17 April, 2025

सामाजिक समता सप्ताहाचा विविध कार्यक्रमांनी समारोप

हिंगोली (जिमाका), दि. 17 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह सोहळा दिनांक 8 ते 14 एप्रिल या दरम्यान साजरा करण्यात आला. सामाजिक समता सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात सकाळी 6 ते सायकांळी 6 वाजेपर्यंत अभ्यास सत्राचे आयोजन करण्यात आले होते. तसेच समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, सार्वजनिक पुतळा समितीचे अध्यक्ष मधुकर मांजरमकर यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे सर्व कर्मचारीवृंद यांच्या समवेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेअंतर्गत जमीन वाटप करण्यात आले. 85 लाभार्थी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांच्या जातीचे वैधता प्रमाणपत्र वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायक आयुक्त यादव गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून आत्माराम वागतकर, विनोद ठाकरे, विशाल इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी 6 वाजता मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये सामाजिक समता सप्ताहाचा समारोप करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी सहायक आयुक्त यादव गायकवाड, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त श्रीमती छाया कुलाल, पंडित अवचार, आत्माराम वागतकर, नितीन राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. समारोपाच्या दिवशी दिवसभर 12 तास अभ्यास करुन महामानवास अभिवादन केलेल्या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या समारोप कार्यक्रमास विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. *******

No comments: