23 August, 2023

 

जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यासाठी हिंगोली येथे मतदार जनजागृती रॅली

उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी हिरवी झेंडी दाखवून केला रॅलीचा शुभारंभ

 

 


 हिंगोली (जिमाका),  दि. 23 : जिल्ह्यामध्ये स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी तथा स्वीप समितीचे नोडल अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी हिंगोली तालुक्यात सुरु आहे. त्यामध्ये नवमतदारांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यासाठी आज दिनांक 23 ऑगस्ट,2023 रोजी हिंगोली तहसील कार्यालय व विविध महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये  येथील जिल्हा परिषद बहुविध प्रशाला  व कन्या प्रशाला, शांताबाई मु.दराडे मा.वि.भारतीय विद्या मंदीर, सक्रर्टहार्ट इंगलीश हायस्कुल,  सरजुदेवी भिकुलाल भारुका ऑर्य कन्या विद्यालयातील सुमारे 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थी रॅलीचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.

ही रॅली  तहसील कार्यालय येथून निघून शिवाजी चौक, पोस्ट ऑफिस, जवाहर रोड, गांधी चौक, इंदिरा चौक मार्गे संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्याच्या हातामध्ये मा. भारत निवडणुक आयोगाने पुरविलेले बॅनर व घोषणा फलक देवून मतदार जनजागृतीच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी तहसीलदार नवनाथ वगवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचारी, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****

 हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 492 मिमी पावसाची नोंद

 

हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 10.70 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 492.10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 61.88 टक्के इतकी  पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दिनांक 23 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

हिंगोली निरंक (521.90) मि.मी., कळमनुरी 4.90 (540.40) मि.मी., वसमत 23.20 (544.60) मि.मी., औंढा नागनाथ 13.40 (473.60) मि.मी, सेनगांव 13.10 (362.60) मि.मी  पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 492.10 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

******

 

दीनदयाल स्पर्श योजना फिलाटेली शिष्यवृत्तीसाठी

सहभाग नोंदविण्याचे आवाहन

 

 

 हिंगोली (जिमाका),  दि. 23 : भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर दीनदयाल स्पर्श योजना या शीर्षकाखाली फिलाटेली शिष्यवृत्ती योजनेचे आयोजन केले आहे.

भारतीय डाक विभागातार्फे इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी दीनदयाल स्पर्श योजना फिलाटेली शिष्यवृत्ती सुरु केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकिटांचा संग्रह करण्याचा तसेच तिकिटांचे संशोधन करण्याचा छंद निर्माण करण्याचा डाक विभागाचा मानस आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी हा छंद जोपासला आहे, अशा विद्यार्थ्यांनी डाक विभागातर्फै फिलाटैली प्रश्नमंजूषा आणि फिलाटेली प्रकल्प या आधारावर निवड करुन मुख्य पोस्ट मास्तर जनरल कार्यालयातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. निवडक विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी सहा हजार रुपये रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येणार आहे.

सर्व शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन मोहम्मद खदीर, डाक अधीक्षक, परभणी यांनी केले आहे.

****

 

औंढा नागनाथ येथील मतदार जनजागृती रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

 

 हिंगोली (जिमाका),  दि. 23 : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी हिंगोली यांचे निर्देशानुसार मा. भारत निवडणुक आयोगाच्या पध्दतशीर मतदार शिक्षण व त्यांचा निवडणुक पक्रियेतीमध्ये सहभाग (SVEEP - Systematic Voters Education and Electrol Participation Programme) या कार्यक्रमांतर्गत आज दिनांक 23 ऑगस्ट,2023 रोजी औंढा नागनाथ तहसील कार्यालय व विविध महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये औंढा नागनाथ येथील नागेश्वर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नागनाथ कनिष्ठ महाविद्यालय, नागनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सुमारे 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी विठ्ठल परळीकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करुन विद्यार्थी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. ही रॅली मुख्य रस्त्याने निघून हेडगेवार चौक, नगरपंचायत कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अण्णाभाऊ साठे चौक या मार्गाने हुतात्मा स्मारकापर्यंत काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्याच्या हातामध्ये मा. भारत निवडणुक आयोगाने पुरविलेले बॅनर व घोषणा फलक देवून मतदार जनजागृतीच्या घोषणा देण्यात आल्या.

हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रगीत गाण व मतदारांसाठीची शपथ घेवून रॅलीचा समारोप करण्यात आला. नागेश्वर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची ढोलपथक रॅली मुख्य आकर्षण ठरली. समारोपानंतर विद्यार्थ्यांना अल्पोहार वाटप करण्यात आला.

रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी नायब तहसिलदार वैजनाथ भालेराव, लता लाखाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयातील अव्वल कारकून श्रीकृष्ण दराडे, महसूल सहायक नितीश कुलकर्णी. मंडळ अधिकारी आशा गिते, रंगनाथ मेहत्रे, तलाठी गजानन हजारे, गोपाल मुकीर, सहशिक्षक उमाकांत मुळे. विनोद घोडके, वामन मोरे, कैलास जाधव, किशन पलटनकर, गणेश जायभाये, विशाल भुक्तर हे अधिकारी व कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते विनोद साळवे, नागनाथ वरिष्ठ महाविद्यालयाचे रा.से.यो. चे कार्यक्रम अधिकारी प्रा. बळीराम कुंडगर, प्रा. पोहकर, प्रा. जाधव, नागनाथ कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. सानप, प्रा. रमेश वाहुळे, प्रा.मुंढे, प्रा. माळी, प्रा. बिराडी, नागेश्वर महाविद्यालयचे प्राचार्य प्रा. लांडे, प्रा. जगताप, प्रा. अंबादास वाहुळे, प्रा. जाधव, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी चव्हाण राधेश्याम, एच.एम.शेळके, डमरे व्हि. गोंड एन.जे. सांगळे जी. डी, बेडके एस.एस. यांनी परिश्रम घेतले.

****

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी

28 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करावेत

 

हिंगोली (जिमाका),  दि. 23 : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत महिला व बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना व संस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात येतो. सन 2020-21, सन 2021-22, सन 2022-23 व सन 2023-24 या वर्षासाठी जिल्हास्तरीय, विभागस्तरीय व राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी हिंगोली जिल्ह्यातील पात्र महिला, संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

जिल्हास्तरीय, विभागस्तरीय व राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे पात्रता व स्वरुप पुढीलप्रमाणे आहे.

पुरस्कारासाठी पात्रता :

राज्यस्तरीय पुरस्कार :- महिला व बालविकास क्षेत्रात किमान 25 वर्षांचा सामाजिक कार्याचा अनुभव आवश्यक आहे. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्या महिलांना सदर पुरस्कार मिळाल्यापासून 5 वर्ष राज्यस्तरीय पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही.

विभागीय पुरस्कार :- महिला व बालविकास क्षेत्रात किमान संस्थेचे किमान 7 वर्ष कार्य असावे. संस्थेस दलितमित्र पुरस्कार मिळालेला असल्यास पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही. संस्था राजकारणापासून अलिप्त असावी तसेच संस्थेचे कार्य व सेवा राजकारणापासून अलिप्त असावी. स्वयंसेवी संस्था पब्लिक ट्रस्ट अॅक्ट व सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्टनुसार किमान 7 वर्षापूर्वी नोंदणीकृत झालेली असावी.

जिल्हास्तरीय पुरस्कार :- महिला व बालविकास क्षेत्रात किमान 10 वर्ष सामाजिक कार्य असावे. ज्या महिलांना दलितमित्र पुरस्कार किंवा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे, त्या महिलांना जिल्हास्तरीय पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही.

पुरस्काराचे स्वरुप :

राज्यस्तरीय पुरस्कार एक लाख एक रुपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. विभागीय पुरस्कार 25 हजार एक रुपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे, तर जिल्हास्तरीय पुरस्कार 10 हजार एक रुपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ अशा स्वरुपात असणार आहे.

प्रस्तावासोबत जोडावयाची आवश्यक माहिती / कागदपत्रे :

राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव धारकाची माहिती, केलेल्या कार्याचा तपशील, वृत्तपत्रात प्रसिध्द झालेली कात्रणे व फोटोज सध्या कार्यरत असलेल्या पदांचा तपशील, यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर किंवा इतर कोणताही पुरस्कार मिळाला असल्यास संपूर्ण तपशील तसेच  मा.जिल्हा पोलीस अधीक्षक,हिंगोली यांचे अलीकडील कालावधीचे चारित्र्य पडताळणी  अहवाल आदी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

विभागीय पुरस्कारासाठी संस्थेची माहिती व कार्याचा तपशील, वृत्तपत्रात प्रसिध्द झालेली कात्रणे व फोटोज,

संस्थेस यापूर्वी  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर किंवा इतर कोणताही पुरस्कार मिळाला असल्यास संपूर्ण तपशील, संस्था नोंदणी प्रमाणपत्र आणि घटना व नियमावलीची प्रत, संस्थांचे पदाधिकारी यांचे चारित्र्य चांगले आहे. त्यांच्याविरुध्द कोणताही फौजदारी तसेच त्यांनी सार्वजनिक संपत्तीचा अपहार केल्याबाबतचा गुन्हा दाखल नसल्याचे व संस्थेचे कार्य, संस्था राजकारणापासून अलिप्त असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

            वरील पुरस्कारांसाठी सन 2020-21, सन 2021-22, सन 2022-23 व सन 2023-24 या वर्षासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र महिला समाजसेविकांनी व संस्थांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. 07, नांदेड रोड, हिंगोली  ई-मेल : dwandcdoh@gmail.com या पत्त्यावर दिनांक 28 ऑगस्ट, 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत आपले प्रस्ताव सादर करावेत.

अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन राजाभाऊ मगर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

 

******

 

जिल्ह्यात सद्यस्थितीत वाढत असलेल्या लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी

उपाययोजना कराव्यात

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

 

हिंगोली (जिमाका),  दि. 22 : राज्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे व हा रोग जलदगतीने पसरणारा अनुसूचित रोग असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित विभागाला दिले.

हिंगोली जिल्ह्यात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी दि. 22 ऑगस्ट, 2023 रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.मधुसुदन रत्नपारखी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एस.बी. खुणे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गोजातीय प्रजातीची गुरे बाजाराच्या ठिकाणी खरेदी-विक्रीसाठी आणण्यात येणाऱ्या पशुधनास लंम्पी चर्मरोगासाठी लसीकरण व इनाफ (टॅगींग) करणे बंधनकारक करावे. जनावरांचे बाजार भरविणारे कृषि उत्पन्न बाजार समिती, नगर परिषद, नगर पंचायत, ग्राम पंचायत  किंवा इतर संस्थांनी याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी व त्याशिवाय खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यास सक्त मनाई करण्यात यावी, असे निर्देश दिले.

जिल्ह्यातील सर्व गोजातीय पशुधनास शंभर टक्के लम्पी चर्मरोगासाठी लसीकरण करण्यात यावे. जिल्ह्यातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात भटके, मोकाट पशुधन आढळून आल्यास पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने लसीकरण करणे व त्यांचे स्थलांतर नजीकच्या कोंडवाडा, गोशाळा, पशु आश्रय स्थान इत्यादी ठिकाणी करण्यात यावे. प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 अन्वये जिल्हास्तरीय तसेच तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समितीने याबाबत स्थानिक स्तरावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. रोग प्रसार करणारे बाह्य किटक, परोपजीवी (गोचीड, गोमाशा, डास, माशा) यांच्या नियंत्रणासाठी जनावरांची व गोठ्याची किटक्नाशक औषधीने फवारणी करण्यात यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळर यांनी दिले आहेत.

            लम्पी चर्मरोग नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण मोहिम राबवून शंभर टक्के लसीकरण पूर्ण करावेत. लम्पी रुग्णांचे लवकरात लवकर निदान करुन विलगीकरण करावे. लम्पी रुग्णांची जास्तीत जास्त काळजी घ्यावी. 20 टक्के औषधाचा वापर करावा. विद्यापीठाने व विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेद्वारे जनजागृती करावी. बाधित क्षेत्रातील जनावराचे आठवडी बाजार गरजेनुसार बंद करावे किंवा लम्पी लसीकरणाच्या 28 दिवसानंतर जनावरांच्या वाहतुकीस परवानगी द्यावी. रोग पसरवणाऱ्या बाह्य परोपजीवी डास, माशा, पिसवा, गोचीड, गोमाशा यांचे नियंत्रण करण्यासाठी माझा गोठा स्वच्छ गोठा मोहिमेअंतर्गत गोठे फवारणी कार्यक्रमात मोहिम स्वरुपात राबवावी. तसेच सर्व संस्थाप्रमुखांनी मुख्यालयी राहावेत, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी दिले आहे. 

******   

22 August, 2023

 

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

 

            हिंगोली (जिमाका), दि. 22 :  जिल्ह्यात सर्व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दि. 21 ऑगस्ट, 2023 रोजी पासून श्रावण मास व सोमवार आरंभ होत आहे. श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथे आठवे ज्योतिर्लिंग व नागपंचमी असल्याने या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच दि. 28 ऑगस्ट, 2023 रोजी दुसरा श्रावण सोमवार निमित्ताने कावड यात्रेचे आयोजन केलेले आहे. तसेच दि. 30 ऑगस्ट, 2023 रोजी नारळी पोर्णिमा व रक्षाबंधन, दि. 4 सप्टेंबर, 2023 रोजी तिसरा श्रावण सोमवार आहे. तसेच सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडी तसेच नागरिकांच्या वतीने विविध संघटना, पक्ष यांच्यातर्फे हिंगोली जिल्ह्यात त्यांच्या मागणी संदर्भात मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 21 ऑगस्ट, 2023 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 04 सप्टेंबर, 2023 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास    सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी दिलीप कच्छवे  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.     

****