25 February, 2022

 


रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

जिल्ह्यात 1 लाख 29 हजार 748 बालकांना पाजला जाणार पोलिओ डोस

- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार

 

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : जिल्ह्यात आरोग्य  विभागाच्या वतीने  रविवार दि. 27 फेब्रुवारी, 2022 रोजी पल्स पोलिओ मोहीम राबविली जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात शहरी व ग्रामीण मिळून  0 ते 5 वर्ष वयोगटातील 1  लाख 29 हजार 748  बालकांना पोलिओचा डोस पाजला जाणार असल्याची माहिती   जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली आहे.

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 23 जानेवारी, 2022 रोजी घेण्यात येणार होती, मात्र कोरोना प्रादुर्भाव व ओमिक्रॉन व्हेरियंटचे प्रमाण वाढल्याने हा कार्यक्रम तात्पुरता रद्द करुन पुढे ढकलण्यात आला होता. त्यानुसार आता रविवार, दिनांक 27 फेब्रुवारी, 2022 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असल्याने आरोग्य विभागाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी शहरी भागात  व ग्रामीण भागात असे एकूण 1175 बूथची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी 3128  कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दिली आहे.  

दरम्यान बस स्थानक, रेल्वे स्टेशन, नवीन बांधकाम साईट, रस्त्या शेजारील पाले , विटभट्टया आदी ठिकाणी पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी एक दिवस अगोदर  सर्व शाळांनी  प्रभात फेरी काढुन राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेस सहकार्य करणार आहेत.  तसेच मंदिर व मस्जीद वरुन ध्वनीक्षेपकाद्वारे आवाहन करण्यात येत आहे, सर्व पाच वर्षाखालील बालकांना पोलचिट वाटप करण्यात आले  आहेत.  

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम  राबविण्यासाठी  61 वैद्यकीय अधिकारी, 24 जिल्हास्तरीय पर्यवेक्षक, तसेच 9 जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ट्रान्झिटिंग टीममध्ये 38 कर्मचारी तर मोबाईल टीममध्ये 80 कर्मचारी राहणार आहेत. यासाठी 1424 थर्मल व्हायल बॉक्सची व्यवस्था केली आहे. पल्स पोलिओ अभियान मोहिमेची आरोग्य अभियानाने जोरदार तयारी केली असून त्यासाठी कर्मचारी कामाला लागले आहेत, अशी माहिती सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली आहे.

जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने बॅनर , पोस्टर प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटप केले  आहे. या माध्यमातून अधिकाधिक प्रसिद्धी करुन ही मोहिम शंभर टक्के यशस्वी करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाकडून जोरदार तयारी झाली असल्याचे सहाय्यक संचालक डॉ. प्रेमकुमार ठोंबरे यांनी सांगितले आहे.

*****

24 February, 2022

 

युक्रेन देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी

हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशामध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेन या देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता आहे.

अशा नागरिकांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालय, नवी दिल्ली, फोन - टोलफ्री : 1800118797, दूरध्वनी क्र. 011-23012113/ 011 23014105 / 011 23017905, फॅक्स क्र. 011 23088124, ई-मेल : situationroom@mea.gov.in ही हेल्पलाईन नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आलेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी भ्रमणध्वनी क्र. 9552932981 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.  

****** 

 

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 22 रुग्ण ; तर 02 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

·  37 रुग्णांवर उपचार सुरु, एका रुग्णाचा मृत्यू

 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : जिल्ह्यात 22 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक , हिंगोली यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआरद्वारे औंढा ना. परिसर 03 व्यक्ती व कळमनुरी परिसर 19 व्यक्ती असे एकूण 22 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 02 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 01 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 19 हजार 509 रुग्ण झाले असून, त्यापैकी  19 हजार 69 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 37  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 403 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.

****

 दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) दि. 4 मार्च, 2022 ते        30 मार्च, 2022 या कालावधीत व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) दि. 15 मार्च, 2022 ते 4 एप्रिल, 2022 या कालावधीत पार पडणार आहेत. या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी  सर्वांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी दिले.

दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी व परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा दक्षता समितीची बैठक आज दि. 24 फेब्रुवारी, 2022 रोजी जिल्हाधिकारी  तथा दक्षता समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी पोलीस निरीक्षक व्ही. जी. श्रीमनवार, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी परीक्षेचे संचालन सुयोग्य व्हावे व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी परीक्षा चालू असताना परीक्षा केंद्रांना, विशेष उपद्रवी केंद्राना भेटी देण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच सर्व खाते प्रमुख यांनी भेटी द्यावेत. तसेच परीक्षा काळात गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कार्यवाही करावी प्रत्येक मुख्य परीक्षा केंद्राना, उपकेंद्राना परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी भेटी द्यावेत, असे निर्देश दिले आहेत.

तसेच सद्यस्थितीत कोविड-19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी व इतर गोष्टीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी , तालुकास्तरावरील आरोग्य अधिकारी यांनी प्रत्येक परीक्षा केंद्रावर आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्यावेत. विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणीसाठी परीक्षा केंद्रावर परिक्षेच्या एक तास अगोदर उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दि. 4 मार्च, 2022 रोजी जिल्ह्यात स्थानिक सुट्टी घोषित केलेली आहे. परंतु परीक्षा संचलनामधील सर्व कर्मचाऱ्यांना ही सुटी घेता येणार नाही. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्यांनी हयगय किंवा हलगर्जी केल्यास कर्मचाऱ्यांच्या विरुध्द कडक कार्यवाही करण्यात येईल, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिले.

इयत्ता बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यात 32 मुख्य परीक्षा केंद्र व 74 उपकेंद्र अशा एकूण 106 परीक्षा केंद्रावर 13 हजार 439 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर इयत्ता दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यात 53 मुख्य परीक्षा केंद्र व 149 उपकेंद्र अशा एकूण 202 परीक्षा केंद्रावर 16 हजार 134 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी व परिक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी विभागीय मंडळ औरंगाबाद यांच्यामार्फत जिल्ह्यात 7 भरारी  पथकाची  नियुक्ती केलेली आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी  यावेळी  दिली .

 

******  

 


नेहरु युवा केंद्राच्या वतीने युवकांसाठी

आत्मनिर्भर भारत या विषयावर एक दिवशीय प्रशिक्षण संपन्न

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : नेहरु युवा केंद्राच्या वतीने येथील चैतन्य करिअर अकॅडमीमध्ये आत्मनिर्भर भारत या विषयावर एक दिवशीय प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन श्री. गमे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे व प्रशिक्षक म्हणून श्री.कोकाटे, श्री.दहिफळे, श्री.नागरे हे उपस्थित होते.

या प्रशिक्षणामध्ये युवकांना आत्मनिर्भर ही  संकल्पना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारातून आली असल्याची माहिती युवकांना दिली. तसेच आत्मनिर्भर भारत ही संकल्पना काय आहे, तिचा उद्देश काय आहे, ती कशी आत्मसात केली पाहिजे आणि आपला भारत देश आत्मनिर्भर कसा होईल याविषयी माहिती दिली. आत्मनिर्भर होणे म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वत: काहीतरी करुन दाखवणे असा आहे. आपल्या भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी भारतातील सर्व युवकांनी एकत्र येऊन एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. तसेच युवकांनी नवनवीन काही शिकले पाहिजे व स्वत:ला सिध्द केले पाहिजे असे मार्गदर्शन प्रशिक्षकांनी यावेळी केले.

या प्रशिक्षण शिबिरामध्ये ग्रामीण भागातील अनेक युवक, युवती उपस्थित होते. हे प्रशिक्षण नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी हिंगोली तालुका समन्वयक प्रविण पांडे, संदीप शिंदे, सिंधू केंद्रे, नामदेव फरकडे यांनी परिश्रम घेतले.    

****** 

 

भिक्षावृत्तीमुक्त भारत बनविण्यासाठी

स्वयंसेवी संस्थानी 28 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने ‘SMILE- Support For Marginalized Individuals For Livelihood and Enterprise’ उपजिविका आणि उपक्रमासाठी उपेक्षित व्यक्तींसाठी समर्थन ही योजना तयार केली आहे. ज्यामध्ये भीक मागण्याच्या कृतीत गुंतलेल्या व्यक्तींचे सर्व समावेशक पुनर्वसन या उपयोजनेचा समावेश आहे. उपयोजनेमध्ये भीक मागण्याच्या कृतीत गुंतलेल्या व्यक्तींसाठी कल्याणकारी उपायांसह अनेक व्यापक उपायांचा समावेश आहे. पुनर्वसन , वैद्यकीय सुविधांची तरतूद , समुपदेशन , मुलभूत  कागदपत्रे , शिक्षण कौशल्य विकास, आर्थिक संबंध इत्यादींवर या योजनेचा भर आहे. ही योजना राज्य, केंद्रशासित प्रदेश सरकार, स्थानिक नागरी संस्था, स्वयंसेवी संस्था, नागरी संस्था संघटना, समुदाय आधारित संस्था आणि इतरांच्या पाठिंब्याने राबविण्यात येणार आहे.

या उपयोजनेतून देशाला भीक्षावृत्तीमुक्त भारत (भिक्षेपासून मुक्त) बनविण्यासाठी भीक मागण्याच्या कृतीत गुंतलेल्या व्यक्तींपैकी केंद्र आणि राज्य सरकार , स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणावर जनता अशा विविध भागधारकांच्या समन्वित कार्यवाहीव्दारे भीक मागण्यात गुंतलेल्या व्यक्तींचे सर्व समावेशन करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. भीक मागण्यात गुंतलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण आणि ओळख, भीक मागण्यात गुंतलेल्या व्यक्तींचे एकत्रीकरण, निवारा, पुन:भीक मागण्यात गुंतलेल्या व्यक्तींचा शाश्वत विकास करण्यासाठी आणि लक्षित लोकसंख्येचे एकूण आरोग्य आणि कल्याण सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे. त्यानुसार संस्थेचे  अनुभव पात्रतेच्या आधारे पुढील प्रक्रियेसाठी स्वयंसेवी संस्थांची निवड केली जाईल. संस्थेची निवड खालील प्रमाणे करण्यात येईल. संस्थेची मान्य कर्मचारी संख्या, संस्थेतील कर्मचाऱ्याची भिक्षेकरीमुक्त क्षेत्रात कामाची गुणवता, भिक्षेकरीमुक्त शहराचा प्रकल्प अहवाल इत्यादी बाबींवर आधारित संस्थेची निवड होणार आहे.

यासाठी स्वयंसेवी संस्थांनी https://grants.msje.gov.in/ngo-login या लिंकवर e-anudaan वर गुगल फॉर्मव्दारे प्रस्ताव ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. संस्थेने दाखल केलेल्या प्रस्तावाची एक प्रत dixit.shantanu@gov.in  venkatesan.s19@nic.in या ई-मेल आयडीवर दि. 28 फेब्रुवारी, 2022 पर्यंत पाठविण्यात यावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

****** 

23 February, 2022

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 04 रुग्ण ; तर 19 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

·  18 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 23 : जिल्ह्यात 04 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक , हिंगोली यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 02 व्यक्ती व औंढा ना. परिसर 02 व्यक्ती असे एकूण 04 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 19 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 02 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 19 हजार 487 रुग्ण झाले असून, त्यापैकी  19 हजार 67 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 18  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 402 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.

****