28 February, 2025

वसमत येथे रोजगार मेळाव्यात 129 उमेदवारांची प्राथमिक निवड

हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर हिंगोली व स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमत येथे "पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा व पदवी तसेच पदवीधारक या पात्रतेच्या 293 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 129 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील विविध नामांकीत कंपनीचे उद्योजक उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील विविध महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी उपस्थित युवक-युवतींना प्रत्यक्ष संवाद साधून शासनाच्या विविध योजनाचा लाभ घ्यावा, असे सांगितले. प्राचार्य एस.एल. कोंडावार यांनी उमेदवारांनी स्वत:चे गाव सोडून मिळेल तिथे काम करावे, असे सांगितले. सहायक आयुक्त डॉ. रा.प्र.कोल्हे यांनी रोजगार मेळाव्याचा हेतू विशद करताना म्हणाले, युवकांनी मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून रोजगार प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, सुशिक्षित बेरोजगार उमेदवारासाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण याची माहिती देत करिअर कसे निवडावे याच्या मार्गदर्शनासाठी मॉडेल करिअर सेंटरची स्थापना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयात करण्यात आली असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. एम. येमेवार यांनी केले तर नवनाथ टोनपे यांनी आभार मानले. या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हिंगोली या कार्यालयाचे नवनाथ टोनपे, रा.द.कदम, ना. ज. निरदुडे, र. ला. जाधव आणि स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ******

No comments: