22 April, 2025
जागतिक हिवताप दिन साजरा करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 22 : दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस "जागतिक हिवताप दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. जनतेमध्ये हिवतापाविषयी जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. "हिवताप आपल्या सोबत संपतो पुन्हा गुंतवणूक करा, पुन्हा कल्पना करा, पुन्हा प्रज्वलित करा" हे यावर्षीचे घोषवाक्य आहे.
हिंगोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हिवताप आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्ह्यातील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, सेविका व आशा वर्कर यांच्यामार्फत डासअळी सर्व्हेक्षण, जलद ताप सर्व्हेक्षण, अँबेटींग, संडासच्या व्हॅट पाईपला जाळी बसवणे, गप्पी मासे सोडणे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना विषयी आरोग्य शिक्षण देणे, गटसभा घेणे इत्यादी कार्यक्रम नियमितपणे राबविण्यात येतात. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार, भारतामध्ये सन 2030 पर्यंत हिवताप दुरीकरण करण्याचे ठरविले आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यात यावे. तसेच हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया वा किटकजन्य आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी या मोहीम काळातच नाही तर नेहमीसाठी आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. घरातील पाणी साठ्यावर झाकण ठेवावे, नाल्या, गटारे वाहते ठेवावे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, मच्छरदानीचा वापर करावा, उघड्या खिडक्याना जाळ्या बसवावेत, संडासच्या व्हॅट पाईपला जाळी बसवावी, भंगार सामान व निकामी टायर याची विल्हेवाट लावावी, कुलर, फ्रिजजच्या ड्रिपपॅन मधील पाणी नियमितपणे स्वच्छ करावे, पाण्याच्या हौद, टाक्या, रांजन इत्यादी दर आठवडी स्वच्छ करावे. थंडी वाजून ताप येणे, मळमळ होणे, डोके दुखणे, अंगदुखी इत्यादी हिवतापाची लक्षणे आढळून आल्यास जवळच्या आरोग्य संस्थेत संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करुन योग्य औषध उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment