19 September, 2017

ग्रामपंचायत मतदानासाठी स्थानिक सुट्टी जाहीर 
हिंगोली, दि. 19 :  वसमत तालुक्यातील माहे ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या एकूण 13 ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार दि. 26 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. या क्षेत्रात मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणुक आयोगाच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी या मर्यादीत क्षेत्राकरिता मंगळवार दि. 26 सप्टेंबर 2017 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

*****
जिल्हयात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू

हिंगोली, दि. 19 :  जिल्ह्यात येणाऱ्या कालावधीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, घटस्थापना / नवरात्र उत्सव व दसरा महोत्सव, विजयादशमी व धम्म चक्क्र परिवर्तन दिन, मोहरम ताजिया असे विविध कार्यक्रम, सण-उत्सव साजरे होणार आहेत. तसेच विविध मोर्चे, आंदोलने रास्ता रोको अशा विविध प्रकारचे प्रश्न कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून हाताळण्यासाठी जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश दि. 17 सप्टेंबर, 2017 रोजीचे 06.00 वा. पासुन ते दि. 01 ऑक्टोबर, 2017 रात्रीच्या 24.00 वाजेपर्यंत लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
आगामी कालावधीत साजरे सण-उत्सव, धरणे, मोर्चे, रस्तारोको, आंदोलनाची शक्यता या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात दि. 17 सप्टेंबर, 2017 ते दि. 01 ऑक्टोबर, 2017 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत आदेश लागू केला आहे. त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील याउद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

                                                            *****   

17 September, 2017

सातबारा एटीएम मशीनचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

हिंगोली,दि.17: राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बसवलेल्या संगणकीकृत सातबारा एटीएम मशीनचे लोकार्पण करण्यात आले.
            यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड, जिल्हा सूचना कार्यालयाचे श्री. बारी, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यात केंद्र शासान पुरस्कृत डिजीटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्रॉम कार्यान्वित असून त्याअंतर्गत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र पुणे यांनी ई-फेरफार आज्ञावली विकसित केली आहे. राज्यातील ई-फेरफार आज्ञावलीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी स्टेट डाटा सेंटर या ठिकाणी स्थापित केलेला हिंगोली जिल्ह्यातील अधिकार अभिलेखाचा अद्यावत डाटा हा मुळ हस्तलिखित अभिलेखाशी तंतोतंत 100 टक्के जुळविण्याचे काम करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण 697 गावापैकी 292 गावांतील संगणकीकृत सातबारा (7/12) अद्यावत करण्यात आले आहे.
या एटीएम मशीनमुळे जनतेचे वेळ व कष्ट वाचणार आहे. प्रायोगिक तत्वावर हिंगोली तालुक्याचा अद्यावत संगणकीकृत सातबारा (7/12) जनतेला एटीएम मशीनव्दारे डिजीटल स्वाक्षरीत ऑनलाईन सातबारा (7/12) रुपये 20 मध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. भविष्यात इतर चारही तालुक्याचा संगणकीकृत सातबारा (7/12) एटीएम मशीनव्दारे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

*****
‘महाराष्ट्र वार्षिकी-2017’ आणि ‘लोकराज्य’ विशेषांकाचे
पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते विमोचन

        हिंगोली,दि.17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने ‘महाराष्ट्र वार्षिकी-2017’ आणि ‘आपले जिल्हे विकासाची केंद्रे’ या लोकराज्य विशेषांकाचे विमोचन राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्हा पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडलेल्या प्रकाशन सोहळ्यात आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र वार्षिकी-2017’ या ग्रंथात शासनाच्या विविध योजना, विभाग, मंत्रीमंडळ निर्णय, महाराष्ट्राचा इतिहास, भुगोल, परंपरा, कलासंस्कृती महत्वाच्या घडामोडी यासारखी महत्वाची माहिती मिळणार असून सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असल्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आज व्यक्त केला.
            तसेच ‘आपले जिल्हे-विकासाची केंद्रे’ या लोकराज्यच्या विशेषांकात महाराष्ट्राच्या स्थित्यंतराची दखल घेतली आहे. प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या, पूर्णत्वास गेलेल्या व नजीकच्या काळात सुरु होणाऱ्या विविध योजना व विकास कामांचा आढावा या विशेषांकात घेतला आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यात झालेले जलयुक्त शिवार अभियानाच्या मदतीने टँकरमुक्ती, अहिल्यादेवी सिंचन विहिरी योजना, हमी भावाने तूर खरेदी, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदी विषयांची माहिती या लोकराज्य अंकात देण्यात आलेली आहे.
            यावेळी विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

*****
पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण
व्यावसायिक विकास संस्थेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

         हिंगोली, दि.17: येथील जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, हिंगोली यांनी  स्वत:चे स्वतंत्र http://www.diecpdhingoli.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळाचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी आज केले.
            या संकेतस्थळावर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद, संस्था व इतर सर्व माध्यमांच्या शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांच्या शैक्षणिक संबंधीत समस्या सोडविण्याकरीता उपयोग होणार आहे. या संकेतस्थळाद्वारे समस्यांची  नोंदणी करुन विहित वेळेत समस्यांचे निवारण करण्यात येणार आहे. समस्या सोडविण्यासोबत विविध तंत्रज्ञानाचे ई-साहित्य देखील उपलब्ध होणार आहे.
           यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शिवराणीताई नरवाडे, खासदार राजीव सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड, प्राचार्य गणेश शिंदे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

*****
जिल्हाधिकारी कार्यालयात अनिल भंडारी यांच्या हस्ते ध्वजारोहण

        हिंगोली, दि.17: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
            यावेळी प्र. निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, उपजिल्हाधिकारी निवडणूक गोविंद रणवीरकर यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

*****
मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरीता सहकार्य आवश्यक
                                                                                                  -- पालकमंत्री दिलीप कांबळे
            हिंगोली, दि.17: मराठवाडा मुक्ती संग्रामात निजामाच्या हुकूमशाही विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या  संपुर्ण आयुष्याची आहुती देत मराठवाड्याला निजामांच्या जोखडातून मुक्त केले. त्याची जाणीव ठेऊनच मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्हा पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
            मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त देवडा नगर येथील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य ध्वजारोहण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शिवराणीताई नरवाडे, खासदार राजीव सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड  यांची उपस्थिती होती.
            यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. परंतू त्यानंतरही मराठवाडा निजाम संस्थानाच्या राजवटीखाली होता. निजामांच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी हा मुक्तीसंग्राम लढा स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्यासह इतर थोर नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढला गेला. या संग्रामात हिंगोली जिल्ह्यातील बहिर्जी शिंदे वापटीकर, चंद्रकांत पाटील गोरेगावकर, दीपाजी पाटील दातीकर, बापुराव शिंदे वापटीकर, भीमराव ऊर्फ बाबासाहेब शेषराव नायक सवनेकर, वासुदेवराव बसोले, बाबुलाल माणिकचंद राठौर यांच्यासह अन्य स्वातंत्र सेनानी महत्वपूर्ण योगदान दिले असल्याचे ते म्हणाले.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे हे आंदोलन सतत 13 महिने सुरु होते. या आंदोलनात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आहुती दिल्याने अखेर दि. 17 सप्टेंबर, 1948 रोजी निजामाच्या जोखंडातून मराठवाडा मुक्त झाला. मराठवाडा मुक्ती संग्रामाकरीता अनेक हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे मोल फार मोठे असल्याचे ही श्री. कांबळे यावेळी म्हणाले.
            तसेच जिल्ह्यातील 10 हुतात्मा स्मारकांच्या दूरुस्ती व नुतणीकरणांसाठी राज्य शासनाने 108 लाख रुपये मंजूर केले असून लवकरच या स्मारकांच्या दूरुस्ती व नुतणीकरणांचे कामे पूर्ण होणार आहे.
            यापुर्वी श्री. कांबळे यांनी देवडा नगर येथील उद्यानातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी पोलीस पथकाने हुतात्म्यांना मानवंदना देवून शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी दिली. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहन केले. यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यांनी उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी यांची भेट घेऊन मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
            यावेळी प्र.निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी,     उपजिल्हाधिकारी निवडणूक गोविंद रणवीरकर, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार गजानन शिंदे, मुख्याधिकारी रामदास पाटील, कार्यकारी अभियंता सुरेश देशपांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, लोकप्रतिनिधी, पत्रकार, अधिकारी-कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती.
*****