12 December, 2017

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत हिंगोली जिल्ह्यातील 9 हजार 410 शेतकऱ्यांना 40 कोटी 85 लाख रुपयांचा कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाख



वृत्त क्र.572                                               दिनांक : 12 डिसेंबर 2017
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत
हिंगोली जिल्ह्यातील  9 हजार 410 शेतकऱ्यांना
40 कोटी 85 लाख रुपयांचा कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाख
 हिंगोली, दि. 12 :- राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा निर्णय घेऊन कर्जदार शेतकऱ्यांच्या जीवनातील दु:खाचा भार हलका करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना 1 लाख 50 हजारापर्यंत तर नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यास शासन प्रयत्नशील आहे. हिंगोली जिल्ह्यात एकूण 9 हजार  410 शेतकऱ्यांच्या खात्यात 40 कोटी 85 लाख रुपये जमा केले आहेत. जिल्ह्यात डिसेंबर 2017 पासून प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणास सुरुवात झाली असून ती आता पुर्णत्वाच्या टप्प्यात आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, एस.पी. मैत्रेवार यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यात  परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत 11 डिसेंबर 2017 अखेर 3 हजार 40 शेतकऱ्यांच्या खात्यात 5 कोटी 58 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. तर प्रोत्साहनपर लाभ स्वरुपात 737 शेतकऱ्यांच्या खात्यात 82 लाख रुपये जमा करण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यातील व्यापारी, राष्ट्रीयकृत / ग्रामीण बँकांकडून 11 डिसेंबर 2017 अखेर 1 हजार 851 शेतकऱ्यांच्या खात्यात  10 कोटी 76 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.  तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत 11 डिसेंबर 2017 अखेर  4 हजार 52 शेतकऱ्यांच्या खात्यात  23 कोटी 69 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. अशा प्रकारे  हिंगोली जिल्ह्यात एकूण 9 हजार  410 शेतकऱ्यांच्या खात्यात 40 कोटी 85 लाख  रुपये जमा केले आहेत.
            छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्रशासन बँक स्तरावरुन कर्जाची माहिती लेखापरीक्षण करुन माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची ग्रीन लिस्ट बँकांना देण्यात आली आहे. या यादीनुसार बँकेमार्फत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफी प्रोत्साहनपर लाभाची रक्कम हस्तांतरीत करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रोत्साहनपर रकमेचा लाभ बँकेकडून प्रत्यक्ष दिला जात आहे त्यांना बँकेमार्फत शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीद्वारे एसएमएस संदेश पाठविण्यात येणार आहेत.
            ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना किंवा बँकांकडून कर्जाबाबत माहिती भरताना काही त्रुटी राहिल्या आहेत अशा शेतकऱ्यांच्या माहितीची दुरुस्ती तालुकास्तरीय समितीकडून करण्यात येत असून उर्वरीत सर्व पात्र शेतकरी या योजनेपासून वंच राहणार नाही तसेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी शासन प्रशासनाकडून पूर्ण दक्षता घेण्यात येत आहे, असेही जिल्हा उपनिबंधक  श्री. मैत्रेवार यांनी सांगितले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण41 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 19 हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली असून  या योजनेंतर्गत 77 लाख अर्ज प्राप्त झाले असून  छाननीअंतर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन 69 लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली असून त्यापैकी जवळपास41 लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे 19 हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरित करण्यात आले असून जे शेतकरी पात्र होते पण अर्ज केला नाही अशा शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेणार येणार असून  शेवटच्या पात्र शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेवली जाईल. 00000

09 December, 2017

शेतमाल तारण कर्ज योजना प्रभाविपणे राबवा

                - सहकार मंत्री सुभाष देशमुख

        हिंगोली,दि.9: शासनाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ जास्तीत-जास्त शेतकऱ्यांना व्हावा यासाठी शेतमाल तारण कर्ज योजना आहे. सदरील योजना ज्या शेतकऱ्यांना माहिती नाही त्या शेतकऱ्यांपर्यंत शेतमाल तारण कर्ज योजना कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी प्रभाविपणे राबवावी असे निर्देश सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.
            येथील रामकृष्ण पॅलेस सभागृहात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत आयोजित ‘सहकार चळवळीची वाटचाल, संधी व आव्हाने’ या चर्चासत्रात सहकार मंत्री श्री. देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, औरंगाबादचे सहकारी संस्थेचे विभागीय सहनिबंधक राजेश सुरवसे, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पुढे श्री. देशमुख म्हणाले की, सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्र समृद्ध व्हावा हेच शासनाचे धोरण आहे. त्यासाठी शासन विविध स्तरावर प्रयत्न करत आहे. राज्यातील सहकारी चळवळीला चालना मिळण्यासाठी गावातील महिलांनी स्थानिक पातळीवर कौशल्याच्या आधारावर खाद्यपदार्थ, टिकविण्याचे पदार्थ तयार करून खरेदी विक्री संघामार्फत विक्री करण्याची आज गरज आहे. सहकारी संस्थांनी नाविन्यपूर्ण उपक्रमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज आहे. तसेच प्रत्येक बाजारपेठेमध्ये ज्या काही अडचणी असतील त्या तात्काळ सोडविल्या जातील ज्यामध्ये निधी स्वरुपाची असो वा गोदामाची या अडचणी तात्काळ सोडवून याची काळजी घेतील जाईल. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने 100 वर्षाची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण केली आहे. निस्वार्थपणे काम केलेल्या नेतृत्वाचा मोठा त्याग यामागे आहे. राज्य सहकारी संघासारख्या शिखर संस्थेला शासन सकारात्मक भुमिका घेऊन निश्चित मदत करेल.
            ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सहकारी संस्था या गावातील विकासाचा केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे गावातील प्रत्येक घटकाला या सहकारी सोसायट्यांशी जोडून घ्या, महसूली गावात सभासद वाढवा, ठेवी संकलन वाढवा व सेवक म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासत या सहकारी सोसायट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करा. सहकारी संस्था राजकारण विरहीत चालविल्यास सभासदांना निश्चितपणे लाभ मिळण्यास मदत होते. तसेच शासनही अशा संस्थांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील. शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेत 77 लाख ऑनलाईन अर्ज भरले. सदरील कर्जमाफी योजना पारदर्शक स्वरुपाची असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. जलयुक्त शिवार अभियानामुळे पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीत साठवला जात असल्यामुळे मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाली आहे. तसेच मुबलक वीज, मुबलक खत शेतकऱ्यांना मिळत आहे. शेतकऱ्यांनी शेतीचे व्यवस्थापन करून जमिनीचा पोत कशाप्रकारे सुधारणा करता येईल यासाठी माती परीक्षण करून घ्यावी. बोगस बियाणे कंपनीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नाफेड केंद्रामार्फत तुर खरेदी करण्यात आलेल्या रास्त भाव दुकानात 55 रुपये किलो दराने उपलब्ध आहे. त्यासाठी विविध कार्यकारी संस्थानी गावात माल उत्पादीत केल्यास बेरोजगारीचा प्रश्न सुटून त्यांना आर्थिक लाभ होण्यास देखील मदत होईल. राज्यातील अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांना सुस्थितीत असलेल्या इतर बँकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. राज्यातील सहकार टिकविण्यासाठी  शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे ही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची समयोचित भाषणे झाली.
            यापूर्वी सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी कळमनुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील  किमान आधारभूत किंमत खरेदी केंद्रात शेती माल विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
            सदर चर्चासत्राचे प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक एस. पी. मेत्रेवार यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील पणन, प्रक्रिया सहकारी संस्थां बँकाचे प्रतिनिधी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती,  सदस्य आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*****

07 December, 2017

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ



वृत्त क्र.     570
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ
        हिंगोली, दि.07: हिंगोली जिल्ह्यातील सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन-2017 कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला.
            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मनियार, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उप जिल्हा निवडणुक अधिकारी गोविंद रणवीरकर, उपजिल्हाधिकारी(सा.प्र.) श्री. बोरीकर जिल्हा उद्योग केंद्राचे श्री. पवार यांची उपस्थिती होती.
            देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी अनेक  सैनिक आपले बलिदान देतात. अशा सैनिक/माजी सैनिक यांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलनासाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा. आपले सैनिक दिवस-रात्र  आपल्या देशाच्या सिमेचे रक्षण करत असतात. म्हणूनच सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजनिधी संकलनात सहभाग घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शासकीय विभागानेही त्यांना दिलेला ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट पुर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी यावेळी केले.
            याप्रसंगी वसमत नगर परिषदेने ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 
            ध्वजदिन निधी संकलनातून माजी सैनिक, सैनिकांच्या पाल्यांसाठी शिक्षणाच्या परिपूर्तीसाठी, शिष्यवृत्ती, वसतिगृहासाठी निधी, सैनिक, माजी सैनिक, त्यांचे पाल्य यांच्या कल्याणासाठी या निधीतून विविध योजना राबविण्यात येतात. तसेच माजी सैनिकांच्या पुर्नवसनासाठी सैनिक कल्याण विभागामार्फत काम केले जाते. जिल्ह्याचा इष्टांक रुपये 28 लाख 45 हजार 400 रुपये इतका होता  यापैकी  25 लाख 5 हजार एवढा निधी जमा करण्यात आला आहे म्हणजे 88.03 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे वरिष्ठ लिपीक संजयकुमार केवटे यांनी दिली आहे .0000

सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री श्री. सुभाष देशमुख यांचा जिल्हा दौरा



वृत्त क्र.     569                                     दिनांक : 07 डिसेंबर 2017
सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री श्री. सुभाष देशमुख यांचा जिल्हा दौरा
हिंगोली,दि.07: सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना. श्री. सुभाषे देशमुख हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे . दिनांक 9 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 8.30 वाजता  कळमनुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील किमान आधारभूत  किंमत खरेदी केंद्रास भेट , सकाळी 9.00 वाजता  कळमनुरी  येथून शासकीय  विश्रामगृह हिंगोली  कडे आगमन ,  सकाळी 9.30 वाजता  शासकीय विश्रामगृह , हिंगोली येथे आगमन व राखीव , सकाळी 10.00 ते 11.30 वाजता रामाकृष्ण  पॅलेस येथील सभागृहातील  सहकार चळवळीची वाटचाल , संधी व आव्हाने  या चर्चासत्रास  उपस्थिती , सकाळी 11.30 वाजता  हिंगोली येथून शासकीय वाहनाने  आडगाव कडे प्रयाण ,दुपारी  12.00 वाजता  आ. श्री. तान्हाजी मुटकुळे , वि.स.स. यांच्या निवासस्थानी  सदिच्छा  भेट , दुपारी  1.00 वाजता  आडगाव येथून  शासकीय वाहनाने  वाशिमकडे प्रयाण.
00000

क्षयरुग्ण शोधण्यासाठी घर चलो मोहिमेस प्रारंभ

वृत्त क्र.     568                                     दिनांक : 07 डिसेंबर 2017
क्षयरुग्ण शोधण्यासाठी घर चलो मोहिमेस प्रारंभ
हिंगोली,दि.07: सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यकमांतर्गत  दिनांक 5 डिसेंबर 2017 रोजी  जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहीम 2017 बाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये  क्षयरोगाबाबत प्रथमत: आढावा घेण्यात  आला व नंतर  क्षयरुग्ण शोध मोहीम दिनांक 4 ते 18 डिसेंबर  या कालावधीत  जिल्ह्यात  प्रभावी व दर्जेदारपणे व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी भंडारी  यांनी उपस्थित वैद्यकीय  अधीक्षक , तालुका आरोग्य  अधिकारी व इतर आरोग्य कर्मचारी  यांना विशेष सूचना  दिल्या व जास्तीत जास्त  क्षयरुग्ण शोधून काढण्याकरिता आरोग्य कर्मचारी  यांनी पूर्ण क्षमतेने काम करण्याचे सूचविले .
झोपडपट्टी , ऊसतोड मजूर, विटभट्टी मजूर, रस्ते व बांधकाम  मजूर, निराधार, निराश्रीत, अनाथाश्रमे, वृध्दाश्रमे, स्थलांतरीत, नॅको ने निवडलेली जोखीमग्रस्त गावे आदी  अतिजोखमीच्या भागामध्ये  सर्व्हे होणार आहे. क्षयरोग  नियंत्रणासाठी जिल्ह्यात 1 लाख 13 हजार 345 जोखीमग्रस्त लोकसंख्येचा सर्व्हे आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत  घरोघरी जाऊन केला जाणार आहे.  क्षयरोग शोधमोहिमे दरम्यान आढळून आलेल्या संशयित क्षयरुग्णांची तपासणी  आवश्यकता असल्यास सीबीनॅट मशीनद्वारे  केली जाणार आहे .
संशयित रुग्णांचा थुंकी नमुना तपासणी व क्ष किरण तपासणी मोफत केली जाणार आहे. तरी  ज्यांना दोन आठवड्यांपासून खोकला, ताप, वजन कमी होणे , थुंकीवाटे रक्त पडणे इत्यादी लक्षणे  आढळून येणाऱ्या  व्यक्तींनी  या मोहीमेमध्ये मोफत थुंकी तपासणी  जवळच्या  सरकारी दवाखान्यात करुन घ्यावी . क्षयरोगाचे निदान झालेल्‍या  रुग्णावर मोफत  औषधोपचार केला जाणार आहे . या मोहिमेचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले आहे .
00000