05 April, 2025
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महत्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी करावी
हिंगोली (जिमाका), दि. 05 : जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीची बैठक पोलीस अधीक्षक यांच्या दालनात नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करुन निर्णय घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्या निर्णयांची अंमलबजावणी दि. 30 एप्रिल, 2025 पर्यंत करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व स्कूलबस चालक व मालक तसेच शाळा व्यवस्थापनांनी शाळेत मुलांची ने-आण करणारी बस व इतर वाहने मुलांकरिता सुरक्षित राहतील यांची खबरदारी शाळेने घ्यावी. प्रत्येक बस व इतर वाहनात सीसीटीव्ही असणे अनिवार्य करण्यात यावे. शाळेच्या बसमध्ये सहा वर्षाखालील मुलांना ने-आण करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. तसेच मुली असणाऱ्या शाळांतील वाहनांमध्ये महिला कर्मचारी बंधनकारक असावेत. चालक, वाहक, मदतनीसांची पोलीस विभागाकडुन चारित्र्य पडताळणी करुन घ्यावी. मुलांच्या सुरक्षेसाठी शाळांमार्फत ॲप तयार करून त्यामध्ये जीपीएस बसवावेत. मुले घरातून निघून शाळेत व घरी सुरक्षित पोचल्याची नोंद पालक करु शकतील. शाळा प्रशासन व पालक हे मुलांच्या सुरक्षिततेबद्दल जागरुक राहु शकतील. यामुळे मुले कोणत्याही कारणास्तव शाळेत पोचली नाहीत किंवा घरी पोचली नाही तर सूचना, अलर्ट देवून लगेच त्याला शोधण्याची कार्यवाही सुरु करता येईल.
त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व स्कूलबस चालक व मालक तसेच शाळा व्यवस्थापनांनी महत्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी 30 एप्रिल, 2025 करावी, अशा सूचना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल गावडे यांनी केले आहे.
******
पिंपळखुटा येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी घेतली भेट
• शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधितांना दिल्या सूचना
हिंगोली (जिमाका), दि. 05 : पिंपळखुटा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी राजू गताडे यांच्या कुटुंबियांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी राजू गताडे यांच्या कुटुंबास ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी नुकतीच त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार श्रीकांत भूजबळ, गटविकास अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व महसूल अधिकारी उपस्थित होते.
अँड. निलेश हेलोंडे पाटील यांनी गटविकास अधिकारी यांना सदरील कुटुंबात गोठा अथवा मोसंबीची शेती (फळबाग) करण्यासाठी आवश्यक अनुदान तसेच घरकुलासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पशुसंवर्धन विभागाने अनुदान तत्त्वावर लहान व मोठे जनावरे उपलब्ध करून द्यावेत. महिला व बाल विकास अधिकारी यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारस मुलांना प्रोत्साहन पर भत्ता मिळवून द्यावा, तहसीलदार यांनी तालुका मुख्यालय येथे आरसेटी प्रकल्पांतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी आवश्यक त्या कोर्समध्ये प्रवेश मिळवून देण्याबरोबरच शासनाच्या सर्वं योजनांचा लाभ त्या कुटुंबास मिळवून देण्याची खबरदारी बाळगावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
यावेळी आत्महत्याग्रस्त कुटुंबास आतापर्यंत संजय गांधी, विधवा निवृत्ती वेतन योजना, रास्त भाव दुकानदारामार्फत पिवळे रेशन कार्ड अंतर्गत धान्य वाटप, आत्महत्याग्रस्त कुटुंबास देण्यात येणारे सानुग्रह अनुदान एक लाख रुपयाचे वितरण, पीएम किसान तसेच लाडकी बहीण योजना इत्यादींचा लाभ देण्यात आल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले.
******
03 April, 2025
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 03 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ 6 महिन्याऐवजी 11 महिने करण्यात आला आहे. या योजनेंतर्गंत प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन डीबीटीद्वारे ऑनलाईन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ 11 महिने केल्यामुळे दि. 10 मार्च, 2025 किंवा त्यापूर्वी सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना उर्वरित पाच महिने कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या वाढीव पाच महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छूक उमेदवारांची आधार पडताळणी व आवश्यक कागदपत्रे (आधार, शैक्षणिक पात्रता, वय, अधिवास प्रमाणपत्र इ.) तपासणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे योजनेच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील प्रतिज्ञापत्राचा नमुना प्रशिक्षणार्थी व आस्थापना यांनी संबंधित सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयास सादर करणे अनिवार्य आहे. यापुढे आधार सीडेड डीबीटी होऊ शकेल. त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी बँक खाते आधार सीडींग करुन घ्यावेत.
या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी घेण्यास इच्छुक असणाऱ्या आस्थापनांची शासन निर्णयानुसार कार्य प्रशिक्षणार्थी सामावून घेण्याची क्षमता, आवश्यक कागदपत्रांची तपासणी, पडताळणी करुनच उमेदवारांना आस्थापनेवर रुजू करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि. 10 मार्च, 2025 च्या शासन निर्णयानुसार आधार व कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी रुजू करुन घेण्यात येणार नाही. तसेच प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांची नोंदणी आधार पडताळणी अनिवार्य आहे. आधार लिंक असलेले बँक खाते क्रमांकच योजनेच्या विद्यावेतन डीबीटीसाठी नमूद करणे आवश्यक आहे.
सर्व इच्छुक कार्य प्रशिक्षणार्थी उमेदवार आणि आस्थापनांनी आधार पडताळणी, कागदपत्रे तपासणीसाठी आपल्या जिल्ह्याचे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी दि. 30 एप्रिल, 2025 पर्यंत संपर्क साधून आवश्यक ती तपासणी करुन घ्यावी. याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक 02456-224574 किंवा 9767213394, 7276459839 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.
*****
पेहणी जिल्हा परिषद शाळेत बाल संसदेची स्थापना
हिंगोली (जिमाका), दि. 03 : हिंगोली तालुक्यातील पेहणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चाईल्ड हेल्पलाईन 1098 मार्फत "बाल संसद" स्थापन करून त्याबाबत जनजागृती करण्यात आली.
"बाल संसद" म्हणजे मुलांची संसद, जिथे मुले, त्यांच्या शाळा आणि समाजाशी संबंधित समस्यांवर चर्चा करतात आणि निर्णय घेण्यात भाग घेतात. बाल संसद मुलांना त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी आणि इतरांचे म्हणणे ऐकण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. नेतृत्व, निर्णय क्षमता आणि जबाबदारीची भावना विकसित करण्यास मदत करते. लोकशाही प्रक्रियाः बाल संसद लोकशाही प्रक्रियेद्वारे कार्य करते, मुले त्यांचे प्रतिनिधी निवडतात. शाळा आणि समाजात हक्कांचे संरक्षण हा उपक्रम मुलांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याच्या अधिकाराचे संरक्षण करण्यात येते. बाल संसदेत प्रधानमंत्री, शिक्षण मंत्री, क्रीडा मंत्री, आरोग्य मंत्री, कृषी मंत्री आणि पर्यावरण मंत्री अशा पदांवर मुलांची निवड केली जाते.
बाल संसद स्थापन प्रक्रियेमध्ये शाळेतील विद्यार्थी व शिक्षक, गावातील नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला व बाल संसद कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून चाईल्ड हेल्पलाइनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, समुपदेशक अंकुर पाटोडे, पर्यवेक्षक विकास लोणकर, केस वर्कर सूरज इंगळे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. कऱ्हाळे, शिक्षक श्री. वानखेडे. शिक्षक व शिक्षिका तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
******
खासगी अकादमींनी आर्थिक सहाय्यासाठी ‘मिशन लक्ष्यवेध’अंतर्गत प्रस्ताव सादर करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 03: राज्यात ‘मिशन लक्ष्यवेध’अंतर्गत निवडण्यात आलेल्या ॲथलेटिक्स, धनुर्विद्या, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉनटेनिस, रोईंग, शुटींग, सेलींग, टेबल टेनिस, वेटलिफटींग, कुस्ती आदी 12 क्रीडा प्रकारात राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करणाऱ्या खासगी अकादमींना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा अकादमींनी आर्थिक सहाय्यासाठी ‘मिशन लक्ष्यवेध’अंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करणे व प्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. राज्यातील खेळाडूंनी ऑलिंम्पिक क्रीडा स्पर्धेत पदके संपादित करण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न होणे गरजेचे आहे. राज्यातील खेळाडूंसाठी अद्यावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, पायाभूत सुविधा, वेधकशास्त्र तसेच क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंना पुरस्कार व प्रोत्साहन, करिअर मार्गदर्शन व त्यांच्या क्षमता विकासासाठी देशी, विदेशी प्रशिक्षक व संस्थाचा सहयोग हे सर्व घटक विकसित करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने या महत्वकांक्षी योजनेची अमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
खासगी अकादमींना अर्थसहाय्य करण्याच्या दृष्टीने संबंधित अकादमीमधील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभूत सुविधा व त्यांचा स्तर, क्रीडा साहित्य व क्रीडा अकादमीच्या कामगिरींचे गुणांकन करून 35 ते 50 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था क वर्ग, 51 ते 75 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ब वर्ग व 76 ते 100 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था अ वर्ग अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे. क वर्ग अकादमींना वार्षिक 10 लाख, ब वर्ग अकादमींना वार्षिक 20 लाख व अ वर्ग अकादमींना वार्षिक 30 लाख रुपये आर्थिक सहाय्य, पायाभूत क्रीडा सुविधा उभारणी, क्रीडा सुविधा उन्नत करणे, प्रशिक्षक मानधन, क्रीडा व प्रशिक्षण उपकरणे इत्यादी बाबींवर खर्च करण्यासाठी देण्यात येणार आहेत.
त्यानुसार इच्छुक संस्थांनी अधिक माहिती व अर्जाच्या नमुन्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, हिंगोली येथे संपर्क साधावा व सदरचा अर्ज दि.15 एप्रिल,2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण भरून द्यावा. हिंगोली जिल्ह्यातील इच्छुकांनी योजनेचा जास्तीत-जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
*****
गोरेगाव येथे संजीवनी अभियान तपासणीचे तालुकास्तरीय उद्घाटन शिबिरात 67 महिलांची तपासणी; आठ पॉझिटिव्ह
हिंगोली, दि. 03 (जिमाका): सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिला स्वत:च्या आरोग्यकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यांच्यामध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. याचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून 8 मार्चपासून जिल्ह्यात विशेष संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे. आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते आज प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव येथे नवसंजीवनी अभियानाचे तालुकास्तरीय उद्घाटन करण्यात आले. या तपासणी शिबिरात एकूण 67 महिलांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी आठ महिलांची व्हीआयए टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश, सरपंच गंगुबाई कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कर्करोगाविषयी मनामध्ये भीती बाळगण्याचे कारण नाही. कारण आता यावर शस्त्रक्रियेच्या माध्यमातून उपचार करता येत आहेत. त्यामुळे रुग्णांनी वेळेत तपासणी करून घेतली पाहिजे. संजीवनी अभियानामध्ये आशा वर्कर यांनी सर्वेक्षणाचे काम उत्कृष्टपणे केले असल्याचे सांगत, खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनीया अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार श्री. मुटकुळे यांनी केले.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश म्हणाल्या ‘लवकर निदान, लवकर उपचार’ तेव्हा महिलांनी समोर येऊन स्वतःहून तपासणी करून घेतली पाहिजे. त्यामुळे कर्करोगावर त्वरित मात करता येते. कर्करोगावर उपचार करणे आता सहज आणि अतिशय अल्पदरात करता येत आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी कर्करोगाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात संजीवनी अभियान राबविण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील 30 वर्षावरील सर्व महिलांचे आशा स्वयंसेविकामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात संशयित महिलांची डॉक्टरकडून आज तपासणी करण्यात आली. त्यांना स्त्रीरोग तज्ञांच्या देखरेखीखाली विशेष आरोग्य शिबिरातून ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय निदान करण्यात येणार आहे. तसेच निदान झालेल्या रुग्णांना उपचारासाठी संदर्भीत करून पाठपुरावा केला जाणार आहे.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, गटविकास अधिकारी माधव कोकाटे, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. रवी पाटील, सुनील पाटील, डॉ. बालाजी भाकरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत पाटील, डॉ. कुणाल अवचाटे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी मारोतराव पोले, तालुका पर्यवेक्षक अशोक जोशी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. माधव वानखेडे डॉ. विजय बोरकर डॉ. अजय जाधव, डॉ. हनुमान सावके, डॉ. दिपाली इंगोले डॉ. स्वाती मगर, डॉ. वैशाली बगाटे, डॉ. इंगळे, यांच्यासह कार्यक्षेत्रातील सर्व आशा वर्कर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील संपूर्ण वैद्यकीय चमू उपस्थित होता.
*****
01 April, 2025
मुख्य कार्यकारी अधिकारी पदी श्रीमती अंजली रमेश रुजू
हिंगोली, दि. 01 (जिमाका): जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश यांनी आज सकाळी पदभार स्वीकारला. यावेळी विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी त्यांचे स्वागत केले. श्रीमती अंजली रमेश या मध्य प्रदेश संवर्गातील असून, त्यांची हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. अंजली रमेश यांनी अहमदाबाद येथून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले असून, त्यानंतर त्यांनी आयआयटी चेन्नई (मद्रास) येथून बीटेक आणि एमटेक पूर्ण केले आहे. यापूर्वी त्यांनी मध्य प्रदेशमध्ये उपविभागीय अधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहीले आहे.
*****
Subscribe to:
Posts (Atom)