07 April, 2025

कृषी विभागाचे प्रधान सचिव तथा महाबीजचे अध्यक्ष विकासचंद्र रस्तोगी यांनी घेतला महामंडळाच्या कामकाजाचा आढावा

• उपस्थित मान्यवरांनी केले महामंडळाच्या लोगोचे अनावरण हिंगोली(जिमाका),दि.7: राज्य शासनाच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव तथा अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे अध्यक्ष विकास चंद्र रस्तोगी यांनी नुकतीच महाबीज मुख्यालयास भेट देवून महामंडळाच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला. या आढावा बैठकीस कृषी आयुक्त सुरज मांढरे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, संचालक वल्लभराव देशमुख, डॉ. रणजित सपकाळ व हेमंत चिमूरकर, विभागीय व्यवस्थापक राष्ट्रीय बीज महामंडळ तथा महाबीजचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. आगामी खरीप हंगामात महाबीज आयोजित विविध पीक, वाणांचा बिजोत्पादन कार्यक्रम तसेच अधिक उत्पादनशील पीक व वाणांच्या प्रमाणित बियाण्याची उपलब्धता याबाबतचा सखोल आढावा घेवून महाबीजच्या व्यवसाय वृध्दीसाठी करावयाच्या उपाययोजना तसेच राज्यातील शेतकरी बांधवाकरिता महाबीज मार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य पुरस्कृत योजना व त्याअंतर्गत शेतकरी, बिजोत्पादक यांना मिळणारे अनुदान यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली व त्यातील अडीअडचणी जाणून घेतल्या. त्याचबरोबर महाबीज संशोधित विविध पीक, वाणांची माहिती व त्यांची उपलब्धता, महाबीज विपणन साखळीत समाविष्ट प्रमुख पीक, वाणांच्या बियाणेची माहिती घेतली. याप्रसंगी महामंडळाने बीटी कपाशी, संकरीत मका तथा संकरीत भाजीपाला यावर विशेष लक्ष केंद्रीत करुन संशोधन तथा विपणनाची दिशा निश्चित करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. त्याबरोबर महामंडळाने जैविक उत्पादने, ऊती संवर्धित रोपे व नर्सरी व्यवसाय सुध्दा शेतकरी बांधवाचे हित लक्षात घेवून वृध्दींगत करावा व शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेवून विकसित केलेल्या संशोधित्त वाणांच्या विपणनावर लक्ष केंद्रीत करण्याबाबत उपस्थितांना सूचित केले. याप्रसंगी शेतकऱ्यांची बियाणे कंपनी म्हणून ओळखले जाणाऱ्या महाबीजच्या स्थापनेस 28 एप्रिल 2026 मध्ये 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या बैठकीमध्ये महाबीज सुवर्ण महोत्सवी वर्ष 2025-26 असल्याने लोगोचे अनावरण कृषी विभागाचे प्रधान सचिव तथा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे अध्यक्ष विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, संचालक वल्लभरावजी देशमुख, डॉ. रणजित सपकाळ व हेमंत चिमुरकर, विभागीय व्यवस्थापक राष्ट्रीय बीज निगम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी महाबीजचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. शेवटी महाबीज सुवर्ण वर्षाच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देवून सभेची सांगता झाली. ******

विशेष लेख - उष्णतेच्या धोक्यापासून स्वत:ला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवा

उन्हापासून बचावासाठी महत्वाचे उपाय सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. उष्णतेच्या या लाटेमुळे शरीराचे तापमान वाढू शकते आणि गंभीर आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत योग्य काळजी न घेतल्यास उष्माघात, डिहायड्रेशन आणि उष्णतेशी संबंधित त्रास होण्याची शक्यता असते. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि गरोदर महिलांसाठी हा काळ अधिक धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. योग्य आहार, भरपूर पाणी आणि सावधगिरी यामुळे आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो. 'हे' करा : जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या, तुम्हाला तहान लागली नसली तरीही. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ओआरएस) वापरा. लिंबू पाणी, ताक, लस्सी आणि फळांचे रस यांसारखे घरगुती पेये प्यावे. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात. पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे. तुमचे डोके झाकून ठेवा. थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करावा. उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालाव्यात. रेडिओ, टीव्ही वर प्रसारित होणाऱ्या उष्णतेच्या लाटेबाबत बचाव उपायावर लक्ष द्या आणि स्थानिक हवामान बातम्यांसाठी वर्तमानपत्र वाचावीत. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) वेबसाइट https://mausam.imd.gov.in/ वर हवामानाविषयी अद्ययावत माहिती घेत रहावी. हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालवा. थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटा रोखा. दिवसा खिडक्या आणि पडदे बंद ठेवावे, विशेषतः तुमच्या घराच्या सूर्यप्रकाशाच्या बाजूला थंड हवा येण्यासाठी रात्री खिडक्या उघड्या कराव्यात. जर तुम्ही घराबाहेर जात असाल, तर तुमची घराबाहेरील कामे दिवसाच्या सकाळ आणि संध्याकाळ वेळेपर्यंत मर्यादित करावी. दिवसाच्या थंड वेळांमध्ये बाहेरील कामांचे नियोजन करावे. संवेदनशील किंवा जास्त जोखीम असलेल्या लोकांसाठी उपाय : कोणाला उष्णतेचा ताण आणि उष्णतेशी संबंधित आजाराचा त्रास होत असेल तर अशा लोकांना इतरांपेक्षा जास्त धोका असतो आणि त्यांच्याकडे अतिरिक्त लक्ष द्यावे. विशेषत: लहान अर्भक आणि लहान मुले, घराबाहेर काम करणारे लोक, गर्भवती महिला, मानसिक आजारपण असलेली व्यक्ती, शारीरिकदृष्ट्या आजारी, विशेषतः हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. थंड हवामानापासून ते उष्ण हवामानापर्यंतच्या प्रवाशांनी त्यांच्या शरीराला उष्णतेला अनुकूल होण्यासाठी एक आठवडा वेळ द्यावा. जास्त श्रम टाळावेत आणि भरपूर पाणी प्यावे. इतर खबरदारी : एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी व्यक्तींवर देखरेख ठेवले पाहिजे आणि त्यांच्या आरोग्याचे दररोज निरीक्षण केले पाहिजे. तुमचे घर थंड ठेवा. पडदे, शटर किंवा सनशेड वापरा. रात्री खिडक्या उघडा. दिवसा खालच्या मजल्यावर राहण्याचा प्रयत्न करावा. शरीर थंड करण्यासाठी पंखा, स्प्रे बाटल्या, ओलसर कापड आणि बर्फाचे टॉवेल वापरावा. पाण्यात पाय बुडवल्याने निर्जलीकरण आणि शरीराची उष्णतेमुळे होणारी अस्वस्थता कमी होऊन जलद थंडावा मिळतो. 'हे' करू नका : उन्हात बाहेर पडणे टाळा., विशेषतः दुपारी 12 ते 3.00 दरम्यान. दुपारच्या वेळी बाहेर असताना कठोर परिश्रम टाळा. अनवाणी बाहेर जाऊ नका. अतिउष्ण वेळेत स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक क्षेत्र पुरेशा प्रमाणात हवा येण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात. अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेले पेय टाळा, कारण यामुळे शरीरातील जास्त पाणी कमी होते किंवा पोटात पेटके येऊ शकतात. उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका. उभ्या केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका. वाहनातील तापमान धोकादायक ठरू शकते. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करणे आपल्या हातात आहे. योग्य उपाययोजना आणि सतर्कता बाळगल्यास आपण या तापमानवाढीच्या संकटातून सुरक्षित राहू शकतो. स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. गरमी वाढली तरी घाबरू नका. सावधगिरी बाळगा, भरपूर पाणी प्या. तापमान वाढले तरी आरोग्य अबाधित ठेवा. सजग राहा. सुरक्षित राहा..! संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली ***

06 April, 2025

कृषी विज्ञान केंद्रानी शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य करावे -सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

हिंगोली(जिमाका), दि. 6 : तोंडापूर कृषी विज्ञान केंद्रानी शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी विषमुक्त अन्न, नैसर्गिक शेती, दुग्ध व्यवसाय यासह विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने कार्य करावेत, असे आवाहन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्राला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट देऊन तेथील संशोधन व विस्तार कार्याची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार शिवाजीराव माने, कयाधू शेतकरी उत्पादक कंपनीचे शेतकरी महेंद्र माने, नागनाथ सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप गंभीरे-पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना सहकार मंत्री श्री. पाटील म्हणाले, कठोर मेहनतीतूनच कृषी विकास शक्य आहे. विषमुक्त अन्न उत्पादन ही काळाची गरज आहे. नैसर्गिक शेतीसाठी युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. दुग्ध व्यवसाय व मिश्र शेती ही ग्रामीण अर्थव्यवस्थेची बळकटीची साधने आहेत, असे सांगून कृषी विज्ञान केंद्रांचे कार्य हे वास्तवात परिवर्तन घडवणारे असल्याचे सांगितले. यावेळी माजी खासदार शिवाजीराव माने, महेंद्र माने, प्रदीप गंभीरे-पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरचे सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, कृषी महाविद्यालय तोंडापूरचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनीही सहभाग घेतला. ही भेट केवळ एक औपचारिक भेट न राहता, ग्रामीण भागात कृषी आणि सहकार क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करणारा एक प्रेरणादायी क्षण ठरला आहे. *******

लोकप्रतिनिधी, अधिका-यांकडून पीडित कुटुंबाचे सांत्वन

• जिल्हा प्रशासनाकडून आयोजित मयताच्या वारसांसाठी विशेष सहायता शिबीरात 94 अर्ज प्राप्त हिंगोली (जिमाका), दि. 06: वसमत तालुक्यातील गुंज येथे आज खासदार नागेश पाटील आष्टीकर, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक असणारे उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी ९४ अर्ज विशेष‌ सहाय्यता शिबिरात भरून घेण्यात आले. ही दुर्घटना घडल्यानंतर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी मयतांच्या वारसांना तात्काळ मदत करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी श्री. माचेवाड आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज मयतांच्या वारसांचे पुनर्वसन करण्याकरिता विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष सहायता शिबीर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये तेथील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच सामाजिक अर्थ सहाय्य, घरकुल योजना यासह विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यासाठी आवश्यक असणारे उत्पनाचे प्रमाणपत्र काढण्यासाठीचे 94 अर्ज भरुन घेण्यात आले. हे सर्व अर्ज संध्याकाळपर्यंत ऑनलाईन करुन प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संबंधित पीडितांना संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना या सामाजिक अर्थसहाय्याच्या योजना, घरकुल योजना यासह शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी तालुका महसूल प्रशासनाकडून धान्य व इतर साहित्याचे किट वाटप करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार श्रीमती शारदा दळवी, गट विकास अधिकारी उमाकांत तोटावाड, नायब तहसीलदार अशोक भोजने, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता गजानन नांदे उपस्थित होते. गुंज येथील शेतमजूर नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात शेतीकामासाठी ट्रँक्टर ट्रॉलीतून जात असताना विहिरीत पडून सात महिलांचा मृत्यू झाला होता. राज्य शासनाने त्यांच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेतली असून, या शिबिराच्या माध्यमातून वारसांना विविध प्रमाणपत्रे, योजनांचा लाभ देण्यात येत आहे. मयतांच्या वारसाला राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 तर केंद्र शासनाकडून 2 लक्ष रुपयांची मदत जाहीर केली आहे. ******

05 April, 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली कृष्णा राऊतच्या शिक्षणाची जबाबदारी

• मृतांच्या कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गुंज येथे रविवारी विशेष सहायता शिबीर हिंगोली, दि.०५ (जिमाका) वसमत तालुक्यातील गुंज येथील शेतमजुरांना घेऊन जाणारी ट्रैक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा मुलगा कृष्णा राऊत याच्या शिक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तर मृताच्या कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रविवारी (दि.६) गुंज येथे विशेष सहायता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे शुक्रवारी ४ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत वसमत तालुक्यातील गुंज त.आसेगाव येथील ९ महिला व एक पुरुष शेतमजूर आलेगाव शिवारातील शेत गट क्र.२०१ मध्ये शेती कामासाठी जात होते. सदरील शेताजवळ आले असता पाण्याने भरलेल्या विहिरीत हे शेतमजूर ट्रॅक्टरसह पडल्यामुळे त्यातील ७ महिलांचा मृत्यू झाला. त्यातील एका मयत महिलेचा मुलगा कृष्णा तुकाराम राऊत याचा समाज माध्यमांवरील व्हिडीओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला असता, त्यांनी व्हिडीओची तात्काळ दखल घेतली. त्या व्हिडीओमधील लहान मुलाची वेदना व भावना समजून घेत मुख्यमंत्र्यांनी कृष्णाच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेत असल्याचे जाहीर केले. तसेच मयतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लक्ष रुपयाची आर्थिक मदतही जाहीर केली आहे. तसेच आज शनिवारी (दि.५) रोजी जिल्हाधिकारी अभिनव गोयल व नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिलेल्या निर्देशानुसार वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांनी मौजे गुंज त. आसेगाव येथील मयतांच्या वारस, नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे सांत्वन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवल्या. त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, घरकुल योजने अंतर्गत घरकुल योजनेचे लाभ, पुरवठा विभागातील शिधापत्रिका व स्वस्त धान्याबाबतचे लाभ, शिक्षणाशी संबंधित विविध प्रमाणपत्रांचे लाभ, व इतर अनुषंगीक प्राथमिक गरजा पूर्ण करणारे लाभ मिळवून देण्याबाबतची सर्व माहिती मयतांच्या वारसांना अथवा नातेवाईकांना जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांकडून देण्यात आली. तहसीलदार श्रीमती दळवी यांच्याकडून दुर्घटनेतील मयतांच्या वारसांना शासकीय योजनेचे लाभ देण्याच्या उद्देशाने उद्या रविवार (दि.६) रोजी गुंज त. आसेगाव येथे विशेष सहाय्य योजनेच्या शिबाराचे आयोजन ही करण्यात आलेले आहे. त्यामध्ये निवासी नायब तहसीलदार वसमत, मंडळ अधिकारी, विभाग गिरगाव व ग्राम महसूल अधिकारी, पळसगाव त. माळवटा यांना आदेश देण्यात आले असल्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी कळविले आहे. *****

सरस्वती विद्या मंदिर येथे बाल संसदेची स्थापना

हिंगोली (जिमाका), दि. 05 : हिंगोली येथील सरस्वती विद्यामंदीर येथे चाईल्ड हेल्पलाईन 1098 मार्फत "बाल संसद" स्थापन करून त्याबाबत जनजागृती करण्यात आली. "बाल संसद" म्हणजे मुलांची संसद, जिथे मुले, त्यांच्या शाळा आणि समाजाशी संबंधित समस्यांवर चर्चा करतात आणि निर्णय घेण्यात भाग घेतात. बाल संसद मुलांना त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी आणि इतरांचे म्हणणे ऐकण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. नेतृत्व, निर्णय क्षमता आणि जबाबदारीची भावना विकसित करण्यास मदत करते. लोकशाही प्रक्रियाः बाल संसद लोकशाही प्रक्रियेद्वारे कार्य करते, मुले त्यांचे प्रतिनिधी निवडतात. शाळा आणि समाजात हक्कांचे संरक्षण हा उपक्रम मुलांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याच्या अधिकाराचे संरक्षण करण्यात येते. बाल संसदेत प्रधानमंत्री, शिक्षण मंत्री, क्रीडा मंत्री, आरोग्य मंत्री, कृषी मंत्री आणि पर्यावरण मंत्री अशा पदांवर मुलांची निवड केली जाते. बाल हक्क व बालकाच्या समस्या सोडवण्यास त्यांना सक्षम करणे, बाल कायद्याची माहिती होणे यासाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 च्या माध्यमातून ग्राम, शहर, तालुका पातळीवर जनजागृती करण्याचे काम सुरु आहे. यावेळी बाल संरक्षण अधिकारी तथा सनियंत्रण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी मार्गदर्शन केले. बाल संसद स्थापन प्रक्रियेमध्ये शाळेतील विद्यार्थी व शिक्षक, गावातील नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला व बाल संसद कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून चाईल्ड हेल्पलाइनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, समुपदेशक अंकुर पाटोडे, पर्यवेक्षक विकास लोणकर, केस वर्कर राजरत्न पाईकराव, सूरज इंगळे, शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना सोवितकर, श्रीमती ए.पी.इंगोले तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. ******

रुग्णवाहिका व स्कूल बसची तपासणी करुन घेण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 05 : हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्याची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व योग्यता प्रमाणपत्र संपलेल्या वाहनांची वाहन प्रणालीवर योग्यता प्रमाणपत्र अर्ज व फी भरणा करुन उप्र प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन हजर करुन योग्यता प्रमाणपत्र तपासणी करुन घ्यावी. तसेच वैध योग्यता प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी शैक्षणिक सुट्टीच्या काळात सुरक्षेच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन हजर करुन योग्यता तपासणी करुन घ्यावी. रस्त्यावर विना योग्यता प्रमाणपत्र, मोटार वाहन कायदा अधिनियम व महाराष्ट्र शालेय अधिनियमाच्या तरतुदीचा भंग करताना आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, हिंगोली यांनी केले आहे. हिंगोली जिल्ह्यातील रुग्णवाहिका धारकांनी तांत्रिक दृष्ट्या नादुरुस्त, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र, विमा, पियुसी, कर संपलेली आहेत, अशांनी आपली वाहने दुरुस्त करुन कागदपत्रे विधीग्राह्य करुन योग्यता प्रमाणपत्रासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे घेऊन यावेत. तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार शुल्क भरुन पासिंग करुन घ्यावीत अन्यथा आपल्या वाहनावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उप प्रादेकिशक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. ******