12 January, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

हिंगोली, दि. 12 :- येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी आदी उपस्थित होते.  

*****

11 January, 2017

सुरक्षा साधनांची निगा म्हणजे आपल्या कुटुंबाची निगा
हिंगोली, दि. 11 :- विद्युत सुरक्षेविषयी लोकांना माहिती मिळावी यासाठी उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या वतीने दि. 11 ते 17 जानेवारी, 2017 या कालावधीत विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आज दि. 11 जानेवारी, 2017 रोजी विद्युत निरीक्षक कार्यालय, महावितरण हिंगोली व विद्युत ठेकेदार संघटना यांच्यामार्फत विद्युत सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन औद्योगीक प्रशिक्षण संस्था, औद्योगीक वसाहत, लिंबाळा येथे सकाळी 11.30 वाजता झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन महावितरणचे अधिक्षक अभियंता के. डी. हुमने यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी आयटीआयचे प्राचार्य एस. पी. भगत हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून आय.टी.आय. प्र. गटनिर्देशिका सौ. राठोड मॅडम व सचिन राका हे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री देशपांडे, कनिष्ठ यंत्रचालक महावितरण हिंगोली यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व मार्गदर्शनपर माहिती एस. व्हि. निरावार, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 यांनी दिली.
यावेळी श्री के. डी. हुमने, अधिक्षक अभियंता, महावितरण हिंगोली यांनी वीज निर्मिती व त्याचा उपयोग कसा करावा, वीज उपकरणे व त्याला लागणारी साघने यांची हाताळणी करतांना घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. तसेच भविष्यात होणारे विजेचे अपघात कमी करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगीतले.आय.टी.आय चे प्राचार्य यांनी विज सुरक्षे संदर्भात मार्गदर्शन केले.यावेळी आय.टी.आय कर्मचारी / विद्यार्थी निदेशक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच विद्यार्थांसाठी व तांत्रीक कर्मचा-यांसाठी विद्युत सुरक्षे संबंधी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत एस. व्हि. निरावार, सहा.अभियंता श्रेणी 2 यांनी उपस्थितांना विद्युत सुरक्षे संबंधी पीपीटीद्वारे मार्गदर्शन केले. सदरील कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन के.जी. घुगे यांनी केले.  

*****      
राष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवा सप्ताहाचे आयोजन
हिंगोली, दि. 11 :- क्रीडा युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या आदेशान्वये जिल्हा क्रीडा अधिकारी  कार्यालय, हिंगोली प्राचार्य शिवाजी महाविद्यालय, हिंगोली, श्री. पलसिद्ध स्वामी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पुसेगांव ता. सेनगांव जि. हिंगोली, विजयदीप करीअर ॲकडमी, हिंगोली, प्राचार्य बाबुराव पाटील महाविद्यालय, हिंगोली, जिल्हा परिषद प्रशाळा, हिंगोली जिल्हा कराटे असोसिएशन, हिंगोली, संत नामदेव सेवाभावी संस्था, नर्सी (ना) ता.जि. हिंगोली, युवा प्रतिष्ठाण, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 ते 19 जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात युवक/युवतींसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
तरी आपल्या शाळा/महाविद्यालयातील युवक/युवतींना सदर कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करावे युवा दिन युवा सप्ताहात सहभागी होवून आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना चालणा देण्यासाठी या संधीचा लाभ द्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नरेंद्र पवार, यांनी केले आहे.
                या युवा सप्ताहमध्ये पुढीलप्रमाणे कार्यक्रम असणार आहे. 1) दिनांक 12 जानेवारी, 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता स्वामी विवेकानंद यांचे तत्वज्ञान व शिकवण / त्यांचे कार्य, प्रेरणादायी विचार युवकांना अवगत करणे, स्थळ - शिवाजी महाविद्यालय, हिंगोली, 2) दिनांक 13 जानेवारी, 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगार, व्यवसाय, नोकरीतील संधीबाबत तज्ज्ञाकडून मार्गदर्शक, स्थळ - केदार ट्रेनिंग सेंटर, श्री. पलसिध्द स्वामी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, पुसेगाव ता. सेनगाव, 3) दिनांक 14 जानेवारी, 2017 रोजी सकाळी 11.00 स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, स्थळ- विजयदीप करीअर ॲकॅडमी, आदर्श महाविद्यालय सोसायटी बिल्डींग,  हिंगोली, 4) दिनांक 15 जानेवारी, 2017 रोजी सकाळी 11.00 व्हॉलीबॉल स्पर्धा, इंदिरा गांधी कन्या विद्यालय, जवळा बाजार, 5) दिनांक 16 जानेवारी, 2017 रोजी सकाळी 11.00 युवती व महिलांसाठी स्वंयसंरक्षणार्थ कार्यक्रम, स्थळ - प्रमोद वाघमारे / गोपाल ईसावे, जिल्हा परिषद प्रशाला, हिंगोली, 6) दिनांक 17 जानेवारी, 2017 रोजी सकाळी 11.00 युवकांसाठी परिसंवाद - युवा विचारांचे आदान-प्रदान, स्थळ - केशव मोरे, संत नामदेव सेवाभावी संस्था, नर्सी (ना.) ता.जि. हिंगोली, 7) दिनांक 18 जानेवारी, 2017 रोजी सकाळी 11.00 निबंध स्पर्धा, स्थळ - शंभुराजे गड, प्लॉट न. 88, महाकाली नगर, अकोला रोड, हिंगोली, 8) दिनांक 19 जानेवारी, 2017 रोजी दुपारी 2.00 युवा सप्ताह समारोप व बक्षीस वितरण, स्थळ - शिवाजी महाविद्यालय, हिंगोली याप्रमाणे सदर युवा सप्ताहात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी जिल्ह्यातील शाळा / महाविद्यालयातील युवक / युवतींनी जास्तीत-जास्त संख्येने यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी अर्ज करावेत
हिंगोली, दि. 11 :- राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडुन शासन निर्णय क्र.अविवि-2010/प्र.क्र.152/10/का-6 दि.11 ऑक्टोंबर 2013 च्या तरतुदीनुसार डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने अंतर्गत जिल्ह्यातील ज्या मदरसा धर्मदाय आयुक्त अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आहेत. अशा मदरसांना मरदशांच्या आधुनिकरीकरणासाठी पायाभुत सुविधा, ग्रंथालयासाठी व शिक्षकांच्या मानधनासाठी शासन स्तरावरुन अनुदान उपलब्ध होणार आहे.
याकरिता योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे असणार आहे. 1) मदरसा चालविणारी संस्था अथवा मदरसा, धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आहेत. अशा मदरसांना सदर योजनेचा लाभ दिला जाईल. 2) ज्या मदरसांना scheme for providing qulity education in madarasa  या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरशांना ही योजना अनुज्ञेय राहणार नाही. 3) शासन निर्णयात नमुद पायाभुत सुविधांसाठी रु.2 लाख अनुदान देय आहे. यापूर्वी ज्या प्रयोजनासाठी अनुदान देण्यात आले आहे त्या प्रयोजनासाठी पुन्हा अनुदान अनुज्ञेय असणार नाही. 4) शासन निर्णयातील तरतुदीनुसार जास्त 3 डी.एड/बी.एड शिक्षकांना मानधन देण्यात येईल. शिक्षणासाठी हिंदी/इंग्रजी/ मराठी / उर्दु यापैकी एका माध्यमाची निवड करुन त्यानुसार शिक्षकांची नेमणुक करणे आवश्यक राहील. 5) सदर अनुदान शासन निर्णयामध्ये नमुद पायाभूत सुविधा वगळून इतर सुविधांसाठी अनुज्ञेय असणार नाही. 6) शासन निर्णय क्र.अविवि-2010/प्र.क्र.152/10/का-6 दि.21 ऑक्टोंबर 2013, अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी https://mdd.maharashtra.gov.in  या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. 7) अल्पसंख्याक विकास विभाग महाराष्ट्र शासन यांचे सदर योजनेचे शासन निर्णय क्र.अविवि-2010/प्र.क्र.152/10/का-6 दि.11 ऑक्टोंबर 2013 मधील सर्व अटी व शर्ती  लागु राहतील.
तरी जिल्ह्यातील इच्छुक मदरसांनी अल्पसंख्याक विकास विभाग, शासन निर्णय दिनांक 11.10.2013 मध्ये नमुद केलेल्या विहीत नमुन्यातील परिपुर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथील जिल्हा नियोजन समिती, कार्यालय येथे दि. 25 जानेवारी, 2017 रोजी संध्याकाळी 5.00 वाजे पर्यंत सादर करावे, व सदर योजनेचा लाभ घ्यावा. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत.

*****
शासकीय व निमशासकीय कार्यालयात
स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करावी
                                -- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
हिंगोली, दि. 11 :- राज्य शासनाने दिनांक 10 जानेवारी, 2017 रोजीच्या निर्णयान्वये प्रतीवर्षी दिनांक 12 जानेवारी, 2017 रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती राज्यभर साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात गुरुवार, दिनांक 12 जानेवारी, 2017 रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करावी, असे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

***** 

10 January, 2017

सैनिक-माजी सैनिक व कुटूंबियांचे प्रश्न वेळेत सोडवावेत
                                                        -- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
हिंगोली, दि. 10 : नैसर्गिक किंवा अन्य आपत्तीच्यावेळी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत भारतीय सैनिक हे सदैव देशाचे रक्षण करण्यासाठी सुसज्ज असते. कोणत्याही परिस्थितीत सशस्त्र सेना दल नेहमी बहुमोल कामगिरी करते. या कामगिरीचा संवेदनशीलपणे विचार करुन सेना दलातील या सैनिकांचे तसेच माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचे विविध प्रश्न सर्व संबंधित विभागांनी वेळेत सोडविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीसी सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय माजी सैनिक-विधवा व उत्कृष्ट ध्वजदिन निधी सकंलन करणाऱ्यांचा सत्कार तसेच लाभार्थ्यांना धनादेश वाटप कार्यक्रमात श्री. भंडारी बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि) आर. आर. जाधव, ले. कर्नल (नि) सुरेश कातनेश्वरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी श्री. भंडारी म्हणाले की, देशसेवा केल्यानंतर सैन्यातून निवृत्त झालेल्या सैनिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. माजी सैनिकांसाठी आरोग्य शिबीराचे वेळोवेळी आयोजन करण्यात यावे. इएसआय रुग्णालय नांदेड येथे असल्यामुळे जिल्ह्यातील माजी सैनिक किंवा त्यांच्या कुटूंबियांना तेथे जाण्यास वेळ जातो. याकरीता येथील जिल्हा रुग्णालयात इएसआय रुग्णालयाचा एक कक्ष सुरु करता येईल का याचा विचार होणे आवश्यक आहे. माजी सैनिकांनी शासनाच्या विविध योजनाचा आपल्यासाठी तसेच आपल्या गावासाठी मिळावा याकरीता पुढाकार घ्यावा. तसेच सर्व शासकीय योजनासाठी आधार कार्ड आवश्यक असल्याने सर्व माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबीयांनी आपाले आधार कार्ड काढून घ्यावे असे ही आवाहन श्री. भंडारी यांनी यावेळी केले.
      जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) आर. आर. जाधव प्रास्ताविकात ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्टपूर्ती करणाऱ्या सर्व विभागांचे अभिनंदन करत म्हणाले की, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जात असून माजी सैनिकांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी शिष्‍यवृत्‍तीच्या योजना राबविल्या जातात. याचा माजी सैनिकांच्या पाल्यांनी लाभ घ्यावा. 
             यावेळी ध्‍वजदिन निधी संकलनात उद्दिष्टपुर्ती करणाऱ्या विविध विभागांचा प्रशस्‍तीपत्रक देऊन, तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांना सन 2016-17 मध्ये मंजूर  झालेल्या शिष्यवृत्ती धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. तसेच 03 जूलै, 2005 रोजी ऑपरेशन रक्षक मध्ये शहीद झालेले जिल्ह्यातील शहीद रणवीर गणपत भिकाजी यांच्या वीर माता-पिता श्री. भिकाजी रणवीर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
            कार्यक्रमास माजी सैनिक त्यांचे कूटंबीय यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

                                                                        *****



09 January, 2017

वाहतूक नियमांचे पालन करीत शिस्तबध्द वाहने चालवावी
                                                        -- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
·         रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन
हिंगोली, दि.9: रस्ता सुरक्षा अत्यंत महत्वाची गरज असून त्याकरीता समाजात जनजागृती होऊन सामाजिक मानसिकता निर्माण होणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे पालन करीत शिस्तबध्द वाहने चालवल्यास विविध अपघातात प्राणहानी टाळता येते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.
            वाहतुक शाखा, हिंगोली येथील प्रांगणात 28 वे रस्ता सुरक्षा अभियान 2017 चे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक अशोक मोराळे, मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, कार्यकारी अभियंता एस. जी. देशपांडे, हिंगोली शहरचे पोलीस उपअधिक्षक एच. डी. भोरे यांची उपस्थिती होती.
            यावेळी श्री. भंडारी म्हणाले की, अपघातामुळे अपघातग्रस्त कुंटूबाचे नुकसान तर होतेच त्याशिवाय राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3 टक्के इतकी देशाची आर्थिक हानी होते. जर सुरक्षा केली असती तर विविध अपघातात प्राणहानी टाळता आली असती असेही अपघातानंतर लक्षात येते. परंतू एकदा गेलेली वेळ परत येत नाही. अशा झालेल्या सर्व अपघातांची कारणे व त्या संदर्भातील सुस्पष्ट आकडेवारी जनतेसमोर येणे आवश्यक आहे. कारण यामुळे जनजागृती होण्यास मदत होणार आहे. दर वर्षी नवीन वाहनांची संख्या दहा टक्क्यांनी वाढत असली तरी होणाऱ्या अपघाताची टक्केवारी कमी आहे. वाहतूक नियमांचे पालन करुन आपल्या जीवनाचे रक्षण करावे. कारण यामुळेच आपले आणि दुसऱ्यांचे जीवाचे रक्षण होऊन अपघात कमी होण्यास मदत होईल. रस्ता सुरक्षेबाबतची ही मोहिम शाळा, महाविद्यालये, कारखाने, विविध ठिकाणी राबविण्यात येत असून यामध्ये नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन ही श्री. भंडारी यांनी यावेळी केले.
            यावेळी पोलीस अधिक्षक अशोक मोराळे श्री. तुम्मोड आणि  श्री. देशपांडे यांनी देखील उपस्थित वाहन चालक, मालक व विद्यार्थी यांना रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन केले.
            यावेळी जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाहन चालकांना हेल्मेटचे वितरण करण्यात आले. तसेच वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. तसेच  रस्ता सुरक्षा विषयक तसेच शालेय बस नियमावली पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
            प्रारंभी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हणाले की, यावर्षी Your Sefety, Secures Your Family Please Be Cautious on Road हे शासनाने ब्रिदवाक्य घोषित केल असून, रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती देवून वाहनचालक, मालक व विद्यार्थी यांना रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन केले.
            सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक नितीन जाधव, अशोक जाधव, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक डी. एस. साळुंके, व्ही. डी. राऊत, किशोर पवार तसेच कर्मचारी व पोलीस विभागाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले. वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आर. डी. कायंदे यांनी आभार व्यक्त केले.

                                                                        *****