाठी मॉडेल करिअर सेंटरची स्थापना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयात करण्यात आली असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. एम. येमेवार यांनी केले तर नवनाथ टोनपे यांनी आभार मानले. या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हिंगोली या कार्यालयाचे नवनाथ टोनपे, रा.द.कदम, ना. ज. निरदुडे, र. ला. जाधव आणि स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
******
27 February, 2025
चाईल्ड हेल्प लाईनकडून शाळेत जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 27 : येथील पेन्शनपुरा भागातील डॉ. इक्बाल उर्दू शाळा व बावनखोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चाईल्ड हेल्प लाईनकडून जनजागृती करण्यात आली.
यावेळी चाईल्ड हेल्पलाईन 1098 कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकाशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये बाल विवाह म्हणजे काय, विवाहाचे योग्य वय, बाल विवाह होण्याची कारणे, बाल विवाहाचे दुष्परिणाम याची माहिती दिली. बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार बाल विवाह केल्यास अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहेत. या सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाही याबाबत योग्यती खबरदारी घ्यावी तसेच मुलीच्या वयाची 18 वर्ष व मुलाच्या वयाची 21 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी बालकांना चांगला व वाईट स्पर्शाबाबत माहिती देण्यात आली. चाईल्ड हेल्प लाईन 1098 ही बालकांसाठी तात्काळ मदत करणारी हेल्पलाईन आहे. 1098 या टोल फ्री क्रमांकावर मिळालेली माहिती गोपनीय असते. बालकाला मदतीची गरज भासल्यास त्यांनी 1098 या टोल फ्री क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. पठाण, श्रीमती गायकवाड, शिक्षिका श्रीमती लांडगे तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.
******
अन्न व्यावसायिकांना अन्न परवाना, नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक
हिंगोली (जिमाका), दि. 27 : अन्न व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 31 अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र न घेता व्यवसाय करणे कायद्याच्या कलम 63 अन्वये दंडनीय गुन्हा आहे.त्यामुळे सर्वांनी नोंदणी व अन्न परवाना प्रमाणपत्र काढून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 मध्ये अन्न व्यावसायिकाची व्याख्या स्पष्ट केली आहे. अन्न पदार्थाचा व्यवसाय करणारे स्टॉलधारक व फिरते विक्रेते जरी पाणीपुरी, भेलपुरी, पावभाजी विक्रेते, आईसक्रीम, बर्फ गोळा, ज्यूस, शरबत विक्रेते, भाजीपाला व फळ विक्रेते, किरकोळ किराणा, डेली नीड्स, बेकरी, घाऊक विक्री करणारे वितरक व वाहतूकदार, गृहउद्योग ते अन्न पदार्थाचे उत्पादक, तसेच उपहारगृह, हॉटेल, खानावळ, चहा विक्रेते, दूध विक्रेते त्याचबरोबर स्वस्तधान्य दुकानदार, कॅटरर्स, शालेय पोषण आहार पुरवठादार, बचत गट, शासकीय, अशासकीय कार्यालयातील कॅंटीन, वसतिगृहातील खानावळ, धार्मिक ठिकाणी वितरित होणारा प्रसाद, मेळावे व प्रदर्शनामधील अन्न पदार्थाचे स्टॉलधारक इत्यादी सर्व अन्न व्यावसायिक या वर्गवारीच्या कक्षेत येतात.
हिंगोली जिल्ह्यामध्ये आज रोजी 584 परवाना व 3 हजसा 445 नोंदणी प्रमाणपत्र असे एकूण 4 हजार 29 सक्रीय परवाना व नोंदणी धारक अन्न व्यावसायिक आहेत. काही अन्न व्यावसायिकांनी मुदतीपूर्व परवान्याचे नूतनीकरण केले नसल्याने अनेक परवाना धारक सक्रीय नसल्याचेही आढळून आलेले आहेत.
परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी foscos.fssai.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाइन पद्धतीने आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
सर्व अन्न व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायासाठी त्वरित ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. परवाना व प्रमाणपत्राची मुदत संपली असल्यास नूतनीकरण करण्यात यावे. सक्रीय परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र न घेता व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्यात येईल, याची सर्व अन्न व्यावसायिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, हिंगोली यांनी केले आहे.
*****
भारतरत्न नानाजी देशमुख पुण्यतिथी आणि भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात
हिंगोली (जिमाका), दि. 27 : हिंगोलीचे भूमिपुत्र भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या १५ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम तसेच क्रिस्प संचालित भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राच्या वर्षपूर्ती सोहळ्याचे भव्य आयोजन शिवाजी सभागृह, हिंगोली येथे करण्यात आले.
कार्यक्रमास हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, क्रिस्पचे एमडी व चेअरमन डॉ. श्रीकांत पाटील, संजय कौडगे, माजी आमदार गजानन घुगे, तसेच फुलाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जीवनावर आधारित विशेष चित्रफीत आणि क्रिस्पच्या कार्यप्रवासावरील व्हिडिओ प्रस्तुतीकरणाने करण्यात आली. यानंतर फुलाजी शिंदे यांनी नानाजींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला, तर गजानन घुगे यांनी नानाजींच्या सामाजिक कार्याचा विस्तृत आढावा घेतला.
संजय कौडगे यांनी क्रिस्प आणि डॉ. श्रीकांत पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कौशल्य विकास उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
क्रिस्पचे व्यवस्थापकीय संचालित डॉ. श्रीकांत पाटील यांनी नानाजी देशमुख यांच्या कार्यातून मिळालेल्या प्रेरणेचा उल्लेख करत, हिंगोलीतील युवकांसाठी क्रिस्पच्या माध्यमातून आगामी काळात हजारो विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा संकल्प व्यक्त केला.
हिंगोलीतील हजारहून अधिक प्रशिक्षणार्थींमध्ये निवडक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि कौशल्य विकास किटचे वाटप करण्यात आले.
हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी क्रिस्प आणि डॉ. श्रीकांत पाटील यांच्या कार्याची प्रशंसा करत, हिंगोलीसारख्या शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य विकास केंद्र असणे अभिमानास्पद आहे असे नमूद केले. तसेच, भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास व उद्योजकता केंद्रासोबत प्रशासनाचे सहकार्य राहील आणि भविष्यात विविध प्रकल्पांवर एकत्रित काम करण्याचा मानस आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन पुष्यमित्र जोशी यांनी, तर आभार प्रदर्शन संचालक अमोल वैद्य यांनी केले.
********
स्थानिक तक्रार निवारण समिती सदस्य पदासाठी 10 मार्चपर्यंत अर्ज करा
हिंगोली (जिमाका), दि. 27 : विशाखा जजमेंटमधील तरतुदीनुसार कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध,मनाई व निवारण) अधिनियम 2013 व नियम दि. 9 डिसेंबर, 2013 रोजी प्रसिध्द करण्यात आले आहेत. या अधिनियमातील कलम 6(1) नुसार जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार समिती गठीत करण्याची तरतूद आहे. या अधिनियमानुसार स्थानिक तक्रार समिती गठीत करण्याचे पूर्ण अधिकार प्रत्येक जिल्ह्याचे नियुक्त जिल्हा अधिकारी या नात्याने उपजिल्हाधिकारी यांना आहेत.
या जिल्हा स्तरावरील स्थानिक तक्रार समितीची रचना - अध्यक्ष - सामाजिक कार्याचा 5 वर्षाचा अनुभव व महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात येते. जिल्ह्यातील गट, तालुका, तहसील, प्रभाग, नगरपालिका या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या महिलामधून एका सदस्याची निवड करण्यात येते. महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या अशासकीय संघटना, संघ किंवा लैंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचित असलेली व्यक्ती यांमधून दोन सदस्यांची निवड करण्यात येते. यापैकी किमान एक सदस्य महिला असावी. परंतु त्यापैकी किमान एका सदस्यांची पार्श्वभूमी प्राधान्याने कायद्याची असावी. तसेच त्यापैकी किमान एक सदस्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्ग किंवा अल्पसंख्यांक समाजातील महिला असावी. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हे या समितीचे पदसिध्द सदस्य सचिव असतील.
स्थानिक तक्रार समितीमधील अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीचा कालावधी तीन वर्षापेक्षा अधिक नसेल. स्थानिक तक्रार समितीचे अध्यक्ष किंवा कोणतेही सदस्य हे या अधिनियमाच्या कलम 16 मधील तरतुदीचे उल्लंघन करीत असतील किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये त्यांच्याविरुद्ध अपराधाची चौकशी प्रलंबित असेल किंवा ते कोणत्याही शिस्तभंगाच्या कारवाईमध्ये दोषी असल्याचे आढळून आले असतील किंवा त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही प्रलंबित असेल, किंवा अशा रितीने त्याने पदावर राहून सार्वजनिक हितास बाधा पोहोचवून त्याच्या पदाचा दुरुपयोग केला असेल. अशा अध्यक्ष किंवा सदस्य यांना पदावरुन दूर करण्यात येईल आणि अशा रितीने रिक्त झालेले पद किंवा कोणत्याही नैमित्तिक कारणाने रिक्त झालेले पद या अधिनियमातील तरतूदीनुसार जिल्हा अधिकारी नव्याने नामनिर्देशन भरतील.
ही समिती गठीत करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांच्याकडून जिल्ह्यातील पात्र व इच्छूक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यांनी स्थानिक तक्रार समितीमध्ये काम करण्यास तयार असल्याबाबतचे संमतीपत्र देणे आवश्यक आहे. महिला व बालविकास विभागाला दि. 10 मार्च, 2025 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्रस्तावांमधून नामनिर्देशनाने जिल्हा अधिकारी या नात्याने उपजिल्हाधिकारी, हिंगोली हे अध्यक्ष व सदस्यांची निवड करतील.
अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस -7, हिंगोली 431513 येथे संपर्क करावा, असे आवाहन राजाभाऊ मगर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*******
स्वाधार योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी त्रुटी पूर्तता करावी
हिंगोली (जिमाका), दि. 27 : शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या, शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी 11 वी, 12 वी तसेच 12 नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील मुलां-मुलीप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून या योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर दिनांक 15 जानेवारी, 2025 पर्यंत स्वीकारण्यात आले होते. या अर्जाची छाननी केली असता अनेक अर्जामध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्रुटीचे अर्ज त्रुटी पुर्ततेसाठी विद्यार्थी लॉगीनला रिव्हर्ट/ सेंड बॅक करण्यात आलेले आहेत. विद्यार्थी लॉगीनला दिसत असलेल्या त्रुटी पूर्ण करून विद्यार्थ्यांने आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने तात्काळ परत सबमीट करावे, असे आवाहन यादव गायकवाड, सहायक आयुक्त, समाजकल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
******
जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा सुधारित हिंगोली दौरा
हिंगोली (जिमाका), दि. 27: जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी हे हिंगोली दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या सुधारित दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. 28 फेब्रुवारी, 2025 रोजी परभणी येथून वाहनाने निघून रात्री 10 वाजता हिंगोली येथे आगमन व मुक्काम .
शनिवार, दि. 1 मार्च, 2025 रोजी सकाळी 7 वाजता हिंगोली येथील पुसेगाव, सेनगाव, राम गल्ली, जिजामातानगर येथील जैन मंदिरास सदिच्छा भेट. 10.30 वाजता ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑप बँक यांच्या तिरुपतीनगर येथील नवीन इमारत उद्घाटन समारोहास उपस्थिती व मार्गदर्शन . दुपारी 1.30 वाजता हिंगोली जिल्हधिकारी यांच्यासोबत बैठक व व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा, 2.30 वाजता जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन, 4 वाजता वाशिमकडे प्रयाण.
******
26 February, 2025
आरोग्य क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट मानांकन प्राप्त हिंगोली जिल्हा
*हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव आरोग्य संस्थेला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन पुरस्कार*
*- जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन*
हिंगोली: दि.२६, (जिमाका) वसमत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गिरगावने राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रम अंतर्गत दिल्लीस्थित केंद्रीय आरोग्य संस्था 'राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था संसाधन केंद्रा'च्या निर्धारित निर्देशांक पूर्ततेचे विशेष परीक्षण केंद्रीय गठीत समितीमार्फत करण्यात आले. हे केंद्रीय परीक्षण २४ व २५ जानेवारी रोजी झाले. या परीक्षणामध्ये राजस्थानचे केंद्रीय परीक्षक डॉ. किरण नागपाल अणि मध्यप्रदेश येथील केंद्रीय परीक्षक श्रीमती अकीला अन्सारी यांनी मुद्देनिहाय परीक्षण करून केंद्रीय समितीस अहवाल सादर केला. या अहवालानुसार गिरगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने छत्रपती संभाजीनगर विभागातून क्रमांक पटकावला. गिरगावने विभागातून ९५ टक्के गुण प्राप्त करून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन केंद्रीय महत्त्वाकांक्षी पुरस्कार प्राप्त केला. छत्रपती संभाजीनगर विभागातून प्रथम व महाराष्ट्रातून सर्वाधिक गुणांकन व मानांकनाचा बहुमान प्राप्त करणारी गिरगाव ही एकमेव आरोग्य संस्था ठरली आहे. त्याबद्दल राज्यस्तरावरून गिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
आरोग्य क्षेत्रातील हे उच्चस्तरीय मानांकन प्राप्त झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे. याचे खरे श्रेय गिरगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक कदम, डॉ. वैजनाथ सूर्यवंशी व संपूर्ण कर्मचारी चमूच्या अथक परिश्रमाचे फलित असल्याचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रशांत पुठावार यांच्या परिश्रमाचे यश आहे.
हे उच्चस्तरीय मानांकन प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे वेळोवेळी प्रेरणादायी मार्गदर्शन, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गोपाल कदम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे, डॉ. सतीश रुणवाल, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. गजानन चव्हाण, डॉ. डी. व्ही सावंत, डॉ. प्रकाश जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश्वर कत्रुवार, डॉ. विनोद आतुरकर, डॉ. ताटेवाड, डॉ. जाधव यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.
*******
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या "अनादी मी अनंत मी... " गीताला पहिला "छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत" पुरस्कार फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरातून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा
मुंबई, दि. २५ : कवी मनाचे महान योध्दे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने यावर्षीपासून दिला जाणार पहिला "राज्य प्रेरणा गीत पुरस्कार" स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या "अनादी मी अनंत मी.. " या गीताला देण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस समुद्र किनाऱ्यावरुन केली.
ज्या पध्दतीने महाराष्ट्रभूषण आणि अन्य सन्मानाचे पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतात त्याच पद्धतीने दरवर्षी एका प्रेरणा गीताला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे "छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत" पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 2 लाख रुपये रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.
छत्रपती संभाजी महाराज हे एक उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचे उत्तम जाणकार होते. त्यांनी संस्कृत भाषेत 'बुधभुषण' हा ग्रंथ लिहिला होता. तर 'नायिकाभेद', 'नखशीख' आणि 'सातसतक' हे ब्रज भाषेत ग्रंथ लिहिले होते. त्यामुळेच त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्र शासन यावर्षी पासून एका प्रेरणा गीताचा सन्मान करणार आहे.
जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास एक मोठा संघर्ष असतो. या संघर्षात संकटसमयी मनाला उभारी देण्याचे काम काव्य पंक्ती करतात, जगण्याला प्रेरणा देतात. म्हणून अशा प्रेरणा गीतांचा सन्मान व्हावा तोही आपल्या स्वराज्यासाठी अफाट संघर्ष करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे व्हावा अशी यामागची कल्पना असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
सावरकर पॅरिसहून लंडनला रेल्वेने आल्यावर ब्रिटिश सरकारने अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप करून खटला भरला. त्यांच्यावरचा खटला इंग्लंडमध्ये न चालवता हिंदुस्थानात चालवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सावरकरांना लंडनहून मोरिया बोटीने हिंदुस्थानात नेण्यात आले. ती बोट मार्सेलिसच्या बंदरात आल्यावर सावरकरांनी ८ जुलै १९१० या दिवशी ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करून घेऊन आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा आपला लढा चालूच ठेवण्यासाठी त्यांनी समुद्रात उडी मारली. सावरकर ६० यार्ड एवढे अंतर पोहून गेले आणि त्यांनी मार्सेलिसचा किनारा गाठला. पण दुर्दैवाने ते पकडले गेले. त्यानंतर आपल्याला इंग्रजाकडून आपला अमानुष छळ होणार हे त्यांच्या लक्षात आलेच होते. त्यावेळी देशासाठी संघर्ष करण्याचे आत्मबळ पुन्हा वाढवण्यासाठी ज्या काव्य पंक्ती त्यांना स्फुरल्या त्या म्हणजे "अनादी मी ... अनंत मी.. हे गीत होय."
हे गीत म्हणजे सावरकरांचे अत्यंत भेदक, प्रेरणा, उर्जा देणारे हे शब्द व ओतप्रोत देशप्रेम याला वंदन करीत हा पुरस्कार जाहीर करीत असल्याचे ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले. लवकरच समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे सांगितले.
पुरस्कारासाठी समिती
या पुरस्कारासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून सांस्कृतिक कार्य विभागाच्या अपर मुख्य सचिवांसह सांस्कृतिक संचनालयाचे संचालक, गोरेगाव चित्रनगरी व्यवस्थापकीय संचालक, उपसचिव सांस्कृतिक कार्य, पु. ल देशपांडे कला अकादमी संचालक, दर्शनिका विभाग संपादक या समितीचे सदस्य आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार हे फ्रान्स दौऱ्यावर असून, याबाबतची ऑनलाईन बैठक घेऊन यावर्षीचे प्रेरणा गीत म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या गीताची निवड एकमताने करण्यात आली असल्याचे सांगितले. या बैठकीला अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक संचालक विभिषण चवरे, चित्रनगरीच्या संचालक स्वाती म्हसे पाटील, पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या संचालक मिनल जोगळेकर आणि डॉ. बलसेकर आदी सदस्य उपस्थित होते. हा पुरस्कार कवींना देण्यात येणार असून कवी जर हयात नसतील तर त्यांच्या नातेवाईक अथवा त्यांचा वारसा सांगणाऱ्या संस्थांना प्रदान करण्यात येणार आहे.
0000
25 February, 2025
जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा हिंगोली दौरा
हिंगोली (जिमाका), दि. 25: जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी हे हिंगोली दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. 28 फेब्रुवारी, 2025 रोजी परभणी येथून वाहनाने निघून रात्री 10 वाजता हिंगोली येथे आगमन व मुक्काम .
शनिवार, दि. 1 मार्च, 2025 रोजी सकाळी 7 वाजता हिंगोली येथील पुसेगाव, सेनगाव, राम गल्ली, जिजामातानगर येथील जैन मंदिरास सदिच्छा भेट. 10.30 वाजता ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑप बँक यांच्या तिरुपतीनगर येथील नवीन इमारत उद्घाटन समारोहास उपस्थिती व मार्गदर्शन . दुपारी 1.30 वाजता हिंगोली जिल्हधिकारी यांच्यासोबत बैठक, 2.30 वाजता जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन, 3.30 वाजता कळमनुरी जि. हिंगोली येथे सकल जैन समाजातर्फे सन्मान समारोह कार्यक्रमास उपस्थिती व नंतर वाशिमकडे प्रयाण.
**
आज महाशिवरात्री ! भगर सेवन करताना काळजी घ्या !!
भगरीमुळे विषबाधेची शक्यता अधिक ; काळजी घेण्याचा इशारा
हिंगोली (जिमाका), दि. 25: उद्या महाशिवरात्रीचा उपवास. घराघरात व भंडाऱ्यामध्ये भगरीचा महाप्रसाद केला जातो. मात्र भगरीमुळे अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता अधिक असल्याने नागरिकांनी सावध राहावे, भगरीचे सेवन टाळावे, काळजी घ्यावी, असा इशारा आरोग्य प्रशासनाने दिला आहे.
गेल्या वर्षी भगर खाल्ल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विषबाधा झाली होती. दोन हजारावर लोकांना भगरीच्या विष बाधेने संकटात आणले होते. त्यामुळे उद्या महाशिवरात्रीला भगवान शंकराचे पूजन करताना उपवासासाठी अन्य पदार्थ वापरावे. भगर खाणे उपवासासाठी टाळावे,अशी सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे.
या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक आवाहन जनतेला केले आहे. गेल्यावर्षी लोहा व अर्धापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विषबाध्येच्या घटना भगरी मुळे झाल्या होत्या.
भगरीमध्ये मोठ्या प्रमाणात अस्परलिस जातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युनिगाक्लेविन यासारखी विष द्रव्य (टॉक्सिन ) तयार होतात.ऑक्टोबर महिन्यातील तापमान आणि आद्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. त्यामुळे भगर खाताना काळजी घ्या, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
भगर खाणे टाळणे शक्य नसेल तर काळजी घ्यावी अशी सूचना करण्यात आली आहे. सुटी भगर दुकानातून घेऊ नका, भगर घरी आणली असेल तर कोरड्या ठिकाणी झाकण बंद डब्यात ठेवा. वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही याची काळजी घ्या. शक्यतो भगरीचे पीठ विकतच आणू नका. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे या पिठाला बुरशीची लागन होते. भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिन युक्त पदार्थ आहेत. दोन ते तीन दिवस सलग उपवास असताना या पदार्थांचे सेवन ऍसिडिटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी मळमळ व पोटाचे त्रास होतात. या पदार्थाचे सेवन पचन शक्तीनुसार मर्यादितच करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
विक्रेतांनाही कडक सूचना...
विक्रेत्यांनी पॅक बंद भगरचीच विक्री करावी भगर करीत खरेदी करताना घाऊक विक्रेत्यांकडून पावती घ्यावी भगरीचे पॅकेट पोत्यावर उत्पादकांचा पत्ता परवाना क्रमांक पॅकिंग दिनांक अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्यावी मुदतबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करू नये अशा पद्धतीची नियमबाह्य विक्री करणारे आढळल्यास त्यांच्यावर अन्नसुरक्षा का व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
******
24 February, 2025
स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आज भरती मेळावा
हिंगोली (जिमाका), दि. 24 : स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसमतनगर व कौशल्य विकास, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसमतनगर येथे उद्या मंगळवार (दि. 25) रोजी वसमत, हिंगोली व परिसरातील बारावी, पदवी, आयटीआय, डिप्लोमा उत्तीर्ण तसेच अनुभवी उमेदवारांसाठी नोकरी इच्छुक, गरजू, सुशिक्षित बेरोजगारासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तसेच या भरती मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांना व उद्योगांच्या आस्थापनांना बोलावण्यात आलेले आहे. या मेळाव्यामध्ये उपस्थित उमेदवारांची मुलाखत घेऊन आवश्यकतेनुसार व पात्रतेनुसार निवड करण्यात येणार आहे.
नोकरी इच्छुक, गरजू, सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या भरती मेळाव्यामध्ये उपस्थित राहून रोजगाराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. एल. कोंडावार यांनी केले आहे.
********
प्रधानमंत्री यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण
हिंगोली (जिमाका), दि. 24 : भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, संत नामदेव सेवाभावी संस्था, हिंगोली संचलित कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर येथे प्रधानमंत्री यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण कार्यक्रम ऑनलाईन प्रणालीद्वारे संपन्न झाला.
या किसान सन्मान कार्यक्रमास प्रधानमंत्री यांनी भागलपूर बिहार येथून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता वितरण करून सर्वांना संबोधित केले. या कार्यक्रमास हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी शेतकऱ्यांनी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन करावे व सध्या सुरु असलेल्या ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आपले ओळखपत्र तयार करून घ्यावे. शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे विशेष लक्ष देऊन फळबाग लागवडीचे नियोजन करावे. प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेमध्ये नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच हिंगोली जिल्ह्यातील सर्व पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी पीएम किसान योजनेचा कार्यक्रम विविध भाषेमध्ये प्रसारित होत असून सर्व शेतक-यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व कृषि विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनामधील सर्व स्टॉलला भेट द्यावी, असे आवाहन केले.
संत नामदेव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव माने यांनी पी.एम. किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांनी आर्थिक मदत होऊन हा निधी शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी उपयुक्त होत आहे. सद्यस्थितीत भारत देश हा डिजिटल युगाकडे वळत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नाविन्य पूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन केले.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी ॲग्रीस्टॅकवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करून शेतकरी ओळख पत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन केले व कृषि विज्ञान केंद्राचे सर्व स्टॉलमध्ये शेतकऱ्यांनसाठी उपयुक्त माहितीचे प्रदर्शन लावण्यात आले आहेत याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमामध्ये प्रगतशील शेतकरी गोरखनाथ हाडोले, आनंदराव साळुंखे, प्रभाकर मगर, बेलअप्पा नरडेले, गंगाधर राऊत, प्रल्हाद देवकते, आबासाहेब कदम, अशोकराव कदम, अमोल बोबडे, सौ. वंदना थोरात, केरबा मस्के यांचा मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये कृषि विज्ञान केंद्राची उद्दीष्ट आणि कार्यपद्धती घडीपत्रिकेचे विमोचन सुद्धा करण्यात आले.
या कार्यक्रमास तोंडापूर कृषी तंत्र विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माधुरी कटकर, तोंडापूर शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कदम, कळमनुरीचे तालुका कृषि अधिकारी एम. वी. कुंभार, कळमनुरीचे मंडळ कृषि अधिकारी नितीन घुगे, आखाडा बाळापूरचे मंडळ कृषि अधिकारी एस .एस. निंबाळकर उपस्थित होते.
या कार्यक्रमा अंतर्गत कृषि विज्ञान केंद्राचे विविध विभाग कृषि विद्या, उद्यान विद्या, पिक संरक्षण, गृह विज्ञान, कृषि विस्तार, मृदा विज्ञान, पशु विज्ञान विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच विविध बचत गट, गांडूळ खत निर्मिती व कृषि महाविद्यालय तोंडापूरचे स्टॉल सुद्धा लावण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय ठाकरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनिल ओळंबे यांनी केले. या कार्यक्रमास हिंगोली जिल्ह्यातील सरपंच, अनेक गावातील शेतकरी, महिला शेतकरी, बचत गट प्रतिनिधी, कृषि सखी, ग्रामीण युवक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 24 : एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प हिंगोली या कार्यालयांतर्गत अंणगवाडी मदतनीस पदाच्या रिक्त असलेल्या हिंगोली नगरपालिका क्षेत्रातील 2, वसमत नगरपालिका क्षेत्रातील 1, औंढा नगर पंचायत क्षेत्रातील 2 आणि सेनगाव नगर पंचायत क्षेत्रातील 3 अंगणवाडी मतदनीसांची रिक्त पदे मानधन तत्वावर सरळ नियुक्तीने भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. यासाठी उद्या दि. 25 फेब्रुवारी ते 11 मार्च, 2025 या कालावधीमध्ये अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
याबाबतच्या सविस्तर सूचना बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी प्रकल्प) हिंगोली यांचे कार्यालय, श्रीप्रभा, बांगर नगर, हिंगोली-431513 येथील सूचना फलकावर व संबंधित नगरपालिका, नगर पंचायत येथील सूचना फलकावर लावण्यात आल्या आहेत, अशी माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
***
माहे फेब्रुवारीच्या वेतन देयकासोबत जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे दुसरे प्रमाणपत्र जोडण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 24 : शासनाने कर्मचारी सर्वकष माहितीकोष-2024 अद्यावत करण्याचे निर्देश दिले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी ऑनलाईन आज्ञावलीमध्ये त्यांच्या कार्यालयाची माहिती अद्यावत केली आहे. त्यानंतर शासन परिपत्रान्वये नमूद वेळापत्रकानुसार दि. 3 डिसेंबर, 2024 ते 28 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत ऑनलाईन आज्ञावलीमध्ये अद्यावत केलेल्या माहितीमधील त्रुटींचे निराकरण करुन माहिती बरोबर असल्याबाबतचे प्रमाणपत्र-2 जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून प्राप्त करुन घ्यावे.
ऑनलाईन आज्ञावलीमध्ये इनव्हॅलीट डाटा या टॅबमध्ये रिमार्कच्या स्तंभात दर्शविलेली त्रुटी दुरुस्त केल्यानंतर ऑनलाईन आज्ञावलीत होम पेजवर उपलब्ध असलेल्या डीडीओ डिक्लेरेशनची प्रत आहरण व संवितरण अधिकारी यांचे नाव, सही व शिक्क्यासहीत जिल्हा सांख्यिकी कार्यालयास सादर करावे.
ऑनलाईन आज्ञावलीत आलेल्या त्रुटीची दुरुस्ती करण्यात अडचण येत असल्यास किंवा माहिती बरोबर असल्यास तसे जिल्हा सांख्यिकी कार्यालयास लेखी स्वरुपात कळवावे. जेणेकरुन त्रुटींची दुरुस्ती करण्यास सोपे होईल.
जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करुन माहे फेब्रुवारी, 2025 (पेड इन मार्च, 2025) च्या वेतन देयकासोबत जोडण्यात यावे अन्यथा माहे फेब्रुवारी, 2025 ची वेतन देयके कोषागार कार्यालयाद्वारे स्वीकारण्यात येणार नाहीत याची सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, हिंगोली व जिल्हा कोषागार अधिकारी , हिंगोली यांनी केले आहे.
****
थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 24 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या हिंगोली जिल्हा कार्यालयासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजना राबविली जाणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील मांग, मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील तसेच मातंग समाजातील राज्यस्तरावरील क्रीडा पुरस्कार प्राप्त महिला व पुरुष तसेच सैन्यदलातील विरगती प्राप्त वारसाच्या एका सदस्यास प्राधान्याने लाभ देण्यासाठी थेट कर्ज योजनेचे प्रस्ताव इच्छूक अर्जदाराकडून मागविण्यात येत आहेत.
वरील योजनेचे कर्ज अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन रिसाला बाजार, सरकारी दवाखान्याजवळ, हिंगोली येथे दि. 5 मार्च, 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज देण्यात व स्वीकारण्यात येईल. तसेच दि. 5 मार्च, 2025 नंतर अर्ज स्वीकारणे बंद करण्यात येईल.
त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील मांग, मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील इच्छूक अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असावे व 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. शहरी व ग्रामीण अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन या योजनेत साधारणपणे समाविष्ट लघु व्यवसाय उदा. मोबाईल सर्व्हिसींग-रिपेरींग, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेअरींग (फ्रीज, एसी, टीव्ही, मायक्रोवेव्ह, लॅपटॉप, कॉम्प्यूटर), हार्डवेअर, ब्युटीपार्लर, ड्रेस डिजायनींग, टेलरींग, फूड प्रॉडक्ट प्रोसेसिंग, किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, मेडिकल स्टोअर्स, फॅब्रीकेशन, वेल्डींग, हार्डवेअर व सेनटरी शॉप, प्रिंटींग, शिवणकला, झेरॉक्स, लॅमिनेशन, हॉटेल, कॅटरींग, सर्विसेस, मंडप डेकोरेशन, क्रीडा साहित्य, स्पोर्ट शॉप, ज्यूस सेंटर, क्लॉथ/रेडिमेड गारमेंट शॉप, मोटार मेकॅनीक/रिपेअर, शेतीशी निगडीत पूरक जोड व्यवसाय इत्यादी व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत स्वत: अर्जदाराने मूळ कागदपत्रासह उपस्थित राहून दाखल करावेत. त्रयस्थ/मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाहीत.
या कर्ज प्रकरणासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्डची झेरॉक्स, आधार कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स, तीन पासपोर्ट फोटो, व्यवसायाचे दरपत्रक (कोटेशन), व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या ठिकाणची भाडे पावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नं. आठ, लाईट बील व टॅक्स पावती), ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगर पालिका यांचे प्रमाणपत्र किंवा शॉप ॲक्ट परवाना, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, शैक्षणिक दाखला, अनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतलेले प्रमाणपत्र, अर्जदाराचे सीबील क्रेडीट स्कोअर 500 असावा, अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा, प्रकल्प अहवाल, प्रकरणासोबतची सर्व कागदपत्रे स्वत:च्या स्वाक्षरीने साक्षांकित करावी. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल.
या थेट कर्ज योजनेसाठी हिंगोली जिल्ह्यासाठी भौतिक उद्दिष्ट 30 आहे. तर आर्थिक उद्दिष्ट 30 लाख रुपये आहे. त्यामुळे उद्दिष्टापेक्षा जास्तीची प्रकरणे प्राप्त झाल्यास दि. 14 नोव्हेंबर, 2022 च्या शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांची निवड लॉटरी पध्दतीने केली जाईल. त्यानंतर थेट कर्ज योजनेअंतर्गत पात्र लाभार्थीचे कर्ज प्रकरण जिल्हा निवड समितीच्या मान्यतेने प्रादेशिक कार्यालयास मंजुरीसाठी शिफारस करण्यात येईल, असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
******
22 February, 2025
विशेष लेख - संत नामदेव - संत चोखोबा याचे गुरुशिष्य नातेसंबंध
'नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी' हे सामाजिक प्रबोधनाचे ध्येय असणाऱ्या संत महर्षि नामदेव महाराजांचे जन्मगाव नर्सी हे आहे. हे गाव मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात आहे. हिंगोलीपासून पश्चिमेला चौदा कि.मी. अंतरावर असलेल्या या गावाला संत नामदेवांच्या जन्मस्थळामुळे नर्सी नामदेव असे म्हटले जाते. या गावात संत नामदेव महाराजांचे मोठे मंदिर आहे. आणि त्या मंदिर परिसरात संत नामदेवांचेच भव्य स्मारक प्रस्तावित आहे.
या मंदिराजवळच संत नामदेवांचे पट्टशिष्य व सहकारी संत चोखामेळा यांची जीर्ण अवस्थेतील समाधी आहे. खुद्द संत नामदेवांनीच पंढरपूरच्या समाधीनंतर या गावी चोखोबांची दुसरी समाधी बांधली होती.
संत नामदेवांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 साली झाला. तर त्यांचा मृत्यू 3 जुलै 1350 साली झाला. आणि संत चोखामेळा यांचे जन्म साल अज्ञात असून त्यांचा मृत्यू 1338 साली झाल्याची नोंद आहे. संत चोखोबाच्या मृत्यूनंतर संत नामदेव बारा वर्षे जिवित होते. संत चोखामेळा हे संत नामदेवांचे शिष्य व विश्वासू सहकारी होते. नामदेवांच्या संतमेळ्यातील एक महत्त्वाचे संत कवी होते. तत्कालीन सर्व जाती-धर्मातील संतांचा योग्य समन्वय राखण्याचे संत नामदेवांचे कौशल्य चोखोबांनी आत्मसात केले होते. त्या विभिन्न संतांचा योग्य मेळ घालणारे चोखोबा म्हणूनच चोखामेळा या नावाने ओळखले जातात. ते मेहूण ता. देऊळगाव राजा जि. बुलडाणा इथले रहिवासी होते. म्हणजेच मेहूण हे चोखोबांचे जन्मगाव आहे.
संत नामदेव विठ्ठलभक्त होते. ते आपल्या नर्सी गावावरुन परिवारासह पंढरपुरात राहायला गेले होते. पंढरपूरची नियमित वारी करणारे चोखोबा संत नामदेवांच्या संपर्कात आले. नामदेवांचा त्यांच्यावर चांगला प्रभाव पडला. संत नामदेवांचा प्रभाव व विठ्ठल भक्तीचे आकर्षण यामुळे चोखोबा सुध्दा आपले मूळ गाव सोडून पंढरपूरच्या आसपास असलेल्या मंगळवेढा या गावी परिवारासह राहायला आले. 80 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या नामदेवांनी आपल्या आयुष्याची वीस वर्षे पंजाब राज्यात खर्ची घातली. भरपूर ग्रंथरचना करणाऱ्या नामदेवांनी 2500 मराठी अभंग, 125 शौरसेनी भाषेतील अभंग तर 62 पंजाबी गुरुमुखी लिपीतील अभंग इतके काव्य लेखन केले. तर चोखोबा व परिवाराने एकूण 300 अभंगांचे लेखन केलेले आहे.
संत नामदेव हे संत, कवी, कुशल संघटक व उत्तम कीर्तनकार होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती-जमातीमधील स्त्री-पुरुषांना एकत्र करुन त्यांच्यात समतेची भावना जागवली.
'नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी' ही त्यांची प्रतिज्ञा होती. नामदेव महाराजांची ही प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी संत चोखोबा जीवनभर झटले. म्हणूनच चोखोबांविषयी नामदेवांना फार लळा व जिव्हाळा होता. संत नामदेवांच्या सामाजिक परिवर्तनाचे ध्येय चोखोबा ओळखून होते. म्हणूनच संत नामदेव महाराजांनी निर्माण केलेल्या भक्ती यात्रेत चोखोबाचे सगळे कुटूंब सामील होते. "सामाजिक परिवर्तन के आंदोलन में चोखामेला पहले संत थे, जिन्होने भक्तिकाल के दौर में सामाजिक गैर-बराबरी को लोगों के सामने रखा। अपनी रचनाओं में वे दलित समाज के लिए खासें चिंतित दिखाई पडते है!
संत नामदेव हे संत चोखोबांचे गुरु व सहकारी होते. नामदेव आपल्या या सहकारी शिष्याचा आदर व सन्मान करत होते. नामदेवांना चोखोबांचा फार अभिमान वाटत होता. नामदेवांसारख्या गुरुने चोखोबांसारख्या आपल्या शिष्याविषयी अभंग लेखनातून आदरभाव व्यक्त करावा, ही बाब गुरु-शिष्य या नात्याची इतिहासातील विलक्षण घटना आहे. संत नामदेवांनी चक्क संत चोखोबावर अभंग लिहिले याची बऱ्याच वारकरी व संत साहित्याच्या अभ्यासकांना सुध्दा कल्पना नाही. नामदेवांना चोखोबांविषयी किती जिव्हाळा होता हे नामदेवांच्या पुढील अभंगावरुन लक्षात येते. संत नामदेव लिहितात -
चोखा माझा जीव, चोखा माझा भाव ।
कुलधर्म देव। चोखा माझा ।।
काय त्याची भक्ती, काय त्याची शक्ती ।
मोही आलो व्यक्ती । तयासाठी ।।
माझ्या चोखियाचे, करिती जे ध्यान।
तया कधी विघ्न। पडो नदी ।।
नामदेवे अस्थि, आणिल्या पारखोनी ।
घेत चक्रपाणी। पितांबर ।।
संत नामदेव
संत तुकारामांनीही चोखोबांचा अभंगातून गौरव केलेला आहे, हे विशेष आहे.
"तुका म्हणे तुम्ही, विचारांचे ग्रंथ। तारिले पतित । तेणे किती । " खुद्द तुकोबाराय ज्यांच्याबद्दल असे म्हणतात. ते पतितांना तारणारे व उपेक्षितांची कैफियत विठ्ठलापुढे तळमळीने मांडणारे संत म्हणजे चोखामेळा होय.
संत चोखोबांचा मृत्यू गावकुसाच्या कामात असतांना अंगावर दरड कोसळून झाला. त्यांच्या मृत्यूनंतर संत नामदेवांनी चोखोबाची हाडे गोळा करुन पंढरपुरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली. एवढेच नव्हे तर चोखोबाची काही हाडे आपल्या नर्सी या जन्मगावी आणून तिथेही त्यांची समाधी बांधली होती. त्या समाधीचे अवशेष आजही त्या गावात अस्तित्वात आहेत. नर्सी इथल्या संत नामदेवांच्या मंदिराजवळ ते चोखोबाच्या समाधीचे अवशेष आजही पाहायला मिळतात.
चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही आणण्याचे काम संत ज्ञानेश्वर व संत नामदेवांनी केले. त्या आध्यात्मिक लोकशाहीला बळकट करण्याच्या महत्वपूर्ण कार्यात संत चोखोबांचे अख्खे कुटूंब सहभागी झाले होते. पत्नी सोयराबाई, बहीण निर्मळा, मेहुणा बंका आणि मुलगा कर्ममेळा या सर्वांनी अभंग लेखन केलेले आहे.
उस डोंगा परि, रस नोहे डोंगा।
काय भुललासि, वरलिया रंगा ।।
यासारखे चोखोबांचे कित्येक अभंग बऱ्याच मराठी माणसांच्या ओठी आहेत.
संत ज्ञानेश्वरांनी अल्पवयातच समाधी घेतल्याने व संत नामदेवांच्या पंजाबला जाण्यामुळे वारकरी संप्रदायाची धुरा त्या काळात एकट्या चोखोबांवर पडली होती. संत नामदेवांच्या मार्गदर्शनाने चोखोबांनी वारकरी संप्रदाय सामाजिकदृष्ट्या अधिक विविधांगी केला. अठरा पगड जातींच्या संत कवींचा त्यांनी उत्तम समन्वय घडवून आणला. संत नामदेवांना अभिप्रेत असलेला जातीय सलोखा टिकवून ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य चोखोबांनी केले. पंढरपुरचे विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे दैवत सर्व जातींच्या महासमन्वयाचे प्रतीक आहे. विठ्ठलाचे हे सामाजिक समतेचे तत्त्वज्ञान संत नामदेव, चोखोबा आणि त्यांच्या संप्रदायातील सर्व संत कवी मंडळी अंगिकारत असत. संत चोखोबांनी सामाजिक समतेचा हा संदेश भक्ती मार्गाच्या माध्यमातून तत्कालीन समाजात जाणिवपूर्वक प्रसारित केला. कारण तत्कालीन सामाजिक विषमतेचे चटके त्यांनी स्वतः भोगले, सोसले व अनुभवले होते. ती वेदना व त्यांचे आक्रंदन चोखोबांनी अपल्या अभंगातून उत्कटपणे मांडले आहे. "हीन मज म्हणती देवा, कैसी घडो तुमची सेवा." अशा शब्दात आपली वेदना चोखोबा व्यक्त करीत होते.
चोखोबांच्या मृत्यूची बातमी संत नामदेवांना समजली तेव्हा त्यांच्या अस्थि गोळा करुन त्यांनी विठ्ठल मंदिरात चोखोबांची समाधी बांधली. आणि एवढेच नव्हे तर त्यातील काही अस्थि त्यांनी नर्सीला आणून त्यावर समाधी बांधली. ती समाधी आज रोजी जीर्ण अवस्थेत आहे. परंतु अस्तित्वात आहे. संत नामदेव वीस वर्षे पंजाबात राहून नंतर महाराष्ट्रात आले. पंढरपुरात त्यांचे निधन झाले. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचे योग्य नेतृत्व केले.
2020 हे वर्ष संत नामदेवांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीचे वर्ष होते. महाराष्ट्र व पंजाबात नामदेवांच्या या जयंती महोत्सवाची तयारी जोरात सुरु होती. परंतु कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या लॉकडाऊन काळात हा जयंती महोत्सव झाला नाही, परंतु त्या निमित्ताने संत नामदेवांच्या जन्मगाव नर्सी मधील नामदेव मंदिराची उभारणी झाली. आणि अजुनही संत नामदेवांचे प्रस्तावित स्मारक भव्यदिव्य होत आहे. आणि सोबतच संत नामदेवांचे जिव्हाळ्याचे सहकारी शिष्य संत चोखामेळा यांच्या त्या जीर्ण समाधीचेही स्मारक व्हावे, चोखोबांचे स्मारक व्हावे हे संत नामदेव यांनाही अभिप्रेत होते. महाराष्ट्र, केंद्र सरकार, आमदार, खासदार, स्वयंसेवी संस्थांनी व संत नामदेव महाराज संस्थानाने, संत नामदेवांच्या चाहत्यांनी पुढाकार घेतल्यास संत नामदेवांच्या स्वप्नातील चोखोबांचे स्मारक व्हायला वेळ लागणार नाही. म्हणजे संत नामदेवांचे मंदीर व त्यांचे स्मारक होणे जेवढे महत्वाचे आहे, तेवढेच संत चोखामेळा यांचे स्मारक होणेही महत्त्वाचे आहे. इतका या दोन संतांचा वैयक्तिक व वैचारिक जिव्हाळा होता. म्हणूनच नर्सी नामदेव जि. हिंगोली येथील संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या समाधी व मंदिर परिसरातील संत चोखामेळा यांच्या जीर्ण समाधीला उजाळा देणे व त्यांचे साजेसे स्मारक तयार होणे आवश्यक आहे. कोणीतरी पाठपुरावा करावा व हे कार्य घडवून आणावे अशी अपेक्षा आहे. कारण संत चोखोबा हे संत नामदेव महाराजांचे उजवा हात होते. संत नामदेवांच्या भव्य स्मारकासोबत संत चोखोबांचे जीर्ण अवशेष असलेल्या ठिकाणी त्यांचेही स्मारक झाले तर ती खरी संत नामदेवांना आदरांजली ठरेल. आणि तेच खरे संत नामदेवांना अभिवादन ठरेल.
संत चोखामेळा संबंधीत पुस्तके :-
1) चोखोबाचा विद्रोह - शंकरराव खरात
2) संत चोखामेळा - लीला पाटील
3) श्री संत चोखामेळा चरित्र - बाळकृष्ण लळीत
4) श्री संत चोखामेळा चरित्र आणि अभंग (परीवारातील लोकांचेही) – शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर.
5) श्री संत चोखामेळा व परीवार चरित्र व समग्र अभंग गाथा प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी
6) संत चोखामेळा : विविध दर्शन अँलिनार झेलियट, वा.ल. मंजूळ
7) श्री संत चोखामेळा : समग्र अभंग गाथा व चरित्र प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी
8) वारकरी संप्रदाय - शंकर वासुदेव अभ्यंकर
9) संत चोखामेळा (मराठी चित्रपट)
- प्रा.डॉ. शत्रुघ्न जाधव, हिंगोली
*******
प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना केले मंजुरी पत्राचे वाटप
हिंगोली (जिमाका), दि. २२ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शुभहस्ते व मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, ग्राम विकास व पंचायत राज मंत्री यांच्या उपस्थितीत महा आवास अभियान 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा 2 मधील राज्यातील वीस लक्ष लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरी पत्र व किमान 10 लक्ष घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा गृहोत्सव कार्यक्रम आज पुणे येथे आयोजित केला होता.
त्यानुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील 48 हजार 517 लाभार्थ्यांपैकी 33 हजार 446 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करण्यात आला आहे. तसेच 42 हजार 938 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहात मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास हिंगोली तालुक्यातील अंधारवाडी, पिपळखुटा, सावरखेडा व कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील लाभार्थी उपस्थित होते. आज पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमासोबत राज्यातील जिल्हा, तालुका व ग्राम पंचायत स्तरावर घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हा, तालुका व ग्राम पंचायत स्तरावर व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे करण्यात आले होते.
हिंगोली जिल्ह्यातील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बोधनकर, पाटील, सारस्वत, मेकाले, काळे, इंगोले इत्यादी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
******
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्यायदानाचे कार्य जलदगतीने व्हावे - न्यायमूर्ती भूषण गवई
हिंगोली (जिमाका), दि. 22 : सामाजिक व आर्थिक विषमता संपवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्यायदानाचे कार्य हे जलदगतीने आणि कमी खर्चात व्हावे, असा आशावाद सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी यावेळी व्यक्त केला.
आज येथील नवीन स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालयाचे व नवीन प्रशस्त न्यायालयीन ईमारतीचा लोकार्पण न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना भा. वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे आलोक आराधे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे, नितीन सांबरे, नितीन सुर्यवंशी, यनशिवराज खोब्रागडे यांच्यासह आमदार तानाजी मुटकुळे, मुंबई उच्च न्यायालयाचे 30 ते 35 न्यायमूर्तीं, परभणीच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर आणि नवीन न्यायिक जिल्ह्याचे पहिले प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तुफानसिंग एस. अकाली, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना न्यायमूर्ती श्री. गवई म्हणाले, स्वतंत्र न्यायिक जिल्हा व इमारतीचे उद्घाटन केल्याबद्दल वकील संघाचे अभिनंदन करून, स्वतंत्र जिल्हा झाल्यानंतर आता हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाची सर्व सोयीसुविधांनी युक्त भव्य आणि देखणी अशी उत्कृष्ट इमारत बांधली आहे. अमरावती, कोल्हापूर जिल्हा न्यायालयाची इमारत स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना ठरला असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालय सुरु करण्यासाठी व न्यायालयासाठी लागणारी नवीन इमारत यासाठी चांगली भूमिका निभावल्याबद्दल विधी विभाग, प्रशासनाचे त्यांनी अभिनंदन केले. या इमारतीतून समाजातील सामाजिक आर्थिक विषमता दूर करत समाजातील शेवटच्या नागरिकाला जलदगतीने कमी वेळेत, कमी खर्चात न्याय मिळाला पाहिजे, असा आशावाद व्यक्त केला. नैसर्गिक न्यायाचा हक्क हा शेवटच्या नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. येथील न्यायालयाचे इमारत बांधकाम उत्कृष्ट झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य हे पायाभूत सोयीसुविधांच्या बांधकामाबाबत कुठेही मागे नसल्याचे सांगून ही इमारत स्वच्छ ठेवण्यावर भर देत न्यायालयीन इमारत परिसरात वृक्षारोपण करत पर्यावरणाचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी यावेळी सांगितले.
नागरिकांच्या मूलभूत हक्काची पायमल्ली होता कामा नये. त्यासाठी न्यायाधीश, वकील आणि अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रयत्न करावेत. हिंगोली जिल्ह्यात जन्मलेल्या संत नामदेवांनी 13 व्या शतकात सामाजिक, आर्थिक न्यायाचे बिजारोपण केले होते. नरसीपासून ते पंजाबपर्यंत यासाठी त्यांनी प्रयत्न केले, असे सांगितले.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी या कार्यक्रमासाठी ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करताना म्हणाले, ज्या ज्या वेळी या भागात येतो तेव्हा अधिक आपुलकीची भावना निर्माण होते. येथे वडिलांचा नोकरीनिमित्त बराच काळ गेल्याचे सांगत ते जुन्या आठवणीत रमले. विधी सेवा प्राधिकरणाचा पदभार न्यायमूर्ती गवई यांनी स्वीकारल्यानंतर नालसा या गिताचा मराठीत अनुवाद पूर्ण झाला असून लवकरच ते मराठीत येईल. यावेळी न्यायमूर्ती गवई यांची लवकरच देशाच्या सरन्यायाधीश पदी नियुक्ती होणार असून ते देशाची न्यायव्यवस्था समर्थपणे सांभाळतील याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्र भूमी ही संत महात्म्याची भूमी म्हणून ओळखली जाते. नवीन इमारतीत न्यायदानाचे काम अधिक प्रभावी व गतिशील होईल, असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांनी व्यक्त केला. या इमारतीतून न्यायदानाचे पवित्र कार्य होते. ते पावित्र्य राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे सांगून इमारत स्वच्छतेवर यंत्रणेने विशेष लक्ष देण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पालक न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांनी नवीन न्यायालयीन इमारत हे आपल्या कार्यक्षमता, न्यायव्यवस्थेच्या शुद्धतेचा पाया आहे. या नवीन इमारतीत न्यायदानाचा गतिशील आदर्श घालवून द्यावा, असे सांगितले.
पालक न्यायमूर्ती यनशिवराज खोब्रागडे यांनी हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन प्रसंगी हिंगोली जिल्हा आजपासून स्वतंत्र न्यायिक जिल्हा म्हणून घोषित झाल्याबद्दल अभिनंदन केले. यामुळे आजपासून जिल्ह्यातील नागरिकांना लवकरात लवकर न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
आमदार तानाजी मुटकुळे यांनी स्वतंत्र हिंगोली न्यायिक जिल्हा झाला आहे. हा क्षण सुवर्णाक्षरांनी लिहावा, असा आहे. नवीन इमारत व जिल्हा न्यायालयामुळे न्यायदेवतेवरील विश्वास दृढ होत जावो, असे सांगून न्यायाधीश, वकीलांच्या प्रशिक्षण केंद्रांसाठी मागणीचा पाठपुरावा शासनदरबारी करणार असल्याचे सांगितले.
परभणीच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला नंदेश्वर यांनी हिंगोलीसाठी आज स्वतंत्र न्यायालय झाले असल्याचे सांगून न्यायदानाचे कार्यही तितकेच उच्च दर्जाचे होईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. सतीश देशमुख यांनी केले. तर शेवटी आभार हिंगोलीचे नव नियुक्त प्रमुख व जिल्हा व सत्र न्यायाधीश तुफानसिंग अकाली यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून व कोनशीलेचे अनावरण करुन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय नागरिकांची सनद आणि त्यांचे अधिकार याची माहिती देणारे 'एक मुठ्ठी आसमा हे' नालसा गीत सादर करण्यात आले. उर्मिला जगताप व देवयानी गायकवाड यांनी स्वागत गीत गायिले.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी स्वातंत्र्यसैनिक माणिकराव टाकळगव्हाणकर व समाजसेवक मधुकरराव मांजरमकर यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना ताम्हणे, गजानन नंदनवार आणि प्रियंका पमनानी यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाला सर्व न्यायाधीश, न्यायिक अधिकारी, कर्मचारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******
21 February, 2025
विशेष लेख - लोककला
भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्या अनुषंगाने प्राचीन काळापासून लोककला जागृत निर्माण झाली आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांच्या भाषेत निर्माण केलेली कला त्याला आपण लोककला म्हणतो. ही कला अविकसित ग्रामीण भागातून निर्माण झाली आहे. जसे की चित्रकला, साहित्य, नृत्य व संगीत या कलांचा समावेश होतो. विशेष म्हणजे लोककला ही कोणत्याही एका व्यक्तीची नसून तीन अनेक लोकांच्या मुखातून व्यक्त झालेली कला आहे. लोककला एकाच व्यक्तीकडून न होता समुहाकडून सादर केल्या जातात. आस्वादही समुहाकडून घेतला जातो. लोककला समूह मनाशी आधारित लोकमाणसांशी संबंधित मनोरंजनाचा प्रकार आहे. यामध्ये लिखित साहित्य आपणास फारसे आढळून येत नाही. कलेतूनच आपणास निसर्ग प्रेम, श्रध्दाळू मन व नाते संबंधाचे चित्रन केले जाते. कला, धर्म, रुढी, परंपरा, सण, उत्सव यांच्याशी संबंधित असतात.
लोककला खडतर व कष्टमय जीवनातून आपणास जीवनामध्ये थोडासा विरंगुळा व्हावा म्हणून निर्मिती केलेली जात असत व त्याचा आस्वाद घेतला जाई. लोककला ही कोणत्याही एका विशिष्ट एका जातीची नसते. तिचे प्रतिबिंब भारतातील अनेक जातीतून आपणास पाहावयास मिळतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात लोककला सण उत्सव जास्त प्रमाणात जोपासले जातात. उदा. दसरा, दिवाळी , पोळा आदी. सणाच्या प्रसंगी राहत असलेल्या निवासाच्या भिंतीवर विविध रंगाचा उपयोग करुन चित्रे काढली जातात. ते लोककलेचे प्रतीक मानले जाई. मंदिराच्या भिंतीवर बाह्य किंवा आतील भिंतीवर धार्मिक चित्र काढली जातात. मंदिराच्या भिंतीवर रामायण व महाभारतातील प्रसंग चित्रित केले जात. सार्वजनिक प्रकारची नृत्ये व गीते सादर केले जात. या कलेमध्ये कुठलेही क्लिष्टपणा नसे. ज्या बोली भाषेतून ही कला सादर होत असे त्या बोलीभाषेतून द्विअर्थ निघत असे. त्यामुळे या लोककलेतून लोकांचे मनोरंजन सतत होत असे. द्विअर्थी भाषेतूनच तमाशा व लावणी ही महाराष्ट्रातील परंपरा जोपासली जाते. यामधूनच चित्रपट निर्मिती होत असे. प्रसिध्द मराठी चित्रपट अभिनेता दादा कोंडके जी चित्रपट निर्मिती केली त्याचे द्विअर्थ शब्द निघतात. त्यावरुन लोककला चित्रपटाच्या माध्यमातून जोपासली जाई.
मंदिरावरती जी चित्रपट रेखाटली जात त्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगावर एक चित्रण केलेले आहे. त्यामध्ये शंकर आणि पार्वतीचे चित्र रेखाटले आहे. पार्वती ही रुसली आहे व शंकर महादेव पार्वतीला मनवीत आहेत असे भासवणारे चित्र रेखाटले आहे. म्हणजे प्राचीन काळामध्ये सुध्दा रुसवे फुगवे होत होते आणि प्रेमाने मनवले जात होते. आज सुध्दा ही परंपरा आपणास जीवनामध्ये पहावयास मिळते.
लोककलामध्ये उपयोगात आणलेले वाद्य , वेशभूषा ही ज्या ज्या पध्दतीने लोककला विकसित होत गेली त्या त्या पध्दतीतील समुहाशी लोककलावंतांनी तयार केलेली असतं. वासुदेव आपणास त्याची वेशभूषा माहीत आहे. ही एक लोककलेतून संदेश देण्याची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक मोहिमा फत्ते केली ती वासुदेवांच्या संदेशावरुन केली जात.
वाघ्या मुरळी ही लोककला अशी आहे की मुरळ्या ह्या दान केल्या जात, सोडल्या जात. गोंधळी हा देवीला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालून जागरण करत असे. मसानजोगी आपणास आलेले कार्य चोख बजावत असे. ज्योतीषी व शाहीरी हे सर्व लोककलेतच येतात.
तमाशा, लोकनाट्य, लावणी, भारुडे या लोककलेतून लोकांचे मनोरंजन नव्हे तर एक लोककला जोपासणारी परंपरेचा संदेश जात असे. या मनोरंजनातून लोककलावंतांना आर्थिक मदत होऊन त्यांच्या पोटची उपजिविका होत असे. प्रत्येक कलावंत आपापल्या कलेशी एकनिष्ठ समरस झालेला असे. त्यामुळेच तर लोककला ही लोकप्रिय ठरली आहे. तमाशा, लावणी, पोवाडा, जागरण, गोंधळ, भारुड, वासुदेव, रामलीला, दशावतार, लेझीम, वाघ्या-मुरळी, दिंडी, उखाणे, लग्न समारंभात सादर केली जाणारी लोककला, जात्यावरील गाणी ही एक महत्वाची परंपरा आहे. मंगळागौरी, मोटेवरील गाणी यांचा समावेश हा लोकगीत व लोकसंगीतात, लोकनृत्यात निर्माण झाला आहे.
याच लोककला व परंपरा पुढील पिढीला माहिती व्हाव्यात व लोककला जिवंत राहण्यासाठी लोककलेला काही अंशी शासकीय अभय मिळाला आहे. त्यांना प्रतिष्ठा देण्यात येत आहे. या लोककला जिवंत राहिल्या तर आपली संस्कृती आपणास कळेल. आपणास त्याची सतत जाण राहील. परंतु शहरीकरण, आधुनिकीकरणामुळे लोककला संपुष्टात येत आहे. लोककलेचे मूळ स्वरुपही लोप पावत आहे. त्याकरिता नव्याने आपणास ही कला सतत अविरत राहण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.
प्रा. डॉ. सुखदेव पिराजी बलखंडे
कै. बाबूराव पाटील महाविद्यालय, हिंगोली
*******
आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत तूर खरेदी सुरु * जिल्ह्यात 15 खरेदी केंद्र निश्चित
हिंगोली (जिमाका), दि. 21 : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत एनसीसीएफच्या वतीने खरीप हंगाम 2024-25 मध्ये मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले असून, येथे खरेदीसाठी दि. 24 जानेवारीपासून नोंदणी सुरु झाली आहे. तसेच खरेदी केंद्रावर दि. 13 मेपर्यंत तूर खरेदी करण्यात येणार आहे.
तूर खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात 15 खरेदी केंद्र निश्चित केली आहेत. त्या ठिकाणी नोंदणीला सुरुवात झाली आहे. खरेदी केंद्राचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
कयाधु शेतकरी उत्पादक कं. मर्या. तोंडापूर ता. कळमनुरी या संस्थेचे खरेदी केंद्र वारंगा फाटा व कळमनुरी येथे आहेत. वारंगा फाटा येथील केंद्र चालक मारोती कदम (9736449393) तर कळमनुरी येथे महेंद्र माने (9689229393) हे आहेत.
हजरत नासरगंज बाबा स्वयंसेवी सेवा सहकारी संस्था म. हिंगोली या संस्थेचे खरेदी केंद्र येहळेगाव ता. औंढा नागनाथ येथे आहे. येथे केंद्र चालक शेख गफार शेख अली हे (9881501040) आहेत. प्रगती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, हिंगोली या संस्थेचे खरेदी केंद्र हिंगोली येथे आहे. येथे केंद्रचालक नारायणराव देशमुख हे (9850792784) कामकाज पाहणार आहेत.
औंढा नागनाथ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. औंढा (ना) या संस्थेचे खरेदी केंद्र जवळा बाजार ता. औंढा नागनाथ येथे आहे. या संस्थेवर केंद्र चालक कृष्णा हरणे हे (9175586758) आहेत. श्री संत नामदेव स्वयंरोजगार सहकारी संस्था म. चोरजवळा या संस्थेचे खरेदी केंद्र कन्हेरगाव ता. जि. हिंगोली येथे आहे. या संस्थेवर केंद्रचालक अमोल काकडे हे (8007386143) आहेत.
विजयलक्ष्मी बेरोजगार सहकारी संस्था म. कोळसा ता. सेनगाव या संस्थेचे खरेदी केंद्र साखरा ता. सेनगाव येथे आहे. केंद्र चालक उमाशंकर माळोदे हे काम पाहणार आहेत. त्यांना 9403651743 क्रमांकावर संपर्क साधावा. श्री संत भगवानबाबा स्वयंरोजगार सेवा संस्था कोथळज या संस्थेचे खरेदी केंद्र सेनगाव येथे आहे. केंद्र चालक निलेश पाटील (9881162222) हे असून, वसमत तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित, वसमत या संस्थेचे खरेदी केंद्र वसमत येथे आहे. केंद्र चालक सागर इंगोले हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 8390995294 असा आहे. गोदावरी व्हॅली फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. शिवणी खु. ता. कळमनुरी येथे आहे. केंद्र चालक कैलास ढोकणे हे आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 7447758312 असा आहे.
श्री. फाळेश्वर महाराज फार्मर प्रोड्यूसर कंपनी या संस्थेचे खरेदी केंद्र फाळेगाव येथे आहे. या संस्थेवर केंद्र चालक म्हणून मारोती वैद्य हे असून, त्यांचा संपर्क क्रमांक 9975055731 असा आहे. मान्यता फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. या संस्थेचे खरेदी केंद्र नागासिंगी येथे आहे. या संस्थेवर केंद्र चालक म्हणून संदीप काकडे हे असून, त्यांचा संपर्क क्रमांक 9823252707 असा आहे. सप्तरंग ग्रेन फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. या संस्थेचे खरेदी केंद्र आडगाव येथे आहे. या संस्थेवर केंद्र चालक म्हणून कल्याण गायकवाड हे असून, त्यांचा संपर्क क्रमांक 9511686882 असा आहे. वाबळे अँड ऑदर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. या संस्थेचे खरेदी केंद्र उमरा येथे आहे. या संस्थेवर केंद्र चालक म्हणून सत्यभामा वाबळे ह्या असून, त्यांचा संपर्क क्रमांक 8805975604 असा आहे. श्री बेलेश्वर महाराज फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. या संस्थेचे खरेदी केंद्र पुसेगाव येथे आहे. या संस्थेवर केंद्र चालक म्हणून माधव गाडे हे असून, त्यांचा संपर्क क्रमांक 9423737672 असा आहे.
शेतकरी बांधवांनी आपल्या तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी संपर्क करुन नोंदणी करावी. नोंदणीसाठी सोबत खरीप हंगाम 2024-25 मधील सातबारावर ऑनलाईन पीकपेरा नोंद असावा. आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबूक झेरॉक्स सोबत आणावे. बँक पासबुकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड स्पष्ट असावा (जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये). संबंधित तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी तूर हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकारी , परभणी / हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
******
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर
हिंगोली (जिमाका), दि.21 : सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर हे उद्या दि. 22 फेब्रुवारी, 2025 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत . त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर जि . नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता वसमत येथे आगमन करुन तेथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या बैठकीस उपस्थित राहतील. 1 वाजता वसमत येथून मोटारीने परभणीकडे प्रयाण.
**
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीच्या 19 व्या हप्त्याचे सोमवारी वितरण
हिंगोली (जिमाका), दि.21 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 19 व्या हप्त्याचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी वितरण होणार आहे.
भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने बिहारमधील भागलपूर येथे इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवार (दि.24) रोजी शेतकरी समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
या ऑनलाईन समारंभामध्ये जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार तसेच पुरस्कार प्राप्त, प्रगतशील शेतकऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची https://pmindiawebcast.nic.in ही लिंक पाठविण्यात येत आहे. दि. 24 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणामध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
******
वसमत येथे मंगळवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि.21 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल कॅरिअर सेंटर, हिंगोली आणि स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमत येथे मंगळवार (दि.25) रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात श्री शिवेश्वर नागरी सहकारी बैंक लि. बसमतनगर, ईसाफ को-ऑपरेटीव्ह मायक्रो फायनांस नांदेड, शिवशक्ती अँग्रीटेक लिमिटेड, नांदेड, क्वेश कॉर्प पुणे, संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्था हिंगोली, डॉ.जयप्रकाश मुंदडा अर्बन को. ऑपरेटीव्ह बँक जवळा बाजार, जया हुंदाई हिंगोली, भारत फायनान्स लि. हिंगोली, उत्कर्ष स्मॉल फायनांस बँक नांदेड, सॉपिओ आनेलिटिक्स नोडल एजंसी हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली, एसबीआय लाईफ इन्शुरन्स हिंगोली इत्यादी नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. तसेच हिंगाली जिल्ह्यातील शासनाच्या विविध महामंडळाचे स्टॉल या रोजगार मेळाव्यात लावण्यात येणार आहेत.
दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार 350 पेक्षा अधिक रिक्त पदे या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in व www.ncs.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचित केली आहेत. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करून खाजगी क्षेत्रात नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करावे अथवा स्वतः मूळ कागदपत्रासह स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, वसमत येथे दिनांक 25 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 10 वाजता स्वखर्चाने उपस्थित रहावे. या मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाच्या 02456-224574 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.
******
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्प लाईनची जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि.21 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्प लाईन कक्षामार्फत हिंगोली नियोजन समिती यांच्या परवानगीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात बालविवाह प्रतिबंधक कायदा, चाईल्ड हेल्पलाईन, बालसंगोपन योजना यासह सर्व योजनाची माहिती उपस्थित सर्व नागरिकांना देण्यात आली.
यावेळी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष प्रा. सुधाकर इंगोले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, सामाजिक कार्यकर्ते रामप्रसाद मुडे व अनिरुद्ध घनसावंत तसेच चाईल्ड हेल्पलाईन कक्षाचे जिल्हा प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, अंकुर पाटोडे, विकास लोणकर, धम्मप्रिया पखाले, श्रीकांत वाघमारे, राजरत्न पाईकराव, सुरज इंगळे, तथागत इंगळे तसेच सखी सेन्टरच्या शीला रणवीर, ज्योती वाघमारे व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
******
अमला येथील शालेय परिसर व्यसनमुक्त
हिंगोली (जिमाका), दि.21 : चाईल्ड हेल्पलाईन 1098 कंट्रोल रूमकडून प्राप्त माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील अमला येथे शाळा लगत असलेल्या पानटपरीमध्ये गुटखा, तंबाखू, सिगारेट इत्यादी अंमली पदार्थ विक्री होत होते. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी व्यसनाचे बळी होण्याची दाट शक्यता आहे, अशी गोपनीय माहिती चाईल्ड हेल्पलाईन 1098 कडून प्राप्त झाली होती.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अंतर्गत चाईल्ड हेल्पलाईनचे सनियंत्रण अधिकारी तथा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे व चाईल्ड हेल्प लाईनचे जिल्हा प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, केस वर्कर राजरत्न पाईकराव यांनी अमला गावातील ग्राम बाल संरक्षण समितीच्या अध्यक्षा सुनिता कामखेडे, सरपंच व ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी बी. एन. कोकरे यांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार हिंगोली तालुक्यातील अमला येथील शालेय परिसरात १०० मीटरच्या आत गुटखा तंबाखू, सिगारेट अमली पदार्थ विक्री करणे हा गुन्हा आहे. याबाबत संबंधिताना मार्गदर्शन केले. त्यानुसार गावातील ग्राम बाल संरक्षण समिती व हिंगोली चाईल्ड हेल्प लाईन 1098 यांच्या समन्वयाने शालेय परिसर तात्काळ व्यसनमुक्त करण्यात आले आहे.
*****
जय शिवाजी जय भारत पदयात्रा व कौशल्य दिंडीस प्रतिसाद
हिंगोली (जिमाका), दि.21 : भारत सरकारचे केंद्रीय युवक व कल्याण विभागाचे राज्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्त "जय शिवाजी जय भारत" पदयात्रा तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या विभागामार्फत कौशल्य दिंडी काढण्यात आली.
"जय शिवाजी जय भारत "पदयात्रा व कौशल्य दिंडीचे जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पोस्ट ऑफीस, महात्मा गांधी चौक, महावीर चौक, इंदिरा गांधी चौक, परत छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने कौशल्य दिंडी काढण्यात आली.
या पदयात्रा व कौशल्य दिंडीप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र), उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामीण विकास), जिल्हा क्रिडा अधिकारी, समाज कल्याणचे सहायक आयुक्त, , जिल्हा उत्सव समितीचे आयक्ष, शिक्षणाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, सहायक माहिती अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा युवा अधिकारी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
"जय शिवाजी जय भारत" पदयात्रा व कौशल्य दिंडीव्दारे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागात राबविण्यात येणाऱ्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास योजना, आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, रोजगार मेळावा, मॉडेल करिअर सेंटर, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ इत्यादी योजनेची कौशल्य दिंडी व स्टॉल लावून योजनेचा प्रचार व प्रसार करण्यात आला.
"जय शिवाजी जय भारत" पदयात्रा व कौशल्य दिंडीमध्ये कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागातील एकूण 503 युवा कार्य प्रशिक्षणार्थी व कौशल्य विकास प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग घेतला. तसेच कार्यालयातील नवनाथ टोनपे, मनोज लोखंडे, राजेभाऊ कदम, रमेश जाधव, नागेश निरदुडे, पवन पांडे व अमोल आडे आदी अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
******
न्यायमूर्ती बी.आर. गवई व न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आज हिंगोली दौऱ्यावर
हिंगोली (जिमाका), दि.21 : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण आर. गवई व न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे हे दि. 21 व 22 फेब्रुवारी, 2025 रोजी हिंगोली दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. 21 फेब्रुवारी रोजी दिल्ली विमानतळावरुन विमानाने प्रयाण करुन सायंकाळी 5.30 वाजता नांदेड विमानतळावर आगमन. सायंकाळी 6 वाजता नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण आणि रात्री 7.30 वाजता हिंगोली येथे आगमन व मुक्काम.
शनिवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता हिंगोली येथे आयोजित स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालयाचे उद्घाटन व नवीन प्रशस्त न्यायालयीन ईमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता हिंगोली येथून मोटारीने वाशिमकडे प्रयाण.
******
20 February, 2025
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत घरकुलाचे मंजुरीपत्र व पहिला हप्ता वितरण कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन
* कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 20 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री यांच्या उपस्थितीत महाआवास अभियान 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 मधील राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरीपत्र व किमान 10 लक्ष घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा गृहोत्सव कार्यक्रम दि. 22 फेब्रुवारी, 2025 रोजी दुपारी 4.45 वाजता मुख्य बॅडमिंटन हॉल, श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे या ठिकाणी आयोजित केला आहे. यादिवशी या कार्यक्रमाबरोबरच राज्यातील जिल्हा , तालुका व ग्रामपंचायत स्तरावर घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर व्हिडिओ कॉन्फरंसद्वारे होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पालकमंत्री , खासदार, आमदार व लोक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मंजुरी पत्र व पहिला हप्ता वितरण कार्यक्रम दि. 22 फेब्रुवारी, 2025 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहात तसेच सर्व पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं.), सर्व गटविकास अधिकारी यांनी केले आहे.
********
स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालयाचे उद्घाटन व नवीन प्रशस्त न्यायालयीन ईमारतीचा शनिवारी लोकार्पण सोहळा
* सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण रा. गवई यांच्या हस्ते होणार उद्घाटन
हिंगोली (जिमाका), दि. 20 : हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर आता शनिवार (दि. 22) पासून स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालयाचे कामकाज कार्यरत होणार असल्याचे परभणीच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर यांनी सांगितले आहे.
या न्यायालयाचे उद्घाटन शनिवार (दि.22) रोजी सकाळी 10.30 वाजता नवीन न्यायालय इमारतीच्या प्रांगणात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण रा. गवई यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना भा. वराळे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे आलोक आराधे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे, नितीन सांबरे, नितीन सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यनशिवराज हे राहणार आहेत. तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे 30 ते 35 न्यायमूर्तींची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभणार आहे.
परभणीच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर आणि नवीन न्यायिक जिल्ह्याचे पहिले प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेले तुफानसिंग एस. अकाली यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.
यासोबतच नव्याने बांधण्यात आलेल्या 11 हजार 170 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या नवीन प्रशस्त न्यायालयीन ईमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. या ईमारतीमध्ये 20 प्रशस्त कोर्ट हॉल, लिफ्ट आणि दिव्यांग व्यक्तीसाठी विशेष सुविधेसह स्वतंत्र पार्किंग आणि बागेसाठी जागा आहे, अशी माहिती प्रबंधक, जिल्हा न्यायालय, परभणी यांनी दिली आहे.
**
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन
हिंगोली (जिमाका), दि. 20 : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा माहिती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी विशाल चव्हाण, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, वरिष्ठ लिपिक श्रीमती आशा बंडगर, लिपिक कैलास लांडगे, रेणुकादास कठारे,गंगा देशमुख उपस्थित होते.
******
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
हिंगोली (जिमाका), दि. 20 : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार आश्विनकुमार माने, नायब तहसीलदार संतोष बोथीकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
*****
हळदीला बाजारात चांगले दर मिळण्यासाठी हळदीतील बलस्थानांवर लक्ष केंद्रित करावे - पालक सचिव रिचा बागला
* पालक सचिव रिचा बागला यांनी घेतला विविध विभागाचा आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 20: हळदीवर प्रक्रिया उद्योगात वाढ करून हळदीचे मूल्यवर्धन करण्यासाठी आवश्यक निधीसाठी प्रयत्न करता येतील. येथील हळदीला बाजारात चांगला दर मिळवून देण्यासाठी कृषि विभागाने हळदीतील बलस्थानांवर लक्ष्य केंद्रित करावे, असे पालक सचिव रिचा बागला यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्याच्या पालक सचिव रिचा बागला यांनी येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामाची सद्यस्थिती व कामावर झालेल्या खर्चाचा आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, महेश सावंत यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी श्रीमती बागला यांना उपविभागीय कृषि अधिका-यांनी जिल्ह्यातील खरीप हंगामातील सोयाबीन, हळद आदी प्रमुख पिक लागवडीखालील क्षेत्र व होणारे उत्पन्न याची माहिती दिली. वसमत येथे स्व. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्रांतर्गंत प्रयोगशाळा आणि अनुषंगिक बाबींचे काम सुरू आहे. हळदीवरील प्रक्रिया उद्योगात वाढ करून हळदीचे मूल्यवर्धन करण्यासाठी आवश्यक निधीसाठी प्रयत्न करता येतील, असे श्रीमती बागला यांनी सांगितले.
प्रधानमंत्री लघु, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) या योजनेमध्ये जास्तीत जास्त लाभार्थींना सहभागी करून घेण्यासाठी कृषी विभागाने बँकेसोबत विशेष शिबिरांचे आयोजन करावे. शेतकरी सहायता गटांचा सहभाग वाढविण्यासाठी बँका आणि कृषि विभागाने जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील शेतकरी सहायता गटांना केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कृषि विभागाने पुढाकार घेण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात सरासरी दूध उत्पन्न हे मध्यम स्वरुपात आहे. त्यात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. जिल्ह्यात 50 हजार 959 लिटर दुधाचे संकलन आहे. जिल्ह्यात दुग्ध व्यवसायात वृद्धी करण्यासाठी संबंधित विभागाने तात्काळ पावले उचलण्याचे निर्देश पालक सचिव श्रीमती बागला यांनी दिले.
जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी 11 प्रकल्पावर काम सुरू असून, 2 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. 3 प्रकल्पाचे काम सुरू आहेत, उर्वरित कामाबाबत अधिक प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
'निपुण हिंगोली'वर पालक सचिवांकडून कौतुकाची थाप
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या नेतृत्वात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी 'निपुण हिंगोली'वर नोव्हेंबर 2024 पासून सुरू केलेल्या कामाबाबत पालक सचिवांना जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी माहिती दिली. तसेच या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये अनुकूल बदल दिसून येत असून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होत असल्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. त्यावर पालक सचिव श्रीमती रिचा बागला यांनी शिक्षण विभागाने चांगला पुढाकार घेतल्याबद्दल कौतुक केले व हा उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्यासाठी तालुकास्तरावर अधिकाऱ्यांची नेमणूक करुन वेळोवेळी शाळांना भेटी देऊन तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
जिल्हा कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून 4 योजनांचे 2031 जणांना प्रशिक्षण दिले आहे. मागील तीन वर्षात प्रशिक्षित प्रशिक्षणार्थी सध्या काय काम करत आहेत, त्याबाबत सविस्तर माहिती देण्यास पालक सचिवांनी सांगितले. जल जीवन मिशनची पूर्ण झालेली कामे प्रमाणिकरण करुन हर घर नल से जल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. महाडीबीटी योजनेचा लाभ देण्यासाठी कृषी व बँकेच्या सहकार्याने गावात शिबीरे घेऊन चांगले शेतकरी लाभार्थी निवडून त्यांना लाभ द्यावा. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी राज्यस्तरावर प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करण्यात येईल.
एनसीडी, तपासणी, हायपरटेंशन, डायबेटीस, कँन्सर अशी आजारनिहाय तपासणी केली जात असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले. जिल्हा आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यातील रुग्णांच्या सोईसाठी मार्गदर्शक तत्वानुसार काम करावे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांनी विशेष स्वच्छता मोहिमेतून शहरी भाग परिसरात स्वच्छता ठेवावी. पुढील महिन्यात जिल्हा दौ-यावर येणार असून, त्यावेळी परिस्थितीत बदल दिसून आला पाहिजे, असे पालक सचिव श्रीमती बागला यांनी मुख्याधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी पोलीस विभाग, प्रधानमंत्री पीकविमा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय (स्मार्ट प्रकल्प), पशुसंवर्धन विभाग, सिंचन विभाग, जलयुक्त शिवार योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, स्वच्छ भारत मिशन, महाराष्ट्र वीज वितरण मंडळांतर्गंत राबविण्यात येणाऱ्या योजना, मागेल त्याला सौर कृषिपंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना, जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण रस्ते, सार्वजनिक बांधकाम विभाग, पर्यटन स्थळांचा विकास करणे, जिल्हा घनकचरा व्यवस्थापन यासह जिल्ह्यातील सर्व विभागाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच चालू वर्षाचा जिल्हा वार्षिक योजनेचा निधी, तसेच उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पालक सचिव श्रीमती रिचा बागला यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वयातून काम करणारी लिगो देशातील तिसरी प्रयोगशाळा असून, यासाठी 2600 कोटी रुपयांचा खर्च निधी अपेक्षित आहे. ही इंग्रजीतील एल आकारात उभारण्यात येणार आहे. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले आहे. यामध्ये 100 विद्यार्थ्यांची पहिली बँच सुरू झाली आहे. 403.89 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दोन वर्षात इमारत बांधकाम पूर्ण कऱण्यात येईल. महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी 100 बेडचे स्त्री रुग्णालय बांधण्यात येणार असून, 4243.65 कोटीचा निधी अपेक्षित आहे. तर 50 बेडचे हार्ट सर्जरीसाठी रुग्णालय बांधण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच जिल्ह्याचा सविस्तर आढावा सादरीकणाव्दारे दिला.
यावेळी संबंधित विभाग प्रमुखांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती पालक सचिवांना दिली.
या बैठकीस जिल्ह्यातील विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
******
19 February, 2025
पालक सचिव रिचा बागला आज घेणार जिल्ह्याचा आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 19 : हिंगोली जिल्ह्याच्या पालक सचिव रिचा बागला ह्या उद्या गुरुवार, दि. 20 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांचा आढावा पालक सचिव श्रीमती बागला ह्या घेणार आहेत. तसेच त्यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामाची सद्यस्थिती व कामावर झालेल्या खर्चाचा आढावा घेणार आहेत.
या बैठकीस सर्व विभाग प्रमुखांनी आपल्याकडील योजनांच्या अद्यावत माहितीसह बैठकीस उपस्थित राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत.
***
जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता- जिल्हाधिकारी अभिनव गोयल
हिंगोली (जिमाका), दि. 19 : हिंगोली जिल्हा औद्योगिकदृष्ट्या पटलावर आणण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विविध योजना राबवून येथील उद्योगधंदे वाढीसाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उद्योग मित्र समिती सभा, जिल्हा सल्लागार समिती, जिल्हास्तरीय स्थानिक लोकांना रोजगार समिती, आजारी उद्योग पुनरुज्जीवन जिल्हास्तरीय समिती, जिल्हा निर्यात प्रचलन समिती आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्हा कार्यबल समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी औद्योगिक विकास महामंडळाचे श्री. इंगळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम, जिल्हा औद्योगिक संघटनेचे उपाध्यक्ष नंदकुमार तोष्णीवाल, जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, श्री. खुराणा यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते.
जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी व वसमत औद्योगिक क्षेत्रामधील भूखंड संपले असून, अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र वाढविणे, यात वारंगा, दाभाडी, कुर्तडी, चुंचा मनाठा व वरवंटा येथे प्रस्तावित ड्रायपोर्ट व एमएमएलपीसाठी संपादित क्षेत्र चौंडी तर्फे सेंदुरसेना, सेनगाव येथे घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत उद्योग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असून, उद्योजकांनी शहरानजीक किमान 100 हेक्टर जमीन विकत घेण्यासाठी जिल्हास्तरावर प्रयत्न करावेत. हिंगोली औद्योगिक क्षेत्रातील पाणीटंचाई दूर करण्याचे काम सुरू आहे. त्याबाबत संबंधित विभागाने जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी घेतला. औद्योगिक क्षेत्रात पाणीवापर धोरणबदलाबाबत निर्णय घेताना तसे बदल शासनाकडे सुचविण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी सांगितले.
हिंगोली औद्योगिक वसाहतीमध्ये 281 भूखंड असून, 277 भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. विशेष मुदतवाढ योजनेत हिंगोली औद्योगिक क्षेत्रातील 30 भूखंडधारकांनी मुदतवाढ मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केले होते. यातील 30 भूखंड धारकांपैकी 15 भूखंडधारकांना मुदतवाढ देण्यात आली असल्याचे श्री. इंगळे यांनी सांगितले.
हिंगोली शहराजवळ भूखंड मिळाल्यास अतिरिक्त औद्योगिक वसाहत स्थापन करुन ती वेगाने विकसित होऊ शकेल. त्यामुळे शहराजवळ जमीन मिळविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत, अशा सूचना उद्योजकांनी यावेळी उद्योग विभागाला केल्या. एमआयडीसी समोरील औंढा रोडवरील अतिक्रमण काढण्यात यावे. तसेच या क्षेत्रातील वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या फीडरचे लवकरच उद्घाटन करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी सांगितले.
यावेळी 2 जानेवारी 2024 रोजी झालेल्या सभेच्या इतिवृत्तास मान्यता देऊन, सन 2024-25 चा आर्थिक वर्षातील जानेवारी 2025 अखेरच्या विविध विकास कामांबाबतचा आढावा घेण्यात आला.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सन 2024-25 मध्ये 70 कर्ज प्रस्ताव बँकेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी 16 प्रस्ताव बँकेने मंजूर केले. तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 1229 प्रस्तावापैंकी 310 मंजूर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेंतर्गत 6 औद्योगिक समूह प्रस्थापित असून, त्यापैकी 4 समूहाचे डीपीआर मंजूर केले आहेत.
******
Subscribe to:
Posts (Atom)