11 February, 2025

बारावीची परीक्षा 3373 परीक्षा केंद्रावर सुरू

हिंगोली (जिमाका), दि. 11 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा आजपासून सुरू झाली असून, मंगळवार, दि. 18 मार्च, 2025 या कालावधीत आयोजित केली आहे. या परीक्षेसाठी विज्ञान, कला, वाणिज्य, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम), टेक्निकल सायन्स या शाखेच्या एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये 8 लाख 10 हजार 348 मुले, 6 लाख 94 हजार 652 मुली व 37 ट्रान्सजेंडर आहेत. या विद्यार्थ्यांची नोंदणी 10 हजार 550 कनिष्ठ महाविद्यालयामधून झालेली आहे. संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 3373 मुख्य केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. तसेच कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. फेब्रुवारी-मार्च 2025 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्वीकारण्यात आलेली असून सरल डेटावरुन कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती घेऊन आवेदनपत्रे ऑनलाईन भरलेली आहे. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2025 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून मंडळामार्फत प्रसिद्ध व छपाई वेळापत्रकच ग्राह्य धरावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये. फेब्रुवारी-मार्च 2025 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचे वेळापत्रक दि. 21 नोव्हेंबर, 2024 रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरुन समुपदेश करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर जिल्हानिहाय प्रत्येकी दोन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच राज्य मंडळ व 9 विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करुन हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळासाठी हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांक 0240-2334228, 0240-2334284, मो.क्र. 9403406725, 9404526036, 9421765683, 9325817006 उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच राज्य मंडळ स्तरावरही हेल्पलाईन सुरु करण्यात आली असून त्याचे दूरध्वनी क्रमांक 020-25705271, 020-25705272 असे आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिवांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे. ********

No comments: