05 April, 2023

 

उष्माघातात नागरिकांनी स्वत:चा बचाव करावा

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन


हिंगोली (जिमाका), दि. 05 : उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी व स्वत:चा बचाव करण्यासाठी  खालील उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

काय करावे :-

  •  उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडीओ, टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.
  •  तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.
  • हलकी, पातळ व सचिद्र सूती कपडे वापरावेत. बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, हॅट, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा.
  • प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी.
  • जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल तर हॅट किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.
  • शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा वापर नियमित करण्यात यावा.
  • अशक्तपणा, स्थूळपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
  •  गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.
  • घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात  यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.
  •  कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.
  • पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.

काय करु नये  :-

  • लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी 12.00 ते 3.00 या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
  • बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. तसेच दुपारी 12.00 ते 3.00 या कालावधीत बाहेर काम करण्याचे टाळावे.
  • उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. (तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.)
  • शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय इ. यांचा वापर टाळावा.
  • शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने (Proteins) असलेले अन्न टाळावे.

*****

 

वादळी वाऱ्यासह पावसाच्या शक्यतेचा हवामान खात्याचा इशारा 

नागरिकांनी खबरदारी घ्यावी : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 05 : भारतीय हवामान विभागाने दि. 6 एप्रिल ते दि. 8 एप्रिल, 2023 या कालावधीत मराठवाड्यात हिंगोलीसह काही जिल्ह्यामध्ये पावसाच्या शक्यतेचा इशारा व वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. दरवर्षी अंगावर वीज पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मरण पावतात अथवा दुर्घनाग्रस्त होतात. त्यामुळे कोसळणाऱ्या विजेपासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी खालीलप्रमाणे खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.  

                           

आकाशात विजा चमकत असल्यास हे करा :

1)      आकाशात विजेचा कडकडाट होत असताना शेतकऱ्यांनी तसेच नागरीकांनी तात्काळ शेताजवळील घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पोहणारे, मच्छीमारी करणाऱ्यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे.  

2)     जवळ आसरा नसेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा. तसेच विजेपासून बचावासाठी दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे गुडघ्यामध्ये झुकवा व डोके जमिनीवर टेकणार नाही याची काळजी घ्या.

3)      झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे.

4)    वीजवाहक वस्तूपासून दूर रहा, उदा. विजेचे खांब, टेलीफोन खांब, लोखंडी पाईप ई. पासून दूर राहावे.

5)     वीज पडल्यास प्राथमिक उपचारासाठी मुख्यतः हृदय व श्वसन प्रकियेत अडथळा येतो. त्यामुळे विद्युतघात झाल्यास लगेच हृदयाच्या बाजूने मालीश करावी. तोंडाने श्वसन प्रक्रियेस मदत करावी.

6)     विजा चमकत असल्यास संगणक, विद्युत उपकरणे बंद करुन ठेवावीत.

7)     वादळी वाऱ्यासह, पावसाची शक्यता देखील असल्याने शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी यानुसार आपापल्या कामाचे नियोजन करावे.

 

आकाशात विजा चमकत असल्यास हे करु नका :

1)      पाण्याचे नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करु नका. बाहेर असाल तर भ्रमणध्वनी तात्काळ बंद करावा.   

2)     विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका. झाडाखाली आश्रय घेऊ नका.

3)      दोन चाकी, सायकल यावर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जा.

4)    धातूची कांडी असलेल्या छत्रीचा वापर करु नका. 

 

*******

03 April, 2023

 

महाज्योतीच्या वेबसाइटला 2022-23 या वर्षामधे दिली 30 लाख विद्यार्थ्यांनी भेट

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 : महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक विचारकार्याला स्मरुन आधुनिक समाज निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत महराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती – भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात.

यात पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजना, जेईई, नीट, एमएचटी-सीईटी परीक्षा प्रशिक्षण योजना. एम.पी.एस.सी. परीक्षा प्रशिक्षण योजना, यु.पी.एस.सी. परीक्षा प्रशिक्षण योजना, यु.पी.एस.सी. नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी आर्थिक सहाय्य योजना, कमर्शिअल पायलट प्रशिक्षण योजना, पीएच.डी. करणाऱ्या उमेदवारांना अधिछात्रवृत्ती योजना, एम.फिल. करणाऱ्या उमेदवारांना अधिछात्रवृत्ती योजना, कौशल्य विकास योजना या योजनांचा समावेश आहे.

या सर्व योजनांची विस्तृत माहिती महाज्योतीच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. 2022-23 या वर्षात तब्बल 30 लाख विद्यार्थ्यांनी या वेबसाईटला भेट दिली आहे आणि सदर योजनांचा लाभ करुन घेतला आहे. महाज्योतीच्या WWW.mahajyoti.org.in या वेबसाइटवर योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. आपल्या वैयक्तिक विकासासाठी, शैक्षणिक प्रगतीसाठी महाज्योतीच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केलेले आहे.   

*****

 




हिंगोलीत जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रम संपन्न

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 : नेहरु युवा केंद्र युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकारच्या वतीने शासकीय तंत्रनिकेतन येथे दि. 28 मार्च रोजी जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हा जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय युवक व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या संकल्पनेतून जी-20 अध्यक्षपद भारताने मिळवत वसुधैव कुटुंबकम च्या माध्यमातून एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य ही भावना समोर ठेवून जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय हे होते. यावेळी जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, शासकीय तंत्रनिकेतनचे माजी पाचार्य प्रकाश पोपळे, जी-20 आणि इंटरनॅशनल मिलेट्स या विषयावर व्याख्याता म्हणून उपस्थित असलेले शिवाजी महाविद्यालयाचे डॉ.सुधीर वाघ उपस्थित होते.

नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी डॉ.आशिष पंत यांनी भारताला मिळालेल्या जी-20 आणि पौष्टिक तृणधान्ये वर्षाबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर भारत हा एक लोकशाही असलेला देश आहे. या देशाला आपले योगदान देणे गरजेचे आहे. यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे उपस्थित युवकांना सांगितले. डॉ. सुधीर वाघ यांनी भारताचे जी-20 मध्ये अध्यक्षपद त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाबद्दल माहिती दिली . जी-20 मध्ये भारताचे अध्यक्षपद जगाला कशा प्रकारे दिशादर्शक ठरेल. त्याचप्रमाणे भारताने आजपर्यंत प्रगतीची गाठलेली विविध शिखरे भारताला महासत्ताक बनवेल, असे सांगितले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अशोक उपाध्याय यांनी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष, पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व, पोष्टिक तृणधान्यामुळे शेतकऱ्यांना व पर्यावरणाला होणारे फायदे याबद्दल युवकांना मार्गदर्शन केले.

तसेच काही युवकांनी पडोस युवा संसद कार्यक्रमांमध्ये मनोगत व्यक्त केले. यामध्ये जी-20 या विषयावर चेतन साठे, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य या विषयावर पुष्यमित्र जोशी यांनी युवकांना संबोधित केले. माजी प्राचार्य प्रकाश पोपळे यांनीही युवकांना माहिती दिली.

या जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रमात युवकांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन केले. नृत्याविष्कार व सांस्कृतिक कार्यक्रमामुळे या कार्यक्रमास चांगलीच रंगत आली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रजल्वन करुन करण्यात आले. यावेळी विविध कलाविष्कार सादर करणाऱ्या युवकांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नेहरु युवा केंद्राचे तालुका युवा समन्वयक प्रवीण पांडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहरु युवा केंद्राचे सर्व तालुका समन्वयक व शासकीय तंत्रनिकेतनचे तानूरकर व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

*****

 

 

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-प्रती थेंब अधिक पिक

हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात 10 हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी घेतला लाभ

·        6 हजार 719 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 : शेती हा व्यवसाय अधिक फायदेशीर व्हावा, शेतकऱ्यांची जोखीम कमी व्हावी तसेच आधुनिक कृषी तंत्राला प्रोत्साहन मिळण्यासाठी खात्रीपूर्वक व संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये सन 2015-16 पासून ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ समाविष्ट केली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतास पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे हा या योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-प्रती थेंब अधिक पिक ही केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यात येत आहे.

सन 2014-15 पर्यंत केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना 80:20 (केंद्र 80 टक्के व राज्य 20 टक्के) या प्रमाणात राबविण्यात येत होती. केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र व राज्य हिश्श्याच्या अर्थसहाय्याचे प्रमाण 60:40 निश्चित केलेले आहे.

प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेचा अत्यल्प व अल्प भूधारक अनुक्रमे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग शेतकरी व सर्वसाधारण या प्राधान्यक्रमानुसार लाभ घेता येते.

योजनेची उद्दिष्ट्ये :

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे. जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे. कृषी उत्पादन आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वृद्धी करणे. समन्वयित पद्धतीने विविध योजनांची अंमलबजावणी करणे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषि व फलोद्यानाचा विकास करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती विकसित करणे, त्याची वृद्धी व प्रसार करणे. कुशल व अर्धकुशल बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे ही प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेची उद्दिष्टे आहेत.

योजनेत अंतर्भूत घटक :

ठिबक सिंचन : इन लाईन, ऑऊटलाईन, सबसरफेस, मायक्रोजेट, फॅनजेटस हे घटक अंतर्भूत आहेत .
तुषार सिंचन : सुक्ष्म तुषार संच, मिनी तुषार संच, पोर्टेबल स्प्रिंकलर (हलविता येणारे तुषार संच) व रेनगन.सेमी परमनंट इरिगेशन सिस्टीम या घटकाचा समावेश आहे.

अनुदान मर्यादा :

अवर्षणप्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी अनुदानाची मर्यादा 55 टक्के आहे, तर सर्वसाधारण भूधारकांसाठी 45 टक्के आहे.

गेल्या दोन वर्षात 10 हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी घेतला लाभ :

हिंगोली जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषि सिंचन योजने अंतर्गत ठिबक सिंचन व तुषार सिंचन संच मिळविण्यासाठी सन 2021-22 मध्ये 5701 महाडीबीटी पोर्टलव्दारे  सहभाग नोंदवलेला आहे. त्यापैकी 5579 लाभार्थ्यांना 977.82 लाख रुपये अनुदान अदा करण्यात आले आहे. यामुळे 3643.51 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले आहे.

तसेच सन 2022-23 मध्ये 8035 लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलव्दारे  ऑनलाईन सहभाग नोंदवला आहे. त्यापैकी 4711 लाभार्थ्यांनी खरेदी करुन संच कार्यान्वित केलेले आहेत, त्यापैकी 1723 लाभार्थ्यांना 358.28 लाख रुपये अनुदान अदा करण्यात आले आहे. यामुळे  3076 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली  आले आहे.

प्रधान मंत्री कृषि सिंचन योजनेत सन 2021-22 मध्ये 5579 आणि सन 2022-23 मध्ये 4711 असे एकूण 10 हजार 290 शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून यामुळे 6 हजार 719 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले आहे,

या योजनेमध्ये राज्य शासनामार्फत अल्प व अत्यल्प भूधारकांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत 25 टक्के व इतर शेतकऱ्यांना 30 टक्के इतके पूरक अनुदान देण्यात येते. अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना 75 ते 80 टक्के अनुदान उपलब्ध होत आहे. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेच्या माध्यमातून सन 2021-22 व सन 2022-23 या वर्षामध्ये सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील 5714 शेतकऱ्यांना 5 कोटी 3 लाख इतके पूरक अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी दिली आहे.  

****

 

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 5 एप्रिल रोजी

जागेवरच निवड संधी मोहिमेचे आयोजन


हिंगोली (जिमाका), दि. 03 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्यामार्फत           दि. 5 एप्रिल, 2023  रोजी हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळावा यासाठी जागेवरच निवड संधी ही मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी  जागेवरच निवड संधी ही मोहिम चालू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील खाजगी संस्था, बँक, कंपन्यामध्ये असलेल्या रिक्त पदासाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना कामाची संधी दिली जाते. जास्तीत जास्त उद्योजकांनी आपली रिक्त पदे या कार्यालयास कळवितात. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3, दुसरा माळा, हिंगोली येथे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी जागेवरच निवड संधी माहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या महिन्याच्या पहिल्या बुधवारी दि. 5 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत बन्सल कोचिंग क्लासेस, हिंगोली या आस्थापनाचे उद्योजक उपस्थित राहणार आहेत. या आस्थापनेवरील टेलीकॉलर ची 4  महिलांची पदे, अकाऊंटंट- 2, रिेशेप्श्ननिस्ट-1 महिला, बॅच कॉर्डिनेटर-1, ॲकॅडमिक हेड-1, ऑफिस बॉय/सफाईगार-4 पदे भरण्यात येणार आहेत. टेलीकॉलर पदासाठी शैक्षणिक पात्रता बी.एस्सी पदवी/डी.एड, अकाऊटंट पदासाठी बी.कॉम, टॅली, डीटीपी 1 वर्ष अनुभव, रिसेप्शनिस्ट पदासाठी पदवी, बॅच कॉर्डिनेटर पदासाठी बीएस्सी, ॲकेडमिक हेड साठी एम.एसस्सी बी.एड 1 वर्ष अनुभव, ॲकेडमिक हेड या पदासाठी एम.एससी बी.एड 1 वर्ष अनुभव, ऑफिस बॉय/सफाईगार पदासाठी  दहावी/बारावी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

जिल्ह्यातील दहावी, बारावी, पदवी व पदवीधर या शैक्षणिक आर्हतेनुसार 13 रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.inwww.ncs.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन नोंदणी करुन स्वत: मूळ कागदपत्रासह जिल्हा विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3, दुसरा माळा, हिंगोली येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा 7385924589 या भ्रमणध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

*****

 

हिंगोली जिल्हा न्यायालयात 30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 : येथील जिल्हा न्यायालयात व त्या अंतर्गत येणाऱ्या विविध न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक 30 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोकअदालतीमध्ये भूसंपादन व मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तडजोड युक्त फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, वैवाहिक/ कौटुंबिक वाद प्रकरणे, पराक्रम्य अभिलेख अधिनियमचे कलम 138 खालील प्रकरणे, नगर परिषद, विद्युत महावितरण कंपनी, बँक व पतसंस्थांचे वादपूर्व प्रकरणे इत्यादी खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेत.  ही सर्व प्रकरणे आपआपसातील तडजोडीद्वारे निकाली काढता यावीत. यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकार मंडळींनी उपस्थित राहून फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आर. व्ही. लोखंडे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अमोल जाधव यांनी केले आहे.

*****