13 January, 2026
हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे भव्य कार्यक्रम, हिंगोली जिल्ह्यात नियोजन बैठक संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 13 : श्री गुरु तेग बहादुर हे शीख धर्माचे नववे गुरु असून त्यांना “हिंद-की-चादर” म्हणून ओळखले जाते. त्यांनी प्रार्थना, परोपकार, सेवा, साधेपणा, निर्भीडपणा व मानवतेच्या सेवेला सर्वोच्च स्थान दिले. धर्मस्वातंत्र्य व मानवी हक्कांच्या रक्षणासाठी त्यांनी 17 व्या शतकात तत्कालीन अन्याय व अत्याचारांविरोधात आवाज उठवून महान बलिदान दिले. त्यांच्या प्रवचनांचा व भजनांचा समावेश “गुरु ग्रंथ साहिब” मध्ये असून त्यांच्या त्यागामुळे भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेला बळकटी मिळाली आहे.
तत्कालिन शासकांच्या विरोधात जाऊन भाई लकीशा बंजारा यांनी श्री गुरु तेग बहादुर यांच्या पवित्र पार्थिवास आपला तांडा व घर जाळून अग्नी दिल्याची घटना भारतीय इतिहासातील अनन्यसाधारण प्रसंग आहे. सन 2025 हे श्री गुरु तेग बहादुर यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षाचे औचित्य साधून नांदेड येथे दि. 24 व 25 जानेवारी 2026 रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना, लातूर, धाराशिव, हिंगोली, बीड, नंदुरबार, धुळे व जळगाव या 11 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून संपूर्ण राज्यातील शीख सिकलीकर, बंजारा लबाना, मोहियाल, सिंधी व इतर समाजांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संदीपकुमार सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) शेख मोहम्मद तौफिक, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते तसेच विविध समाजांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी, प्रवास, निवास, भोजन व्यवस्था करण्याबाबत चर्चा करण्यात आली. श्री गुरु तेग बहादुर यांचा गौरवशाली इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये रांगोळी, निबंध, चित्रकला व हस्तकला स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून प्रचार रथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
“हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment