05 September, 2023

 

सेनगाव येथील रोजगार मेळाव्यात 274 बेरोजगार उमेदवारांची केली प्राथमिक निवड

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 05 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर (एनसीएस) हिंगोली व सेनगाव येथील तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि. 1 सप्टेंबर, 2023 रोजी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी सेनगाव येथील तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा व पदवी तसेच पदवीधारक पात्रतेचे 533 उमेदवार उपस्थित होते. या 533 उमेदवारांपैकी 274 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.  

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. तळणीकर हे होते, तर प्रमुख पाहूणे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व्ही. पी. रांगणे, तसेच प्रमुख उपस्थिती आयटीआय हिंगोलीचे प्राचार्य आर. व्ही. बोथीकर हे होते.

यावेळी सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी महारोजगार मेळावा आयोजनामागील हेतू विशद करत युवकांनी मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवून संधीचे सोने केले पाहिजे, असे सांगून याबरोबरच उद्योजक आपल्या दारी या उक्तीचा देखील उच्चार केला. सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यासाठी व करिअर निवडावे याबाबत नॅशनल करिअर सेंटरची स्थापना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली या कार्यालयात करण्यात आले असल्याचेही डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील नामांकित कंपनीचे उद्योजक उपस्थित होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती उमेदवारांना देण्यात आली. यावेळी  जिल्ह्यातील विविध महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. टी. यु. केंद्रे यांनी केले. तर डॉ. एस. आर. पजई यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे कर्मचारी तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हिंगोली कार्यालयाचे म. ना. राऊत, अ.अ.घावडे, ना.ज.निरदुडे, र.ला. जाधव यांनी परिश्रम घेतले.   

 

*****

04 September, 2023

 

हिंगोली जिल्हा न्यायालयात 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 04 : येथील जिल्हा न्यायालयात व त्या अंतर्गत येणाऱ्या विविध न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक 9 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोकअदालतीमध्ये भूसंपादन व मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तडजोड युक्त फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, वैवाहिक/ कौटुंबिक वाद प्रकरणे, पराक्रम्य अभिलेख अधिनियमचे कलम 138 खालील प्रकरणे, नगर परिषद, विद्युत महावितरण कंपनी, बँक व पतसंस्थांचे वादपूर्व प्रकरणे इत्यादी खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेत.  ही सर्व प्रकरणे आपआपसातील तडजोडीद्वारे निकाली काढता यावीत. यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकार मंडळींनी उपस्थित राहून फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश-1 तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आर. व्ही. लोखंडे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अमोल जाधव यांनी केले आहे.

*****

01 September, 2023

 

सोयाबीन पिकावरील कीड व्यवस्थापनाबाबत

वडगाव येथील शेतीशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन



 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 01  :  येथील कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तोंडापूर येथील कयाधू फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत सोयाबीन पिकावर शेतकरी शेतीशाळा आज वडगाव  येथे घेण्यात आली.

ही शेतीशाळा स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड, तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राचे मृदशास्त्रज्ञ एस. पी. खरात व पुरवठा व मूल्य साखळीतज्ञ गणेश कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.

यावेळी शेतीशाळेत सोयाबीन पिकावरील कीड, रोग व त्यावरील उपाय, फवारणी करताना संरक्षण किटचा वापर करणे, एकात्मिक अन्नद्रव्य व एकात्मिक कीड व्यवस्थापन, स्मार्ट प्रकल्प अंतर्गत हवामान अनुकूल पद्धती वापर व प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन ए.एस.निकम, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक रमेश सरनायक व शेतकरी हजर होते. 

*****

 

कळमनुरी तालुक्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व युवतीसाठी

डीटीपी, टॅली या विषयावर मोफत प्रशिक्षणाचे आयोजन

4 सप्टेंबर पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 01  :  येथील जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने कळमनुरी तालुक्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व युवतीसाठी डीटीपी, टॅली या विषयावर मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी उमेदवार हा किमान 08 वी पास असावा, वय 18 ते 45 वर्षे यादरम्यान असावे. तसेच जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, टीसी, गुणपत्रक, बँक पासबूक जमा करुन आपली नाव नोंदणी दि. 4 सप्टेंबर, 2023 पर्यंत करावेत. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी समाधान मोरे, कार्यक्रम आयोजक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. के. कादरी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे.    

***** 

 

हिंगोली तालुक्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व युवतीसाठी

डीटीपी, टॅली या विषयावर मोफत प्रशिक्षणाचे आयोजन

8 सप्टेंबर पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 01  :  येथील जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने हिंगोली तालुक्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व युवतीसाठी डीटीपी, टॅली या विषयावर मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी उमेदवार हा किमान 08 वी पास असावा, वय 18 ते 45 वर्षे यादरम्यान असावे. तसेच जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, टीसी, गुणपत्रक, बँक पासबूक जमा करुन आपली नाव नोंदणी दि. 8 सप्टेंबर, 2023 पर्यंत करावेत. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी सुभाष बोरकर, कार्यक्रम आयोजक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. के. कादरी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे.    

***** 

 विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी

विजयकुमार जोशी यांची बिनविरोध निवड




हिंगोली (जिमाका), दि. 01 : लातूर विभागीय अधिस्वीकृती समिती - २०२३ ची पहिली बैठक आज लातुरच्या शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार विजयकुमार जोशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. लातूर जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. 

या बैठकीस माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लातूर विभागाच्या उपसंचालक डॉ.सुरेखा मुळे, विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य सर्वश्री अमोल अंबेकर, अझरोद्दीन रमजान शेख, नरसिंह घोणे, प्रल्हाद उमाटे, यांच्यासह नांदेड जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, उस्मानाबाद जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, हिंगोली जिल्हा माहिती अधिकारी अरूण सूर्यवंशी, लातूर विभागीय माहिती कार्यालयाचे सहायक संचालक डॉ. श्याम टरके, माहिती अधिकारी तानाजी घोलप, उपसंपादक रेखा गायकवाड आदी उपस्थित होते.

उपसंचालक डॉ.मुळे यांनी नवनियुक्त अध्यक्ष श्री. जोशी व समिती सदस्यांचे शाल, पुष्पगुच्छ, ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. अधिस्वीकृती समितीचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. जोशी यांनी शासकीय अधिकारी व समिती सदस्यांच्या समन्वयातून अधिकाधिक पत्रकारांना न्याय देऊ. विभागीय अधिस्वीकृती समितीवर माझी पहिल्यांदाच निवड झाली. सर्व समिती सदस्यांच्या परस्पर सहकार्यातून सकारात्मकदृष्टीने काम करण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला. पात्र असलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासाठी समिती सदैव तत्पर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. समितीचे सदस्य श्री. उमाटे, श्री. शेख यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

*****

31 August, 2023

 

जिल्हा प्रशासनाला व्यसनमुक्तीचे बंधन

नशाबंदी मंडळाचा उपक्रम

 



 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : व्यसनमुक्तीचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या राज्यव्यापी नशाबंदी मंडळाच्या वतीने जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी तथा नशामुक्त भारत अभियान समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांना रक्षाबंधन दिनानिमित्त बुधवार, दि. 30 ऑगस्ट रोजी व्यसनमुक्ती राखी बांधण्यात आली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नशामुक्त भारत अभियान अंतर्गत जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद आणि नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्तीच्या प्रसारार्थ रक्षाबंधन उपक्रम राबविण्यात आले.

व्यसनांना आळा घालणे तसेच व्यसनींचे मत परिवर्तन करुन त्यांना निर्व्यसनी बनविण्याचा उपक्रम सुरु आहे. रक्षाबंधन हा कठीण काळात साथ देणाऱ्या, रक्षण करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानण्याचा दिवस आहे. रक्षाबंधनाचा मुख्य गाभा म्हणजे रक्षण, संरक्षण करणाऱ्यांना अभिवादन करणे, त्यांचे आभार मानणे हा आहे. रक्षाबंधन या उत्सवामध्ये एक प्रकारची बांधिलकी आहे. जी बांधिलकी जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने अभिप्रेत करते आणि म्हणूनच हे असे बंधन आहे. जे सातत्याने व्यसनांपासून रक्षा करण्याची यथोचित मागणी करते. महाराष्ट्र शासनाचे व्यवसनमुक्ती धोरण अधिक सक्षमपणे राबविण्यासाठी रक्षाबंधनानिमित्त नशाबंदीमंडळाच्या वतीने विनंती करण्यात आली. या उपक्रमात नशाबंदी मंडळाच्या जिल्हाध्यक्षा शुभदा सरोदे, जिल्हा संघटक विशाल अग्रवाल, अनुप्रिता भाले, अनिता चोंढेकर, ज्योती काथळकर, आर.एस.गडगिळे आदीनी सहभाग घेतला.

रक्षाबंधनानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांना विविध घोषवाक्यांच्या माध्यमातून रक्षाबंधनाचा उपक्रम राबविल्याबद्दल नशाबंदी मंडळ आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे सहायक आयुक्त समाज कल्याण तथा नशामुक्त भारत अभियान समितीचे सचिव आर. एच. एडके यांनी कौतूक केले.

 

*****