08 May, 2017

सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या
 विविध पुरस्कारांचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी मुदतवाढ
हिंगोली, दि. 8 :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार व शाहु, फुले, आंबेडकर परितोषिक पुरस्काराकरिता प्रस्ताव मागविण्यासाठी दिनांक 18 एप्रिल, 2017 रोजीच्या पत्रान्वये हिंगोली जिल्हयातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,हिंगोली मार्फत प्रसिध्द करण्यात आली होती.
सदर जाहिरातीमध्ये प्रस्ताव दाखल करण्यासाठी अंतिम मुदत दिनांक 30 एप्रिल, 2017 पर्यंत देण्यात आली होती. आता सदरची प्रस्ताव दाखल करण्यासाठी मुदत वाढविण्यात आली असून इच्छुक मान्यवर व संस्थांना त्यांचे अर्ज दिनांक 15 मे, 2017 अखेर सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली या कार्यालयात दाखल करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 
स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली, दि. 8 :  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर हिंगोलीव्दारे या कार्यक्रमातून स्वयंरोजगार व रोजगार प्राप्त होण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक हिंगोली येथे सुशिक्षीत बेरोजगार युवक / युवती करिता स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण कार्यक्रम हिंगोली येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचा कालावधी 12 दिवसांचा सशुल्क असून प्रशिक्षण दि. 15 मे, 2017 ते दि. 27 मे, 2017 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमात शेळी पालन, म्हैसपालन इत्यादी विषयी या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे सोबतच व्यवसाय मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, शासनाच्या विविध कर्ज योजना, बँकेची कार्यप्रणाली, प्रकल्प अहवाल इ. बाबत तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात ज्या बेरोजगार युवक युवतींना प्रवेश घ्यावयाचा असल्यास वयोमर्यादा 18 ते 45, शिक्षण 7 वी पास, प्रवेशाची अंतिम तारीख 12 मे, 2017 च्या दुपारी 4.00 वाजेपर्यंत श्री. समाधान मोरे कार्यक्रम आयोजक मो. 9158272909 एमसीईडी जिल्हा कार्यालय व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाचा दुसरा मजला, हिंगोली येथे प्रत्यक्ष भेटून आपला अर्ज सादर करावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 
मौजे वगरवाडी सर्वे क्र.25 व 29 क्षेत्र गोळीबार सरावासाठी उपलब्ध
हिंगोली, दि. 8 :  समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 12 यांनी या गटास पोलीस कर्मचारी यांचे ड्रिल, गॅस ॲम्युनेशन, 7.62 एमएम एकेएम, एलएमजी, 5.56 एमएम इंसास, एलएमजी, स्टेस मॅनेजमेंट सत्र क्र. 9 व 10 चे वार्षिक गोळीबार सराव दि. 3, 4, 5, 6, 10, 13, 17, 20, 24, 27, 31 मे, 2017 व 3, 7, 10, 14, 17, 21, 24, 28 जून, 2017 या कालावधीत घेण्यात येणार आहे. उपलब्ध असलेले गोळीबार सरावाकरिता मौजे वगरवाडी ता. औंढा स. न. 25 व 29 मधील गोळीबार मैदान ( फायर बट ) उपलब्ध करुन मिळण्याची मागणी केली होती.  महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 33(1) (ख) व (प) नुसार मौजे वगरवाडी ता. औंढा ना. जि. हिंगोली येथील फायरींग रेंज मैदान वरील कालावधीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी हिंगोली यांनी कळविले आहे.
सदर ठिकाण धोकादायक क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात येत असून सदरील परिसरात गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सूचना पोलीस अधिकारी यांनी दवंडीव्दारे व ध्वनीक्षेपकाव्दारे संबंधीत गावी सर्व संबंधितांना देण्यात याव्यात, व तहसिलदार औंढा ना. व पोलीस स्टेशन हटृा यांना मौजे वगरवाडी फायरींग बट व परिसरात दवंडीव्दारे व ध्वनीक्षेपकाव्दारे सदरील आदेशाची प्रसिध्दी करावी, असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केलेले आहे.

                                                            ***** 
सैनिकांच्या पाल्यांकरिता जबलपुर येथे
युनिट कोटा सैन्य भरतीस उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 8 :  जिल्ह्यातील आजी / माजी सैनिक व विधवांसाठी दि. 22 ते 27 जून, 2017 पर्यंत 1 एस. टी. सी. जबलपूर येथे आजी / माजी सैनिक व विधवा यांच्या पाल्यांसाठी सैन्य भरतीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सोल्जर जनरल ड्युटी, सोल्जर टेक्निकल व सोल्जर ट्रेडसमॅनची भरती घेण्यात येणार आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी भरतीचे ठिकाणी सकाळी 4.30 वाजण्यापूर्वी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****

04 May, 2017

औंढा (ना) नगर पंचायत नगराध्यक्ष जयश्री देशमुख यांचा राजीनामा

        हिंगोली, दि. 4: औंढा (नागनाथ) नगर पंचायत नगराध्यक्ष श्रीमती जयश्री अनिल देशमुख यांनी वैयक्तीक कारणास्तव जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याकडे दि. 03 मे, 2017 रोजी प्रत्यक्ष हजर राहून अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाधिकारी भंडारी यांनी सदर राजीनामा मंजूर करुन अधिनियमातील तरतूदीनूसार नगर पंचायत औंढा (ना) येथील अध्यक्ष पदाचा कार्यभार उपविभागीय अधिकारी वसमत यांच्याकडे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत सुपूर्द केला असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

***** 

03 May, 2017

जलयुक्त शिवार अभियानाची कामे 30 जून पूर्वी पुर्ण करावीत
-          जलसंपदामंत्री प्रा. राम शिंदे
हिंगोली,दि.3: जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाश्वत पाण्याची उपलब्धता आणि शेतीकरीता सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गतची कामे 30 जून पूर्वी वेळेत पुर्ण करण्याचे निर्देश जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.
जलयुक्त शिवार अभियान आणि जलसंपदा विभागा अंतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामांचा आढावा आणि पाहणीकरीता आज जिल्हा दौऱ्यावर प्रा. शिंदे आले होते त्याअनुषंगाने येथील डिपीडीसी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकूळे, संतोष टारफे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. शिंदे पुढे म्हणाले की, सन 2015-2016 या वर्षात जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 124 गावे निवडण्यात आली होती. सदर गावांमध्ये विविध यंत्रणाद्वारे एकूण 4 हजार 187 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यापैकी एकूण 3 हजार 912 कामे पूर्ण झाली असून यासाठी एकूण 72.18 कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. 93 कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच सन 2016-2017 या वर्षात जिल्ह्यात एकूण 100 गावांची निवड केली असून या गावांत विविध यंत्राद्वारे एकूण 2 हजार 606 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 482 कामे पूर्ण झाली असून त्यावर 18.20 कोटी रुपयांची निधी खर्च झाला असून 678 कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यात जलयुक्त अंतर्गत चांगली कामे सुरु आहेत. परंतू कृषि विभागाचे या कामाकडे दूर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर सन 2016-2017 अंतर्गत प्रस्तावीत कामे ही 30 जून पूर्वी पुर्ण करावीत. अन्यथा संबंधीतावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही प्रा. शिंदे यावेळी म्हणाले.

 तसेच सन 2015-2016 या वर्षात गाळ काढण्याच्या मोहिमेतंर्गत शासकीय मशिन, लोकसहभागातून खोलीकरण, रुंदीकरण या माध्यमातून 67 कामे करण्यात आली असून 10.449 लक्ष घनमिटर गाळ काढण्यात आला. तर सन 2016-2017 या वर्षात 121 कामे करण्यात आली असून 25.14 लक्ष घनमिटर गाळ काढण्यात आला .
सन 2017-2018 या चालु वर्षात जिल्ह्यातील एकूण 80 गावांची निवड करण्यात आलेली आहे. या गावात एकूण 3 हजार 430  कामे प्रस्तावित असून त्यापैकी 157 कामे पूर्ण झाली असून 29 कामे प्रगतीपथावर आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झालेल्या जल व मृद संधारणाच्या उपचारामुळे भुजल पातळीत दोन ते तीन मिटर इतकी लक्षणीय वाढ झाली असून, त्यामुळे रब्बी व उन्हाळी लागवाड क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून 6 हजार 365.88 टि.सी.एम. इतका पाणीसाठा जिल्ह्यात निर्माण झाला आहे. लोकसहभागातून शेतात गाळ टाकण्याच्या मोहिमेमुळे जवळपास 02 हजार हेक्टर शेतजमिनी सुपीक झाली असून पिक उत्पादनात वाढ होत आहे. तसेच या मोहिमेमुळे सिंचन तलावांच्या साठवण क्षमतेत वाढ होऊन विहिरीची पाणी पातळी देखील वाढण्यास मदत  झाली आहे. यामुळे गावांमधील पाणी टंचाईचा प्रश्न सुटत असून जिल्ह्याची टँकरमुक्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरु आहे. जलयुक्त शिवार अभियानातंर्गत ‘क’ वर्ग नगर पंचायत आणि नगर परिषदांना कामे करता येणार असल्याची माहिती प्रा. शिंदे यांनी दिली.
तसेच जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधु, अंबाला आणि गोमती नदीवर बंधारे बांधण्यासाठी बंधारे बांधण्यासाठी 7 कोटी 47 लाख रुपयांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, यास लवकच मंजूरी देण्यात येणार आहे. तसेच नदी पुर्नजीवन अंतर्गत 5 कोटी 50 लाख रुपयांचा निधी देखील जिल्ह्यास उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियान सन 2017-18 करीता  जिल्ह्यास 4 कोटी 5 लाख रुपयांचा निधी नुकताच उपलब्ध करुन देण्यात आल्याचे ही प्रा. शिंदे यावेळी म्हणाले.
राज्यातील धरणे व जलसाठ्यांच्या साठवण क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने धरणांमधील गाळ काढून तो शेतामध्ये वापरण्यासाठी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना’ राबविण्याचा निर्णय नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्यातील लघु पाटबंधारे तलाव, साठवण तलाव, गाव तलाव, पाझर तलाव आणि विदर्भातील माजी मालगुजारी तलाव यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळाची साठवण झाली आहे. गाळ साठवणक्षमतेवर होणारा परिणाम लक्षात घेता 250 हेक्टरपेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या आणि पाच वर्षापेक्षा जुन्या सुमारे 31 हजार 459 धरणांमधील गाळ काढण्याची मोहिम प्राधन्याने राबविण्यासाठी राज्यातील 82 हजार 156 धरणांपैकी 31 हजार 459 धरणांमध्ये साचलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या योजनेमुळे धरणांची मूळ साठवण क्षमता पुर्नस्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्न क्षमतेत वाढ होणार आहे. तसेच शेती आणि पिण्यासाठी देखील पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
या योजनेनुसार स्थानिक शेतकऱ्यांना मोफत गाळ मिळणार असून, त्यांना तो स्वखर्चाने शेतामध्ये वाहून न्यावा लागणार आहे. गाळ उपसण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री व इंधनावरील खर्च शासनाकडून तसेच सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून करण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे जीओ टॅगिंग आणि माहितीचे संगणकीकृत संकलन करण्याबरोबरच स्वतंत्रपणे त्रयस्थ यंत्रणेमार्फत मूल्यमापन केले जाणार आहे. या योजनेनुसार केवळ गाळ उपसा करण्यास परवानगी देण्यात आली असून वाळू उत्खननास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. या योजनेनुसार गाळ काढण्यात येणाऱ्या धरणांची साठवण क्षमता 42.54 लक्ष स.घ.मी. इतकी असून सिंचन क्षमता 8 लाख 68 हजार हेक्टर इतकी आहे. या धरणांमध्ये अंदाजे 5.18 लक्ष स.घ.मी. एवढ्या गाळाचे प्रमाण आहे. हा गाळ काढण्यासाठी सुमारे 6 हजार 236 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पुढील चार वर्षात टप्प्याटप्प्याने संपूर्ण गाळ काढण्यात येणार असल्याची माहिती हि जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी यावेळी दिली.
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा महत्वकांक्षी कार्यक्रम आहे. मागील काही कालावधीत सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती.   जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत मराठवाड्यात होणारी सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील. सन 2016-17 ची कामे जून अखेर पर्यंत शासनाने मुदत वाढ दिली आहे. परंतू आम्ही सदर कामे ही मे अखरेपर्यत पुर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मराठवाड्यासाठी स्वतंत्र जल आयुक्तालय मंजूर करण्यात आले असून, यामुळे नक्कीच मराठवाडयास मदत होणार आहे. तसेच मराठवाडा विभागातील प्रत्येक जिल्ह्यात आढावा बैठक घेवून या योजनेसह इतर सर्व योजना राबविण्यात याव्यात यासाठी आढावा बैठक घेण्यात येत असल्याचे ही डॉ. भापकर यावेळी म्हणाले.
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी यावेळी जलयुक्त शिवार अभियान सन 2015-16, 2016-17 आणि 2016-17 बाबतची सविस्तर माहिती सादरीकरणांद्वारे दिली.
यावेळी आढावा बैठकीस विविध विभागाप्रमुखांची उपस्थिती होती.
****





















जलयुक्त शिवार अभियान आणि मागेल त्याला शेततळे योजनेतील कामे पूर्ण करा

-विभागीय आयुक्त श्री.पुरोषोत्तम भापकर
हिंगोली, दि.3: जिल्ह्यात  जलयुक्त शिवार अभियानाची कामे आणि मागेल त्याला शेततळे या योजने अंतर्गत करण्यात येणारी कामे योग्य नियोजन करुन वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.  पुरोषोत्तम भापकर यांनी दिले.
मराठवाडा विकासात्मक विविध विकास कार्यक्रम विशेष मोहिम स्वरुपात राबविण्याबाबत येथील नगर परिषदेच्या कल्याण मंडपम्म येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील महसूल, सिंचन, कृषी, पंचायत या विभागातील ग्रामस्तर ते जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आयोजित आढावा बैठक तथा कार्यशाळेत डॉ. भापकर हे बोलत होते. यावेळी सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकूळे, संतोष टारफे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर आयुक्त फड आणि सहाय्यक आयुक्त दिलीप हाके  यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. भापकर म्हणाले की, मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत शेततळे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक गावात कँम्प आयोजित करावेत. तसेच सदर कँम्प आयोजित करुन एकाच दिवशी अर्ज घेणे व त्याबाबत कार्यवाहीची पूर्तता करावी. तसेच शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहीत करण्यात यावे. मनरेगा योजनेचे स्वरुप पूर्णत: बदलले असून, मागेल त्याला काम या योजनेमार्फत कामे देण्यात येणार आहेत. मनरेगा अंतर्गत होणारी सर्व कामे ग्रामसेवक ते उपजिल्हाधिकारी स्तरीय सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी योग्य नियोजन करुन, 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे. ज्या ठिकाणी ग्रामसभा झालेल्या नसतील, त्याठिकाणी ग्रामसभेचे आयोजन करुन शासनाच्या कल्याणकारी योजना गावा-गावात पोहचविण्याचा प्रयत्न करावा. जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक तसेच अधिकारी-कर्मचारी यांनी लोकप्रतीनीधी तसेच नागरिक यांच्याशी समन्वय ठेवून कामाचे नियोजन करीत दर्जेदार कामे वेळेत पूर्ण करावीत.
तसेच रोजगार हमी योजनेच्या कामात गती वाढविण्याचे सांगून जलयुक्त शिवार अभियानातून मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यास मदत होत आहे. तसेच जलयुक्त शिवार अभियानातंर्गची आणि मागेल त्याला शेततळे या योजनेतंर्गतची सर्व काम 31 मे पर्यंत पूर्ण करावीत. स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत हागणदारीमुक्तीच्या उद्दिष्टपूर्ती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना ही डॉ. भापकर यांनी यावेळी दिल्या.

भविष्यात तीन हजार शेततळे निर्माण करुन शेतकऱ्यांना शेतीसोबत अतिरिक्त उत्पादन करण्यासाठी मागेल त्याला शेततळेतंर्गत ज्या शेततळ्यात तीन महिन्यापेक्षा जास्त किंवा सहा महिन्यांपर्यंत पाणी टिकून राहते अशा शेतकऱ्यांना मत्स्यबोटकली देण्यात येईल. या व्यवसायापासून किमान एका महिन्याला एका शेतकऱ्यास वीस ते पंचवीस हजार रुपये उत्पन्नमिळण्याचीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच प्रशासनाने नैसर्गिक आपत्ती मध्ये सुध्दा मदतीसाठी कटिबध्द राहण्याचेही आवाहन त्यांनी यावेळी केले. कृषी विभागाने जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर फळबाग शेती लागवड करण्याबाबत विशेष  कार्यक्रम राबविण्यात यावा. असेही डॉ. भापकर यावेळी म्हणाले.
यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख, ग्रामसेवक, तलाठी, तालुका कृषि अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी  विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी मुक्तपणे संवाद साधून विविध विषयावर मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या अडचणींचीही सोडवणूक केली असून सर्वांनी आता जोमाने कामाला लागावेत, असेही त्यांनी सांगितले.
तसेच ग्रामपंचायत यंत्रणांचा सहभाग वाढवून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मजूरीचे प्रदान विहीत कालावधीत करावेत. सदर प्रदाने बँक / पोस्ट ऑफिसमध्ये आधारद्वारे अदा करण्यात येणार आहे. योजनेत परिवर्तन करण्यासाठी वैयक्तिक लाभांच्या योजनावर भर व प्रत्येकाला रोजगाराची हमी , जॉबकार्ड वितरण व नुतणीकरण याबाबतही त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी सहाय्यक आयुक्त दिलीप हाके म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तुती लागवडीसाठी प्रोत्साहीत करुन त्यांना कशाप्रकारे  देता येईल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्कता आहे.  
जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, स्वच्छ भारत मिशन, वृक्षारोपन, 7/12 संगणकीकरण, स्वस्त धान्य दुकानाच्या ई-पॉज मशिन व ईपीडीएस याबाबत यावेळी डॉ. भापकर यांनी सविस्तर आढावा घेवून मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तहसीलदार श्रीमती वैशाली पाटील यांनी केले तर आभार अप्पर आयुक्त विजयकुमार यांनी मानले.
यावेळी जिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देशमुख, ग्रामीण विकास यंत्रणेचे नईम कुरेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, उपविभागीय अधिकारी विवेक काळे, तहसीलदार विजय अवधाने, तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, तहसीलदार श्रीमती वैशाली पाटील, तहसीलदार उमाकांत पारधी, तहसीलदार श्याम मदनुरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.) श्रीमती दिपाली कोतवाल, मुख्याधिकारी रामदास पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी आदि विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
****