30 April, 2025

वेव्हज् परिषदेच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 1 मे रोजी मुंबईत

मुंबई, दि. 30 : भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन (वेव्हज्) शिखर परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 मे रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे. या वेव्हज् परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. “कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रिज" या घोषवाक्याखाली होणाऱ्या या चार दिवसीय शिखर परिषदेत भारताला मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल नवप्रवर्तनाचे जागतिक केंद्र म्हणून प्रदर्शित करण्यात येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि प्रतिभेच्या एकत्रीकरणाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असलेल्या या वेव्हज् 2025 मध्ये चित्रपट, ओटीटी, गेमिंग, कॉमिक्स, डिजिटल मीडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, एव्हीजीसी- एक्सआर ब्रॉडकास्टिंग आणि नव्या तंत्रज्ञानाचा समावेश असेल. भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील सामर्थ्याचे हे सर्वांगीण प्रदर्शन असेल. या उपक्रमाच्या माध्यमातून 2029 पर्यंत 50 अब्ज डॉलर्सच्या बाजारपेठेचे दरवाजे उघडले जातील, असा अंदाज आहे. या शिखर परिषदेत प्रथमच ग्लोबल मीडिया डायलॉग (GMD) चे आयोजन मुंबईत होणार आहे. यामध्ये 25 देशांचे मंत्री सहभागी होणार असून, भारताच्या जागतिक मीडिया क्षेत्रातील सहभागात हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. वेव्हज् बजार या जागतिक ई-मार्केटप्लेसमध्ये 6,100 पेक्षा अधिक खरेदीदार, 5,200 विक्रेते आणि 2,100 प्रकल्प सहभागी होणार आहेत, ज्यातून स्थानिक व जागतिक स्तरावर व्यवसाय आणि नेटवर्किंगच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. या परिषदेत प्रधानमंत्री क्रिप्टोस्पियरला भेट देऊन “क्रिएट इन इंडिया” उपक्रमांतर्गत निवड झालेल्या सर्जनशील कलाकारांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय, ते भारत पॅव्हिलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियनला देखील भेट देतील. या स्पर्धेसाठी एक लाखांहून अधिक नोंदणी झाली. वेव्हज् 2025 परिषदेमध्ये 90 हून अधिक देश, 10,000 प्रतिनिधी, 1,000 कलाकार, 300 हून अधिक कंपन्या आणि 350 हून अधिक स्टार्टअप्स सहभागी होणार आहेत. शिखर संमेलनात 42 मुख्य सत्रे, 39 विशेष सत्रे आणि 32 मास्टरक्लासेस आयोजित करण्यात येणार आहेत, ज्यामध्ये ब्रॉडकास्टिंग, इन्फोटेन्मेंट, एव्हीजीसी- एक्सआर चित्रपट आणि डिजिटल मीडिया यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश असेल. 0000

पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला पाहिजे - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 15 : प्रत्येकाने आपल्या घरामध्ये पाण्याच्या स्त्रोताचा नियमित वापर करताना विविध उपक्रम राबवून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत जलसंपदा विभागाच्या वतीने जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या समारोप कार्यक्रमाचे उद्घाटन व जलपूजन आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते जिल्ह्यातील पूर्णा, कयाधू व पैनगंगा या तीनही मुख्य नद्यांतील पाण्याचे जलपूजन करुन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अधीक्षक अभियंता तथा पालक अभियंता सुधाकर कचकलवार, कार्यकारी अभियंता आण्णाराव कांबळे, कार्यकारी अभियंता संतोष बिराजदार, कार्यकारी अभियंता श्री. शेख, कृषी उपसंचालक प्रसाद हजारे, 'उगम'चे जयाजी पाईकराव यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री. गुप्ता पुढे म्हणाले, जिल्ह्यात दोन ते तीन टक्केच वनक्षेत्र आहे. ते वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरी पाच झाडे लावावीत. पाण्याच्या स्त्रोत वाढविण्यासाठी घरामध्ये शोषखड्डा, पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टींग यासारखे उपक्रम राबवावेत. तसेच जिल्ह्यातील सर्व नद्यांचे पुनरुर्जीवन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थाची बैठक घेऊन त्यांच्या माध्यमातून पुनरुर्जीवन करण्याचे काम करण्यात येईल, असे सांगून पाण्याचे स्त्रोत वाढविण्यासाठी सर्व महत्वाच्या मुद्यांवर केवळ पंधरवाड्यातच जनजागृती मोहिम न राबविता सर्वांनी पाण्याचे महत्व ओळखून सतत पाण्याविषयी सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यासाठी प्रत्येक पाण्याचा थेंब जमिनीमध्ये जिरवण्यासाठी ठोस कार्यक्रम घेण्याची गरज आहे. यासाठी जलतारा, शोषखड्डे, वृक्ष लागवड, पाणी अडवा पाणी जिरवा यासारखे विविध उपक्रम राबविण्याची आवश्यकता असल्याचे उगमचे जयाजी पाईकराव यांनी सांगितले. प्रास्ताविकात पालक अभियंता सुधाकर कचकलवार यांनी जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा अभियानाच्या माध्यमातून गावागावात जाऊन पाणी वापराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. प्रत्येकाने आपल्या स्वत:पासून पाणी बचतीची सुरुवात करावी आणि कार्यक्रम पंधरवाड्यापुरता न राहता सतत राबविण्यात येईल, असे सांगितले. कार्यकारी अभियंता आण्णाराव कांबळे यांनी जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्यानिमित्त दि. 15 ते 30 एप्रिल, 2025 या कालावधीत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती सादरीद्वारे दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जल, कलश व वसुंधरेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर पाण्याचे महत्व सागंणारे गीत गाण्यात आले. तसेच डिग्रस कऱ्हाळे येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिंनी माही गिराम यांनी पाण्याचे महत्त्व सांगितले. तसेच तेथील दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे पाण्याचे महत्त्व पटवून दिले. यावेळी पाणी वापराबाबत जनजागृती करण्यात आलेल्या शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांचा तसेच उप अभियंता कृषक कांबळे यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांना जल प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कोकरे यांनी केले, तर आभार उप अभियंता कृषक कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, जलसंपदा विभाग, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ******

दिशा समितीवर सदस्यांची नियुक्ती

हिंगोली (जिमाका), दि. 30 : हिंगोली जिल्हा‍ विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) समितीवर लोकसभा सदस्य तथा दिशा समितीचे अध्यक्ष खासदार नागेश बापूराव पाटील-आष्टीकर यांनी शिफारस केलेल्या विविध क्षेत्रातील नऊ सदस्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी तथा दिशा समितीचे सदस्य सचिव राहुल गुप्ता यांनी नुकतीच केली आहे. या समितीमध्ये सरपंच प्रतिनिधी म्हणून कळमनुरी तालुक्यातील माळेगावचे सरपंच संदीप उत्तमराव ससे, कवडीचे सरपंच दयानंद मुकुंदराव पतंगे, सेनगाव तालुकयातील कहाकर जिरे येथील सरपंच श्रीमती शारदा संतोष पोपळघट, हिंगोली तालुक्यातील जामठी (खु.) च्या सरपंच श्रीमती शशीकला माधवराव भवर, औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजारचे सरपंच अविनाश सीताराम मुळे यांची नियुक्ती केली आहे. तर बिगर सरकारी संस्था प्रवर्गातून औंढा नागनाथ तालुक्यातील शिरलाचे सुंदरराव मुंजाजी कुर्हे पाटील ऊर्फ बाळू पाटील, अनुसूचित जातीचे प्रतिनिधी म्हणून औंढा नागनाथ तालुक्यातील बेरुळाचे भास्कर हिरामण घोडके यांची, अनुसूचित जमातीचे प्रतिनिधी म्हणून कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याची वाडी येथील डॉ. सतीष यशवंतराव पाचपुते यांची तर महिलांच्या प्रतिनिधी म्हणून वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील श्रीमती आश्विनी शिवाजीराव इंगोले पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती ग्रामीण विकास मंत्रालय, ग्रामीण विकास विभाग, कृषी भवन, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीबाबतच्या निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तरतुदी, सूचना, अटी व शर्तीच्या अधीन राहून लोकसभा मतदार संघ हिंगोली तथा अध्यक्ष दिशा समिती यांच्या शिफारसीनुसार वरील सदस्यांची नियुक्ती पुढील आदेशापर्यंत करण्यात आली आहे. *******

महाबीजचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

हिंगोली (जिमाका), दि. 30 : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला अर्थात महाबीजचा 49 वा वर्धापन दिन तसेच सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण महाबीज, मुख्यालय येथे दिनांक 28 एप्रिल, 2025 रोजी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह व डॉ.विलास खर्चे, संशोधन संचालक, डॉ.पी.डी.के.व्ही, अकोला यांच्या प्रमूख उपस्थितीत तर महाबीजचे संचालक वल्लभरावजी देशमुख व डॉ.रणजीत सपकाळ, अकोला बीज प्रमाणिकरण यंत्रणेचे संचालक अंकूशराव माने, यांची देखील विशेष उपस्थिती होती. यावेळी महाबीज संचालक डॉ.रणजीत सपकाळ यांनी महाबीजने सोयाबीन पिकाला पर्याय उपलब्ध करावा तसेच संत्रा व इतर फळपिकांचे संशोधनाकडे लक्ष केंद्रीत करुन नवीन वाण विकसित करण्याकडे भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर जेष्ठ संचालक वल्लभरावजी देशमुख यांनी महाबीजचा पूर्वइतिहास सांगून महाबीजने चिया सिड्स, हळद व राजमा या पिकांचे वाण उपलब्ध करण्याचे कार्य सुरु असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यत पोहोचविण्याची अपेक्षा व्यक्त केली. बीज प्रमाणिकरण यंत्रणेचे संचालक डॉ.अंकूशराव माने यांनी बीज प्रमाणिकरणामध्ये महाबीज अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मिळत असलेले सहकार्याबद्दल प्रशंसा करुन साथी पोर्टलची अंमबजावणी करणारे महाराष्ट्र हे संपूर्ण देशातील प्रथम राज्य असल्याचे अवगत केले. तर संशोधन संचालक डॉ.विलास खर्चे, यांनी महाबीजसोबत विद्यापिठांचा प्रदीर्घ सहवास असून वातावरणास अनुकूल वाणांचे संशोधन करुन महाबीजमार्फत शेतकऱ्यांचे उत्पादनात कशी वाढ करता येईल, तसेच जैविक खतांचा वापर करुन जमिनीच्या खालावलेल्या आरोग्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अकोलाचे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी महाबीजने आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी गुणवत्तापूर्ण बियाणे वाजवी दरात उपलब्ध करुन दिले ही फार कौतूकास्पद बाब असून बियाणे वाटप करतांना कोणतीही अडचण आल्यास किंवा मदत लागल्यास पोलीस विभागाची सहकार्याची भूमिका असेल, असे आश्वासित केले. व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आजपर्यंत महाबीजला लाभलेले अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विशेष घडामोडींचा उजाळा करुन दिला. तसेच सुरुवातीस केवळ चार जिल्ह्यात असलेले महाबीजचे कार्य 1980 ते 1984 या कालावधीत तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आदरणीय विश्वासराव धूमाळ यांनी केंद्र सरकार व राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा करुन महाबीज कार्याचा विस्तार राज्यभर केल्याचे विषद करुन सुवर्ण महोत्सव विशेषकांकरीता अथक परिश्रम करणाऱ्या चमूंचे कौतूक करुन पुरस्कार प्राप्त कर्मचारी / अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाबीज सुवर्ण महोत्सवी वर्षात महाबीज व शेतकऱ्यांकरीता वर्षभर सकारात्मक उर्जा निर्माण करणारे कार्यक्रम आयोजीत करण्यात येतील असे अवगत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना महाव्यवस्थापक (गु.नि.व संशोधन) डॉ. प्रफूल्ल लहाने यांनी महाबीजचा 49 वर्षातील प्रवासामध्ये महाबीज कर्मचाऱ्यांच्या तीन पिढ्यांचा संगम व भविष्याची वाटचाल याबाबत विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमांची सुरुवात महाबीज मुख्यालय येथे वृक्षारोपण करुन करण्यात आले. या निमित्ताने मागील दोन वर्षात उल्लेखनीय कामगिरी केलेले बिजोत्पादक, शेतकरी, महाबीज विक्रेते, महाबीज अधिकारी/ कर्मचारी यांना महाबीज गौरव पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर बळी यांनी तर आभार प्रदर्शन जितेंद्र सरोदे यांनी केले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. ***

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

हिंगोली(जिमाका),दि.30 :- महाराष्ट्र राज्याच्या 77 व्या स्थापना दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम दि. 01 मे, 2025 रोजी सकाळी 8 वाजता हिंगोली येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर होणार आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालक मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर कार्यक्रमस्थळी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ******

राष्ट्र संत तुकडोजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि. 30 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, संतोष बोथीकर, सी.आर.गोळेगावकर, पंकज खैरकर यांच्यासह‍ प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी-कर्मचारी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. ********

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा हिंगोली जिल्हा दौरा

हिंगोली (जिमाका), दि. 30 : राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे उद्या, दि. 01 मे, 2025 रोजी हिंगोली दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. पालकमंत्री श्री. झिरवाळ हे बुधवार, दि. 30 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता मौजे नागेवाडी ता.जि.जालना येथून हिंगोलीकडे प्रयाण करतील व रात्री 2 वाजता हिंगोली शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. गुरुवार, दि. 01 मे रोजी सकाळी 7.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून पोलीस कवायत मैदानाकडे प्रयाण करतील. सकाळी 7.45 वाजता पोलीस कवायत मैदान येथे आगमन व महाराष्ट्र दिन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती राहतील. सकाळी 9 वाजता पोलीस कवायत मैदान हिंगोली येथून शासकीय विश्रामगृह हिंगोलीकडे रवाना व राखीव. सकाळी 10 वाजता नांदेड विमानतळाकडे प्रयाण. ******

29 April, 2025

बालकांवरील अपराधास प्रतिबंध करण्यासाठी अनधिकृत संस्था आढळून आल्यास संपर्क साधावा

हिंगोली (जिमाका), दि. 29 : पुणे जिल्ह्यातील आळंदी व ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविले जात असल्याच्या बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत. वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यानुसार तसेच सदर संस्थांमध्ये बालकांना अनधिकृतपणे डांबून ठेवण्यात येवून त्यांचे शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषणाच्या घटना घडत असल्याबाबतच्या बातम्या प्रसिध्द झाल्याचे निदर्शनास येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि सुधारित अधिनियम 2021 तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या आहेत. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि सुधारित अधिनियम 2021 मधील कलम 42 नुसार मान्यता तथा सोबतच्या नोंदणी प्रमाणपत्राप्रमाणे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त नसलेली संस्था अथवा अशी संस्था चालविणाऱ्या व्यक्तीला एक वर्ष कारावास तसेच रुपये एक लक्ष पेक्षा कमी नसेल एवढा दंड किंवा दोन्हीही करण्यात घेईल अशी तरतुद नमुद करण्यात आलेले आहे. आपल्या आसपासच्या परिसरामध्ये अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 या वर संपर्क साधून बालकांवरील शारीरिक तसेच लैंगिक अपराधास प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नयना अर्जुन गुंडे, आयुक्त (भा.प्र.से), महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांनी केलेले आहे. *****

बालविवाह मुक्त हिंगोली जिल्हा होण्यासाठी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 29 : बालविवाह मुक्त हिंगोली जिल्हा होण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मंगल कार्यालयामध्ये व विविध धार्मिक स्थळी बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार मुलीचे वय 18 वर्षे व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह करता येत नाही असा नियम आहे. विवाह इच्छुक मंडळी विवाह योग्य ठिकाण म्हणून मंगल कार्यालयात किंवा धार्मिक स्थळी नोंदणी करून विवाहाचे आयोजन करीत असतात. पण काही मंगल कार्यालयांमध्ये व धार्मिक स्थळी 18 वर्षाच्या आतील मुलीचा व 21 वर्षाच्या आतील मुलांचा बालविवाह होत असल्याचे निदर्शनास येत आहे. आपल्या मंगल कार्यालयात नोंदणी करताना बऱ्याच वेळा वर, वधु पक्ष मुला-मुलीचे आधार कार्ड देवून नोंदणी करतात. परंतु आधार कार्ड व प्रवेश निर्गम वरील जन्म तारीख यामध्ये बऱ्याच वेळा तफावत आढळून येते. त्यामुळे आधार कार्ड ग्राह्य न धरता संबधिताचा जन्माचा दाखला अथवा शालेय कागदपत्रे (निर्गम उतारा/शाळा सोडल्याचा दाखला) पाहूनच पडताळणी करावी. मंगल कार्यालयात व धार्मिक स्थळी मुला-मुलींचे विवाह होत असताना मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाले आहे का व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण झाले आहे काय ? याची पडताळणी करावी तसेच यासंबधी सूचनेचा माहिती फलक मंगल कार्यालयाच्या धार्मिक स्थळाच्या दर्शनी भागावर लावण्यात यावा व कायदेशीर विवाहाचे वय पूर्ण असल्यास विवाहाची नोंद करून मंगल कार्यालय, धार्मिक स्थळे याकामी उपलब्ध करून द्यावे अन्यथा नाकारावे. अशा परिस्थितीत बालविवाह झाल्यास, संबंधित वर व वधू यांचे आई-वडील किवा पालक व अन्य नातेवाईक मित्र परिवार, विवाह विधी पार पाडणारे संबंधीत व्यक्ती, धार्मिक गुरु, पंडित, काजो, सेवा देणारे, मंडप मालक, फोटो ग्राफर, केटरिंग व्यावसायिक, लॉन्स मालक आणि वाजंत्री असे सर्व, ज्यांनी हा बालविवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो रोखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत व जे अशा विवाहात सामील झालेल्या सर्वांना दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद व एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. सोबतच जर ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांनी जन्म दाखल्याची खोटी नोंद केल्यास त्यांच्यावर सुध्दा गुन्हा दाखल होऊ शकतो. यामध्ये प्रशासनाला आपला सहभाग अत्यंत महत्वाचा असून बालविवाह विधीपूर्वक लावण्यासाठी चालना, परवानगी, प्रोत्साहन व समर्थन न देता सदर अधिनियमाची अंमलबजावणी व्हावी या दृष्टीकोनातून कृपया प्रशासनाला सहकार्य करावे व मुलींच्या सक्षमीकरणासाठी व प्रगतीसाठी जिल्ह्यात 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' ही संकल्पना रुजवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यानी केले आहे. *****

28 April, 2025

प्रशासनाप्रती विश्वास निर्माण करणे, मोठी बाब -मावळते जिल्हाधिकारी अभिनव गोयल

निरोपाच्या वेळी हिंगोलीकरांच्या भावना संमिश्र....!!! हिंगोली (जिमाका), दि. 28 : हिंगोली जिल्ह्यात जेमतेम 7 महिने काम करण्याची संधी लाभली. त्या कार्यकाळात हिंगोलीवासीयांच्या मनात जिल्हा प्रशासनाप्रती विश्वास निर्माण करता आला, ही मोठी बाब असल्याची भावना मावळते जिल्हा‍धिकारी अभिनव गोयल यांनी निरोप समारंभात व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित निरोप आणि स्वागत समारंभात श्री. गोयल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नूतन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, श्रीमती शुभी अभिनव गोयल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार अश्विन माने यावेळी उपस्थित होते. या जिल्ह्यात काम करताना काही बाबींचा, प्रसंगांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल, असे सांगून त्यांनी अतिवृष्टी व कयाधू नदीला आलेल्या पूरपरिस्थितीबाबतची आठवण सांगितली. या जिल्ह्यात काम करताना निपुण हिंगोली, संजिवनी अभियान, कृषि, आरोग्‍य, शिक्षण विभागात काम करता आले. हिंगोली जिल्ह्यात शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रक्षेत्र भेटी दिल्यामुळे हिंगोलीकरांसोबत चांगली नाळ जुळली असल्याचे सांगून, आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत असलो तरीही हिंगोली आणि हिंगोलीकर कायम हृदयात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच कधीही तिकडे आल्यास हिंगोलीकरांसाठी त्यांच्या घराचे दरवाजे उघडे असल्याचे सांगताच सभागृहाचे वातावरण भावूक झाले होते. नोकरी म्हटले की बदली आलीच, त्यामुळे जिथे आहोत, तिथे आपल्या कामाची छाप सोडायची. नेतृत्वाने केवळ फॉलोअर्स न वाढवता नेतृत्व वाढवायचे ते विकसित करायचे असते, असे मावळते जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी सांगितले. यावेळी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध विकासकामांचा आवर्जून उल्लेख करत जिल्हा न्यायालयाची इमारत, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयाकडे झालेले हस्तांतरण यांचा उहापोह केला. तसेच येथील कामकाजाचा मोठा अनुभव भविष्यात वरिष्ठ पातळीवर धोरणनिश्चिती करताना नक्कीच कामी येईल, असे सांगून जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि माध्यमकर्मींचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. यावेळी स्वागत समारंभात नूतन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मावळते जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे राहिलेले कामकाज त्याच गतीने पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त करताना धाराशिवमध्ये असताना त्यांच्या अनेक नाविन्यपूर्ण बाबींचे अनुकरण केले असल्याचे सांगितले. हिंगोलीच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम, त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना, उपक्रम तितक्याच ताकदीने यशस्वीरित्या पुढे नेत राबविण्यात येतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, जयाजी पाईकराव, संजय टाकळगव्हाणकर यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. ******

नागरिकांना विहीत कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देणार -जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यातील नागरिकांना विनाविलंब आणि विनासायास, तसेच ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्याला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. त्यासाठी अनेक सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून, या सेवा शहरापासून ते गावाखेड्यापर्यंतच्या नागरिकांना विनाविलंब उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात सेवा हक्क दिनाच्या दर्शकपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. गुप्ता बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, तहसीलदार अश्विन माने उपस्थित होते. शासनाने दिनांक 1 एप्रिल 2015 रोजी '28 एप्रिल' हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी तसेच सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, 10 वर्षांपूर्वी शासनाने जनतेला नियत कालमर्यादेच्या आत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क देणारा ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015’ अंमलात आणला आहे. या अधिनियमातील कलम 4 अन्वये महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अशा नियत कालमर्यादेतच जनतेला लोकसेवा देण्याची जबाबदारी दिली आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारे त्याचे उत्तरदायित्व निश्चित केले असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले. हा लोक सेवा हक्क अधिनियम प्रशासकीय अधिकाऱ्यांना कर्तव्य भावनेतून जनतेची सेवा करण्यासाठी प्रेरीत करत असल्याचे सांगून ते म्हणाले की, शासनाने आयोगाच्या शिफारशी नुसार आयोगाने निर्धारीत नागरीकांना दिल्या जाणाऱ्या सर्व अधिसूचित सेवा कालमर्यादेत देण्याचे सांगितले आहे. अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा सेवाभाव हेच कर्तव्य ही कर्मयोगाची भावना असल्याचे सांगितले. राज्य शासनाने महाराष्ट्र लोक सेवा हक्क आयोगाची दशकपूर्ती साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, हा एक चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिसूचित केल्या आहेत. या सेवा शहरापासून ते गावखेड्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात अजूनही सुधारणा करण्यास वाव आहे, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. या सेवा नागरिकांना घरबसल्या मिळाव्यात, यासाठी काम करूयात. या सेवा केंद्र संचालकाकडून मिळवून दिल्या जात आहेत. त्यामध्ये अजून उत्तम नियोजन करून कर्मचाऱ्यांमार्फत अधिक सेवा घरपोच देण्याचा प्रयत्न करूयात, असे सांगितले. ऑनलाईन सेवा विहित मुदतीत देण्याचा राज्य शासनाचा आणि जिल्हा प्रशासनाचा मनोदयही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी व्यक्त केला. नागरिकांना वेळेत आणि पारदर्शकतेने, विनासायास आणि सहज घरच्या घरी ऑनलाईनरित्या या अधिसूचित सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांनी प्रास्ताविकात या दिनामागची भूमिका, त्याची प्रभावी अंमलबजावणीबाबत माहिती दिली. उत्कृष्ट काम करणा-या उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, शारदा दळवी, पोलीस अधिकारी कुंदन कुमार वाघमारे, सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड या अधिका-यांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपले सरकार सेवा केंद्रांचे संचालकांना जिल्हाधिका-यांच्या हस्ते लैपटॉपच्या किटचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना लोकसेवेची शपथ देण्यात आली. तहसीलदार अश्विन माने यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. *****

मुंबईत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चे भव्य आयोजन; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्घाटनासाठी उपस्थित राहणार - उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २८ : मुंबई बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ ते ४ मे २०२५ पर्यंत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाचे १ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बीकेसी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 1 मे रोजी संपूर्ण दिवसभर मुंबईत उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सोबत परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाही सहभाग राहणार आहे. उद्योग मंत्री सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले की, मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. विशेषतः हिंदी चित्रपटसृष्टीचे माहेरघर हे मुंबईला म्हटले जाते. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी याच महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपट सुरू केले. त्यामुळे मनोरंजनाच्या क्षेत्रात मुंबई ही देशात अग्रगण्य शहर आहे. त्याचबरोबर, गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक ही एक नंबरला आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात देखील महाराष्ट्र आणि मुंबई एक नंबरला राहिलेले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने देखील महाराष्ट्र या देशाच्या पातळीवर अन्य देशांशी स्पर्धा करतो आहे. म्हणून पर्यटनाची सगळी स्थळे जागतिक पातळीवर जावी, हा देखील या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा उद्देश आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, औद्योगिक व पर्यटन संस्कृती आणि ज्या काही महाराष्ट्राच्या परंपरा आहेत, त्या जागतिक पातळीवर जाव्यात, यासाठी मुंबई शहराची निवड केंद्र शासनाने केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले की, या कार्यक्रमात ३३ देशांतील मंत्री व मंत्रीस्तरीय अधिकारी, तसेच १२० आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बॉलिवूड, टॉलीवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार व निर्मातेही कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या चार दिवसीय सोहळ्यात भारत पॅव्हेलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियन, तेलंगणा पॅव्हेलियन तसेच अन्य संस्थांचेही पॅव्हेलियन उभारण्यात येणार आहेत. त्यांचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विविध क्षेत्रांतील परिसंवाद, राउंड टेबल कॉन्फरन्स, आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असेल. विशेषतः तिसऱ्या दिवशी म्हणजे ३ मे रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर ए. आर. रहमान यांच्या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. "हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, औद्योगिक व पर्यटन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्याची संधी आहे. या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे," असे आवाहनही उदय सामंत यांनी केले. 000 संजय ओरके/विसंअ/

‘वेव्हज परिषद-2025’निमित्त ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात सचिव डॉ. अन्बळगन पी. यांची मुलाखत

मुंबई दि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ‘ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’वेव्हज-2025 परिषदेनिमित्त उद्योग विभागाचे सचिव डॉ. अन्बळगन पी. यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 29 एप्रिल 2025 रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रात्री 8.00 वा. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर खाली दिलेल्या लिंकवरून ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे. एक्स- https://twitter.com/MahaDGIPR, फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR, यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’म्हणजेच ‘वेव्हज-2025’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद 1 ते 4 मे 2025 या कालावधीत जिओ कन्व्हेशन सेंटर, बीकेसी, मुंबई येथे होणार आहे. जगभरातील विविध देशांमधील मनोरंजन आणि निर्मितीशी संबंधित क्षेत्रातील मान्यवर यानिमित्ताने एकत्र येणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून भारताच्या सर्जनशील शक्तीला, क्रिएटीव्ह इकॉनॉमीला चालना मिळणार आहे. यानिमित्त होणारे नियोजित कार्यक्रम आणि तयारीबाबत उद्योग विभागाचे सचिव डॉ. अन्बळगन पी. यांनी ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात माहिती दिली आहे.

27 April, 2025

दशकपूर्ती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची!

राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबध्द पध्दतीने लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015' लागू केला आहे. यामुळे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी निश्चित झाली आहे. हा अधिनियम 28 एप्रिल 2015 रोजी अंमलात आला असून राज्यात हा दिवस “सेवा हक्क दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीस दहा वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त हा विशेष लेख… महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 हा कायदा राज्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. या कायद्याची व्याप्ती संपूर्ण राज्यभर आहे. हा अधिनियम संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार पात्र असलेल्या व्यक्ती व लोकसेवा देणारी सार्वजनिक प्राधिकरणे यांना लागू होतो. तसेच, या अधिनियमांतर्गत अधिसूचित केलेल्या सर्व सेवांसाठी हा कायदा लागू आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश हा पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम आणि वेळेत लोकसेवा पुरवणे आहे. यासोबतच, लोकसेवा देणाऱ्या सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे हे देखील या कायद्याचे उद्दिष्ट आहे. एखाद्या व्यक्तीची पात्रता संबंधित कायद्यातील तरतूदीनुसार ठरविली जाते. विशेष म्हणजे, या कायद्यानुसार सार्वजनिक सेवा मिळवण्यासाठी कोणताही पात्र व्यक्ती अर्ज करु शकते. परदेशात राहणारी एखादी व्यक्ती कोणत्याही अधिसूचित सेवेसाठी पात्र असेल, तर तीदेखील या कायद्यानुसार सेवा प्राप्त करू शकते. गेल्या दहा वर्षात 18 कोटींपेक्षा अधिक अर्जदारांनी या अधिनियमानुसार अधिसूचित सेवा मिळविल्या आहेत. "आपले सरकार पोर्टल" यांसारख्या उपक्रमांनी नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारात सुलभता आणली आहे. सर्व विभागांच्या मिळून एक हजारपेक्षा जास्त सेवा अधिसूचित असून त्यापैकी त्यापैकी 583 सेवा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध आहेत. एकूण 1 कोटी पेक्षा अधिक नागरिकांनी "आपले सरकार" पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेले आहे. सेवेचा अधिकार म्हणजे सार्वजनिक प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या वेळेत लोकसेवा मिळवण्याचा हक्क. सार्वजनिक प्राधिकरणात शासनाचे विभाग, विविध सरकारी संस्था, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळणाऱ्या अशासकीय संस्था यांचा समावेश होतो. प्रत्येक सेवेसाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या कायद्याची आणि नियमांची प्रत 'आपले सरकार' पोर्टल किंवा 'आरटीएस महाराष्ट्र' मोबाईल ॲपवरून विनामूल्य डाउनलोड करता येते. सार्वजनिक प्राधिकरणांची भूमिका : या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक प्राधिकरणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अधिसूचित सेवा आणि त्यासंबंधीची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे सार्वजनिक प्राधिकरणाचे कर्तव्य आहे. यासाठी, राजपत्रात अधिसूचना प्रकाशित करण्यात येते. सार्वजनिक प्राधिकरणाने पुरविलेल्या लोकसेवांची यादी, त्यासाठी लागणारा वेळ, विहित शुल्क, पदनिर्देशित अधिकारी आणि अपील प्राधिकाऱ्यांचे तपशील कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि त्यांच्या वेबसाइटवर किंवा पोर्टलवर दर्शविण्यात येतात. ही माहिती प्रदर्शित केली नाही, तर मुख्य आयुक्त किंवा संबंधित आयुक्त स्वतः दखल घेऊन कारवाई करू शकतात. लोकसेवा मिळवण्यासाठी आवश्यक असणारी विविध प्रमाणपत्रे, कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्रे कमी करण्यावर या कायद्यात भर देण्यात आला आहे. अर्ज कुठे करावा? लोकसेवा मिळवण्यासाठी अर्जदारास पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे, प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन किंवा 'आपले सरकार सेवा पोर्टल' वरून ऑनलाईन अर्ज करता येतो. प्रत्येक विशिष्ट सेवेसाठी अर्ज करण्याचा नमुना वेगळा असतो. अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची यादी संबंधित कार्यालयात, 'आपले सरकार सेवा केंद्रां'मध्ये आणि संबंधित विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असते. ऑनलाईन अर्ज सुविधा: 'आपले सरकार सेवा पोर्टल' (https://aaplesarkar.mahaonline.gov.in) हे विविध विभागांच्या लोकसेवांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एक सामान्य व्यासपीठ आहे. जे नागरिक स्वतःहून अर्ज करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी राज्यभरात 32000 हून अधिक 'आपले सरकार सेवा केंद्रे' (ASSK) कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त, 'आरटीएस महाराष्ट्र' नावाचे मोबाईल ॲपदेखील वापरकर्त्यांसाठी मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. प्रत्येक ऑनलाईन अर्जाला एक विशिष्ट ओळख क्रमांक (युनिक आयडेंटिफिकेशन नंबर - UIN) मिळतो, ज्यामुळे अर्जाच्या प्रगतीचा मागोवा घेणे सोपे होते. जर एखाद्या पात्र व्यक्तीला विहित वेळेत सेवा मिळाली नाही किंवा तिचा अर्ज फेटाळला गेला, तर ती व्यक्ती प्रथम अपील प्राधिकरणाकडे अपील करू शकते. प्रथम अपील अर्ज सेवा नाकारल्याच्या किंवा विहित कालमर्यादा संपल्याच्या दिवसापासून 30 दिवसांच्या आत दाखल करता येतो. मात्र, जर अर्जदाराकडे वेळेत अपील न करण्याचे योग्य कारण असेल, तर प्रथम अपील प्राधिकरण विलंब माफ करून 90 दिवसांत अपील स्वीकारू शकते. अपील सुनावणीची नोटीस अर्जदाराला प्रत्यक्ष, नोंदणीकृत पोस्टाने, ईमेलद्वारे, एसएमएसद्वारे किंवा मोबाईल ॲपद्वारे दिली जाते. आपले सरकार सेवा केंद्रांबाबत माहिती : 'आपले सरकार सेवा केंद्रे' ही नागरिकांना सार्वजनिक सेवा मिळविण्यासाठी मदत करतात. ही केंद्रे तहसील, ग्रामपंचायती, नगरपालिका, आणि काही खाजगी ठिकाणीही उपलब्ध आहेत. ही केंद्रे आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सर्व विभागांच्या सेवा पुरवतात. लोकसेवेत कसूर झाल्यास कारवाई या अधिनियमात लोकसेवा पुरविण्यात किंवा अपिलांवर निर्णय घेण्यात अधिकाऱ्यांकडून कसूर झाल्यास दंडात्मक कारवाईची स्पष्ट तरतूद आहे. पदनिर्देशित अधिकाऱ्यावरील दंड: जर पदनिर्देशित अधिकाऱ्याने विहित वेळेत योग्य कारणाशिवाय लोकसेवा दिली नाही, तर त्याच्यावर कमीतकमी ₹ 500 ते कमाल ₹ 5,000 पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. प्रथम अपील प्राधिकारी सुनावणीनंतर हा दंड लावू शकतात. वारंवार लोकसेवा देण्यात दिरंगाई झाल्यास किंवा अपील प्राधिकाऱ्याच्या निर्देशांचे पालन न केल्यास, संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाऊ शकते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 हा नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणारा आणि शासकीय कामांमध्ये पारदर्शकता आणणारा एक महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक प्राधिकरणांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावणे आवश्यक आहे. नागरिकांनी देखील आपल्या हक्कांबाबत जागरूक राहून या कायद्याचा योग्य वापर केल्यास त्यांना वेळेत आणि पारदर्शकपणे लोकसेवा मिळू शकेल. - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई

'सेवा हक्क दिना'चे आज आयोजन

* शंभर टक्के ऑनलाईन सेवा दिलेल्या विभागप्रमुखांचा प्रशस्तीपत्र देवून होणार गौरव हिंगोली (जिमाका),दि.२७ : शासनाने शासन निर्णय निर्गमित करुन 28 एप्रिल हा दिवस 'सेवा हक्क दिन' म्हणून साजरा करण्यास मान्यता दिलेली आहे. दिनांक 28 एप्रील 2025 रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या अंमलबजावणीस दहा वर्ष पूर्ण होत असल्याने या दशकपूर्तीचे औचित्य साधून जिल्हास्तरावर तसेच ग्रामपातळीवर ग्रामपंचायत स्तरावर विशेष उपक्रम राबविण्याबाबत सूचित केलेले आहे. या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक 28 एप्रील, 2025 रोजी हिंगोली जिल्ह्यामध्ये 'सेवा हक्क दिवस' तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या दशकपूर्तीचे औचित्य साधून सर्व कार्यालयामध्ये तसेच ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय,आपले सरकार केंद्र या ठिकाणी विविध उपक्रम राबवून हा दिवस जनसहभागासह साजरा करावा व नागरिकांमध्ये या अधिनियमाबाबत तसेच आपले सरकार पोर्टल व्दारे उपलब्ध असलेल्या सेवाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करावेत. दिनांक 28 एप्रील 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता 'सेवा हक्क दिन'निमित्त उक्त कायद्याच्या ठळक तरतुदीचे वाचन करुन सेवेची बांधिलकी मानणारी शपथ घेण्यात येणार आहे. तसेच ज्या विभागांनी, कार्यालयांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अधिनियमान्वये अधिसूचित केलेल्या सेवा 100 टक्के ऑनलाईन दिलेल्या कार्यालय,विभागप्रमुखांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट काम करणा-या अधिका-यांचा गौरव करण्यात येणार आहे. या समारंभास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, स्वंयसेवी संस्था, नागरिक, पत्रकार यांनी उपस्थित राहुन सेवा हक्क दिनांचा कार्यक्रम साजरा करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांनी केले आहे. ******

विशेष लेख- पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम

राज्यातील पात्र नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित पध्दतीने लोकसेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला आहे. हा अधिनियम 28 एप्रिल, 2015 रोजी अंमलात आला आहे. त्यानुषंगाने राज्यामध्ये 28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या अंमलबजावणीस दहा वर्षे पूर्ण होत असल्याने या दशकपूर्तीचे औचित्य साधून जिल्हास्तरावर तसेच ग्रामपातळीवर विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या लोकसेवा हक्क दिनाच्या अनुषंगाने हा विशेष लेख… महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 हा एक क्रांतिकारी कायदा असून त्यामध्ये अनेक वैशिष्ठ्ये आहेत जी इतर राज्यांच्या तद्अनुषंगिक कायद्यांपेक्षा वेगळी आहेत. लोकसेवा वितरित करताना विविध बाबी साध्य करण्याचा या कायद्याचा उद्देश आहे. पारदर्शकता, उत्तरदायित्व, कालबद्धता, कार्यक्षमता, डिजिटल मंचाचा उपयोग करुन लोकसेवा वितरणामध्ये सक्षमता व पारदर्शकतेच्या संस्कृतीस चालना देण्यावर या कायद्याचा भर आहे. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सार्वजनिक सेवांचा दर्जा उंचावणे व त्या विहित कालावधीत व जबाबदारीपूर्वक पुरविल्या जातील, याची खात्री करणे हे या कायद्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या कलम 3 नुसार, प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या कालावधीच्या आत आणि त्यानंतर वेळोवेळी ते पुरवीत असलेल्या लोकसेवा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपीलीय प्राधिकारी आणि द्वितीय अपीलीय प्राधिकारी यांचा तपशील आणि नियत कालमर्यादा या अधिनियमाखाली अधिसूचित करील. प्रत्येक पात्र व्यक्तीस (कायदेशीर, तांत्रिक, आर्थिक व्यवहार्यतेच्या अधीन राहून) या अधिनियमानुसार राज्यातील लोकसेवा नियत कालमर्यादेच्या आत प्राप्त करण्याचा हक्क असेल. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 नुसार कोणतीही अधिसूचित लोकसेवा मिळविण्यासाठी कोणत्याही पात्र व्यक्तीस पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे अर्ज करता येईल. असा अर्ज निकाली काढण्यासाठी नियत केलेल्या कालमर्यादेसह अर्ज मिळाल्याचा दिनांक एका विशिष्ट अर्ज क्रमांकासह अर्जदारास देण्यात येईल. प्रत्येक अर्जदार त्याला प्रदान केलेल्या विशिष्ट अर्ज क्रमांकासह त्याच्या ऑनलाइन अर्जाच्या स्थितीची पाहणी करू शकतो. या अधिनियमानुसार कोणतीही पात्र व्यक्ती ज्याचा अर्ज फेटाळला गेला आहे किंवा ज्याला नियत कालमर्यादेच्या आत लोकसेवा प्रदान केली गेली नसेल अशी कोणतीही पात्र व्यक्ती, अर्ज फेटाळल्याचा आदेश मिळाल्याच्या किंवा नियत कालमर्यादा समाप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या कालावधीच्या आत प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्याकडे अपील दाखल करू शकते. प्रथम अपिलीय प्राधिकारी, आपल्या आदेशात पात्र व्यक्तीला सेवा देण्यासाठी पदनिर्देशित अधिकाऱ्याला निर्देश देऊ शकतात किंवा त्यास अपील दाखल केल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या कालावधीच्या आत अपील फेटाळण्याची कारणे लेखी नमूद करून अपील फेटाळू शकतात. प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध अर्जदार प्रथम अपील प्राधिकाऱ्याचा आदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या कालावधीत द्वितीय अपिलीय प्राधिकाऱ्यांकडे द्वितीय अपील दाखल करू शकतो. पदनिर्देशित अधिकारी पुरेशा आणि वाजवी कारणाशिवाय लोकसेवा प्रदान करण्यात अयशस्वी झाल्यास 500 पेक्षा कमी नसेल परंतु 5 हजार रुपयांपर्यंत असू शकेल एवढी शास्ती संबंधित पदनिर्देशित अधिकाऱ्यावर लादली जाऊ शकते. यावर्षी लोकसेवा हक्क अधिनियमांच्या अंमलबजावणीस दहा वर्षे पूर्ण होत असल्याने जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये जिल्हास्तरावर सर्व पदनिर्देशित अधिकारी, कर्मचारी यांनी सेवेची बांधिलकी मानणारी शपथ घेतील. विविध समारंभाचे आयोजन करणे, अधिनियमाची वैशिष्ट्ये विशद करणे, सेवा देण्याच्या कामाचा आढावा सादर करणे, उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करणे, जिल्ह्यात सेवादूत योजना सुरु करणे, नागरिकांना एसएमएसद्वारे अधिनियमाची व पोर्टलची माहिती देणे, माहिती फलक क्यूआर कोडसह प्रदर्शित करणे, विद्यार्थी, महिला, नागरिकांशी सुसंवाद साधणे, विविध स्पर्धाचे आयोजन करणे यासह विविध उपक्रम जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत स्तरावर दि. 28 एप्रिल रोजी विशेष सभेचे आयोजन करणे, ग्रामपंचायत सदस्यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रत देणे, कायद्याच्या ठळक तरतुदीचे वाचन करणे, ग्रामपंचायतीमध्ये फलक लावले नसल्यास ते लावणे, अधिसूचित सेवांची व शुल्कांची माहिती देणारा क्यूआर कोड लावणे, तक्रार नोंदविण्यासाठी क्यूआर कोड लावणे, ग्रामपंचायत स्तरावरील सर्व ऑनलाईन सेवा नागरिकांना उपलब्ध करुन देण्याची सुरुवात करणे, आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन, कोनशिला समारंभ आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत शासनाच्या अधिसूचित सेवा कालमर्यादेत मिळाव्या यासाठी https//:aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर आपले सरकार पोर्टल सेवेत आहे. - प्रभाकर बारहाते, जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली ******

मूल्य साखळी भागीदार निवडीसाठी पात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अर्ज करावेत

हिंगोली(जिमाका), दि. २७ : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत सन २०२५-२६ साठी मूल्य साखळी भागीदार यांच्यामार्फत समूहामध्ये प्रमाणित बियाणे शेतकरी प्रशिक्षण व शेतकरी शेतीशाळा इत्यादी घटक राबवायचे आहेत. त्यानुषंगाने मूल्य साखळी भागीदार निवडीसाठी पात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत नवीन कार्यकारी सूचना केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाल्या आहेत. या अभियानाची सन २०२५-२६ मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत सोयाबीन, करडई या पिकांसाठी महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्याची निवड केली आहे. अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये पिकनिहाय मूल्य साखळी समूह निवडणे, मूल्य साखळी भागीदार म्हणून शेतकरी उत्पादक कंपनीची निवड करणे, तांत्रिक सहाय्य संस्था म्हणून कृषि विज्ञान केंद्राची निवड, मुलभूत बियाणे खरेदी (१०० टक्के केंद्र हिस्सा), मूल्य साखळी भागीदार यांच्यामार्फत समुहामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण, शेतकरी शेतीशाळा व मूल्य साखळी भागीदार यांना व्यवस्थापन खर्च, मूल्य साखळी समुहामधील शेतकऱ्यांचे माती परिक्षण, सीड हब, ब्लॉक प्रात्यक्षिके, काढणीत्तोर सुविधा सहाय्य, कृषि मॅपरवर लाभार्थ्यांची माहिती भरणे इत्यादी घटकांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत सन २०२५-२६ या योजनेअंतर्गत मूल्य साखळी भागीदार यांच्यामार्फत समूहामध्ये प्रमाणित बियाणे शेतकरी प्रशिक्षण व शेतकरी शेतीशाळा इत्यादी घटक राबवायचे आहेत. त्यानुषंगाने मूल्य साखळी भागीदार म्हणून निवड करावयाच्या शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्थांसाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे असतील. कंपनी कायदा किंवा सहकारी कायद्यांतर्गत नोंदणी केलेली असावी. हिंगोली जिल्ह्यात समूह तयार झाला आहे तेथे काम करण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा. किमान २०० शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्थेमध्ये नोंदणीकृत असावेत. सहकारी संस्था असल्यास संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये तेलबिया पिकांत कामकाजाबाबत नमूद असावेत. मागील तीन वर्षातील सरासरी वार्षिक उलाढाल ९ लाख रुपयांपेक्षा जास्त असावी. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेतकऱ्यांचा किमान ३ लाख रुपयांचा समभाग असावा. शेतकरी उत्पादक कंपनी सहकारी संस्था प्राधान्याने कमी उत्पादकता असणाऱ्या तालुक्यांमध्ये कार्यरत असावी. सरकारकडून अनुदान प्राप्तकर्ता शेतकरी उत्पादक संघाला प्राधान्य दिले जाईल. १० हजार रुपये शेतकरी उत्पादक संघ योजनेंतर्गत तयार केलेले शेतकरी उत्पादक कंपनी, नाफेड, एनएससी-ओएस इत्यादी सार्वजनिक संस्थांकडे नोंदणीकृत तेलबियांशी संबंधित शेतकरी उत्पादक कंपनी यांना पात्रता निकषांच्या पूर्ततेच्या अधीन राहून प्राधान्य दिले जाईल. हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांनी/सहकारी संस्थांनी निकषानुसार दि. ३० एप्रिलपूर्वी या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याकडे कागदपत्रासह अर्ज प्रत्यक्ष सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. **

महाराष्ट्रातील जनतेचा तसेच प्रशासनाचा, 28 एप्रिल हा "सेवा हक्क दिन" लेखक- डॉ.किरण जाधव, (से.नि.भा.पो.से.) राज्य सेवा हक्क आयुक्त, छत्रपती संभाजीनगर

कार्यकाळ- दिनांक 1 डिसेंबर, 2021 पासुन आजतागायत महाराष्ट्र शासनाने दिनांक 1 एप्रिल, 2025 रोजी '28 एप्रिल' हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी तसेच सर्व शासकीय अधिकारी कर्मचा-यांसाठी सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 वर्षांपूर्वी म्हणजे दिनांक 28 एप्रिल,2015 रोजी महाराष्ट्र शासनाने विशेष करुन तत्कालीन मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणविस यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील जनतेला नियत कालमर्यादेच्या आत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क देणारा 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015' अंमलात आणला आहे. या अधिनियमातील कलम 4 अन्वये महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी व कर्मचा-यांवर अशा नियत कालमर्यादेतच जनतेला लोकसेवा देण्याची जबाबदारी दिली आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारे त्याचे उत्तरदायित्व निश्चित केले आहे. हा कायदा प्रशासकीय अधिका-यांना कर्तव्य भावनेतून जनतेची सेवा करण्यासाठी प्रेरीत करत आहे. या कायद्याने नव्याने निर्मित केलेल्या राज्य सेवा हक्क आयोगाने आपले ब्रीदवाक्य "आपली सेवा आमचे कर्तव्य " असे निर्धारित केलेले आहे. शासनाने आयोगाच्या शिफारशी नुसार आयोगाने निर्धारीत केलेले बोधचिन्ह व ब्रीदवाक्य हे नागरीकांना दिल्या जाणा-या सर्व अधिसूचित सेवांच्या प्रमाणपत्रांवर मुद्रित केले जात आहे. हे बोधचिन्ह आणि ब्रीदवाक्य शासकीय विभागांकडून त्यांच्या अधिका-यांचा व कर्मचा-यांचा सेवाभाव हेच कर्तव्य ही कर्मयोगाची भावना उर्धृत तर करतेच शिवाय ती त्यांनी अवलंबलेली पारदर्शकता, संवेदनशिलता व कार्यक्षम समयोचितता अशा सर्वेात्तम गुणवत्तेची ग्वाही सुध्दा देत आहे. सेवा हक्क अधिनियमाची जडणघडण महाराष्ट्र शासनाने सन 2005 मध्येच दफतर विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 अंमलात आणला. या कायद्यांतर्गत सुध्दा सर्व विभागांबाबत ते जनतेला देत असलेल्या सर्व लोकसेवांची नागरिकांची सनद त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर फलकाच्या स्वरुपात दर्शनी भागात प्रदर्शित करतील असे प्राविधान आहे. या नागरीकांच्या सनदेमध्ये लोकसेवा देणा-या अधिका-यांचे पदनाम लोकसेवा देण्यासाठी विहित केलेला कमाल कालावधी तसेच अशा लोकसेवा देणा-या पदनिर्देशित अधिकारी यांचेकडून विलंब झाल्यास किंवा सेवा नाकारल्यास अपील करावयाच्या अधिका-यांचे म्हणजेच प्रथम अपीलीय प्राधिकारी यांचे पदनाम (त्याच विभागाचे गट-ब चे राजपत्रित अधिकारी) तसेच जर प्रथम अपीलामध्ये अपीलार्थिचे समाधान झाले नाही तर द्वितीय अपीलीय प्राधिका-याचे पदनाम (त्याच विभागाचे गट-अ चे राजपत्रित अधिकारी) दर्शविण्यात यावे असे प्राविधान आहे. परंतु विद्यमान मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणविस यांनी स्वत: पुढाकार घेऊन या दफतर विलंबास प्रतिबंध अधिनियम या कायद्याचा परिणाम होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर दिनांक 28 एप्रिल, 2015 रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा कायदा अंमलात आणला. 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015' कायद्याच्या कलम 5(2) नुसार पदनिर्देशित अधिकारी अर्ज मिळाल्यावर नियत कालमर्यादेत एकतर थेट लोकसेवा देईल किंवा ती सेवा मंजूर करील किंवा फेटाळण्याची कारणे लेखी नमूद करुन अर्ज फेटाळील. पदनिर्देशित अधिकारी, अर्जदाराला त्याच्या आदेशाविरुध्द अपील करण्याचा कालावधी आणि ज्याच्याकडे पहिले अपील दाखल करता येईल त्या प्रथम अपील प्राधिका-याचे नाव व पदनाम त्या कार्यालयीन पत्यासह लेखी कळविल अशी जबाबदारी पदनिर्देशित अधिका-यावर निश्चित केलेली आहे. तसेच कलम-10 नुसार, या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये पदनिर्देशित अधिकारी व प्रथम अपिलीय प्राधिकारी यांनी कसूर केल्यास रु.500/- पेक्षा कमी नसेल परंतू रु.5000/- पर्यंत असू शकेल एवढी शास्ती चे प्राविधान आहे. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग या कायद्याने या कायद्यातील सेवा हक्क प्राविधानांच्या अंमलबजावणीचे सनियंत्रण करण्यासाठी एक निष्पक्ष,स्वतंत्र आयोगाची निर्मिती केली गेली. हा आयोग मुख्य आयुक्त तसेच सहा महसूल विभागांसाठी प्रत्येकी एक आयुक्त यांचा बनलेला आहे. सदर आयुक्तांची नियुक्ती ही सेवानिवृत्त असलेल्या शासन किंवा सार्वजनिक प्राधिकरण यातील प्रशासनाचे व्यापक ज्ञान व अनुभव असलेल्या सार्वजनिक जीवनातील प्रख्यात अशा व्यक्तींमधून केली जाते. या अधिनियमाच्या कलम 16 अनुसार या कायद्याची अंमलबजावणीची सुनिश्चिती करणे व अधिक चांगल्या रितीने लोकसेवा देण्याची सुनिश्चिती करण्यासाठी राज्य शासनाला सूचना करणे हे आयोगाचे कर्तव्यच असल्याचे नमूद केले आहे. लोकसेवा देण्याच्या कार्यपध्दतीमुळे ज्यामुळे लोकसेवा देण्यामध्ये अधिकाधिक पारदर्शकता व सुलभता येईल असे बदल करण्याची शिफारस करणे तसेच लोकसेवा कार्यक्षमपणे देण्यासाठी सार्वजनिक प्राधिकरणांनी करावयाच्या उपाययोजनांसाठी शिफारस करणे अशा सर्व उपाययोजनां द्वारे आयोगाला सार्वजनिक प्राधिकरणांच्या लोकसेवा देण्याबाबत कामगिरीचे सनियंत्रण करणे असे अधिकार दिलेले आहेत. आपले सरकार पोर्टल व मोबाईल ॲप महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चे कलम 20(2) मध्ये पात्र व्यक्तींच्या अपेक्षांच्या प्रती पदनिर्देशित अधिका-यांना संवेदनशिल करणे आणि नियत कालमर्यादेत पात्र व्यक्तींना लोकसेवा देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करणे हे या कायद्याचे प्रयोजन व उद्दिष्ट असल्याचे नमूद केले आहे. याच कलमाचा अवलंब करुन महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांनी आपण देत असलेल्या जास्तीत जास्त सेवा या त्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देण्याचे अवलंबिले आहे. अशा सर्व विभागांच्या सर्व ऑनलाईन सेवा दिनांक 28 एप्रिल, 2025 पर्यंत 33 विभागांच्या अधिसूचित करण्यात आलेल्या एकूण 1027 सेवांपैकी 583 सेवा आपले सरकार पोर्टल व मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन देण्यात येत आहेत. अधिसूचित केलेल्या सेवांमध्ये नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील आवश्यक सेवा उदा.जन्म/मृत्यू प्रमाणपत्र,उत्पन्न दाखला,वाहन परवाना, जात प्रमाणपत्र, मृद व जल नमुना तपासणी, बियाणे नमुना चाचणी,किटकनाशके नमुना चाचणी, जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र,शेतकरी दाखला, वय राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र,रेशनकार्ड,ध्वनिक्षेपण परवाना, सभा-मिरवणूकांची परवानगी, विवाह नोंदणी प्रमाणपत्र,नमुना 8 अ चा उतारा देणे इ. लोकोपयोगी सेवा समाविष्ट आहेत. सध्या प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रामार्फत त्यांच्या विभागाच्या फक्त 7 अधिसूचित सेवांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. परंतु दिनांक 28 जानेवारी, 2025 च्या शासन निर्णयाद्वारे आता या ग्रामपंचायतीतील केंद्रांना, महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या ऑनलाईन सेवेचे लॉगीन क्रेडेन्शियल्स देऊन त्यांच्या मार्फत सर्व विभागांच्या सर्व ऑनलाईन सेवांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे ग्रामिणांना हव्या असलेल्या कोणत्याही सेवेसाठी कोणत्याही विभागाच्या जिल्हास्तरीय वा तालुकास्तरीय कार्यालयात स्वत: जाऊन आपल्या अर्जाचा पाठपुरावा करण्याची आवश्यकता उरली नाही. तसेच दिनांक 27 मार्च, 2025 रोजी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सन्मा.मंत्री महोदय यांनी घोषणा केल्याप्रमाणे 100 रुपये अतिरिक्त शुल्क भरुन नागरीकांना त्यांच्या मागणीनुसार आपले सरकार सेवा केंद्र चालकाद्वारे त्यांच्या घरी जाऊन त्यांचा अर्ज त्यांच्या समक्ष ऑनलाईन भरण्याची तसेच सेवा मंजूर झाल्यानंतर त्या सेवेचे प्रमाणपत्र / मंजूरी आदेश त्यांच्या घरी वितरीत करण्याची "सेवादूत योजना "सुरु केली आहे. 28 एप्रिल "सेवा हक्क दिन "महोत्सव शासनाच्या महसूल विभागाकडून 1 ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो, तसेच एप्रिल महिन्यामध्ये 21 एप्रिल रोजी नागरी सेवा दिन तर 24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो परंतु या सर्व विभागांच्या विविध दिनांचा परिपाक म्हणजे 28 एप्रिल सेवा हक्क दिवस हा आहे. हा सेवा हक्क दिन महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक कार्यालयाकडून त्यांनी या वर्षभरात जनतेला दिलेल्या सेवांचा तसेच त्यांच्या सेवा हक्कांच्या अंमलबजावणीच्या कार्यवाहीचा वार्षीक लेखाजोखा त्यांच्या लाभार्थिाना बोलावून किंवा जनतेच्या लोकप्रतिनिधींना बोलावून साजरा करायचा आहे. या दिवशी सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये सर्व जिल्हाधिकारी आपल्या जिल्हयाचे पालकमंत्री, खासदार, आमदार यांना विशेष आमंत्रित करुन तसेच सर्व जिल्हयांच्या विविध विभागांच्या अधिका-यांना बोलावून समारंभपूर्वक सर्व विभागांच्या विगत वर्षाच्या कामाचा आढावा घेतील.तसेच उपस्थित सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारीही या दिवशी त्यांच्या सेवानिष्ठेची,सचोटीची, सौजन्यतेची कटिबध्दता अधोरेखीत करणारी त्यांना नेमून दिलेली सेवा हक्क शपथ सुध्दा घेतील. तसेच या महोत्सवी कार्यक्रमात ज्या अधिकारी /कर्मचा-यांनी या अधिनियमाच्या अनुसार सचोटीने व 100% प्रकरणांमध्ये नियत कालावधीत जनतेला अधिसूचित सेवा दिल्या असतील त्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा विशेष प्रशस्तीपत्र देऊन मा. पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात येईल. तसेच या दिवशी महाराष्ट्र शासनातर्फे मा. पालकमंत्री हे जनतेला तसेच शासकीय अधिका-यांना मार्गदर्शन करतील. महाराष्ट्र शासनाने आपले सरकार सेवा पोर्टल हे पात्र व्यक्तींसाठी बहुतांश विभागांच्या कोणत्याही अधिसूचित लोकसेवेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संयोजित व्यासपीठ आहे. http://aaplesarkar:mahaonline.gov.in आजवर 01,07,51,000 नागरीकांनी या संकेतस्थळावर नोंदणी करुन सेवा घेतली आहे. याखेरीज आरटीएस महाराष्ट्र हे मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर / ॲपल स्टोअर वर विनामूल्य उपलब्ध आहे. अर्जदार मराठी किंवा इंग्रजी पर्याय निवडू शकतो. पात्र व्यक्ती स्वत: अर्ज करु शकत नसल्यास महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये कार्यान्वित असलेल्या 39,783 आपले सरकार सेवा केंद्रांद्वारेही अर्ज करुन सेवा घेता येते. ही केंद्रे खासगी केंद्रचालक चालवितात व त्यांच्यावर त्यांच्या निवडीपासूनच जिल्हाधिका-यांचे नियंत्रण असते. काही विभागांची स्वतंत्र पोर्टल्स आहेत उदा. महसूल विभागाचे महाभूलेख, परिवहन विभागाचे वाहन, सारथी इ. हा अधिनियम लागू झाल्यापासुन 17 एप्रिल, 2025 पर्यंत ऑनलाईन सेवांसाठी 18,76,52,113अर्ज प्राप्त झाले त्यांच्या निपटा-याचे प्रमाण 94.15% आहे. सन 2024-25 मध्ये एकूण 02,77,28011 सेवा अर्ज प्राप्त झाले असून निपटा-याचे प्रमाण 92.33% आहे. अनेक अर्ज ऑफलाईन स्वरुपातही येतात. मात्र आयोगाने अनेक प्रयत्न करुन सुध्दा ऑफलाईन प्राप्त झालेल्या व निपटारा केलेल्या अर्जांची आकडेवारी संबंधित विभागांकडून उपलब्ध झालेली नाही. तथापी ही संख्या जवळपास ऑनलाईन आकडेवारीच असल्याचा अंदाज आहे. मा.मुख्यमंत्री महोदयांनी अशा ऑफलाईन सेवा देण्याच्या प्रवृत्तींना आळा बसविण्यासाठी सर्व विभागांच्या सर्व सचिवांची विशेष बैठक घेऊन पुढील 31 मे,2025 पर्यंत सर्व विभागांच्या सर्व सेवा या आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करुन द्याव्यात तसे च उर्वरित 306 अधिसूचित सेवा ज्या सध्या ऑफलाईन आहेत त्या ऑनलाईन उपलब्ध करुन आपले सरकार या एकल पोर्टलवर संलग्न करुन 15 ऑगस्ट,2025 पर्यंत नागरीकांना उपलबध करुन देण्याविषयी निर्देश दिलेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या तसेच आयोगाच्या वतीने मी महाराष्ट्राच्या सर्व जनतेला सेवा हक्क दिनाच्या शुभेच्छा देत आहे. ********

26 April, 2025

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुंज येथील मयतांच्या वारसांना सांत्वनापर भेट

*राज्य शासन वारसांना सर्वतोपरी मदत करणार-उपमुख्यमंत्री अजित पवार* हिंगोली, दि. २६ (जिमाका) : राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सायंकाळी वसमत तालुक्यातील गुंज येथील मयत ७ महिला शेतमजुरांच्या वारसांची सांत्वनापर भेट घेऊन त्यांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लक्ष रुपयांचा धनादेश वितरीत‌ केला. तसेच राज्य शासन मयतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार राजू नवघरे, माजी मंत्री नवाब मलिक, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास शेळके, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृष्णा राऊत याच्याशी यावेळी संवाद साधला. 'तू चांगला अभ्यास कर, पुढील शिक्षणासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. गुंज‌ येथील महिला शेतमजुरांचा दि. ४ एप्रिल २०२५ रोजी आलेगाव येथील दगडोजी लक्ष्मण शिंदे यांच्या शेतात शेतकामासाठी‌ जात असताना ट्रॅक्टर ट्रॉलीसहीत विहिरीत पडून मृत्यू झाला. त्यामध्ये १) ताराबाई सटवाजी जाधव (३५), धुरपता सटवाजी जाधव (१८) सिमा (सिमरन) संतोष कांबळे (१८), सरस्वती लखन बुरड (२५), चऊतराबाई माधव पारधे (४५), मिना तुकाराम राऊत (२५) आणि ज्योती इरबाजी सरोदे (३०) यांचा समावेश होता. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते आज सातही मयतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लक्ष रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला. जिल्हा प्रशासनाकडून घटनेतील मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबीयांना व जखमी झालेल्या व्यक्तींना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी, यासाठी ७ एप्रिल रोजी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले वसमत येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण* महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत वसमत शहर पाणीपुरवठा योजना, आपत्ती व्यवस्थापन योजनेंतर्गत कुरुंदा ता. वसमत येथील पूर नियंत्रण उपाययोजनेचे भूमीपूजन व बाभूळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ऑनलाइन लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज वसमत येथे करण्यात आले. ******

25 April, 2025

विशेष लेख -: ‘वेव्हज 2025’ : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ

देशातील माध्यम व मनोरंजन (Media & Entertainment) क्षेत्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरणाऱ्या ‘WAVES 2025’ या जागतिक परिषदेस मुंबईत भव्य सुरुवात होत आहे. 1 मे रोजी, प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिओ वर्ल्ड सेंटर, मुंबई येथे या ऐतिहासिक परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री श्री. अश्विनी वैष्णव व मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. 1 ते 4 मे दरम्यान होणारी ही परिषद भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून, माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. महाराष्ट्र – ‘ग्लोबल क्रिएटर इकॉनॉमी’कडे वाटचाल बॉलीवूड, टीव्ही आणि ओटीटी इंडस्ट्री यांचे केंद्रस्थान असलेली मुंबई भारताच्या मनोरंजन क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिली आहे. आता याच मुंबईला आणि महाराष्ट्राला जागतिक स्तरावर 'क्रिएटर हब' म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न ‘WAVES 2025’ च्या माध्यमातून होतो आहे. ऑस्कर, कान्स आणि दावोससारख्या जागतिक परिषदेच्या धर्तीवर प्रथमच भारतात अशी परिषद आयोजित होत असून, जगभरातील 100 पेक्षा अधिक देशांतील प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला दिशा देणारा मंच ‘WAVES 2025’ ही परिषद केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक माध्यम व मनोरंजन (M&E) उद्योगाला एकत्र आणणारा, नवसृजनास चालना देणारा आणि गुंतवणुकीसाठी दरवाजे उघडणारा एक महत्त्वाचा मंच आहे. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, तंत्रज्ञानातील कौशल्य आणि प्रतिभेचा संगम या परिषदेच्या केंद्रस्थानी असणार आहे. या परिषदेतील एक विशेष आकर्षण 'WAVES बाजार’* ‘WAVES बाजार’ – एक इंटरॅक्टिव्ह व्यावसायिक व्यासपीठ असून जिथे खरेदीदार आणि विक्रेते थेट संवाद साधू शकतात. नव्या प्रकल्पांची ओळख, सर्जनशील कल्पना, आणि गुंतवणुकीच्या संधी येथे उपलब्ध होतील. विशेषतः, श्रेणीआधारित शोध प्रणाली आणि सुरक्षित मेसेजिंग सुविधांमुळे व्यवहार अधिक प्रभावी आणि विश्वासार्ह ठरतील. परिषदेत काय असणार? १. परिषद सत्रे – जागतिक उद्योग नेते, विचारवंत आणि नवोन्मेषक विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. २. मीडिया मार्केटप्लेस – भारताच्या माध्यम व मनोरंजन (M&E) क्षेत्रातील वैविध्य, क्षमता आणि नवकल्पनांचे आकर्षक प्रदर्शन. ३. तंत्रज्ञान प्रदर्शन – नवीन तंत्रज्ञान आणि सर्जनशील प्रकल्पांचे लाईव्ह डेमो. ४. सांस्कृतिक कार्यक्रम – भारताच्या समृद्ध कलासंपदेची झलक दाखवणारे बहारदार कार्यक्रम. 'WAVES 2025’ : उद्योगाला बळकटी देणारी संजीवनी' माध्यम आणि मनोरंजन उद्योग सध्या मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. ‘WAVES 2025’ ही परिषद नव्या कल्पनांना दिशा देऊन, भारताला जागतिक M&E सुपरपॉवर बनवण्याचा पाया रचणार आहे. सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि धोरणात्मक भागीदारी यांचा मेळ घालून, भारताला ‘ग्लोबल कंटेंट डेस्टिनेशन’ बनवण्याचे स्वप्न या मंचाद्वारे प्रत्यक्षात उतरणार आहे. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणारी ही परिषद भारताच्या सृजनशील भविष्यासाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारी ठरणार आहे. वर्षा फडके-आंधळे, उपसंचालक (वृत्त) ००००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हिंगोली जिल्हा दौरा

हिंगोली, दि. २५ (जिमाका): उप मुख्यमंत्री अजित पवार हे शनिवार (दि.२६) रोजी हिंगोली जिल्हा दौ-यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे परभणी येथून मोटारीने सायंकाळी ५ वाजता गुंज येथे आगमन होईल. उपमुख्यमंत्री श्री. पवार हे गुंज येथील मृत महिला शेतमजुरांच्या वारसांना सांत्वनापर भेट देणार आहेत. दि. ४ एप्रिल रोजी येथील शेतकाम करणा-या महिला मजुरांचा नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथील विहिरीत ट्रँक्टर ट्रॉली पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर ते वसमत येथील मयुर मंगल कार्यालय येथील सामूहिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर वसमत येथील प्रसाद गार्डन मंगल कार्यालय येथून सायंकाळी ७ वाजता विविध विकासकामांचे भूमिपूजन करणार आहेत. या भूमिपूजनानंतर त्यांची वेळ राखीव असेल. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोईनुसार नांदेडकडे प्रयाण करतील. *****

24 April, 2025

सेवा हक्क दिन साजरा करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 24 : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या अंमलबजावणीस दि. 28 एप्रिल, 2025 रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या दशकपूर्तीचे औचित्य साधून जिल्हास्तरावर तसेच ग्रामपातळीवर ग्रामपंचायत स्तरावर विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सर्व कार्यालय प्रमुखांनी दि. 28 एप्रिल, 2025 रोजी जनसहभागासह विविध उपक्रम राबवून लोकसेवा हक्क दिन साजरा करावा. नागरिकामध्ये अधिनियमाची तसेच ऑनलाईन उपलब्ध सेवाबाबतची जनजागृती करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी केले आहे. ******

भूसंपादन प्रक्रियेतील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 24 : जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी लागणाऱ्या जमिनीसाठीची भूसंपादन प्रक्रियेतील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत संबंधित यंत्रणेला दिले. आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली भूसंपादन, सार्वजनिक बांधकाम, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग वन हक्क आदी विभागाचा आढावा घेतला. यावेळी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मंजुषा मुथा, हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भूते, वसमतचे नायब तहसीलदार दामोदर जाधव, उप प्रादेशिक परिहवन अधिकारी राहुल गावडे, सहायक मोटार वाहन निरीक्षक अतुल बानापुरे, उप अभियंता सुदेश देशमुख आदी उपस्थित होते. जिल्ह्यात विविध विकास प्रकल्प, त्यासाठी लागणारी जमीन, सुरु असलेले विविध कामे, मावेजाचे वाटप, भूसंपादित जमिनीची मोजणी आदी कामे तातडीने मार्गी लावावेत. नागपूर ते पत्रादेवी शक्तिपीठ महामार्ग मोजणीच्या कामासाठी शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्या शेतकऱ्यांची समजूत काढून शक्तीपीठ महामार्ग मोजणी तात्काळ सुरु करावी. तसेच त्यांना मावेजा त्वरित मिळवून देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिल्या. अपघाताची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना करा-जिल्हाधिकारी जिल्ह्यातील अपघाताची संख्या कमी करण्यासंदर्भात उपाययोजना करावेत, जिल्ह्यातील बासंबा टी पॉईंट व लिंबाळा मक्ता या अपघात प्रवण क्षेत्रात पॅराबोलिक मीरर लावण्या संदर्भात सूचित केले. तसेच अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई चालू ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बैठकीत दिले. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांनी अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर आतापर्यंत केलेली कार्यवाही, अपघात प्रवण क्षेत्र व त्याबाबत करावयाच्या उपाययोजनाची माहिती आढावा बैठकीत दिली. वनहक्क धारकांना शासनाचा लाभ देण्याची कार्यवाही करावी-जिल्हाधिकारी अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी वन हक्क धारकांचे सामुहिक व वैयक्तीक वनहक्काचे जुने व नवीन नोंद झालेली दावे, वनहक्क धारकांना सातबारा वाटप, मोजणी झालेली प्रकरणे तसेच मोजणीसाठी प्रलंबित प्रकरणे, फेर चौकशीसाठी पाठविलेली प्रकरणे, अपील प्रकरणे शासन निर्णयातील तरतुदीनुसार तात्काळ निकाली काढून पात्र वनहक्क धारकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले. तसेच यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचाही आढावा घेतला. *****

जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू

हिंगोली (जिमाका), दि. 24 : एप्रिल व मे महिन्यात हिंगोली जिल्ह्यात होणाऱ्या विविध सण-उत्सव, स्पर्धा आणि सभा, बैठका, धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी दिले आहेत. दि. 30 एप्रिल,2025 रोजी महात्मा बसवेश्वर जयंती, दि. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन, दि. 9 मे रोजी महाराणा प्रताप जयंती, दि. 12 मे रोजी बौध्द पोर्णिमा आणि दि. 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती तारखेप्रमाणे तसेच विविध देवी देवतांच्या वार्षिक यात्रा, उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, शंकर पटाच्या शर्यती, कब्बडी, कुस्ती आयोजित करण्यात येतात. तसेच मराठा आरक्षण व इतर आरक्षण संबंधाने घडणाऱ्या राजकीय घडामोडी, नागरिक, विविध संघटना, पक्ष यांच्या मागण्यासंदर्भात मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दि. 25 एप्रिल, 2025 रोजी मध्यरात्रीपासून ते दि. 14 मे, 2025 रोजी मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे. त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्याजवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तूजवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटकद्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल, अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील, या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. ******

23 April, 2025

राज्यस्तरीय कराटे तायकांदो चषक विजेत्यांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते गौरव

हिंगोली (जिमाका), दि. 23 : संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय ऑल स्टाईल मार्शल आर्टस कराटे तायकांदो चषक-2025 स्पर्धेत हिंगोली जिल्ह्याला तिसरे पारितोषिक मिळाले आहे. यानिमित्त हिंगोली जिल्ह्यातील गोल्ड मेडल पदक विजेत्यांचा आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी हिंगोली जिल्ह्याला राज्यस्तरीय ऑल स्टाईल मार्शल आर्टस कराटे तायकांदो चषक-2025 स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. आता करिअर करण्यासाठी अनेक क्षेत्र उपलब्ध झाली आहेत. कराटे क्षेत्रात चांगली प्रगती करत फिजिकल फिटनेससाठी ही बाब उपयुक्त आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी निवड केल्यामुळे व्यक्तिमत्व विकास होत आहे. त्यामुळे पालकांचे अभिनंदन करुन विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांच्या हस्ते आज 14 वर्षाखालील वयोगटातील मुली अन्वी हनुमंत भिंगारे (16 कि.वजनगट) जान्हवी विनोद कुबडे (20 ते 22 कि. वजनगट), वैभवी गजानन नागरे (22 ते 24 कि. वजनगट), तेजश्री नवनाथ दराडे (16 ते 18 कि. वजनगट) यांना तसेच 14 वर्षावरील वयोगटातील मुले अर्नव विनोद कुबडे (18 ते 21 कि. वजनगट), अमेय सुदेश भारतीया (24 ते 28 कि. वजनगट), तनय विलास चव्हाण (21 ते 23 कि. वजनगट), तन्मय संजय गुट्टे (25 ते 27 कि. वजनगट), मुंगसाजी दत्ता खोकले (29 ते 32 कि. वजनगट), सुरज भगीरथ कोरडे (23 ते 25 कि. वजनगट), हासीर शेख (35 ते 38 कि. वजनगट), पुष्कराज पंकज पतंगे (38 ते 41 कि. वजनगट), साईनाथ दादाराव निलकंठे यांना तर 17 वर्षाखालील वयोगटातील अशाजखान माजीद खान पठाण (35 कि.वजनगट), युवराज विश्वनाथ दळवे (45 ते 48 कि. वजनगट) आणि 19 वर्षाखालील वयोगटातील सहायक प्रशिक्षक शुभम प्रभाकर मुंडे यांचा गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच प्रशिक्षक नवनाथ बांगर यांना हिंगोली जिल्ह्यातील पहिला कोरियन ब्लॅक बेल्ट मिळाल्यामुळे त्यांचाही गौरव जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विजेत्या मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******

जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्यानिमित्त आयोजित कार्यशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

हिंगोली (जिमाका), दि. 23 : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा 2025 च्या अनुषंगाने जलसंपदा व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या शेतकरी प्रशिक्षण सभागृहामध्ये आज पीक पध्दती, उत्पादकता वाढ व पाण्याचे नियोजन याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मंडळ अधीक्षक अभियंता हिंगोलीचे पालक अभियंता सुधाकर कचकलवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राजेश भालेराव, उगमचे जयाजी पाईकराव यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी पीक पध्दती, पाण्याचे नियोजन व त्या अनुषंगाने कृषी विभागाशी संबंधित विविध शासकीय योजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले. उगमचे जयाजी पाईकराव यांनी पाणी बचतीबाबत जनजागृतीच्या अनुषंगाने विविध स्तरावर होत असलेल्या लोकसहभागाच्या प्रयत्नाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. अधीक्षक अभियंता सुधाकर कचकलवार यांनी कृषी विभागामार्फत संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यशाळेचा उपयोग शेतकऱ्यांना पीक उत्पादन वाढीस होईल, असे मत व्यक्त केले. तसेच शेतकरी प्रदीपराव देशमुख यांनी ऊस शेतीसाठी अच्छादीत पध्दतीचा वापर केल्यामुळे पाणी बचत होऊन पिकाचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली असल्याचे अनुभव कथन केले. दुपारच्या सत्रात शास्त्रज्ञ राजेश भालेराव यांनी पीक पध्दती, उत्पादकता वाढ व पाण्याचे नियोजन या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात उपस्थित शेतकरी पुत्र गजानन गणेश भवर यांची राज्य राखीव पोलीस दलामध्ये निवड झाल्याने सत्कार करण्यात आला. कार्यशाळेस परिसरातील शेतकरी उपस्थित होते. *******

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 'ॲग्री स्टॅक' प्रणालीत तात्काळ नोंदणी करावी -जिल्हाधिकारी

हिंगोली (जिमाका), दि. 23 : महाराष्ट्र शासनाने दि. 11 एप्रिल 2025 रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी 'अँग्री स्टॅक' प्रणालीत नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. शासनाच्या कृषी योजना, अनुदाने आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करणे अत्यावश्यक आहे. ॲग्री स्टॅक प्रणालीवर नोंदणी करुन फार्मर आयडी काढून घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच शासकीय योजनांचा लाभ मिळणार असल्यामुळे ही नोंदणी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. नोंदणी प्रक्रियेमध्ये तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामसेवक यांची मदत उपलब्ध असून, हे कर्मचारी शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य करतील. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या जवळच्या सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) केंद्रावर जाऊन अँग्रीस्टॅक प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी आणि फार्मर आयडी काढून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. ******

अक्षय तृतियेला बालविवाह केल्यास होणार कठोर कारवाई - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 23 : येत्या बुधवार (दि.30) रोजी 'अक्षय्य तृतीया’ असून, या दिवशी जिल्ह्यात संभाव्य बाल विवाहाच्या घटना घडू शकतात. ते संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक ती खबरदारी घ्यावी. तसेच असे बालविवाह केल्यास कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यंत्रणेला दिले आहेत. तसेच नागरिकांनी बालविवाह रोखण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1098 किंवा 112 यावर माहिती द्यावी, नागरिकांनी सतर्क राहून बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 आणि महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2022 लागू करण्यात आला आहे. त्यानुसार बालविवाह आयोजित करणे अजामीनपात्र गुन्हा आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना शहरी भागासाठी तर ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तसेच ग्रामीण भागाकरिता अंगणवाडी सेविका व शहरी भागाकरिता पर्यवेक्षिका यांना सहाय्यक बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. 'अक्षय्य तृतीया' या दिवशी हिंगोली जिल्ह्यात बालविवाह होवू शकतात व यास प्रतिबंध म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. त्यानुसार एखाद्या पुरुषाने अल्पवयीन वधूशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणाऱ्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीचो कैद आणि एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. बालविवाह झाल्यास, संबंधित वर व वधू यांचे आई-वडील किंवा पालक व अन्य नातेवाईक मित्र परिवार, विवाह विधी पार पाडणारे संबंधित व्यक्ती, धार्मिक गुरु, पंडित, काजी, सेवा देणारे, मंडप मालक, फोटोग्राफर, केटरिंग व्यावसायिक, लॉन्स मालक आणि वाजंत्री असे सर्व, ज्यांनी हा बालविवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो रोखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत व विवाहात सामील झालेल्या सर्वांना दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद व एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. सोबतच ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांनी जन्म दाखल्याची खोटी नोंद केल्यास त्यांच्यावर सुध्दा गुन्हा दाखल होऊ शकतो. ******

संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बार्टीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

हिंगोली (जिमाका), दि. 23 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वायत्त संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग (युपीएससी)मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण देण्यात येते. तसेच मुख्य परीक्षा व मुलाखत चाचणीकरिता पात्र झालेल्या उमेदवारांना आर्थिक साहाय्य दिले जाते. संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा 2024 परीक्षेच्या दिनांक 22 एप्रिल, 2025 रोजी लागलेल्या निकालात बार्टीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या निकालात बार्टी संस्थेच्या तब्बल 11 विद्यार्थ्यांची निवड झाली असून विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे रँक मिळाल्या आहेत... 1) आयुष राहुल कोकाटे - रँक 513, 2) बुलकुंडे सावी श्रीकांत - रॅंक 517, 3) प्रांजली खांडेकर- रॅंक 683, 4) राजूरकर अतुल अनिल - रँक 727, 5) खंदारे मोहिनी प्रल्हाद - रॅंक 844, 6) सरवदे अजय नामदेव- रॅंक 858, 7) अभिजय पगारे- रॅंक 886, 8) पानोरेकर हेमराज हिंदुराव- रॅंक 992, 9) बोराडे प्रथमेश सुंदर- रॅंक 926, 10) जाधव सुमेध मिलिंद- रॅंक 942, 11) सदावर्ते आनंद राजेश- रॅंक 945. कठोर मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि संसाधनांचा प्रभावी वापर यांच्या जोरावर त्यांनी हे अत्युच्च यश संपादन केले आहे. यूपीएससी परीक्षा देशातील सर्वात अवघड परीक्षांपैकी एक मानली जाते आणि त्यामधील यश ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे. बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी सांगितले की, “संस्थेच्या माध्यमातून सामाजिकदृष्ट्या मागास वर्गातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता आणि कौशल्यवृद्धीच्या दिशेने चालना देण्याचे काम आम्ही सातत्याने करत आहोत. यंदाचे युपीएससी मधील विद्यार्थ्यांचे यश हे संस्थेच्या प्रयत्नांची फलश्रुती आहे.” केंद्रीय सेवांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी समाजातील विध्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. बार्टीने त्यांच्या यशाचे औचित्य साधून भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी अधिक व्यापक आणि सुसज्ज प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शखाली व सामाजिक न्याय विभागाच्या या पुढाकारामुळे अनेक विद्यार्थी सशक्त होत असून, समतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून या उपक्रमाची दखल देशभरात घेतली जात आहे. महासंचालक सुनील वारे, निबंधक इंदिरा अस्वार यांनी या निकालात 11 विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, यूपीएससी विभाग प्रमुख शुभांगी पाटील व त्यांच्या टीमचे विशेष अभिनंदन केले. __ यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोगत/फोटो अतुल अनिल राजूरकर मी नांदेड येथून बीई केले आहे. माझे वडील टेलिफोन ऑपरेटर होते. बाबासाहेबांच्या शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या विचाराने प्रेरीत होऊन अनेक अपयशावर मात करीत मी युपीएससी पास झालो आहे. या प्रवासात बार्टीच्या युपीएससी नागरी सेवा आर्थिक सहाय्य योजनेची मुख्य परीक्षेस आणि मुलाखतीस खूप मदत झाली. टेस्ट सिरीज लावता आली. मुलाखतीसाठीची तयारी करता आली. बार्टीमुळे आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार झाले. मोहिनी प्रल्हाद खंडारे माझे शालेय शिक्षण यवतमाळ पुसद येथून झाले. बीई केल्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात काम न करता सार्वजनिक क्षेत्रात आपल्या लोकांसाठी काम करावे वाटले. आणि युपीएससीच्या तयारीला लागले. सोबत बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा होतीच. आईवडिलांचे, दादाचे सहकार्य होते. वडील शिक्षक होते. खूप प्रयत्नांनी युपीएससी पास झाले. बार्टीच्या युपीएससी नागरी सेवा आर्थिक सहाय्य योजनेची मुख्य परीक्षेस आणि मुलाखतीस खूप मदत झाली. निश्चिंत होऊन अभ्यास करता आला. यशस्वी होता आले. ***

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे डिग्रस कऱ्हाळे येथे आयुष्मान व किसान कार्ड शिबिरात मार्गदर्शन

हिंगोली (जिमाका), दि. 23 : हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आज आयुष्यमान कार्ड व किसान कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते आयुष्यमान कार्ड व किसान कार्ड काढणाऱ्या शेतकऱ्यांना कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी उपस्थित ग्रामस्थांना कृषी, आरोग्य शिक्षण या संदर्भात अडीअडचणी विचारून घेतल्या व शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनाबाबत त्यांना तसेच बचत गटाच्या महिलांना शासनाच्या योजनाची माहिती दिली. तसेच त्यांनी डिग्रस कऱ्हाळे येथील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला शासकीय गायरानातील जमीन हस्तांतरित करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, गटविकास अधिकारी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संभाजी कऱ्हाळे, ग्रामविकास अधिकारी श्री. हेलगड, मंडळ अधिकारी, तलाठी, गजानन रणखांब, डॉ.संगीता टारफे, बळीराम पाटील, शिवाजी कऱ्हाळे, रावसाहेब कऱ्हाळे, बळीराम पाटील, अशोक काळे, शैलेश कऱ्हाळे, शिवम कऱ्हाळे, छाया कऱ्हाळे, अंगणवाडी ताई व आशा वर्कर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ***

उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्हाधिकारी तथा उद्योग उपायुक्त राहुल गुप्ता यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन उद्योजकांसोबत चर्चा केली व येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी उद्योजकांना दिली. जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष असोसिएशनच्या भूखंडाची तसेच भविष्यात चालू होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व लवकरात लवकर पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या. एमआयडीसीमधील पोलीस चौकी, वीज, रस्ते, पाणी, अंतर्गत वीजपुरवठा, राष्ट्रीयकृत बँकेची शाखा या विषयावर संघटनेसोबत सविस्तर चर्चा करून येणाऱ्या कुठल्याही अडचणी सोडविण्यासाठी हमी यावेळी त्यांनी दिली. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या सकारात्मक चर्चेमुळे उद्योजकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होऊन नक्कीच नवीन उद्योग जिल्ह्यामध्ये येण्यास आता मोठा वाव असल्याबद्दल उद्योजकांच्या मनामध्ये शंका राहिली नाही, अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वर मामडे यांनी यावेळी दिली. तसेच प्रत्यक्ष एमआयडीसीमध्ये येऊन उद्योजकांसोबत हितगुज साधल्याबद्दल उद्योजकांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी हिंगोली जिल्हा औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मामडे, उपाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, सचिव प्रवीण सोनी, जनकराज खुराना, सुनील देवडा, कुशल मुंदडा, शशिकांत दोडल, नितीन राठोड, भारत चिकटे, ओमप्रकाश हेडा, अंकित सोनी, जितेन ठक्कर, विकास कराळे, विठ्ठल कराळे व परिसरातील उद्योजक उपस्थित होते. ***

अडचणीत असलेल्या प्रवाशांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा जम्मू काश्मीर येथील घटनाक्रम ; हिंगोली जिल्हा प्रशासनाचे आवाहन

हिंगोली (जिमाका),दि. २३ : हिंगोली जिल्हा प्रशासनाने जम्मू काश्मीर येथील घटनाक्रमानंतर पर्यटनाला गेलेल्या किंवा या घटनाक्रमाची संबंधित असणाऱ्या नागरिकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत या संदर्भात हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनाला गेलेल्या नागरिकांसंदर्भात अडचण असेल, संपर्क होत नसेल, तर 9405408939 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन कार्यालय मदतीसाठी सज्ज असून जम्मू-काश्मीरमध्ये थेट संपर्कासाठी काही नंबर प्रशासनाने दिले आहेत. यामध्ये जम्मू काश्मीर प्रशासनाने जारी केलेल्या 0194-2483651, 0194-2457543 तसेच व्हॉट्सअप क्रमांक 7780805144, 7780938397 क्रमांकाचा समावेश आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता जर आपले नातेवाईक अडचणीत असेल तर या क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहनही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी केले आहे. *****

22 April, 2025

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला विविध योजनांचा आढावा

• रोहयोची अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करा-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता • विविध योजनेची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश • प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना पाच झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करा हिंगोली (जिमाका), दि. 22: महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून घेण्यात येणारी अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, विविध आवास योजना, जलशक्ती अभियान, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोल, पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे, पुष्पा पवार, सर्व गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले, जिल्ह्यात रोहयोची मंजूर असलेली सर्व कामे वेळेत आणि जलदगतीने पूर्ण करावीत. मजुरांचे हजेरी पट वेळेत तातडीने पूर्ण करा. तसेच त्यांचे वेतन अदा करण्याची कार्यवाही तातडीने करावी. मजुरांचे वेतन अदा करण्यास विलंब झाल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करावी. त्याला वेळ लागणार नाही याची दक्षता घ्यावी. रेशीम लागवड, फळबाग लागवड, चारा लागवड यासह विविध कामांना वेळेत तांत्रिक मान्यता देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिका-याला दिल्या. दि. 28 एप्रिल व 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत विविध योजनेचे जास्तीत जास्त प्रस्ताव मागवून घ्यावेत. योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. तसेच प्रधानमंत्री आवास टप्पा दोन मधील 3944 घरकुलांना तात्काळ मंजुरी द्यावी तसेच घरकुलाचा पहिला हप्ता 10 हजार 483 लाभार्थ्यांना 30 एप्रिलपर्यंत त्यांच्या बँक खात्यावर जमा करावा. अपूर्ण बांधकाम झालेली घरे तात्काळ पूर्ण करावीत. तसेच घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या जागेत 5 झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करावे. घरकुलांसाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांना गावठाण विस्तारामध्ये जागा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन प्रस्ताव सादर करावेत. त्यास मान्यता देण्यात येईल. तसेच आवास योजनेची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिल्या. स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत आढावा घेताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाला गती द्यावी, कुटुंबाना वैयक्तिक कचरा कुंडी तसेच गावात सार्वजनिक कचराकुंडी उपलब्ध करून द्यावी व गावे ओडीएफ प्लस मॉडेल करावीत, वैयक्तिक शौचालय पूर्ण करावेत तसेच मोठ्या शाळांना सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना देत यासंदर्भात सविस्तर आढावा घेतला व पुढील बैठकीत याचा प्रगती अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात जलजीवन मिशनची 616 कामे प्रस्तावित असून, 201 कामे पूर्ण झालेली आहेत. प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत. जागेचा किंवा इतर काही वाद असल्यास ते तात्काळ सोडविण्यात यावेत. यासाठी पोलीस संरक्षणाची गरज भासल्यास तसे कळवावे. त्यानुसार आपणास पोलीस संरक्षण देण्यात येईल. जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरामध्ये पाणी पोहोचविण्यासाठी 'हर घर जल' मोहिम यशस्वीपणे राबवावी. काम करण्यास अडचण येत असलेल्या गावांची यादी तयार करावी. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी सांगितले. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 73 गावांची निवड करण्यात आली होती. निवड केलेल्या गावांमध्ये विविध विभागाने ७८.७५ कोटी रुपयांच्या 1805 कामांचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला होता. त्यापैकी विविध विभागाने 1155 कामे पूर्ण करण्यात आली आहेत, तसेच पूर्ण झालेल्या कामावर 23.98 कोटी खर्च करण्यात आलेला आहे. 104 कामे प्रगतीपथावर आहेत. प्रकल्पनिहाय प्रलंबित कामाचा आढावा घेऊन ती कामे तात्काळ पूर्ण करावेत. जलशक्ती अभियानांतर्गंत 'कॅच दि रेन' उपक्रम राबवावा. पाण्याच्या स्त्रोताच्या ठिकाणी शोषखड्डे (रिचार्ज शॉफ्ट) घेण्यात यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिल्या. ****

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला कृषि विभागाचा आढावा

* शेतकऱ्यांनी बी.बी.एफ. व टोकन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन उत्पादकता वाढवावी-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हिंगोली (जिमाका), दि. २२: कृषी विभाग व विविध खत कंपनीच्या प्रतिनिधींनी योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे व खत पुरवठा होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्यासह कृषि व ईतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री.गुप्ता यांनी बैठकीदरम्यान खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया व डीएपी या खतांचा संरक्षित साठा व नियोजन याविषयी सविस्तर चर्चा केली. तसेच शासनाच्या सुचनेप्रमाणे युरिया व डी.ए.पी खतांचा संरक्षित साठा करण्याच्या नियोजनास मान्यता दिली. त्याचबरोबर एचटीबीटी कापूस बियाण्यांची अनधिकृत विक्री रोखण्यासाठी पोलीस विभाग, महसूल विभाग व कृषी विभाग यांनी संयुक्तपणे दक्षता घेण्याचे आदेश दिले.अशा बियाण्यांची विक्री निदर्शनास आली, तर पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत कलम 15 व 16 अन्वये कडक कारवाई करण्यात येईल. यामध्ये पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड, एक वर्षाचा कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. खरीप हंगामात बियाणे, खते व कीटकनाशके यासंबंधी तक्रारींचे निवारण करण्यासाठी कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी त्यांच्या 9421490222 या क्रमांकावर संपर्क साधून नोंदवाव्यात. तालुका स्तरावर देखील कृषि अधिकारी, पंचायत समिती यांच्या अध्यक्षतेखाली अशी केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत. या बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी बी.बी.एफ. आधारित व टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड करण्यासाठी व्यापक प्रचार व प्रसिध्दी करण्याचे निर्देश कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांनी बी.बी.एफ. व टोकन तंत्रज्ञानाचा मोठ्या क्षेत्रावर अवलंब करुन उत्पादकता वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी केले. ******

जागतिक हिवताप दिन साजरा करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 22 : दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस "जागतिक हिवताप दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. जनतेमध्ये हिवतापाविषयी जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. "हिवताप आपल्या सोबत संपतो पुन्हा गुंतवणूक करा, पुन्हा कल्पना करा, पुन्हा प्रज्वलित करा" हे यावर्षीचे घोषवाक्य आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हिवताप आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्ह्यातील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, सेविका व आशा वर्कर यांच्यामार्फत डासअळी सर्व्हेक्षण, जलद ताप सर्व्हेक्षण, अँबेटींग, संडासच्या व्हॅट पाईपला जाळी बसवणे, गप्पी मासे सोडणे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना विषयी आरोग्य शिक्षण देणे, गटसभा घेणे इत्यादी कार्यक्रम नियमितपणे राबविण्यात येतात. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार, भारतामध्ये सन 2030 पर्यंत हिवताप दुरीकरण करण्याचे ठरविले आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यात यावे. तसेच हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया वा किटकजन्य आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी या मोहीम काळातच नाही तर नेहमीसाठी आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. घरातील पाणी साठ्यावर झाकण ठेवावे, नाल्या, गटारे वाहते ठेवावे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, मच्छरदानीचा वापर करावा, उघड्या खिडक्याना जाळ्या बसवावेत, संडासच्या व्हॅट पाईपला जाळी बसवावी, भंगार सामान व निकामी टायर याची विल्हेवाट लावावी, कुलर, फ्रिजजच्या ड्रिपपॅन मधील पाणी नियमितपणे स्वच्छ करावे, पाण्याच्या हौद, टाक्या, रांजन इत्यादी दर आठवडी स्वच्छ करावे. थंडी वाजून ताप येणे, मळमळ होणे, डोके दुखणे, अंगदुखी इत्यादी हिवतापाची लक्षणे आढळून आल्यास जवळच्या आरोग्य संस्थेत संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करुन योग्य औषध उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी केले आहे. *****

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून जिल्हा रुग्णालय यंत्रणेचा आढावा

• एसएनसीयू , एनआरसी, डीईआयसी, एड्स नियंत्रण विभाग व डायलिसिस विभागाचे केले कौतुक हिंगोली (जिमाका), दि. 22 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नुकतीच जिल्हा रुग्णालयातील सर्व विभागांना भेट देऊन पाहणी केली तसेच आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नव्याने होत असलेल्या एमआरआय विभाग, कॅथ लॅब व इतर बांधकामाची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णांलयातील स्वच्छता, पाण्याची व्यवस्था तसेच इतर सोयीसुविधांची माहिती घेत महत्त्वूपर्ण सूचनाही दिल्या. याप्रसंगी हिंगोली जिल्हा रुग्णालयाला एबीडीएममध्ये महाराष्ट्रात प्रथम व एनआरसीमध्ये महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. तसेच बालरोग विभाग, एसएनसीयू, एड्स नियंत्रण विभाग, डायलिसिस विभागांचे विशेष कौतुक केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश टेहरे, बालरोग तज्ञ डॉ. गोपाळ कदम, डॉ. नंदकुमार करवा, डॉ. पुरोहित, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, डॉ. मनीष बगडिया, इत्यादी अधिकारी, डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. ******