03 April, 2025

गोरेगाव येथे संजीवनी अभियान तपासणीचे तालुकास्तरीय उद्घाटन शिबिरात 67 महिलांची तपासणी; आठ पॉझिटिव्ह

हिंगोली, दि. 03 (जिमाका): सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिला स्वत:च्या आरोग्यकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यांच्यामध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. याचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून 8 मार्चपासून जिल्ह्यात विशेष संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे. आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते आज प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव येथे नवसंजीवनी अभियानाचे तालुकास्तरीय उद्घाटन करण्यात आले. या तपासणी शिबिरात एकूण 67 महिलांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी आठ महिलांची व्हीआयए टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश, सरपंच गंगुबाई कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कर्करोगाविषयी मनामध्ये भीती बाळगण्याचे कारण नाही. कारण आता यावर शस्त्रक्रियेच्या माध्यमातून उपचार करता येत आहेत. त्यामुळे रुग्णांनी वेळेत तपासणी करून घेतली पाहिजे. संजीवनी अभियानामध्ये आशा वर्कर यांनी सर्वेक्षणाचे काम उत्कृष्टपणे केले असल्याचे सांगत, खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनीया अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार श्री. मुटकुळे यांनी केले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश म्हणाल्या ‘लवकर निदान, लवकर उपचार’ तेव्हा महिलांनी समोर येऊन स्वतःहून तपासणी करून घेतली पाहिजे. त्यामुळे कर्करोगावर त्वरित मात करता येते. कर्करोगावर उपचार करणे आता सहज आणि अतिशय अल्पदरात करता येत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी कर्करोगाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात संजीवनी अभियान राबविण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील 30 वर्षावरील सर्व महिलांचे आशा स्वयंसेविकामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात संशयित महिलांची डॉक्टरकडून आज तपासणी करण्यात आली. त्यांना स्त्रीरोग तज्ञांच्या देखरेखीखाली विशेष आरोग्य शिबिरातून ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय निदान करण्यात येणार आहे. तसेच निदान झालेल्या रुग्णांना उपचारासाठी संदर्भीत करून पाठपुरावा केला जाणार आहे. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, गटविकास अधिकारी माधव कोकाटे, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. रवी पाटील, सुनील पाटील, डॉ. बालाजी भाकरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत पाटील, डॉ. कुणाल अवचाटे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी मारोतराव पोले, तालुका पर्यवेक्षक अशोक जोशी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. माधव वानखेडे डॉ. विजय बोरकर डॉ. अजय जाधव, डॉ. हनुमान सावके, डॉ. दिपाली इंगोले डॉ. स्वाती मगर, डॉ. वैशाली बगाटे, डॉ. इंगळे, यांच्यासह कार्यक्षेत्रातील सर्व आशा वर्कर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील संपूर्ण वैद्यकीय चमू उपस्थित होता. *****

No comments: