07 September, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही  

तर 02 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 07 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही नाही, तर 02 रुग्णावर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 29 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 635 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 02 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 392 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******

 

सर्व यंत्रणांनी प्राप्त निधी वेळेत खर्च करावा

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


 

हिंगोली, (जिमाका) दि. 07 : जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त झालेला निधी योग्य नियोजन करुन वेळेत खर्च करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, राज्य राखीव पोलीस दलाचे महानिदेशक संदीप सिंह गिल, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पोहरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक घेऊन जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2020-2021 साठी वितरीत केलेल्या निधीतून केलेल्या कामाचा आढावा घेतला. सर्व यंत्रणांनी त्यांना मंजूर केलेली तरतूद, उपलब्ध निधी याचे योग्य नियोजन करुन सर्व कामे पूर्ण करावेत. आयपासचा शंभर टक्के वापर करावा. यासाठी नोडल अधिकारी नेमावा. तसेच गुगलशीटवर दिलेल्या निधीची माहिती देण्यात येणार आहे. याची शहानिशा करुन दिलेला निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करावा. तसेच नाविण्यपूर्ण कामाची यादी तयार ठेवावी व नाविण्यपूर्ण योजनेतील सर्व कामे झाल्याची माहिती घ्यावी. जिल्हा परिषदेकडे प्रलंबित असलेला निधी तात्काळ खर्च करावा. कोणताही दिलेला निधी शासनाकडे परत जाणार नाही याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. कोणत्या योजनांवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे हे पहावे. एकमेकाशी समन्वय ठेवून निधी खर्च करण्याबाबत युध्दपातळीवर कार्यवाही करावी व त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन कारवाई करण्यात येईल, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

तसेच सन 2021-22 साठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनाच्या खर्चाचा प्रस्ताव योग्य नियोजन करुन सादर करावा. शासनाने 2021-22 साठी 30 टक्के निधीचा कट लावलेला आहे. त्यामुळे त्यानुसार सर्व यंत्रणांनी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिल्या.

 या बैठकीत आरोग्य विभाग, महावितरण विभाग, शालेय शिक्षण विभाग, जलसंधारण, तीर्थस्थळ, पर्यटन स्थळ यासह सर्वसाधारण वार्षिक योजना, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उपयोजनेतंर्गत नाविन्यपूर्ण योजना, केंद्र पुरस्कृत योजनांसाठी झालेल्या खर्चाचा व नियोजित खर्चाचा आढावा घेतला.

यावेळी विविध विभागाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

****

 

घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्याचे वितरण करावे

                            --- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


 

हिंगोली (जिमाका), दि. 07 : सध्या शाळा सुरु नसल्यामुळे जंतनाशक गोळ्याचे वितरण आशा, अंगणवाडी, तसेच आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रत्येक घरी भेटी देऊन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी परशुराम पावसे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय जंतनाशक दिन दि. 21 सप्टेंबर, 2021 रोजी साजरा करण्यात येत आहे. या दिनांचा आढावा घेताना मुलांचे आरोग्य, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी बालकांना घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्याचे वितरण करावे. तसेच प्रत्येक शाळेत, सार्वजनिक ठिकाणी हात धुण्याची मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी केल्या.

यावेळी जिल्हा‍ आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जंतनाशक गोळ्याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगात 28 टक्के बालकांना जंत दोष असतो. 68 टक्के बालकामध्ये आतड्याचा जंत दोष मातीतून प्रसार होणाऱ्या जंतुमुळे होतो. त्यामुळे 01 ते 19 वर्ष या वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगून ही मोहीम आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, शिक्षण विभाग, नागरी विकास, महिला व बालविकास विभाग, पंचायत राज विभाग, जंतनाश करण्याचा जागतिक उपक्रम व पार्टनर्स यांचा सहभाग असणार असल्याची माहिती दिली.

 

*****

 

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीचा

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडून आढावा


 

हिंगोली, (जिमाका) दि. 07 : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची माहे एप्रिल ते जून 2021 या कालावधीची आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली . यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पोहरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील एचआयव्ही, एडस रुग्णांना सुविधा पुरविणाऱ्या केंद्राची तसेच जिल्हा एड्स प्रतिबंध समितीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती घेऊन सूचना केल्या. तसेच एप्रिल ते जून, 2021 या कालावधीत केलेल्या कार्यक्रमाचा, अशासकीय संस्था विहाण व लक्षगट हस्तक्षेप प्रकल्पाचा आढावा घेतला. संजय गांधी दुर्धर आजार अंतर्गत अल्प उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळवून देण्याबाबत चर्चा केली. साखर कारखाना कामगारांची तपासणी शिबीरे घेऊन तपासण्या कराव्यात. जिल्ह्यात सर्व सोयींनी युक्त असे एआरटी सेंटर उभारण्यात आले आहे. या एआरटी सेंटरच्या माध्यमातून आपला जिल्ह्याचा ग्रेडींग वाढवून जिल्हा एड्समुक्त करावा. तसेच बालसंगोपन योजनेचे प्रस्ताव त्वरित निकाली काढावेत , अशा सूचना केल्या.

यावेळी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीचे कार्यक्रम व्यवस्थापकांनी सादरीकरणाद्वारे एड्सबाबत, माता व बालसंगोपन व क्षयरुग्णांसाठी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. 

या बैठकीस जिल्हा महिला व बालविकास विभाग, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा मूल्यमापन व सनियंत्रण अधिकारी, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी, एआरटी केंद्राचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, जिल्हा कामगार अधिकारी, डापकू व एनआरएचएमचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक यांची या बैठकीस उपस्थिती होती.

****

 

हिंगोली नगर परिषदेचे नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतर

नागरिकांनी बदलाची नोंद घेण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 07 : येथील नगर परिषदेचे नवीन प्रशासकीय इमारत बांधली असून त्याचे अनावरण नुतकेच झाले आहे. या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये हिंगोली नगर परिषद दि. 3 सप्टेंबर, 2021 पासून  स्थलांतर करण्यात आले आहे. त्याचा नवीन पत्ता : मुख्याधिकारी, हिंगोली नगर परिषद, जिल्हा परिषद कार्यालय इमारतीच्या बाजूला, नांदेड रोड, हिंगोली ता.जि. हिंगोली पिन कोड-431513 असा आहे.

या बदलाची नागरिकांनी  नोंद घ्यावे, असे आवाहन हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी केले आहे.

 

******

 

इसापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने

पैनगंगा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 07 : पैनगंगा नदीवरील इसापूर धरण दि. 7 सप्टेंबर, 2021 पर्यंत 90.10 टक्के भरले आहे. धरणाची पाणी पातळी 439.98 मीटर आहे. सद्यस्थितीत इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याचा येवा होत आहे. त्यामुळे जलाशय पाणी पातळीत वाढ होत आहे. पाण्याचा येवा पाहता इसापूर धरणाचा मंजूर जलाशय प्रचालन आराखड्यानुसार दि. 15 सप्टेंबर, 2021 पर्यंत 440.85 मीटर ठेवावी लागणार आहे. धर सुरक्षिततेच्या दृष्टीने इसापूर धरणातून वक्रदाराद्वारे कोणत्याही क्षणी धरणात येणारे अतिरिक्त पाणी पेनगंगा नदीपात्रात  सोडावे लागेल. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवित व वित्त हानी होऊ नये म्हणून पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावेत, असे आवाहन कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1, नांदेड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

*****

 

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

नागरिकांनी पूर परिस्थतीत काळजी व खबरदारी घेण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 07 भारतीय हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत झालेला जोरदार पाऊस, येलदरी, सिद्धेश्वर व इसापूर धरणाची पाणी पातळी आणि पूर्णा, पैनगंगा आणि कयाधू नदीची तसेच लहान , मोठ्या ओढ्यातून वाहत असलेले पाणी यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठ्या पावसामुळे कयाधू, पूर्णा व पैनगंगा नदी तसेच जवळील नाले, ओढे काठच्या गावांना पुरस्थिती उद्भवू शकते अशा गावांसाठी खालीलप्रमाणे उपाययोजना व खबरदारी घेण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

काय करावे :

१)        गावात पुरस्थिती निर्माण झाल्यास अथवा होण्याची शक्यता असल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा.

२)        गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ तहसील, पोलीस, नगर पालिका प्रशासनास कळवावे.

३)        गावात, घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या.

४)        पूर स्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जाते वेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवावेत. घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करुन जावे.

५)        पूर स्थिती असेपर्यंत पाळीव प्राणी, जनावरे उंच ठिकाणी बांधण्यात यावीत. चुकूनही पाळीव प्राणी, इतर जनावरे यांना नदी काठी, ओढ्या काठी बांधू नये. 

६)        कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र राहील याची काळजी घ्या.

७)        पुरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करा), कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. पूर स्थितीत घाबरुन जाऊ नका, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.

काय करु नये :

१)      पुर असलेल्या भागात, नदीच्या पुलावर विनाकारण भटकू नका.

२)      पुराच्या पाण्यात चुकूनही जावू नका, तसेच पूर आल्यानंतर पुलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करु नका.

३)      दूषित, उघड्यावरील अन्न पाणी टाळा. (शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा.)

४)      सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत तारांना स्पर्श करु नका.

५)      पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतु अपरिचीत व खोल पाण्यात जाऊ नका.

६)      पूर परिस्थितीत नदी, नाले, पूल, धरण इत्यादी ठिकाणी विनाकारण गर्दी करू नका.

****