17 July, 2025
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेच्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हतेचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर करावेत
हिंगोली (जिमाका), दि.17: शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेच्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यवसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिन्याच्या कालावधीत सादर करणे अनिवार्य आहे. विहित मुदतीत गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवारांने सादर केल्यानंतर त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे कळविण्यात आले होते.
त्यानुसार उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयास ई-मेल, पोस्ट अथवा हस्तपोचीने सादर करतांना शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा-2025 परीक्षेचा नोंदणी क्रमांक व बैठक क्रमांक नमूद करावा किंवा https://mscepune.in/dtedola/TAIT2025InfoAppear.aspx या लिंकमध्ये माहिती भरुन विहित मुदतीत सादर करावी. जेणेकरुन शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा-2025 मध्ये प्राप्त केलेल्या गुणांनुसार त्यांचे गुणपत्रक देण्यात येईल.
गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील. तद्नंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी, विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
**
शिवाजी महाविद्यालयात मंगळवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर व येथील शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टिने मंगळवार (दि. 22) रोजी शिवाजी महाविद्यालय, हिंगोली येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात मुथ्थुट फायनान्स हिंगोली, उत्कर्ष स्मॉल बँक वाशिम, क्लासिक टीव्हीएस मोटर्स हिंगोली, नवभारत फर्टीलायझर लि. छत्रपती संभाजीनगर, पगारीया ऑटो प्रा.लि.हिंगोली, पलटन सेक्युरिटी हिंगोली, क्रिडेट एक्सेस ग्रामीण कुटा हिंगोली, भारत फायनान्स लि. हिंगोली, एसबीआय लाईफ इन्शुरन्स हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली, मारोती ऑटोमोबाईल हिंगोली, स्वतंत्र मायक्रो फायनान्स वाशिम अशा नामांकित कंपनी व हिंगोली जिल्ह्यातील शासनाचे विविध महामंडळ रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार 250 पेक्षा अधिक रिक्त पदे https://rojgar.mahaswyam.gov.in व www.ncs.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचित केली आहेत. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करून ऑनलाईन अर्ज करून स्वत: मूळ कागदपत्रांसह शिवाजी महाविद्यालय, हिंगोली येथे मंगळवार, (दि. 22) रोजी सकाळी 10 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे.
*****
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची ब्रम्हवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला आकस्मात भेट
• अनुपस्थित मुख्याध्यापकास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश
हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज सकाळी जिल्ह्यातील ब्रम्हवाडी, तांदुळवाडी येथील शाळांना अचानक भेट देऊन पाहणी केली. या भेटीत ब्रम्हवाडी येथील मुख्याध्यापक तथा प्रभारी केंद्र प्रमुख एल. यु. पुरी अनुपस्थित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी संबंधित मुख्याध्यापकास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना दिले आहेत.
याप्रकरणी संबंधिताचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी श्री. दिग्रसकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी शाळेतील तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत त्यांना प्रश्न विचारले. या तपासणीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. येथील विद्यार्थ्यांना गणित विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन असले तरी त्यांचे इंग्रजी विषयाचे ज्ञान थोडे कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शिक्षणाधिकारी श्री. दिग्रसकर यांना दिले आहे.
*****
16 July, 2025
गोरेगाव येथील 9 कृषि निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबीत
हिंगोली (जिमाका), दि. १६ : जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम-२०२५ च्या अनुषंगाने भरारी पथके व निरीक्षकामार्फत रासायनिक खते, किटकनाशके कृषि निविष्ठा विक्री केंद्राची तपासणी केली असता, अनियमित्ता करणाऱ्या निविष्ठा केंद्रांची दि. १४ जुलै २०२५ परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी सुनावणी घेऊन ज्या कृषि केंद्रानी अनियमित्ता करुन व त्याबाबतचा अहवाल पूर्तता सादर केला नसल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील गोरेगाव येथील ९ कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबनाची कार्यवाही करण्यात आलेली आहे.
यामध्ये माऊली ट्रेडर्स, गोरेगाव ता.सेनगाव (निविष्ठा प्रकार-बियाणे) या कृषी केंद्राचा परवाना १५ दिवसांसाठी, मे.भन्साळी कृषी सेवा केंद्र, गोरेगाव ता. सेनगाव (निविष्ठा प्रकार-बियाणे) या कृषी केंद्राचा परवाना ७ दिवसांसाठी, झांझरी अॅग्रो एजन्सीज गोरेगाव ता. सेनगाव (निविष्ठा प्रकार-बियाणे) या कृषी केंद्राचा परवाना १५ दिवसांसाठी, झांझरी अॅग्रो एजन्सीज गोरेगाव ता. सेनगाव (निविष्ठा प्रकार-खते) या कृषी केंद्राचा परवाना १५ दिवसांसाठी, मे.भन्साळी कृषी सेवा केंद्र, गोरेगाव ता. सेनगाव (निविष्ठा प्रकार-खते) या कृषी केंद्राचा परवाना ७ दिवसांसाठी, बळीराजा कृषि केंद्र, गोरगाव ता. सेनगाव (निविष्ठा प्रकार-किटकनाशके) या कृषी केंद्राचा परवाना ७ दिवसांसाठी, माऊली ट्रेडर्स, गोरेगाव ता. सेनगाव
(निविष्ठा प्रकार-किटकनाशके) या कृषी केंद्राचा परवाना १५ दिवसांसाठी, ओम कृषि केंद्र, गोरेगाव ता.सेनगाव (निविष्ठा प्रकार-किटकनाशके) या कृषी केंद्राचा परवाना १५ दिवसांसाठी आणि झांझरी अॅग्रो एजन्सीज, गोरेगाव ता. सेनगाव (निविष्ठा प्रकार-किटकनाशके) या कृषी केंद्राचा परवाना ७ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी ज्यादा दराने विक्री, रासायनिक खताची साठवणूक, भेसळयुक्त खते व औषधी विक्री बाबतच्या तक्रारी आढळल्यास विक्रेत्यावर गंभीर स्वरुपाची कार्यवाही केली जाईल, असे आवाहन राजेंद्र कदम, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
****
जिल्ह्यातील मागासवर्गीय पात्र विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 16 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,हिंगोली यांच्या नियंत्रणाखाली हिंगोली जिल्ह्यात 4 मुलींचे व 4 मुलांचे शासकीय वसतिगृहे असे एकूण हिंगोली जिल्ह्यात 8 शासकीय वसतिगृहे कार्यरत असून सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेश करण्यासाठी दिनांक 11 जून 2025 रोजी पासून ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे बंद असून ऑनलाईन पध्दतीने https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज स्वीकारणे सुरु झालेले आहे.
वसतिगृहाची नावे :
1) गृहपाल, मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकिय वसतिगृह,डॉ.बा.आं.सामाजिक न्याय भवन,हिंगोली. 2) गृहपाल, नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकिय वसतिगृह, डॉ.बा.आं.सामाजिक न्याय भवन,हिंगोली 3) गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकिय वसतिगृह, लमाणदेव मंदिराच्या समोर, इंदिरा नगर, कळमनुरी 4) गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकिय वसतिगृह, बेले यांची इमारत, बस स्टँण्ड समोर, वसमत 5) गृहपाल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह,एस.आर.पी.एफ.कॅम्पच्या पाठीमागे,हिंगोली 6) गृहपाल,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह,कृषी उ.बाजार समितीच्या पाठीमागे,कळमनुरी 7) गृहपाल,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह,भोरीपगांव रोड, वसमत 8) गृहपाल, मागासवर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह,तालुका रुग्णालयाच्या शेजारी, गोरेगांव रोड, सेनगांव येथे आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त शालेय मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 17 जुलै 2025 ही प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. तर इयत्ता 11 वी व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम (पदवीसाठी प्रवेशीत) मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी दिनांक 23 जुलै 2025 पर्यंतच वरील ऑनलाईन संकेतस्थळावर अर्ज करावेत. ऑनलाईन संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करतेवेळी वसतिगृहाचे नाव नमुद करुन मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.
तसेच ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रिंट काढून त्यासोबत आवश्यक कागदपत्रासह आपला अर्ज आपण ज्या वसतिगृहासाठी अर्ज सादर केला त्या वसतिगृहात प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्जाची प्रत सादर करावे, हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त मागासवर्गीय पात्र विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,हिंगोली यांनी केले आहे.
******
सेनगाव तालुक्यातील युवती व महिलांसाठी ब्युटी पार्लरचे मोफत प्रशिक्षण • सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छुकांनी 24 जुलैपर्यंत नाव नोंदणी करावी
हिंगोली (जिमाका), दि. 16 : येथील जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने सेनगाव तालुक्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील युवती व महिलांसाठी ब्युटी पार्लर या विषयावर मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
यासाठी उमेदवार हा किमान आठवी पास असावा, त्याचे वय 18 ते 45 वर्षादरम्यान असावे. तसेच आधार कार्ड, तीन पासपोर्ट फोटो, टीसी, बँक पासबूक जमा करुन आपली नाव नोंदणी दि. 24 जुलै, 2025 पर्यंत करावी. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी आयोजक दत्ता उचितकर (मो.9960189358) महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे.
*****
औंढा नागनाथ तालुक्यातील युवक व युवतीसाठी बेकरी उत्पादनाचे मोफत प्रशिक्षण • सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छुकांनी 24 जुलैपर्यंत नाव नोंदणी करावी
हिंगोली (जिमाका), दि. 16 : येथील जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने औंढा नागनाथ तालुक्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील युवक, युवतीसाठी बेकरी उत्पादन या विषयावर मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
यासाठी उमेदवार हा किमान आठवी पास असावा, त्याचे वय 18 ते 45 वर्षादरम्यान असावे. तसेच आधार कार्ड, तीन पासपोर्ट फोटो, टीसी, बँक पासबूक जमा करुन आपली नाव नोंदणी दि. 24 जुलै, 2025 पर्यंत करावी. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी आयोजक किसन धाबे (मो.9370631461) महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Posts (Atom)